चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 फेब्रुवारी 2024

Date : 22 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक; भारतीय फलंदाज शुभमन गिलचे वक्तव्य
 • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीनही कसोटी सामन्यांत खेळपट्टी या फिरकी गोलंदाजांनाच मदत करणाऱ्या होत्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत होती. पण, यानंतरही महत्त्वाच्या क्षणी भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेली कामगिरी हीच खऱ्या अर्थाने निर्णायक होती, असे भारतीय फलंदाज शुभमन गिलने सांगितले.
 • तीन सामन्यांत आतापर्यंत अश्विन (११), रवींद्र जडेजा (१२), कुलदीप यादव (८) आणि अक्षर पटेल (५) यांनी एकत्रित ३६ गडी बाद केले आहेत. वेगवान गोलंदाजांनी २२ गडी बाद केले आहेत. हे आकडे फिरकी गोलंदाज आणि गोलंदाजीची ताकद दाखवून देत असले, तरी ते फक्त आकडे आहेत. वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी करून भारतीय संघाचे पाऊल पुढे ठेवले, असे गिल म्हणाला.
 • चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ रांची येथे दाखल झाल्यावर पहिल्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गिलने फिरकी आणि वेगवान गोलंदाजीची तुलना केली. ‘‘जेव्हा आपण भारतात खेळतो तेव्हा खेळपट्टी फिरकीला साथ देणार हे निश्चित असते. अश्विन, जडेजा गडी बाद करणारच. पण, अशा खेळपट्टीवर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली हे विसरून चालणार नाही. त्यांच्या गोलंदाजीमुळे नक्कीच फरक पडला,’’असे गिलने सांगितले.
 • ‘‘चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली असली, तरी अन्य गोलंदाज कामगिरी उंचावण्यात सक्षम आहेत. मोहम्मद सिराज जबाबदारी घेण्यात सक्षम आहे. राजकोटमध्ये त्याने चार गडी बाद केले होते. विशेषत: भारतीय हवामानात गोलंदाजी करण्याचा अनुभव त्यालाही आहे,’’असेही गिल म्हणाला.
 • ‘‘विराट नसल्याचा फायदा उदयोन्मुख फलंदाजांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी झाला. पण, ही मिळालेली संधी त्यांच्याबरोबर फार काळ राहणार नाही, ही कल्पना देखील त्यांना होती. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोने कसे करता येईल हा विचार नवोदित खेळाडूंनी केला. यशस्वीने तर ही संधी जणू दोन्ही हाताने साधली असे म्हणता येईल. लागोपाठच्या सामन्यात द्विशतक झळकावणे सोपे नसते. तो खरच गुणी फलंदाज आहे,’’असे गिलने सांगितले. यशस्वीने विशाखापट्टणम व राजकोट कसोटीत द्विशतक झळकावत आपली छाप पाडली. त्यामुळे रांची येथील सामन्यातूनही त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
विरारच्या हार्दीक पाटीलचे यश, अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण
 • विरारच्या हार्दिक पाटील याने अमेरिकेत झालेली अल्ट्रामॅन फ्लोरिडा २०२४ स्पर्धा ही विक्रमी वेळेत पूर्ण करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. ३१ तास ४६ मिनिटांंत त्याने ही तीन दिवसांतील स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक १९ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
 • दरवर्षी अमेरिकेत अल्ट्रामॅन स्पर्धा ही ३ दिवस आयोजित केली जाते. त्यात १० किलोमीटर जलतरण, ४२० किलोमीटर सायकलींग आणि ८५ किलोमीटर धावण्याचा समावेश असतो. या स्पर्धेत दिवसाला १२ तासा प्रमाणे खेळाडूंना ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यंदाची स्पर्धा ९ ते ११ फेब्रुवारी या कालवाधीत अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात पार पडली. या स्पर्धेत १७ देशातील ४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात ६ भारतीय स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील केवळ ४ स्पर्धकच ही स्पर्धा पूर्ण करू शकले. हार्दीक पाटील याने ३१ तास ४६ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.

