चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 जुलै 2023

Date : 7 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नव्या जोमाने भारताची १४ जुलैला चंद्रावर स्वारी; ‘चंद्रयान-३’ मोहिमेंतर्गत २३-२४ला ‘लँडिंग’चा प्रयत्न
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान ३’ मोहिमेची तारीख निश्चित झाली असून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता एलव्हीएम-३ या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. २३ किंवा २४ तारखेला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ‘इस्रो’ने गुरूवारी जाहीर केले. चंद्रयान-२ मोहिमेतील अपयशातून धडा घेत ‘लँडर’ आता अधिक शक्तिशाली करण्यात आला आहे.
  •  तमिळनाडूतील श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपणतळावरून चंद्रयान ३ चे उड्डाण होईल. चंद्रयानाच्या सर्व चाचण्या झाल्या असून ‘लाँच व्हेईकल मार्क थ्री’ या प्रक्षेपणयानावर ते सिद्ध करण्यात आले आहे. चंद्रयान-३ मोहिमेचे दोन प्रमुख भाग असतील. ‘चंद्राचे विज्ञान’ (सायन्स ऑफ द मून) याअंतर्गत चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावील प्लाझ्माचे प्रमाण तसेच लँडिंग स्थळाच्या आसपास असलेल्या चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जाणार आहे. तर ‘चंद्रावरून विज्ञान’ (सायन्स फ्रॉम द मून) याद्वारे चंद्राच्या कक्षेमधून पृथ्वीचा अभ्यास केला जाणार आहे. या दुसऱ्या संशोधनासाठी चांद्रयान-२मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. चांद्रयान-२मध्ये केवळ लँडर (चांद्रपृष्ठावर उतरणारे वाहन) आणि रोव्हर (चांद्रपृष्ठावर चालणारे वाहन) होते. चांद्रयान-३मध्ये या दोन वाहनांखेरीज प्रोपल्शन (प्रेरक) हे तिसरे वाहन बसविण्यात आले आहे. यामुळे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवरील वर्णपटासह अन्य निरीक्षणे नोंदविता येणार आहेत. याखेरीज अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था, ‘नासा’ची काही उपकरणेही चांद्रयान-३मार्फत चंद्राकडे पाठविण्यात येणार आहेत.
  • २३ किंवा २४ तारखेला चांद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष सोमनाथ एस. यांनी जाहीर केले. चंद्रावर १४-१५ दिवस सूर्यप्रकाश तर १४-१५ दिवस अंधार असतो आणि लँडिंगसाठी सूर्यप्रकाश असणे आवश्यक असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन ‘विक्रम’ उतरविले जाईल, अशी माहिती मोहिमेतील संशोधकांनी दिली.

 ‘अलगद’ उतरण्याची सिद्धता

  • ’चंद्रयान-२मध्ये लँडरच्या पायांची क्षमता २ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याची होती. त्यामुळे चांद्रपृष्ठावर उतरताना हे वाहन टिकू शकले नाही आणि ‘रोव्हर’ही चालू शकला नाही. ’मात्र आता चंद्रयान-३मधील लँडरच्या पायांची क्षमता ३ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याइतकी वाढविण्यात आली आहे. शिवाय अधिक अलगदपणे उतरता यावे व परत येण्याचा प्रयत्न करता यावा,  यासाठी लँडरमध्ये अधिक इंधनही ठेवण्यात आले आहे.
ISROच्या महत्वकांक्षी Chandrayaan 3 मोहिमेची तारीख आणि वेळ ठरली…
  • अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेले काही महिने चर्चेत असलेल्या इस्रोच्या (ISRO) चांद्रयान ३ ( Chandrayaan 3 ) मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १४ जुलैला दुपारी दोन वाजून ३५ मिनीटांनी आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटा इथून चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार आहे. त्या दिवसाची आणि वेळेची घोषणा आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO ( indian space research organisation ) ने केली आहे.
  • इस्त्रोचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे LVM3-M4 हे महाकाय रॉकेट – प्रक्षेपक हे उड्डाणाच्या ठिकाणी Chandrayaan-3 ला घेऊन पोहचले आहे. आता लवकरच त्यामध्ये इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि हवामान अनुकूल असेल तर नियोजित वेळी रॉकेट गर्जना करत अवकाशात झेप घेईल.
  • Chandrayaan-3 चे उड्डाण हे जरी १४ जुलैला होणार असले तरी चंद्रावर उतरण्यासाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लॅडरनधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे.
  • ही मोहिम यशस्वी झाली तर चंद्रावर अलगद यान आणि रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान २ मोहिमेत काय झालं होतं ?

