साताऱ्याच्या एकलव्यचा खडतर सुवर्णप्रवास! ; युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत इतिहास घडवणाऱ्या पार्थच्या यशामागची कहाणी
एकलव्यने द्रोणाचार्याना गुरू मानून धनुर्विद्या आत्मसात केली. महाभारतातील अर्जुनाला प्रत्यक्ष द्रोणाचार्याचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, या आधुनिक युगातील पार्थला द्रोणाचार्य मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. या पार्थने ‘युटय़ूब’मार्फत धनुर्विद्येचे धडे गिरवले आणि स्वत:मधील तिरंदाज जागा ठेवला. नेमके मार्गदर्शन मिळाल्यावर या पार्थने म्हणजेच साताऱ्याच्या पार्थ साळुंखेने जागतिक नकाशावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या रीकव्र्ह प्रकारात पार्थने युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला.
आयर्लंड येथील युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णयश मिळवलेल्या पार्थचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. ‘‘ऑलिम्पिकच्या लढती टीव्हीवर पाहून तिरंदाजीची मला आवड निर्माण झाली. शाळेमध्ये हा खेळ सुरू झाला. हा खेळ शिकण्यासाठी धनुष्यबाणही खरेदी केला होता. मात्र, तिरंदाजी प्रशिक्षकांपर्यंत पोचण्यापूर्वीच ते शाळा सोडून गेले. मग शालेय शिक्षक असलेल्या वडिलांनी धीर दिला आणि त्यांच्यासह ‘युटय़ूब’वरून या खेळातील बारकावे शिकू लागलो,’’ असे पार्थने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
कधी घरात, कधी शाळेने उपलब्ध करून दिलेल्या मैदानात, तर कधी शेतात पार्थचे तीर लक्ष्य साधू लागले होते. पार्थच्या या अशा प्रशिक्षणाचा कालावधी थोडाथोडका नव्हता. पार्थने २०१३ ते २०१८ अशी तब्बल पाच वर्षे अशाच पद्धतीने प्रशिक्षण घेतले. याच कालावधीत २०१६ मध्ये पार्थने इंदूरला शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर २०१८मध्ये पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत पार्थला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, स्पर्धेतील पहिल्या दहा तिरंदाजांची क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि तेथे पार्थमधील एकलव्याला खऱ्या अर्थाने द्रोणाचार्य मिळाले व त्याच्यातील अंगभूत गुणवत्तेला पैलू पडले. केंद्रातील प्रशिक्षक राम अवधेश यांनी पार्थला घडवले.
जागतिक यशाबद्दल पार्थ म्हणाला, ‘‘तुटपुंज्या प्रशिक्षणावर मी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले होते. त्यामुळे मोठय़ा स्पर्धेत उतरल्यावर काय करायचे किंवा कसे खेळायचे याचे दडपण मला कधीच नव्हते. यापूर्वी २०२१च्या जागतिक युवा स्पर्धेतच मी पदार्पणात सांघिक सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो होतो. या यशाने स्फूर्ती मिळाली आणि आता वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. कोरियन स्पर्धकांसमोर आपले तिरंदाज अपयशी ठरतात. मात्र, या वेळी माझ्या पदकाने हे चित्र बदलले याचा आनंद अधिक आहे.’’
गुरुवारी मंत्रीमंडळ विस्तार होणार? अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चेला उधाण
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मागील जवळपास दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने नवनवीन तारखा दिल्यानंतर अलीकडेच अचानक अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मागून आलेल्या आमदारांचा आधी शपथविधी घेतल्याने शिंदे गटासह भाजपातील अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराचा गुंता आणखी वाढत चालला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर उद्या (गुरुवार, १३ जुलै) उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी कार्यक्रम होईल, असं बोललं जात आहे.
तत्पूर्वी, सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदाराची बैठक पार पडणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळणार? याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे. खरं तर, शिंदे गटासह भाजपाचे अनेक आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार; विश्वस्त सुशीलकुमारांचे मौन
लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून गांधी-नेहरूंचा वैचारिक वारसा संपविण्यासाठी आणि देशात हुकूमशाही लादण्यात कार्यमग्न असल्याचा ज्यांच्यावर आक्षेप घेतला जातो, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वादंग माजले असतानाच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ आॕगस्ट रोजी हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख सत्ताधारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसी विचार परंपरा जपणा-या टिळक स्मारक ट्रस्टने पंतप्रधान मोदी यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्यामुळे राज्यात वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या काही पदाधिका-यांसह सेवादल, इंटक तसेच आम आदमी पार्टी (आप) तसेच युवक क्रांती दलाने (युक्रांद) आदी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मोदी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.
