इशान किशनने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, अजिंक्य रहाणेलाही टाकले मागे
- आशिया कप २०२३ मधील तिसरा शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा डाव ४८.५ षटकांत २६६ धावांवर आटोपला. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. या सामन्यात इशान किशनने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला.
- पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात इशान किशन पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय आघाडीची फळी तुटत असताना, संयमाने खेळून काय करता येते, हे इशानने दाखवून दिले. इशान किशनने या सामन्यात ८२ धावांची खेळी करत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडला.
इशान किशनने मोडला विराट कोहलीचा विक्रम –
- भारतासाठी, इशान किशनने वनडेच्या पहिल्या १७ डावांमध्ये धावा करण्यात दुसरे स्थान गाठले, जेथे विराट कोहली आधी उपस्थित होता. इशान किशनने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या १७ डावात ७७६ धावा केल्या आहेत आणि त्याने कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे, ज्याने त्याच्या पहिल्या १७ एकदिवसीय डावात ७५७ धावा केल्या होत्या. या यादीत शुबमन गिल ७७८ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
पहिल्या १७ एकदिवसीय डावानंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -
७७८ धावा – शुबमन गिल
७७६ धावा – इशान किशन
७५७ धावा – विराट कोहली
७५० धावा – श्रेयस अय्यर
७३९ धावा – नवज्योत सिद्धू
७०० धावा – शिखर धवन
सूर्याच्या मुख्य थरांमध्ये आणखी ११ उपथर; संशोधक डॉ. विजय इंगोले यांचा दावा
- चंद्रयान-३ च्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ यान प्रक्षेपित केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी सूर्याचे ११ उपथर शोधल्याचा दावा केला आहे. ही माहिती आदित्य एल-१ मोहिमेत उपयुक्त ठरेल, असा विश्वास देखील डॉ. इंगोले यांनी व्यक्त केला आहे.
- सूर्यावरील उष्णतेमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीला ऊर्जा मिळते. सूर्य हा तप्त वितळलेल्या रसाने बनलेला असून त्यावर एक प्रकाशमानाचा थर आहे. या थराला ‘फोटोस्फियर’ म्हणतात. यामधूनच आपल्याला दिसणारे सप्तरंगी प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. यानंतर ‘क्रोमोस्फियर’ हा दुसरा थर असून त्यामधून ‘अल्ट्राव्हायोलेट किरणे’ बाहेर पडतात.
- त्यानंतर ‘ट्रान्झिशन रिजन’ नावाचा तिसरा थर असून त्यामधून अतिनील किरणे म्हणजेच हाय ‘अल्ट्रावायोलेशन’ बाहेर पडते. शेवटी करोना नावाचा सर्वात जाड थर आहे. या सर्व थरांसंदर्भात ढोबळ मानाने माहिती उपलब्ध आहे. परंतु ‘ट्रान्झिशन’ थराबाबत पूर्ण माहिती उपलब्ध नाही. यासंदर्भात संशोधक डॉ. इंगोले यांनी गेल्या अनेक वर्षांसून सूर्य आणि त्याच्या बाह्य थरांविषयी संशोधन केले असून या संशोधनात ‘ट्रानसिशन रिजन’मध्ये तब्बल ८ उपथर आढळून आल्याचा डॉ. इंगोले यांचा दावा आहे.
- सूर्याच्या सर्व मुख्य चारही थरांमध्ये प्रकाशमानात बदल होताना दिसतो. सूर्याच्या अगदी जवळ असणारा फोटोस्फियर हा थर सुमारे ४०० ते ५०० किलोमीटपर्यंत पसरला आहे. त्यानंतर सुमारे ७५० किलोमीटर पर्यंत मोठी पोकळी अर्थात ‘डेड झोन’ आहे. त्यानंतर ‘क्रोमोस्फियर’ हा थर असून तो सुमारे एक ते तीन हजार किलोमीटर रुंद आहे. त्यानंतर ‘ट्रान्झिशन रिजन’ हा सुमारे एक ते साडेतीन हजार किलोमीटर रुंद थर आहे. यानंतर पुन्हा पाचशे किलोमीटर रुंद मोठी पोकळी आहे.
‘आदित्य एल १’ची पहिली प्रक्रिया यशस्वी; पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पुढील कृती उद्या
- ISRO Aditya L1 Solar Mission देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी जाहीर केले. ही प्रक्रिया येथे असलेल्या ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क’द्वारे (आयएसटीआरएसी-इस्ट्रॅक) पार पडली. हा उपग्रह अगदी सुस्थितीत असून योग्यरित्या काम करत असल्याचेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.
- ‘इस्रो’ने ‘एक्स’वर प्रसृत केलेल्या तपशीलात नमूद केले आहे, की कक्षेसंबंधित पुढील प्रक्रिया ५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता नियोजित केली आहे. पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन#1) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’येथून यशस्वीरित्या पार पडली. या उपग्रहाने प्राप्त केलेली नवीन कक्षा २४५ किलोमीटर ७ २२,४५९ किमी आहे. ‘आदित्य एल १’ला शनिवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह सूर्यावर उतरणार नाही किंवा त्याच्या जवळही जाणार नाही.
लक्ष्यपूर्ती १२५ दिवसांनी
- सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर हे यान प्रस्थापित करण्यात येईल. तेथपर्यंत म्हणजे पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो.