  • चांद्रयान २ मोहिम ही जुलै २०१९ ला झाली आणि ऑगस्ट महिन्यात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वेग नियंत्रित न झाल्याने चंद्रावर उतरणारे लॅडर हे चंद्राच्या जमिनीवर आदळळे होते आणि त्याचे तुकडे झाले होते. मात्र या मोहिमेत चंद्राभोवती एक उपग्रह हा कक्षेत स्थिर करण्यात इस्त्रोला यश आले होते. हा उपग्रह चंद्राभोवती अजुनही फिरत असून त्याने चंद्राच्या जमिनीचा नकाशा तयार केला आहे.
राज्यातील तुरुंगात सुमारे अडीच हजार मनोरुग्ण!
  • राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मनोरुग्णांची संख्याही फार मोठी असल्याचे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे अडीच हजार मनोरुग्ण कैदी आहेत. या कैद्यांसाठी मानसोपचारासाठी आवश्यक असलेली औषधेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागात मनोविकृती चिकित्सकांच्या मंजूर ९७ पदांपैकी ८१ पदे रिक्त आहेत.
  • महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे असून यामध्ये नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा तर १९ खुली आणि एक खुले महिला कारागृह आहे. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ इतकी असून जानेवारी २०२३ अखेरीस या कारागृहात एकूण ४१ हजार ७५ बंदी होते. यामध्ये ३९ हजार ५०४ पुरूष तर १५५६ महिला आणि १५ तृतीयपंथी कैद्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व कारागृहात क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कैदी असून प्रामुख्याने यात मुंबई, ठाणे, येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. मुंबईतील कारागृहात क्षमतेपेक्षा ३२५ टक्के अधिक तर ठाणे कारागृहात २८८ टक्के, येरवडा येथे १८० टक्के आणि नागपूर कारागृहात ५६ टक्के क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी मांडला होता. वेगवेगळ्या तुरुंगातील कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व त्यांना योग्य त्या आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक कैद्यांना त्वचाविकारांचा त्रास होतो तसेच मानसिक आजारांचाही त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे तुरुंगातील तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहात मानसिक आजाराचे सर्वाधिक म्हणजे ९७४ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा क्रमांक लागतो. ठाणे मध्यवर्ती कारागृहात २०० मनोरुग्ण कैदी असून गेल्या महिन्यात येथे मानसिक आजारावरील उपचारांची औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. तथापि तुरुंग प्रशासनाने औषध उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला असून कैद्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठीही पत्यत्न केल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. ठाण्यापाठोपाठ पालघर येथे १५० तर नागपूर मध्यवर्ती कारागृहात ११४ मनोरुग्ण आहेत. रायगड येथील कारागृहात १०९ मनोरुग्ण तर यवतमाळ जिल्हा कारागृहात ८६ मनोरुग्ण आहेत.
  • अकोला येथे ५४ मनोरुग्ण कैदी आहेत तर लातूर व जळगाव येथील कारागृहात अनुक्रमे ५६ व ३८ मनोरुग्ण कैदी आहेत. नाशिक कारागृहात ५० मनोरुग्ण कैदी असून मुंबईतील येरवडा व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील मनोरुग्ण कैद्यांची माहिती वारंवार विचारूनही आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांकडून उपलब्ध होऊ शकली नाही. तथापि या दोन्ही मध्यवर्ती कारागृहात मोठया प्रमाणात मानसिक आजारांचे कैदी असून आरोग्य विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार यातील बहुतेक कैदी हे पूर्वी अंमली पदार्थांचे सेवेन करणारे असल्यामुळेच त्याचा फटका त्यांना बसला आहे.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, त्सित्सिपास यांचे संघर्षपूर्ण विजय
  • सर्बियाचा २३ ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि ग्रीसचा पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांनी संघर्षपूर्ण विजयांसह विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात आगेकूच केली. महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवा व व्हिक्टोरिया अझरेन्का यांनी विजय नोंदवले.
  • दुसऱ्या मानांकित जोकोव्हिचला विजयासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर ६-३, ७-६ (७-४), ७-५ अशी मात केली. अन्य चुरशीच्या सामन्यात त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमवर ३-६, ७-६ (७-१), ६-२, ६-७ (५-७), ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. इटलीच्या लोरेंझो मुसेट्टीने स्पेनच्या क्वामे मुनारला ६-४, ६-३, ६-१ असे नमवले. चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीकडून ६-४,३-६, ४-६, ६-३, ६-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. 
  • महिला एकेरीत क्विटोवाने जॅस्मिन पाओलिनीवर  ६-४, ६-७ (५-७), ६-१ असा विजय मिळवला. अझरेन्काने  नादिया पोडोरोस्काला ६-३, ६-० असे पराभूत केले. ३५० जोकोव्हिचचा हा ३५०वा ग्रँडस्लॅम विजय ठरला. अशी कामगिरी करणारा तो रॉजर फेडररनंतरचा (३६९) केवळ दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
‘मेटा’च्या ‘थ्रेड्स’वर लाखोंच्या उडय़ा! ‘ट्विटर’शी स्पर्धा; पहिल्याच दिवशी दोन कोटींहून अधिक सभासद
  • शब्दसंवादावर भर देणारे चर्चापीठ म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाशी थेट स्पर्धा करणारे ‘थ्रेड्स’ हे नवीन समाजमाध्यम फेसबुक, इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने गुरुवारपासून कार्यान्वित केले. इलॉन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यापासून ट्विटरवर वारंवार होत असलेल्या बदलांना त्रासलेल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा ‘थ्रेड्स’चा प्रयत्न असून पहिल्या दिवशी अवघ्या १२ तासांत सव्वा दोन कोटी जणांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली.
  • प्रथमदर्शनी ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे. ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेच्या जवळपास दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, छायाचित्रे आणि पाच मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल.
  • या वैशिष्टय़ांमुळे ‘थ्रेड्स’ ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून केलेली कामगार कपात, त्यावरील ओळख पडताळणीसाठीची मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे.  जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा ‘थ्रेड्स’ला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • थ्रेड्सचा इंटरफेस अतिशय साधा असून त्यामध्ये ट्विटरसारखी व्यक्तिगत संदेश देवाणघेवाण करण्याची सुविधा नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी हे अ‍ॅप कार्यान्वित झाल्यानंतर भारतासह ब्रिटनमध्ये पोस्ट प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.

