चालू घडामोडी आणि दिनविशेष - 15 जुलै 2023

Date : 15 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक व करसहायक पदाचा निकाल जाहीर
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अकराशेहून अधिक पदांचा निकाल आहे. कौशल्य चाचणी आणि इतर परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
  • महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाचा निकाल जाहीर केला. सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
23 ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख
  • २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.
  • सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.  
  • २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.

प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन

  • सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अ‍ॅन्सेस्ट्रल अ‍ॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.
  • चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.

द्रौपदी  मुर्मू, राष्ट्रपती

  • चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो!  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
  • चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

  • चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
फ्रान्समध्ये लवकरच भारताची यूपीआय प्रणाली! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान कराराची शक्यता
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात डिजिटल अर्थव्यवस्था, उत्पादन क्षेत्र आणि हरित इंधन या क्षेत्रांत दोन्ही देशांदरम्यान सहकार्याची पावले उचलली जाणार आहेत. या दौऱ्यात भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणाली फ्रान्समध्ये सुरू केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  • सध्या भारताबाहेर, सिंगापूरमध्ये यूपीआय प्रणालीचा वापर सुरू आहे. याच वर्षी यूपीआय प्रणाली चालविणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि सिंगापूरमधील पेनाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे यूपीआयचा वापर सिंगापूरमध्ये आणि पेनाऊचा वापर भारतामध्ये करणे शक्य झाले. एनपीसीआय आणि फ्रान्समधील लायरा या कंपन्या वर्षभरापासून यावर काम करीत आहेत. मोदींच्या दौऱ्यादरम्यान याबाबत निर्णय यूपीआयचा वापर सुरू करणारा फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश ठरेल.
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘यूपीआय’ प्रणाली विकसित केली आहे. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे आणि सध्या देशातील सुमारे ४०० बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्या ‘यूपीआय’शी जोडल्या गेल्या आहेत.

भारत-फ्रान्समधील उद्योगपतींची बैठक

  • ‘भारत-फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदे’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या परिषदेची बैठक पॅरिसमध्ये १४ जुलैला होणार असून, त्यात दोन्ही बाजूंकडील १० ते १२ उद्योगपती उपस्थित असतील. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्युबिलंट समूहाचे सहअध्यक्ष हरी भाटिया आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कॅपजेमिनी एसईचे अध्यक्ष पॉल हर्मिलीन करणार आहेत.
‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण.. पुढे काय?
  • श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेने झेपावले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. या चांद्रमोहिमेचे तीन प्रमुख टप्पे आहेत.

पृथ्वीला निरोप..

  • चंद्रयान-३चा मार्ग चा चंद्रयान-२ सारखा आहे. हे यान पृथ्वीभोवती पाच कक्षेतील आवर्तन पूर्ण करेल. प्रत्येक वेळी ते पृथ्वीपासून दूर जाणारे अंतर वाढवेल. पाचवे आवर्तन पूर्ण केल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जाऊ लागेल.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश

  • पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील आवर्तनाप्रमाणेच ‘चंद्रयान-३’ चंद्राभोवती चार वेळा प्रदक्षिणा घालेल आणि प्रत्येक वेळी चंद्राजवळ जाईल. अखेरीस ते १०० किमी  ७ १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचेल. या टप्प्यावर लँडर प्रोपल्शन मॉडय़ूलपासून वेगळे होते आणि त्याची कक्षा बदलते. त्यानंतर, लँडरचे अलगत अवतरण प्रक्रिया सुरू होते.

चंद्रावर अवतरण

  • पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास सुमारे एक महिना लागण्याचा अंदाज आहे. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. चंद्रावर अवतरण केल्यावर, ते एका चांद्र दिवसासाठी कार्य करेल.
  • ०१ = यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे
  • ०२ = चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)
  • ०३ = ‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर

रोव्हर डिस्कव्हरी

  • चंद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर एक रोव्हर उतरवेल आणि चंद्राचा शोध घेण्याची क्षमता सिद्ध करेल. रोव्हर त्याच्या स्थानाजवळ वैज्ञानिक प्रयोग करेल आणि चंद्राच्या वातावरणाबाबत मौल्यवान माहिती गोळा करेल.

काय माहिती मिळवणार?

  • चंद्रयान-३च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, भूवैज्ञानिक वैशिष्टय़े आणि इतर माहिती मिळविली जाणार आहे. चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझ्माचे प्रमाण,  चांद्रपृष्ठातील रासायनिक मूलद्रव्ये यांचा अभ्यास केला जणार आहे.

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - भारत अव्वल! ; अखेरच्या दिवशी एक सुवर्ण, तीन रौप्यपदके :
  • नेमबाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले. भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली. यामध्ये महाराष्ट्राच्या शाहूने सांघिक गटांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली.

  • दिवसाच्या सुरुवातीला भारताच्या अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा या त्रिकुटाने १० मीटर एअर रायफल सांघिक गटात कोरियाला १७-१५ असे पराभूत करत देशासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले. अर्जुन आणि शाहूचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.

