चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 मार्च 2024

Date : 18 March, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 Chalu Ghadamodi - 18 March 2024

आदर्श आचारसंहिता
  • आदर्श आचारसंहिता (MCC) हा भारतीय निवडणूक आयोगाने (EC) निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे.
  • हे निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेच लागू होते आणि निकाल घोषित होईपर्यंत ते लागू राहते.
  • MCC ची रचना सर्व स्पर्धकांसाठी समान खेळाचे क्षेत्र राखून आणि निवडणूक फायद्यासाठी अधिकृत यंत्रणेचा गैरवापर रोखून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे.
RCB च्या पोरींची क्रांती! जिंकले WPL चे जेतेपद
  • नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली.
  • मागील हंगामातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सला यंदा देखील उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवलेल्या आरसीबीने सांघिक खेळी केली.
  • प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत चमक दाखवत स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले.
  • त्यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीने हुलकावणी दिली.

१८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)


 Chalu Ghadamodi - 18 March 2023

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचं मूळ ठरलेली जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय?
  • जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ही मागणी करत राज्यातले सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. जोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातल्या विविध शहरांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, आंदोलन किंवा इतर मार्गे होणारा संघर्ष पाहण्यास मिळतो आहे. अशात राज्य सरकारने यावर अद्याप काही तोडगा काढलेला नाही. मुळात प्रश्न हा निर्माण होतो आहे की ही जुनी पेन्शन योजना आहे तरी काय? तसंच त्यासाठी सरकारी कर्मचारी इतके का आग्रही झाले आहेत? याचीच उत्तरं आपण जाणून घेऊ.
  • काय आहे जुनी पेन्शन योजना - जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme ही आहे की ज्या अंतर्गत सरकार २००४ च्या आधी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक निश्चित निवृत्ती वेतन देत होतं हे वेतन कर्मचाऱ्याचा निवृत्त होत असतानाचा पगार किती होता? त्यावर अवलंबून होतं. या योजनेनुसार निवृत्त झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही ही पेन्शन मिळत होती. मात्र या योजनेत फेरबदल करण्यात आले आणि १ एप्रिल २००४ पासून राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) सुरू करण्यात आली.
  • जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय होते - जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जितका पगार होता त्याच्या निम्मा पगार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होती. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा सरकारी नोकरीतून निवृत्त होतानाचा पगार हा ८० हजार रूपये असेल तर त्याचे निवृत्तीनंतरचे निवृत्ती वेतन हे ४० हजार रूपये इतके होते.
  • जुन्या पेन्शन स्कीमनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला हे पेन्शन दिलं जात होतं.
  • या पेन्शनमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नव्हती.
  • नवी पेन्शन योजना अर्थात NPS काय आहे - NPS (New Pension Scheme) नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात केली जाते.
  • नव्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर नेमकं किती पेन्शन मिळणार? याची रक्कम निश्चित नसते
इस्रो आणि नासाच्या सहलीसाठी 33 विद्यार्थी पात्र; विज्ञान सफरसाठी ग्रामीण मुलांना प्रथमच संधी
  • इस्त्रो आणि नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातल्या ३३ शाळकरी मुला-मुलींना पहिल्यांदाच इस्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीची संधी मिळली आहे. या ३३ विद्यार्थ्यांपैकी प्रथम आलेले ११ टॉपर विद्यार्थी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट देणार आहेत.
  • बीड जवळील पाली गावातल्या जिल्हा परिषद शाळेत अभय वाघमारे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. इस्रोसाठी पात्र झाल्याने त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कुटुंबातील व्यक्ती कधीच जिल्ह्याबाहेर देखील गेली नव्हती. पण, अभय छोट्याशा वयात इस्रोला जात आहे. अभयच्या निवडीची माहिती मिळताच कुटुंबासह ग्रामस्थांनी अभयचे अभिनंदन केलं आहे.
  • “इस्त्रोत जाण्यासाठी निवड झाली आहे. तिथे संशोधन कसं केलं जातं, पृथ्वीचं कसं निरीक्षण होतं, संशोधक कसं काम करतात हे पाहणं महत्वाचं आहे. पुढे जाऊ आयआयटी इंजिनीअर होण्याची इच्छा आहे. इस्त्रोत जाऊन गावाचं नाव मोठं करेन,” असं अभय वाघमारे याने बोलताना सांगितलं आहे.
धुळ्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तृतीयपंथीय उत्तीर्ण
  • पोलीस भरतीसाठी आलेली तृतीयपंथीय चांद तडवीची शुक्रवारी सकाळी येथील पोलीस कवायत मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. याआधी राज्य शासनाकडून तृतीपंथींयासंदर्भात शारीरिक चाचणीचे धोरण आणि निकष ठरले नसल्याने चाचणी न देताच चांदला निराश होऊन परतावे लागले होते. शारीरिक आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर चांदच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
  • राज्य शासनाने पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी आरक्षण जाहीर केल्याने चांद तडवी उर्फ बेबो जोगी (२७, सोयगाव, औरंगाबाद) हिने येथे पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. फेब्रुवारीत भरती प्रक्रियेवेळी कागदपत्र पडताळणीसह तिला पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाकडून तृतीय पंथियांसाठी शारीरिक मोजमापाचे तसेच मैदानी चाचणीचे निकष कोणते असावेत, याबाबत कुठलेही धोरण ठरले नव्हते. यामुळे चांदला राज्य शासनाचे धोरण जाहीर झाल्यानंतर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • राज्य शासनाकडून तृतीयपंथीयांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर चांदला शुक्रवारी सकाळी पुढील प्रक्रियेसाठी धुळे येथे बोलविण्यात आले होते. चांदने निकषानुसार सर्व प्रक्रिया पार पाडली. शारीरिक तसेच मैदानी चाचणीही झाली. पोलीस कवायत मैदानावर तिच्या एकटीच्या चाचणीसाठी पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संभाजी पाटील, निरीक्षक पावरा यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तिला सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धीर दिला. आता तिला लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार असल्याने चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
उत्तराखंडची जन्मकथा, …’उत्तर’कळा मात्र अद्यापही सुरूच!
  • उत्तराखंड या वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलक किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. सोमवारी (दि. १३ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला. मागच्या ११ वर्षांपासून हा मुद्दा तापला होता. वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात काही आंदोलकांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते, काही जणांना तुरुंगवास भोगावा लागला होता.
  • आजवर अनेक पक्षांनी राज्याच्या निर्मितीचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २०२२ च्या निवडणुकीआधी भाजपाने, ‘अटलजीने बनाया, मोदीजी सवारेंगे’ असा नारा दिला. या नाऱ्याद्वारे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली हे जनतेच्या लक्षात आणून दिले गेले. भाजपाला सत्ता मिळताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आंदोलनादरम्यान तुरुंगात गेलेल्या आंदोलनकर्त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली.
  • दीर्घकाळ सामाजिक-राजकीय संघर्ष केल्यानंतर ९ नोव्हेंबर २००० साली उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडे डोंगररांगांनी व्यापलेल्या भागाला स्वतःची ओळख मिळाली. उत्तरांचल हे भारताचे सत्ताविसावे राज्य म्हणून घोषित झाले. कालांतराने याचे नामकरण उत्तराखंड करण्यात आले. उत्तराखंडमधील लोकांच्या संघर्षाचा इतिहास खूप मोठा आहे. त्याची सुरुवात १८१५ पासून होते. ईस्ट इंडिया कंपनीने १८१५ मध्ये जेव्हा आताच्या उत्तराखंडमधील कुमाऊॅं हिल्सवर ताबा मिळवला तेव्हापासून येथील लोकांनी विशेष अधिकार आणि सवलतींची मागणी केली होती.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 18 मार्च 2022