काश्मीर, अरुणाचल आमचेच!; चीन, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले
- काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असल्यामुळे तेथे जी-२०च्या बैठका घेणे हे नैसर्गिक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे आक्षेप फेटाळून लावले. आठवडय़ाभरात दिल्लीमध्ये होऊ घातलेल्या जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पीटीआयला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत मोदी यांनी चीन, पाकिस्तानच्या आक्षेपांना रोखठोक प्रत्युत्तर दिले.
- जी-२०चा सदस्य असलेला चीन आणि या गटाबाहेर असलेल्या पाकिस्तानने जी-२०च्या विविध बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात घेण्यास विरोध केला होता. याला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, की आम्ही त्या भागांमध्ये बैठका घेण्याचे टाळले असते, तर प्रश्न विचारला जायला हवा होता. आमचा देश हा इतका विशाल, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहे. देशाच्या प्रत्येक भागात जी-२०च्या बैठका होणे हे अतिशय नैसर्गिक आहे. ‘जी-२०’ला एक नवीन आयाम देत, त्याच्या मंत्रीस्तरीय आणि इतर बैठका केवळ राजधानी दिल्लीतच नव्हे तर इंदूर आणि वाराणसीसारख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसह देशाच्या सर्व भागांमध्ये आयोजित केल्या गेल्या.
- सुमारे २०० प्रादेशिक बैठका केरळ, गोवा आणि काश्मीरसारख्या पर्यटन स्थळांवर आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात एक लाखाहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी भारताच्या विविध भागांत जाऊन आपली भूप्रदेशनिहाय लोकसंख्या (डेमोग्राफी), लोकशाही व्यवस्था (डेमॉक्रसी) आणि वैविध्य (डायव्हर्सिटी) अनुभवले. त्यांनी यात ‘डेव्हलपमेंट’चा चौथा ‘डी’सुद्धा अनुभवला. गेल्या दशकात भारतात झालेल्या विकासामुळे भारतीयांना कसे सक्षम बनवले आहे, हेही या जागतिक प्रतिनिधींनी अनुभवले. जगाला गरजेचे असलेले अनेक उपाय आपल्या देशात आधीच यशस्वीपणे अंमलात आणले जात असल्याचे त्यांना प्रत्यक्ष पहायला मिळाले त्यामुळे भारताविषयी त्यांच्या ज्ञानात ताजी भर पडली.
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन
- काँग्रेसने अलीकडेच खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन केलं होतं. भारताचं दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ही पदयात्रा काढली होती. गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी ही पदयात्रा सुरू करण्यात आली होती. ‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसने आता देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘भारत जोडो यात्रा’ काढणार असल्याची घोषणा केली.
- राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदयात्रेचा पहिला टप्पा सुरू केला होता. त्याचा समारोप काश्मीरमध्ये झाला. दरम्यान, राहुल गांधींनी सुमारे १३० दिवसांहून अधिक काळ पायी प्रवास केला. ही पदयात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून गेली होती.
- काँग्रेसचे जनरल सेक्रटरी के सी वेणुगोपाल यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ७ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत “भारत जोडो यात्रा” काढावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतचं परिपत्रकही जारी केलं आहे.
- दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातपासून सुरू होऊन ईशान्येकडील राज्य मेघालयापर्यंत जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. राहुल गांधींची दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा सुरू झाल्यानंतर प्रत्येक राज्यातील नेते त्या-त्या राज्यात समांतर पदयात्रा काढतील, असंही पटोले म्हणाले होते.
“रोव्हरने त्याला दिलेलं काम पूर्ण केलं, आता त्याला…”; इस्रोकडून चांद्रयान ३ ची मोठी अपडेट
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यापासून वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या जात आहेत. इस्रोने आतापर्यंत चंद्रावरील तापमानापासून रोव्हरच्या मार्गापर्यंत सर्व माहिती दिली आहे. आता इस्रोने या मोहिमेबाबतची मोठी अपडेट दिली आहे. इस्रोने रविवारी (३ सप्टेंबर) ट्वीट करत रोव्हरने दिलेलं काम पूर्ण केल्याचं सांगितलं.
- इस्रोने चांद्रयान ३ मोहिमेची माहिती देताना म्हटलं, “रोव्हरने त्याला दिलेलं काम पूर्ण केलं आहे. आता त्याला सुरक्षितपणे ‘पार्क’ करण्यात आलं आहे आणि त्याचा ‘स्लीप मोड’ सक्रीय करण्यात आला आहे. एपीएक्सएस आणि एलआयबीएस पेलोड्सही बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरमार्फत पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे.”
“सध्या बॅटरी पूर्ण चार्ज”
- “सध्या बॅटरी पूर्ण चार्ज आहे. पुढील सर्योदय २२ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. त्यावेळी सूर्य प्रकाश पडेल अशी सोलर पॅनलची रचना करण्यात आली आहे. रिसिव्हर सुरूच आहे,” अशी माहिती इस्रोने दिली.
“रोव्हर इंडियाचा चंद्रावरील राजदुत म्हणून कायम चंद्रावरच राहील”
- “पुन्हा एकदा रोव्हर नव्या कामासाठी यशस्वीपणे सुरू होईल, अशी आम्हाला आशा आहे. याशिवाय हा रोव्हर चंद्रावरील भारताचा राजदुत म्हणून कायम चंद्रावरच राहील,” असंही इस्रोने नमूद केलं.
04 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)