  • एलाव्हेनिल व्हलारिव्हान, मेहुली घोष आणि रमिता यांनी कोरियाकडून १०-१६ अशी हार पत्करली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने इटलीकडून १५-१७ असा पराभव पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिवसाचे तिसरे रौप्यपदक भारताने १० मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक गटात मिळवले.

नगरपालिका निवडणुका स्थगित ; मनाई आदेश नसतानाही निवडणूक आयोगाचा निर्णय :
  • इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.   

  • राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्टला होणार होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असल्याने निवडणूक कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला होता. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाशिवाय या निवडणुका नकोत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता. या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.   

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात १२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीतही राज्य सरकारने या निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली होती. ओबीसी आरक्षणाबाबतचा समर्पित आयोगाने दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून, त्यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

जुमलाजीवी, बालबुद्धी, नक्राश्रू, स्नूपगेट :
  • ‘भ्रष्टाचार’, ‘बालीशपणा’, ‘नक्राश्रू’ असे दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले आहेत. सूचिबद्ध असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यास आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला होता. पण, ‘जुमलाजीवी’ हा शब्द असंसदीय मानला गेला आहे. मोदी सरकारच्या कारभारावर टिप्पणी करताना विरोधक वापरत असलेले शब्दच असंसदीय मानले जात असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आता विश्वगुरू हा शब्दही असंसदीय ठरवणार का, असा सवाल काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. ‘‘आम्ही तर आता विश्व ठगगुरू असे  म्हणू’’, अशी उपहासात्मक टिप्पणी काँग्रेसचे शक्तिसिंह गोहील यांनी केली.    

  • लोकसभा सचिवालयाच्या सूचीमुळे वादंग माजल्यामुळे अखेर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी लागली. ‘‘लोकसभा किंवा राज्यसभेत सत्ताधारी वा विरोधी सदस्यांनी एकमेकांवर आरोप करताना वापरलेल्या शब्दाचा संदर्भ लक्षात घेऊन संबंधित शब्द आक्षेपार्ह ठरत असेल तर, कामकाजातून काढून टाकला जातो. ही संसदीय नियमांची पद्धत कायम ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही शब्दावर बंदी घातली जाणार नाही’’, असे बिर्ला म्हणाले.

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचा राजीनामा ; मालदीवहून सिंगापूरमध्ये दाखल :
  • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. राजपक्षे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना पाठवला आहे. राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते गुरुवारी सिंगापूरला रवाना झाल़े

  • ‘खासगी भेट’ म्हणून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांना देशात प्रवेशास अनुमती दिली आहे आणि त्यांच्याकडून आश्रय देण्याची कोणतीही विनंती करण्यात आली नाही, असे सिंगापूरने गुरुवारी स्पष्ट केले.श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे.  सऊदी एयरलाइसचे विमान स्थानिय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजतानंतर काही वेळात सिंगापूरमधील चांगी अंतरराष्ट्रीय विमानळावर उतरले. यामध्ये  राजपक्षे होते.

  • सिंगापूर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, राजपक्षे यांना  खासगी भेट’ म्हणून सिंगापूरध्ये प्रवेशास संमती देण्यात आली आहे. राजपक्षे यांनी आश्रय देण्यासाठी कोणतीही विनंती केली नव्हती. त्यांना आश्रयही देण्यात आला नाही. राजपक्षे यांनी बुधवारी राष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी देश सोडल्यानंतर काही तासांत  पंतप्रधान रानील विक्रमसिंघे हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल, ‘ही’ आहेत लक्षणं :
  • गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

  • संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात दाखल झाली होती. या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

  • मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग १९५८ मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत.

  • साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सचा इंक्यूबेशन काळ ( संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ ) साधारणतः ७ ते १४ दिवसांचा असतो. मात्र तो५ ते २१ दिवसांपर्यंत वाढू शकतो, असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या वतीने सांगण्यात आले आहे.

उद्यापासून ७५ दिवस वर्धक मात्रा मोफत; केंद्र सरकारची घोषणा :
  • सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे करोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळण्याचे संकेत आहेत. ‘‘देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला’’ अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना प्रतिबंधक लशीची पहिली आणि दुसरी मात्रा केंद्र सरकारने मोफत दिली होती. खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता.

  •  आत्तापर्यंत ९६ टक्के पात्र लोकांना पहिली, तर ८७ टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येपैकी १ टक्क्यांहूनही कमी नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, ६० आणि त्याहून अधिक वयोगटातील सुमारे १६ कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे २६ टक्के नागरिकांना तसेच, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.

  • गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली़  दोन्ही मात्रा घेतलेल्या बहुतांश नागरिकांनी वर्धक मात्रेकडे मात्र पाठ फिरवली़  आता वर्धक मात्राही मोफत देण्यात येणार असल्याने लसीकरणाची टक्केवारी वाढेल, असे मानले जाते.

१५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.