..असा केला विक्रम

 • हार्दिकेने पहिल्या दिवशी ४ तास ५ मिनिटांत स्विमिंग आणि ५ तास २० मिनिटांत १४५ किलोमीटर सायकलींग पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी १० तास ४५ मिनिटांता २७५ किलोमीटर सायकलींग तर तिसऱ्या दिवशी ११ तास १० मिनिटांत ८५ किलोमीटर धावण्याचे अंतर पार केले. तीन दिवसांत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणारा हार्दीक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. स्पर्धेच्या इतिसाहात आतापर्यंत केवळ १८ भारतीयांनीच ही स्पर्धी पूर्ण केली होती. यापूर्वी हार्दीकने जगभरात आर्यनमॅन स्पर्धा तसेच जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक विक्रमांची नोंद केली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ८ वेळा, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये ४ वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ६ वेळा नोंद केली आहे.
राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा
 • देशभरातच वातावरणाचे चक्र पूर्णपणे बिघडले असून हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे.
 • जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा हवामान बदलले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीसह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
 • राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज खात्याने व्यक्त केला आहे. येत्या २५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. २५ फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील यासंबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आरोग्य विभागाची राज्यात ३५ जिल्ह्यांत डे-केअर केमोथेरपी केंद्र! टाटा कर्करोग केंद्राबरोबर सामंजस्य करार…
 • देशात व राज्यात कर्करुग्णांची वेगाने वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यात कर्करोग निदान व उपचारासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत टाटा कॅन्सर सेंटर बरोबर सामंजस्य करार करून राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये कर्करोग निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २७ कर्करोग निदान रुग्णवाहिका घेण्यात येणार आहे.
 • गेल्या काही वर्षात देशात कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून २०२२ मध्ये १४ लाख ५० हजार एवढे कर्करुग्ण होते, ते २०२५ मध्ये वाढून त्यांची संख्या १५ लाख ७० हजार एवढी होईल, अशी भिती नॅशनल कॅन्सर रजीस्ट्रीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशात २०१२ मध्ये सात लाख ८९ हजार लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन आठ लाख आठ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशभरात दररोज कर्करोगामुळे २६,३०० लोक मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासानाने देशपातळीवर कर्करोग निदान व उपचाराचा कार्यक्रम राबिवण्यास सुरुवात केली आहे.
 • महाराष्ट्रातही २०२० मध्ये कर्करोगाच्या एक लाख १६ हजार १२१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २०२५ पर्यंत एक लाख ३० हजार रुग्ण असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. राज्यात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण ४०.६ टक्के, तर महिलांमध्ये प्रमाण १५.६ टक्के आहे. याशिवाय पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.१० टक्के, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ८.४ टक्के तर प्रोस्टेट कर्करुग्णांचे प्रमाण ७ टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २९.९ टक्के, गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ११ टक्के, तर ओव्हरीच प्रमाण ६.०३ टक्के एवढे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 • महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कर्करुग्णांचे प्रमाण वेगवेगळ्या कारणांमुळे वाढत असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कर्करोग निदान व उपचाराच्या सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचाराबाबत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम तसेच जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शल्यचिकित्सक, स्त्ररोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक तसेच अन्य विशेषोपचार तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ मध्ये दहा जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू केले होते. सध्या १३ जिल्ह्यांमध्ये ही सुविधा असून आगामी काळात ३५ जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. यादृष्टीने आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना टाटा कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या राज्यात अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड व नंदुरबार या ठिकाणी डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू असून राज्यातील सुमारे सव्वालाख कर्करुग्णांचा विचार करून या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
 • मराठा आरक्षणासाठीचा कायदा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारे करण्यात आला होता. याउलट, कौटुंबिक उत्पन्न आणि इतर आर्थिक मागासलेपणाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) दहा टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. परिणामी, दोन्ही कायद्यांत फरक असल्याने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईएसडब्ल्यू प्रवर्गातून न्यायीक सेवेत नियुक्ती देण्याची मागणी करणाऱ्या चार मराठा समाजाच्या याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नकार दिला.