 

लोकसभेत राजन विचारे शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद :
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद असतील. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

  • राज्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी युती करण्याची विनंती केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराब पाटील यांनी शिवसेनेचे डझनभर खासदार शिंदे गटात सामील होतील, असा दावा केला होता.

  • आमदारांनंतर खासदारांकडूनही संभाव्य बंडाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार असून राज्यसभेत तीन खासदार आहेत.

‘यूनो’च्या ‘फोर्स कमांडर’पदी लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम ; दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या प्रमुखपदी शैलेश तिनईकर यांच्या जागी नियुक्ती :
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेच्या ‘फोर्स कमांडर’पदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्या जागी करण्यात आली आहे.

  • २०१९ मध्ये तिनईकर यांना ‘फोर्स कमांडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिनईकर यांचे अथक समर्पण, अमूल्य सेवा आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस त्यांचे आभारी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांनी ३६ वर्षे भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. २०१५ ते २०१६ या काळात त्यांनी ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग आणि २०१३ ते २०१४ या काळात ‘माउंटन ब्रिगेड’चे ‘कमांडर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

  • २००८ ते २०१२ दरम्यान त्यांनी व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये भारताचे संरक्षण प्रभारी म्हणून आणि २००० मध्ये सिएरा लिओनमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेत अधिकारी म्हणून काम केले. अगदी अलीकडे, त्यांनी मध्य भारतात लष्करी क्षेत्राचे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले. याआधी, त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयात २०१९ ते २०२१ पर्यंत अतिरिक्त महासंचालक आणि २०१८ ते २०१९ पर्यंत ‘स्ट्राइक इन्फंट्री डिव्हिजन’मध्ये ‘डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले.