या पार्श्वभूमीवर टिळक स्मारक ट्रस्ट मंडळाचे विश्वस्त असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत मौन बाळगले. विश्वस्त मंडळाने पुरस्काराचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यावर आपण बोलणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना ७,५३२ कोटी रुपये निधी जारी
अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज २२ राज्य सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) साठी ७,५३२ कोटी रुपये जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार ही रक्कम जारी करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्राला १४२० कोटी ८० लाख रुपये जारी करण्यात आले आहेत. देशभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्यात आली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना जारी केलेल्या रकमेच्या वापराच्या प्रमाणपत्राची वाट न पाहता राज्यांना तात्काळ मदत म्हणून ही रक्कम जारी करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ४८ (१) (अ) अंतर्गत प्रत्येक राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची (एसडीआरएफ) स्थापना करण्यात आली आहे. हा निधी अधिसूचित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारांकडे उपलब्ध असलेला हा प्राथमिक निधी आहे. केंद्र सरकार सर्वसाधारण राज्यांमध्ये एसडीआरएफ मध्ये ७५% तर ईशान्य प्रदेश आणि हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यांमध्ये ९०% योगदान देते.
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वार्षिक केंद्रीय योगदान दोन समान हप्त्यांमध्ये जारी केले जाते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार,आधीच्या हप्त्यात जारी केलेल्या रकमेच्या वापराचे प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि एसडीआरएफकडून हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत राज्य सरकारकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधी जारी केला जातो. मात्र, तातडीची गरज लक्षात घेऊन यावेळी निधी जारी करताना अटी शिथिल करण्यात आल्यात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला आणि हिमवृष्टी आणि शीतलहरी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना त्वरित मदत पुरवण्यासाठी खर्च केला जातो.
याआधी केलेला खर्च, क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि आपत्ती जोखीम निर्देशांक यांसारख्या अनेक घटकांच्या आधारे राज्यांना एसडीआरएफ निधीचे वाटप केले जाते. हे घटक राज्यांची संस्थात्मक क्षमता, जोखीम आणि धोक्याची शक्यता दर्शवतात. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारने २०२१-२२ ते २०२५-२६ या वर्षांसाठी एसडीआरएफसाठी १,२८,१२२.४० कोटी रुपये तरतूद केली आहे. या रकमेपैकी केंद्र सरकारचा हिस्सा ९८,०८०.८० कोटी रुपये आहे. केंद्र सरकारने याआधी ३४,१४०.०० कोटी रुपये जारी केले होते. त्यामुळे आतापर्यंत राज्य सरकारांना जारी केलेल्या एसडीआरएफमधील केंद्राच्या हिश्श्याची एकूण रक्कम ४२,३६६ कोटींवर गेली आहे.
राज्य मानांकन कॅरम स्पर्धा - प्रशांत, काजलला जेतेपद :
विश्वविजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी बंगाल क्लबतर्फे आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे जेतेपद मिळवले.
पुरुष एकेरीत प्रशांतने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विकास धारियाला १८-९, १५-२५, १०-१५ असे नमवले. दोन सेटच्या बरोबरीनंतर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली.
सातव्या बोर्डनंतर १९-१४ अशी ५ गुणांची आघाडी प्रशांतकडे होती. त्याने आपली हीच लय कायम ठेवत विजय नोंदवला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम लढतीत काजलने मुंबईच्या नीलम घोडकेवर २५-६, २२-११ असा एकतर्फी विजय मिळवला.
जागतिक पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा :
जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आज आपला राजीनामा सादर केला. अमेरिकेत प्रदीर्घ अध्ययन रजा मंजुरीच्या मुद्यावर डिसले हे वादग्रस्त ठरले असून त्याबाबत झालेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे.
ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित करून जागतिक पातळीवर पोहोचलेले आणि डिसेंबर २०२० मध्ये युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशनचा सात कोटी रुपयांचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे प्रकाशझोतात आले होते.
नंतर अमेरिकेतील फुलब्राईट अभ्यासवृत्ती डिसले यांना जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याबाबतची रीतसर कागदपत्रे डिसले यांच्याकडे मागणी करूनही शेवटपर्यंत त्यांनी सादर केली नव्हती. उलट, शिक्षण विभागात शैक्षणिक संशोधनासाठी अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजुरीसाठी लाच मागितली, अधिकारी आपला मानसिक छळ करतात, असा गंभीर आरोप डिसले यांनी केला होता.
तेव्हा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्तक्षेपानंतर डिसले यांना तब्बल १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मंजूर झाली होती. तथापि, त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असता डिसले यांनी आपण केलेले आरोप खरे नसून भावनेच्या भरात केलो होतो, असा पवित्रा घेतला होता.
इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी ५ सप्टेंबर रोजी निवड; हुजूर पक्षातर्फे नेतृत्व निवडीची प्रक्रिया जाहीर :
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवड ५ सप्टेंबर रोजी केली जाईल. तोच सत्ताधारी काँझव्र्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता असेल. हुजूर (काँझरव्हेटिव्ह) पक्षाच्या संसदीय समितीने (१९२२ पासूनची परंपरा असलेली बँकबेंच कमिटी ) यासाठीचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले.
मंगळवारी यासाठी नामांकन करण्यात येईल व याच दिवशी नामांकनाची मुदत संपेल. या पदासाठी आतापर्यंत भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांसारख्या प्रमुख उमेदवारांसह ११ उमेदवारांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. या समितीचे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी सांगितले, की ही निवडप्रक्रिया शक्यतो जलद आणि सहज पद्धतीने व्हावी, यावर आमचा भर आहे. नव्या पक्षनेत्याची निवड ५ सप्टेंबरला करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यावर एकमत झाल्यानंतर नेतृत्व निवडीची प्रक्रिया योग्यरीत्या करण्यासाठीचे सुस्पष्ट नियोजन केले असून, त्याद्वारे नेतृत्वाचा हा प्रश्न मार्गी लावला जाईल.
समितीच्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन नियमांविषयी मतदान झाले. त्यानुसार पक्षनेतृत्वासाठी जे संसदसदस्य इच्छुक आहेत त्यांना किमान २० खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तरच त्यांचे नाव उमेदवार यादीत समाविष्ट होऊ शकेल. त्यानंतर या उमेदवारांना पुढील फेरीत जाण्यासाठी किमान ३० मतांची किंवा दहा टक्क्यांपर्यंत खासदारांच्या मतांची आवश्यकता असेल.
पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी व दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होईल. त्यातून दोन उमेदवार निवडले जातील. या आठवडय़ाअखेरीस दोन उमेदवार निवडता आले नाही तर पुढील आठवडय़ात पुन्हा मतदान घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनावरील मानचिन्हाच्या स्वरूपाला विरोध :
नव्या संसद भवनावर सोमवारी मोदींनी अनावरण केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या स्वरूपाला विरोधी पक्षाचे नेते आणि काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी विरोध व्यक्त केला. त्यात त्वरित बदल करण्याची मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली.
सारनाथ येथे सम्राट अशोकांच्या काळात उभारलेल्या चार सिंहांचे चिन्ह आपले राष्ट्रीय मानचिन्ह आहे. डौलदार व आत्मविश्वासाचे प्रतीक असलेल्या सिंहांच्या जागी धडकी भरवणाऱ्या आक्रमक सिंहमुद्रा उभारून या मूळ राष्ट्रचिन्हाचे विकृतीकरण नव्या संसदभवनावरील मानचिन्हाच्या रूपाने झाले आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून, सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटले आहे, की नरेंद्र मोदीजी या नव्या मानचिन्हातील सिंहांचा चेहरा नीट पाहावा. ते महान सारनाथ येथील सिंहांच्या मूर्तीची प्रतिकृती वाटतात, की गीरच्या सिंहांचे विकृत रूप त्यांच्यात दिसते, ते तपासा अन् फरक जाणवल्यास त्यात बदल करा.