 • याचिकाकर्त्यांनी एसईबीसी कायद्यांतर्गत अर्ज केला होता. त्यामुळे,सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा घटनाबाह्य ठरवल्याच्या आदेशानंतर याचिकाकर्त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून न्यायीक सेवेत नियुक्ती नाकारण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता, असेही न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळताना नमूद केले. कनिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश आणि प्रथमश्रेणी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती नाकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली त्या तारखेला यचिकाकर्त्यांचे वय पात्रता वयापेक्षा जास्त होते व ते आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील आहेत या कारणास्तव त्यात सवलत मागू शकत नाही. त्यामुळे, या पदांसाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही, असे राज्य सरकारतर्फे याचिकाकर्त्यांना कळवण्यात आले होते. त्याविरोधात याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उपरोक्त पदांसाठी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. वकिलांसाठी वयोमर्यादा तीन वर्षांच्या सरावासह ३५ वर्षे होती आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली क्षेत्रात नुकताच प्रवेश केलेल्यांसाठी वयाची मर्यादा ही २५ वर्षे होती. त्याचप्रमाणे, नियमानुसार उमेदवार मागासवर्गीय असल्यास वयोमर्यादा आणखी पाच वर्षांनी शिथिल केली जाईल, असे जाहिरातीत म्हटले होते.
 • दरम्यान, मराठा समाज मागास असल्याचे अधिसूचित करून राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देणारा कायदा केला. उच्च न्यायालयाने सरकारचा हा निर्णय योग्य ठरवला. मात्र, आरक्षणाची टक्केवारी १३ टक्के करण्याची सूचना केली. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले. सुरूवातीला या प्रकरणी अंतरिम आदेश देताना ९ सप्टेंबर २०२० नंतर सार्वजनिक सेवा आणि सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पदांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी केली जाऊ नये. परंतु त्याआधीच्या नियुक्त्या संरक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी उपरोक्त पदांसाठीची परीक्षा दिली व ते पात्रही ठरले. पुढे, २१ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरवून ते रद्द केले.
बारावी परीक्षेत एकही काॅपी सापडल्यास संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
 • यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलणार असून परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एक जरी कॉपीचा प्रकार आढळून आला तर त्याची जबाबदारी संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळेवर निश्चित करून थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
 • इयत्ता बारावी परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. इयत्ता बारावी परीक्षेला एकूण ११८ परीक्षा केंद्रांमधून ५५ हजार ५४१ विद्यार्थी बसले आहेत. सकाळी परीक्षेचा पहिला पेपर देण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांची संबंधित परीक्षा केंद्रांवर परीक्षा दालन शोधण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
 • जिल्हास्तरावर बारावी आणि दहावी परीक्षांसाठी एकूण १८ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरावर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त स्वतंत्र भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना आणि दोन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे (डाएट) प्राचार्य, सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्या देखरेखीखालीही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
 • १ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८२ केंद्रांमधून ६५ हजार ७४९ विद्यार्थी बसणार आहेत. दोन्ही परीक्षांच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व परीक्षा केंद्रावर काॅपीमुक्त वातावरण राहण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती दिली.
वर्क फ्रॉम होम फायद्याचं की तोट्याचं? टीसीएसच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
 • करोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊ केली होती. या सुविधा अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहेत. या कंपन्यातील कर्मचारी देशातील कोणत्याही काना-कोपऱ्यात बसून काम करू शकतात. परंतु, कामाची ही पद्धत कर्मचारी आणि कंपन्यांच्या मुळावर येत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. दरम्यान याबाबत आता टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. क्रितिवासन यांनी या रिमोट (घरातून काम करण्याची सोय) पद्धतीचे काम बंद करण्याचे आवाहन केले आहे. कार्यालयात काम करताना वरिष्ठांचं काम पाहून इतर सहकारी काम शिकत असतात, असं त्यांनी यावेळी नोंदवलं. ते नॅसकॉम कार्यक्रमात बोलत होते.
 • “घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही. टीसीएस टीमवर्क आणि फेलोशिपला महत्त्व देते. करोना काळात ३०-४० टक्के कर्माचारी भरती करण्यात आली. परंतु, ते कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते कंपनीची मूल्ये आणि संस्कृती कशी आत्मसात करतील?” असाही प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 • “वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी कसे काम करतात हे पाहून इतर कर्मचारी शिकत असतात. टीसीएस वर्क फ्रॉम होम पद्धतीला समर्थन देत नाही. कारण पारंपरिक कार्यालयीन वातावरणच सर्वात प्रभावी पद्धत आहे. आमचे सर्व कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येण्यास इच्छुक आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