 

ऑलिम्पियाड बुद्धिबळचे भारताला यजमानपद; यंदा जुलै-ऑगस्ट कालावधीत चेन्नईत स्पर्धेचे आयोजन :
  • रशिया-युक्रेन संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाबाहेर हलवण्यात आलेल्या ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान भारताला लाभणार आहे. यंदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जुलै-ऑगस्ट या कालावधीत चेन्नईमध्ये रंगणार असल्याची घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.

  • ‘‘भारतातील बुद्धिबळाची राजधानी (चेन्नई) यंदा ४४व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. तमिळनाडूसाठी ही अभिमानाची बाब आहे. जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचे चेन्नईत स्वागत,’’ असे स्टॅलिन यांनी ‘ट्वीट’ केले. त्यांच्या या विधानाला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानेही (एआयसीएफ) दुजोरा दिला.

  • ‘एआयसीएफ’ने ऑलिम्पियाड स्पर्धेच्या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ‘फिडे’ला १० मिलियन अमेरिकन डॉलर (साधारण ७० कोटी रुपये) देऊ करण्याची तयारी दर्शवली. ऑलिम्पियाड या दर दोन वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जवळपास १९० देशांचे संघ सहभागी होतात. यंदा ही स्पर्धा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात येणार होती. मात्र, युक्रेनवरील हल्ल्यांनंतर ऑलिम्पियाडसह सर्वच बुद्धिबळ स्पर्धा रशियाबाहेर खेळवण्याचा ‘फिडे’ने निर्णय घेतला. 

