इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.
‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली.
‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.
तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.
एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या शाळेबाहेर रांगा लागत असताना मराठी शाळांकडे मात्र अनेक पालक नाक मुरडताना दिसतात. भविष्यातील स्पर्धेसाठी आपलं मूल तयार व्हावं यासाठी अनेकजण इंग्रजी शाळांमध्येच मुलांना शिकवण्याकडे प्राधान्य देताना दिसतात. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
पालकांच्या इंग्रजी शिकण्याच्या हट्टापायी मराठी शाळा ओस पडत असताना वर्षा गायकवाड यांनी आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल असं सांगितलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
“अनेक आमदारांनी सीबीएसई, आसीयएसईचा अभ्यासक्रम असा आहे सांगितलं. मी एक गोष्ट नम्रपणे सांगू इच्छिते की, आपलं एक बोर्ड असून त्याचंही अस्तित्व आहे. त्याचा अभ्यासक्रम कसा चांगला करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिलीचा अभ्यासक्रम बदल आहोत आणि आदर्श शाळा आहेत तिथे दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहोत,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेत चांगलं कळतं. पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे हे माहिती असावं म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचं ओझं होणार नाही याचं आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकं आणत आहोत”.
युक्रेनप्रश्नी भारताची भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून समजून घेतली. या प्रश्नामुळे ‘इंडो-पॅसिफिक’ म्हणजे भारतासह प्रशांत महासागरीय देशांच्या (ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान) संबंधांवर परिणाम व्हायला नको, यावर दोन्ही नेते सहमत झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला यांनी दिली.
मोदी आणि मॉरिसन यांच्यात दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या चर्चेत युक्रेनवरील रशियाचे आक्रमण हा महत्त्वाचा मुद्दा होता.
प्रसारमाध्यमांना या चर्चेचा तपशील सांगताना श्रुंगला म्हणाले, की युक्रेनमध्ये सुरू असलेला हिंसाचार अत्यंत चिंताजनक व मानवतेला काळिमा फासणारा आहे, तो त्वरित थांबवण्यात यावा, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. युरोपमधील या संघर्षांचा ‘इंडो-पॅसिफिक’ संबंधांवर परिणाम होऊन त्यावरून अन्यत्र लक्ष विचलित व्हायला नको, अशी अपेक्षा दोन्ही बाजूंनी व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या प्रश्नांसह परस्परहिताशी संबंधित जागतिक प्रश्नांवरही चर्चा केली.
क्वाड गटातील सदस्य अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला आहे. मात्र या गटाचा सदस्य असलेल्या भारताने मात्र रशियाचा निषेध न करता हा प्रश्न संवाद आणि राजकीय मुत्सद्देगिरीने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात देशातील सर्व व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. यावेळी वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी असे काम केले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी तीनदा डोके टेकले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धतीत आणि योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांची ही कृती पाहून पंतप्रधान मोदींनीही नतमस्तक होऊन नमस्कार केला. यानंतर स्वामी शिवानंद यांनी रेड कार्पेट आणि स्टेजजवळ दोनदा डोके टेकून रामनाथ कोविंद यांनाही नमस्कार केला.
यानंतर राष्ट्रपती कोविंद आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उभे केले आणि त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. राष्ट्रपती कोविंद यांनीही स्वामी शिवानंद यांच्यासोबत हसत संवाद साधला. स्वामी शिवानंद हे वाराणसीच्या कबीर नगर भागात राहतात. वयाच्या १२६ व्या वर्षीही ते खूप निरोगी आहेत.
पॅरीसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची उंची आता आणखी वाढली आहे. १५ मार्च रोजी आयफेल टॉवरवर नवीन डिजिटल रेडिओ अँटेना बसवण्या आल्यानंतर त्याच्या उंचीमध्ये सहा मीटरची भर पडली आहे. तंत्रज्ञ टॉवरच्या शीर्षस्थानी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अँटेना बसवत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आता आयफल टॉवरची एकूण उंची ३२४ मीटर झाली आहे.
आयफेल टॉवरच्या LaTourEiffel या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “दुर्मिळ आणि नेत्रदीपक तांत्रिक पराक्रम”ने आता टॉवरची उंची ३२४ मीटर वरून ३३० मीटर केली आहे. फ्रेंचमधील ट्विटच्या भाषांतरानुसार, डिजिटल रेडिओ कव्हरेज सुधारण्यासाठी आणि सुमारे ३० DTT चॅनेल आणि २३ रेडिओ स्टेशन्स १२ दशलक्ष इले-डे-फ्रान्स रहिवाशांना प्रसारित करण्यासाठी नवीन सहा मीटर अँटेना स्थापित करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आयफेल टॉवरची निर्मिती १८८७ ते १८८९ या दोन वर्षांमध्ये झाली होती. पॅरीसमधल्या सर्वाधिक उंच टॉवरमध्ये आयफेल टॉवरची गणना केली जाते. अगोदर या टॉवरची उंची ३२४ मीटर होती. जी एखाद्या ८१ मजली इमारतीएवढी आहे. या टॉवरच्या तीन लेव्हल आहेत. या तिन्ही लेव्हल्सला पर्यटक भेट देऊ शकतात. या टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या लेव्हलवर रेस्तराँ आहेत. २७६ मीटरवर म्हणजेच ९०६ फुटांवर या टॉवरची तिसरी लेव्हल आहे. या ठिकाणाहून पर्यटकांना पाहणी करता येते. आयफेल टॉवरला दरवर्षी साधारण ७ लाख पर्यटक भेट देतात.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.