टीसीएस कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यासाठी अल्टिमेटम

 • टीसीएसमध्येही करोनाकाळात वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. परंतु आता जनजीवन सुरळीत झालेले असतानाही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये परतले नाहीत. त्यामुळे कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना अजून एकदा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एनजी सुब्रमण्यम यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, आम्ही संयम बाळगत आहोत. परंतु, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात जावे लागेल अशी तत्वतः भूमिका घेतली आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना यावर अंतिम निर्णय पाठवला आहे. जर ते कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

 

बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस

 • राज्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर पद्धतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १७ गैरप्रकार उघडकीस आले असून, सर्वाधिक गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली.
 • राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथकाची प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्यवस्था, परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर परिसरातील छायाप्रतीची दुकाने बंद केली जातील. तसेच सहायक परीरक्षकाचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात १७ गैरप्रकार झाल्याचे समोर आले.
 • राज्य मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक सात गैरप्रकारांची नोंद पुणे विभागात झाली. तर नागपूर आणि औरंगाबाद विभागात प्रत्येकी तीन, अमरावती आणि लातूर विभागात प्रत्येकी एक, नाशिक विभागात दोन गैरप्रकार झाल्याचे आढळून आले.

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान

 • भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.
 • अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या ६५ देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे २०३० पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.
 • सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर सार्वजनिक धोरण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
 • अफशान खान यांनी १९८९ मध्ये मोझाम्बिक येथे युनिसेफसाठी काम करायला सुरुवात केली. सध्या त्या पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये कार्यरत आहेत. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

तुर्कस्तानहून परतलेल्या भारतीय मदत पथकांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

 • भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारताच्या मदत व आपदा निवारण पथकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारताने स्वत:ची ओळख केवळ स्वयंपूर्ण देश म्हणूनच नव्हे, तर नि:स्वार्थी देश म्हणून बळकट केली आहे, असे ते म्हणाले.
 • भूकंपग्रस्त तुर्कस्तानला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर, राष्ट्रीय आपदा निवारण दलाची (एनडीआरएफ) एकूण तीन पथके ७ फेब्रुवारीला तेथे पाठवण्यात आली होती. भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही  भूकंपग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे.
 • ‘तुम्ही मानवतेची मोठी सेवा केली असून, भारताला अभिमान वाटावा असे काम केले आहे. आम्ही जग हे एक कुटुंब असल्याचे मानतो आणि संकटात त्याच्या कुठल्याही सदस्याला त्वरित मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे समजतो’, असे भूकंपग्रस्त तुर्कस्तानहून परतलेल्या पथकांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले. जगात कुठेही संकट उद्भवते, तेव्हा प्रतिसाद देणारा पहिला देश होण्यास भारत तयार असतो, असेही त्यांनी सांगितले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध

 • भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले. भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत.
 • सोमवारी आर. नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याने जर्मनीच्या मॅक्सिमिलियन उल्ब्रिचचा १६-८ असा पराभव केला. मानांकन फेरीतही रुद्रांक्षने २६२ गुणांचा वेध घेत अव्वल क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. उल्ब्रिचचे २६०.६ गुण होते. त्यापूर्वी पात्रता फेरीत ६२९.३ गुण मिळवत रुद्रांक्ष सातव्या क्रमांकाने मानांकन फेरीसाठी पात्र ठरला होता.
 • सुवर्णपदकाच्या लढतीत पहिल्या सात फैऱ्यानंतर रुद्रांक्ष आणि उल्ब्रिचमध्ये ७-७ अशी बरोबरी होती. मात्र, पुढील तीनही फैऱ्यांमध्ये रुद्रांक्षने सरशी साधताना १३-७ अशी आघाडी मिळवली. अखेरीस रुद्रांक्षने लढतीत १६-८ असा विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.  भारताचे दिव्यांश सिंह पन्वर आणि हृदय हजारिका हे अन्य दोन नेमबाज पात्रता सिद्ध करू शकले नाहीत.
 • भारतीय नेमबाजांनी सोमवारी एअर रायफल आणि पिस्तूल प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते. यामध्ये नर्मदा-रुद्रांक्ष जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते. वरुण तोमरने पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वरुणने रिदम संगवानच्या साथीने १० मीटर पिस्तूल प्रकारातील मिश्र दुहेरीत सुवर्ण यश मिळवले.

