चालू घडामोडी आणि दिनविशेष - 16 जुलै 2023

Date : 15 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : वोन्ड्रोउसोवाचे ऐतिहासिक जेतेपद, अंतिम लढतीत सरळ सेटमध्ये विजय
  • चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची पहिली बिगरमानांकित विजेती होण्याचा मान मिळवला. वोन्ड्रोउसोवाने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरवर विजय मिळवला. त्यामुळे जाबेऊरला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या २४ वर्षीय वोन्ड्रोउसोवाने धक्कादायक निकाल नोंदवताना जाबेऊरवर ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये सरशी साधली.
  • ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा गेल्या ६० वर्षांतील पहिली महिला टेनिसपटू होती. त्यामुळे अंतिम लढतीत जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते . जाबेऊरने गतवर्षीही विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. यंदा पुन्हा अंतिम फेरी गाठण्यापूर्वी जाबेऊरने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या एलिना रायबाकिनाचा, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची विजेती आणि दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचा पराभव केला होता. त्यामुळे जाबेऊर कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवेल अशी बहुतांश टेनिसरसिकांना अपेक्षा होती. मात्र, वोन्ड्रोउसोवाविरुद्ध तिला आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले.
  • वोन्ड्रोउसोवाने दोन्ही सेटमध्ये पिछाडीनंतर पुनरागमन केले. पहिल्या सेटमध्ये २-४ अशी पिछाडीवर असताना वोन्ड्रोउसोवाने सलग चार गेम जिंकले. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने अखेरचे सलग तीन गेम जिंकत सेट आणि सामना जिंकला. वोन्ड्रोउसोवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत ती उपविजेती होती. वोन्ड्रोउसोवा गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दुखापतीमुळे टेनिस कोर्टच्या बाहेर होती. त्यामुळे वर्षांअखेरीस ती क्रमवारीत ९९व्या स्थानी गेली होती. मात्र, २०२३ वर्षांत तिने अप्रतिम कामगिरी केली आहे.
भारत-अमिराती व्यापारास बळ; आता स्थानिक चलनांद्वारे व्यवहार, द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचा निर्धार
  • डॉलरऐवजी आपाआपल्या स्थानिक चलनांत व्यापारविनिमय करणे आणि जलद देय व्यवहार यंत्रणांची (फास्ट पेमेंट सिस्टीम) जोडणी याबाबत शनिवारी भारत आणि संयुक्त अरब अमिराती(यूएई)मध्ये द्विपक्षीय करार करण्यात आला. 
  • भारत आणि यूएईमध्ये द्विपक्षीय करार करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दोन्ही देशांतील व्यापार सध्या ८५ अब्ज डॉलर असून तो लवकरच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
  • यूएईच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी यूएईचे अध्यक्ष शेख मोहंमद बिन झायेद अल् नह्यन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत व्यापक चर्चा केली. शेख मोहंमद यांची भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले, की गेल्यावर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएईमधील व्यापारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उभय देशांच्या चलनांमध्ये व्यापार विनिमय करण्यासाठी शनिवारी झालेल्या करारामुळे दोन्ही देशांतील भक्कम आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास याची प्रचीती येते, असेही मोदी यांनी नमूद केले. दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सुलभतेसाठी परस्परांच्या जलद देय व्यवहार प्रणालींची (फास्ट पेमेंट सिस्टीम) जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता भारताची ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’(यूपीआय) यूएईच्या ‘इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (आयपीपी)’शी जोडण्यात येईल. त्याचबरोबर आयआयटी, दिल्लीचे कॅम्पस अबुधाबी येथे सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली.
  • चलन व्यवहार यंत्रणा.. भारत- यूएईतील व्यापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि यूएईचे दिऱ्हम या चलनांचा वापर करता यावा म्हणून एक रचना तयार करण्याबाबत दोन्ही देशांत सामंजस्य करार करण्यात आला. द्विपक्षीय व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक चलन व्यवहार यंत्रणा (एलसीएसएस) विकसित करणे, हा त्यामागील उद्देश आहे. दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांनीही त्यास सहमती दर्शवल्याची माहिती अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फ्रान्सचे अध्यक्ष, त्यांच्या पत्नीसह प्रमुख व्यक्तींना ‘या’ खास भेटवस्तू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांना खास भारतीय वस्तू भेट दिल्या. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोदींनी मॅक्रॉन यांना चंदनाच्या लाकडाचा सतार भेट म्हणून दिला. या चंदनाच्या लाकडावर भारतातील प्राचीन शिल्प कोरलेले आहेत. याशिवाय या सतारावर सरस्वती, गणपती आणि मोरही कोरलेला आहे.
  • विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी ब्रिगिट मॅक्रॉन यांनाही खास भेट दिली. फ्रान्सच्या पहिल्या महिला नागरिक ब्रिगिट यांना तेलंगणातील प्रसिद्ध पोचमपल्लीची रेशीम साडी भेट म्हणून देण्यात आली. पोचमपल्लीच्या साडीने कापड आणि साडी उद्योगात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या साडीवर अगदी गुंतागुंतीचं नक्षीकाम अगदी सफाईदारपणे केलेलं आहे. तसेच नक्षीकामाची रंगसंगतीही कमालीची सुंदर आहे. त्यामुळेच पोचमपल्लीची ओळख भारताबाहेर अगदी जगभरात झाली आहे.