  • या स्पर्धेच्या आयोजनासाठी चेन्नईसह दिल्ली आणि गुजरात या शहरांची नावेही चर्चेत होती. मात्र मार्चच्या सुरुवातीला ‘एआयसीएफ’चे सरचिटणीस भरत सिंह चौहान यांनी भारताचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांच्यासोबत स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यांच्या पाठिंब्यानंतर ‘एआयसीएफ’ने यजमानपदासाठी चेन्नईचे नाव निश्चित केले. ऑलिम्पियाड ही भारतात होणारी दुसरी सर्वात मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ठरेल. याआधी २०१३ मध्ये विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन या तारांकित खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत भारतामध्ये झाली होती.

धोनीने पहिल्यांदाच सांगितलं ७ नंबरची जर्सी घालण्याचं कारण; म्हणाला, “मी अंद्धश्रद्धाळू…” :
  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडिया सीमेंट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संभाषणात तो ७ नंबरची जर्सी का घालतो, याचे रहस्य उघड केले. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सची आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच फ्रँचायझी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर T20 असो, खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये ७ नंबरची जर्सी परिधान करत आला आहे.

  • क्रिकेटमध्ये सात नंबरची जर्सी घालणारं कोणी नव्हतं. त्यामुळे सात नंबरची जर्सी म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे महेंद्र सिंह धोनी. याआधी ७ नंबरची जर्सी फुटबॉलमध्ये खूप महत्त्वाची असायची. कारण ही जर्सी डेव्हिड बेकहॅम, राऊल आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या दिग्गज खेळाडूंनी परिधान केली होती.

  • व्हर्च्युअल संभाषणादरम्यान धोनी म्हणाला, ‘बर्‍याच लोकांना सुरुवातीला वाटले की सात हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. मात्र, त्यामागे एक अतिशय साधे कारण होते. माझा जन्म जुलै महिन्याच्या सातव्या तारखेला झाला. सातव्या महिन्याचा सातवा दिवस. त्यामुळेच कोणता नंबर चांगला आहे, याकडे जाण्याऐवजी मी माझी जन्मतारीख जर्सीचा नंबर म्हणून निवडली.’

  • एमएस धोनी म्हणाला, ‘मग लोक मला याबद्दल विचारत राहिले. म्हणून, मी त्या उत्तरात भर घालत राहिलो. ७/७ आणि नंतर आणि जन्मवर्ष ८१ आहे. आठ मधून १ वजा केल्यास ७ येते. हा एक नॅचरल नंबर होता. लोक मला जे म्हणत होते ते मी ऐकू लागलो. जेव्हा लोक मला विचारतात तेव्हा मी त्यानुसार उत्तर देतो. सात ही नैसर्गिक संख्या आहे. ती तुमच्या विरोधात जात नाही. म्हणून मी माझ्या उत्तरात ते देखील जोडले. मी याबद्दल खूप अंधश्रद्धाळू नाही, परंतु हा माझ्या मनाच्या जवळचा नंबर आहे. म्हणून, मी माझ्याजवळ ठेवतो,’ असं धोनीने सांगितलं.

ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते. दरम्यान राज्य सरकारने अनेक निर्बंध मागे घेतले असून त्यासंबंधीची नियमावली नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.

  • गृह विभागाने करोनाच्या नियमांचं पालन करावं तसंच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केलं आहे. रंग लावणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. शिमगा साजरा करत असताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नियमात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.

  • भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा त्यांनी केली होती. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली होता. दरम्यान सरकारने निर्बंध मागे घेतल्यानंतर त्यांनी स्वागत केलं असून इतक्या उशीरा शहाणपण सुचलं असा टोलाही लगावला आहे.

भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा :
  • पंजाबमध्ये २३ मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली. या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल.

  • राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

  • केजरीवाल म्हणाले, आप सरकारने देशाच्या राजघानीला भ्रष्टाचारमुक्त केले आहे. आता मान आणि त्यांचे मंत्री पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार देतील, असा विश्वास आहे.

शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश, गुजरात सरकारचा मोठा निर्णय :
  • पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे. ६वी ते १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले.

  • “भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील”, अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली.

  • ६वी ते ८वीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात भगवद् गीता समाविष्ट करण्यात येईल, असं देखील वाघानी म्हणाले.

  • यासोबतच, शाळांमध्ये प्रार्थना, श्लोक पठन, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘असनी’ ठरणार २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ; चारच दिवसात देणार धडक :
  • असनी हे २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेने सरकले आणि आज सकाळी ८.३० वाजता दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर मध्यभागी आले. ते पूर्व-ईशान्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूने आणि त्याच्या बाहेर जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

  • २० मार्चच्या सकाळपर्यंत हे वादळ तीव्र होईल आणि २१ मार्च रोजी चक्री वादळात रूपांतरित होईल.त्यानंतर, ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि २२ मार्चच्या सकाळच्या सुमारास बांगलादेश-उत्तर म्यानमार किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

  • सध्या समुद्राची स्थिती मध्यम ते उग्र आहे. मात्र १८ मार्चपासून ती अत्यंत उग्र होण्याची शक्यता आहे.

१८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.