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे, सलग दुसऱ्या वर्षी प्रश्नपत्रिकेत चुका

 • राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे. त्यामुळे या तीन प्रश्नांचे सहा गुण विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे.
 • राज्यभरात बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला.
 • अनेकांना प्रश्नच कळले नाही, तर काहींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या इंग्रजी विषयाच्याच प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
 • विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल - इंग्रजी विषयाची सभा विषय तज्ज्ञ आणि विभागीय मंडळांचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत आयोजित करण्यात आली होती. मात्र धोरणात्मक मागण्यांबाबत शिक्षकांचा बहिष्कार असल्याने सभा होऊ शकली नाही. इंग्रजी विषयाच्या त्रुटींबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा घेऊन संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

क्रिकेट चाहत्यांसाठी खुषखबर! IPL सामन्यांचा आनंद आता मोफत लुटता येणार

भारत हा देश क्रिकेटप्रेमी देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही ठिकाणी खेळाला जाणारा हा खेळ आहे. लवकरच आता IPL २०२३ सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा लिलाव देखील पार पडला आहे. सुमारे एक ते दीड महिना आयपीएलच्या मॅचेस सुरु असतात. मात्र IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Ipl संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) आता jio cinema वॉर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या टीममध्ये होणार आहे. jio cinema वर सर्व आयपीएलचे सामने 4K रिझोल्यूशन (UltraHD) मध्ये ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहेत. या आधी फक्त IPL केवळ Disney+ Hotstar वरच स्ट्रीम केले जात होते आणि यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागत होते.

FIFA World Cup 2022 Multicam फीचरसह JioCinema वर वापरकर्ते सर्व ७४ सामन्यांदरम्यान कॅमेरा अनेक अँगलमध्ये स्विच करू शकणार आहेत. jiophone वापरकर्ते IPL २०२३ मोफत पाहू शकणार आहेत कारण या फिचर फोनमध्ये आधीपासूनच JioCinema सपोर्ट उपलब्ध आहे. अ‍ॅपच्या मदतीने वापरकरते फोनवरच स्कोअर आणि पिच हीट मॅप सारखी आकडेवारी बघू शकणार आहेत. मोठ्या स्क्रीन म्हणजेच टीव्हीवर सामना पाहणारे वापरकर्ते पूर्ण माहितीसह सामना बघू शकणार आहेत.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 22 फेब्रुवारी 2022

 

एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदचा जगज्जेत्या कार्लसनला धक्का :
 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला.

 • ऑनलाइन स्वरूपातील या जलद प्रकाराच्या स्पर्धेत १६ वर्षीय प्रज्ञानंदने काळय़ा मोहऱ्यांसह खेळताना कार्लसनला ३९ चालींत पराभूत करण्याची किमया साधली. या पराभवामुळे कार्लसनची सलग तीन विजयांची मालिका खंडित झाली. कार्लसनवर मात करणारा प्रज्ञानंद हा केवळ तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याच्याआधी विश्वनाथन आनंद आणि पी. हरिकृष्णा यांनी ही कामगिरी केली होती.

 • प्रज्ञानंदने या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी निराशाजनक खेळ केला होता. त्याला सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने अविस्मरणीय पुनरागमन केले. त्याने काही तासांच्या कालावधीत आधी अर्मेनियन ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियन आणि मग कार्लसनवर सरशी साधली. त्यामुळे आठव्या फेरीअंती प्रज्ञानंद आठ गुणांसह १२व्या स्थानावर आहे.

एसटी संपाचा ११८ वा दिवस; आज विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी :
 • महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. या संपकाळामध्ये एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे.

 • संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. संप सुरु झाल्यानंतर आज ११८ व्या दिवशी या प्रकरणावर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. विलीनीकरणासंदर्भातील अहवाल आज न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे.

 • १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत नुकसान विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बसगाड्या, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

 • संप चिघळल्याने प्रवाशांचे हाल सुरूच राहिले आणि एसटीचे नुकसान वाढतच गेल़े नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपामुळे एसटीचे ४३९ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न बुडाले होते. त्यात आणखी वाढ झाली असून, ते १ हजार ६०० कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली आहे.