संसदेच्या अध्यक्षांना काश्मीरची प्रसिद्ध कार्पेट भेट

  • फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याशिवाय मोदींनी फ्रान्सच्या संसदेचे प्रमुख येल ब्रॉन पिवेट यांना हाताने तयार केलेली काश्मीरचं प्रसिद्ध कार्पेट भेट दिलं. हे कार्पेट जगप्रसिद्ध आहेत. आता त्याची फ्रान्समध्ये जोरदार चर्चा आहे. या कालीनवर खासप्रकारची कलाकुसरही करण्यात आली आहे.
  • मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना मार्बल इनले वर्क टेबल भेट दिला. राजस्थानमधील संगमरवराच्या दगडापासून तो तयार करण्यात आला आहे. याशिवाय सिनेट अध्यक्षांना चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेलं खास हत्तीशिल्प भेट देण्यात आलं.
२३ ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख
  • २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.
  • सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.  २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.

प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन

  • सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अ‍ॅन्सेस्ट्रल अ‍ॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.
  • चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.

द्रौपदी  मुर्मू, राष्ट्रपती

  • चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो!  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
  • चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

  • चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

के शिवन, इस्रोचे  माजी अध्यक्ष


 

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा - युईवर मात करत सिंधू उपांत्य फेरीत :
  • दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने शुक्रवारी रोमहर्षक विजयासह सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित सिंधूने चीनच्या हॅन युईचे कडवे आव्हान एक तासांहून अधिक काळाच्या झुंजीनंतर १७-२१, २१-११, २१-१९ असे मोडीत काढले. मे महिन्यात झालेल्या थायलंड खुल्या स्पर्धेनंतर प्रथमच सिंधूने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. सिंधूचा पुढील फेरीत जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावरील जपानच्या सेईना कावाकामीशी सामना होणार आहे. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचूवांगला २१-१७, २१-१९ असे नामोहरम करून खळबळ माजवली आहे.

  • आता भारताच्या आव्हानाची भिस्त एकमेव सिंधूवर अवलंबून आहे. बर्मिगहॅमला होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी ही अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सिंधूने सेईनाविरुद्ध आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.

  • जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूला पहिल्या गेममध्ये क्रमवारीत १९व्या क्रमांकावरील हॅनने झगडायला लावले. विश्रांतीला ११-९ अशी हॅनकडे आघाडी होती. त्यानंतर सिंधूच्या बचावातील उणिवांमुळे हॅनने पहिला गेम जिंकला.

  • दुसऱ्या गेममधील विश्रांतीला सिंधूकडे तीन गुणांची आघाडी होती. त्यानंतर सिंधूने वर्चस्वपूर्ण खेळासह सात गुणांची आघाडी मिळवली आणि नंतर गेमसुद्धा आरामात जिंकला.

  • तिसऱ्या गेममध्ये सिंधू सुरुवातीला ८-११ आणि नंतर ९-१४ अशी पिछाडीवर होती. मग काही लक्षवेधी रॅलिजमुळे सलग पाच गुणांच्या कमाईसह १४-१४ अशी बरोबरी साधली. मग ही चुरस १९-१९ अशी टिकून होती. परंतु अखेरीस सिंधूने खेळ उंचावत निर्णायक गेमसह सामना जिंकला.

सनदी लेखापाल अंतिम परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला :
  • द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात मुंबईच्या मीत शहाने ८०.२५ टक्के देशात पहिला क्रमांक मिळवला असून, दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल १२.५९ टक्के लागला. 

  • आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल २१.९९ टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ६४३ उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल २१.९४ टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जयपूपच्या अक्षत गोयलने ७९.८८ टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने ७६.३८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

  • या वेळी तपासणी पद्धतीमध्ये अधिक सुधारणा करून अत्यंत कमी कालावधीमध्ये अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजच्या काळात सनदी लेखापालांना मोठी मागणी निर्माण झाली आहे, असे आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.

  • चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे लक्ष्य ठेवले होते, पण : “देशात पहिला येणे अनपेक्षित आहे. त्यामुळे खूपच आनंद झाला. दररोज ठरावीक तास अभ्यास करण्यापेक्षा एकाग्रतेने अभ्यास करण्यावर भर दिला होता. खासगी शिकवणीबरोबरच स्वयंअध्ययनावरही भर होता. आता पुढे जाऊन खासगी क्षेत्रात नोकरी करायची की स्वतःचा व्यवसाय करायचा याचा विचार करत आहे.” अशा शब्दांमध्ये मीत शहा यांने प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या :
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थानिक निवडणुकांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वादात सापडलेला असताना दुसरीकडे गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

  • या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाईलद्वारे ‘इंटरनेट’चा शहरी भागात सर्वाधिक वापर ; ग्रामीण भागात ८३ टक्के प्रमाण :
  • महाराष्ट्रात (गोव्यासह) मोबाईलच्या माध्यमातून ‘इंटरनेट’ सेवा वापरणाऱ्यांची संख्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही मोठय़ा संख्येने आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या जानेवारी २०२२ च्या अहवालानुसार शहरी भागात १०० नागरिकांच्या मागे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरात शतप्रतिशत तर ग्रामीण भागात ८३ आहे.

  • केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन आहेत. ग्रामीण भागात ‘इंटरनेट’चा वापर कमी होतो, त्यामुळे या सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही, अशी ओरड केली जाते. मात्र ‘ट्राय’च्या आकडेवारीनुसार शहर आणि ग्रामीण भागात ‘इंटरनेट’चा वापरकर्त्यांच्या संख्येत विशेष फरक दिसून येत नाही. मात्र, अजूनही अतिदुर्गम भागात ही सुविधा पोहचली नाही हे सत्य आहे.

  • केंद्रीय दूरसंचार खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात ‘ब्रॉडबँड’ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘भारत नेट’ योजना राबवली जाते. या योजनेत महाराष्ट्रात एकूण २१ हजार ९७७ ग्रामपंचायतींना ‘इंटरनेट’ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. पहिल्या टप्प्यात १५ हजार १७१ ग्रामपंचायतींचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी १५,१६६ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात, फेब्रुवारी २०२२ अखेपर्यंत ६८०७ ग्रामपंचायतीत ‘इंटरनेट’ सुविधा पुरवठय़ाची तयारी पूर्ण झाली आहे.

  • या शिवाय चार ग्रामपंचायतींमध्ये ‘सॅटेलाईट’ सेवा देण्याची तयारी करण्यात आली आहे.

देशात डिजिटल मीडियासाठी येणार नवा कायदा; माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रक्रियेला सुरुवात :
  • भारतात पहिल्यांदाच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी एक नवीन कायदा आणण्यात येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नव्या विधेयकात डिजीटल न्यूज मीडियाचा देखील समावेश करण्यात येणार आहे. देशात डिजीटल न्यूज मीडियासाठी हा पहिलाच कायदा असेल. हा कायदा पारित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी लागणार आहे.

  • वेबसाईट प्रकाशकांना आपल्या वेबसाईटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागेल. तसेच कोण्यात्याही वेबसाईटवर कारवाई करण्याचे अधिकारही त्यांच्याकडेच असतील. त्यानुसार ते कोणत्याही वेबसाईटची मान्यता रद्द करू शकतात किंवा त्यांना दंड ठोठावू शकतात. त्यासोबतच तक्रार निवारणासाठी मंडळदेखील स्थापण करण्यात येणार आहे. त्याचे प्रमुख हे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी असतील.

  • यापूर्वी डिजीटल न्यूज मीडियावर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर बंधने नव्हती. मात्र, हे सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर सर्व न्यूज वेबसाईट या कायद्याच्या चौकटीत येणार आहे. २०१९ मध्ये सरकारने या कायद्याचा मसूदा तयार केला होता. त्यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सरकार डिजीटल मीडियावर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता.

१६ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.