करोना लसीच्या बूस्टर डोससाठीच्या कालावधीत कपात, केंद्र सरकारचा निर्णय :
  • केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, “१८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना करोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी किंवा २६ आठवड्याने खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देता येईल.”

  • “६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येईल,” असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

  • सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात ४ कोटी ७५ लाख बुस्टर डोस देण्यात आले आहेत. यात ५७ लाख ७५ हजार आरोग्य कर्मचारी, १ कोटी ५ लाख फ्रंटलाईन वर्कर्स आणि २ कोटी ५० लाख ६० वर्षांवरील वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

बाप- मुलीच्या जोडीने भारतीय वायू सेनेत रचला इतिहास, एकाच फायटर प्लेनमधून यशस्वी उड्डाण :
  • बाप आणि मुलीच्या जोडीने भारतीय वायू सेनेत इतिहास रचला आहे. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा ही आपल्या फायटर पायलट वडिलांसोबत विमान उडवणारी पहिली महिला भारतीय वैमानिक बनली आहे. अनन्याने हॉक-132 या विशेष विमानाने ३० मे रोजी उड्डाण केले होते.

  • अनन्याने तिचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा यांच्यासोबत हॉक 132 एअरक्राफ्टमध्ये एअर फोर्स स्टेशन बिदर येथून उड्डाण केले. डिसेंबर २०२१ मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्त झालेली अनन्या शर्मा हीने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर पायलट म्हणून भारतीय हवाई दलात प्रवेश केला.

  • अनन्याला लहानपणापासूनच फायटर पायलट बनायचे होते. अनन्याचे वडील एअर कमोडोर संजय शर्मा १९८९ मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनले आणि मिग-21 स्क्वाड्रनचे कमांडिंग करण्याचा मान त्यांना मिळाला होता.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉस प्रथमच उपांत्य फेरीत ;  महिलांमध्ये हालेप, रायबाकिनाचे विजय :
  • ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा टेनिसपटू निक किरियॉसने बुधवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिलीच्या ख्रिस्टियन गारिनवर सरळ तीन सेटमध्ये मात केली. तसेच महिलांमध्ये रोमेनियाची सिमोना हालेप व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनीही स्पर्धेत आगेकूच केली.

  • पुरुष एकेरीच्या सामन्यात किरियॉसने गारिनचा ६-४, ६-३, ७-६ (७-५) असा दोन तास आणि १३ मिनिटांत पराभव केला. आक्रमक शैलीत खेळ करणारा किरियॉस दमदार सव्‍‌र्हिससाठी ओळखला जातो. त्याने गारिनविरुद्धच्या सामन्यात १७ एसेसची (प्रतिस्पर्ध्याला सव्‍‌र्हिस परतवण्यात अपयश) नोंद केली. तसेच त्याने तीन वेळा गारिनची सव्‍‌र्हिसही मोडली. त्यामुळे त्याने सहज हा सामना जिंकला.

  • त्याचप्रमाणे नवव्या मानांकित ब्रिटनच्या कॅमरून नॉरीने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर ३-६, ७-५, २-६, ६-३, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. उपांत्य फेरीत नॉरीला अग्रमानांकित आणि गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचा सामना करावा लागणार आहे.   

  • महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत २०१९च्या विम्बल्डन विजेत्या हालेपने २०व्या मानांकित अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला ६-२, ६-४ असा शह दिला. तसेच १७व्या मानांकित कझाकस्तानच्या रायबाकिनाने ऑस्ट्रेलियाच्या आयला टोमयानोव्हिचवर पिछाडीवरून ४-६, ६-२, ६-३ अशी सरशी साधली. उपांत्य फेरीत हालेप आणि रायबाकिना आमनेसामने येतील. 

07 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.