‘कॉर्बेव्हॅक्स’ला मंजुरी ! १२-१८ वयोगटाच्या लसीकरणाला बळ :
 • मुलांच्या लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळाले आह़े ‘बायोलॉजिकल ई लिमिटेड’च्या ‘कॉर्बेव्हॅक्स’ या १२ ते १८ वयोगटासाठीच्या लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आह़े

 •  १२ ते १८ वयोगटासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने १४ फेब्रुवारीला केली होती़  त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून ‘कॉर्बेव्हॅक्स’ला परवानगी देण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितल़े.

 • ‘बायोलॉजिकल ई लिमिटेड’चे गुणवत्ता व नियमन विभागाचे प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी ९ फेब्रुवारीला केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे ‘कॉर्बेव्हॅक्स’साठी अर्ज केला होता़  या अर्जानुसार ५ ते १८ वयोगटातील मुलांवर ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परवानगी मिळाली होती़  त्यानंतर ऑक्टोबरपासून घेतलेल्या चाचण्यांमधून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात आल़े.

“सीमेवर लष्कर वाढणं हे….”; रशिया-युक्रेन तणावावर भारताची पहिली प्रतिक्रिया :
 • रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढतच आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. रशिया-युक्रेन संकट कमी करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, असं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलने बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत भारताने म्हटले आहे.

 • यूएनएससीच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, “रशिया-युक्रेन संकटाची तात्काळ प्राथमिकता डी-एस्केलेशन आहे. सीमेवर लष्कर वाढणं, हे आमच्यासाठी योग्य असू शकत नाही. आम्ही सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन करतो. हा प्रश्न केवळ राजनैतिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, याची आम्हाला खात्री आहे. तसेच तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षांनी अलीकडे घेतलेल्या काही पुढाकारांबद्दल विचार करण्याची गरज आहे.”

 • तिरुमूर्ती यांनी युक्रेनवरील यूएनएससीच्या बैठकीत सांगितले की, “रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवर वाढत असलेला तणाव ही गंभीर चिंतेची बाब आहे. या घडामोडींमुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा बिघडू शकते. तसेच घडामोडी घडत असताना दोन्ही देशांच्या नागरिकांची सुरक्षा आवश्यक आहे. २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेन आणि त्याच्या सीमावर्ती भागात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि अभ्यास करत आहेत, भारतीयांना या परिस्थितीत सुरक्षित ठेवणं आणि तिथून बाहेर काढणं, याचा आमचं प्राधान्य आहे,” असं ते म्हणाले.

समजून घ्या : पुतिन यांनी ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिलेल्या डॉनेत्स्क, लुहान्स्क प्रांतांना एवढं महत्व का आहे :
 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. रशियाने आक्रमक भूमिका घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे.

 • पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र हे दोन प्रांत नक्की कुठे आहेत? रशिया आणि युक्रेनसाठी ते एवढे महत्वाचे का आहेत?, या दोन प्रांतांवरुन नक्की का वाद सुरु आहे यावरच या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर टाकलेली नजर.

 • रशियाने देश म्हणून मान्यता दिलेले डॉनेत्स्क आणि लुुहान्स्क नावाचे हे दोन प्रांत युक्रेनच्या पूर्व सीमा भागात रशियाला खेटून आहेत. युक्रेनच्या या दोन प्रांतांमध्ये रशियाच्या आश्रयाखालील समर्थक सक्रिय आहेत. हा संपूर्ण टापू दोन्बास म्हणून ओळखला जातो. २०१४ मधील क्रिमिया आक्रमणापासूनच येथील रशियन बंडखोरांनी युक्रेनच्या सैन्याशी चकमकी सुरू केल्या असून, त्यात आतापर्यंत १४ हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

 • २०१४ मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर कब्जा केला, त्यावेळी जग अक्षरशः पाहात राहिले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि नाटोच्या इतर नेत्यांना पुतीन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यापलीकडे त्यावेळी काही करता आले नव्हते. युरोपिय समुदाय आणि अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लागू केले. पण त्यातून पुतीन यांची महत्त्वाकांक्षा कमी झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याच महत्वकांक्षेचा एक भाग म्हणजे रशियाने नुकतीच या प्रांतांना राष्ट्र म्हणून दिलेली मान्यता.

रशियाचा मोठा निर्णय! युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता; युद्धाचे ढग अजून गडद :
 • रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे.

 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

 • लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं.

२२ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.