चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 11, 2021 | Category : Current Affairs


लस न घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीची रजा; पंजाब सरकारचा निर्णय :
 • पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी घोषणा केली की, राज्य सरकारी कर्मचारी जे वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यास अपयशी ठरतील त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, राज्यातील लोकांना रोगापासून वाचवण्यासाठी हा उपाय लागू केला आहे.

 • काल झालेल्या उच्च स्तरीय व्हर्च्युअल कोविड -१९ आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की लसीची प्रभावितता समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. लस सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आणि जे लसीकरण टाळत राहतील त्यांना लसीचा पहिला डोस मिळेपर्यंत रजेवर जाण्यास सांगितले जाईल, असे पंजाब सरकारने घोषित केले आहे.

 • बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी साप्ताहिक आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याच्या अधीन राहून चार आठवड्यांपूर्वी लसीचा किमान एक डोस घेतलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर शालेय कर्मचाऱ्यांना पुन्हा आपलं काम सुरू करण्याची परवानगी दिली. तथापि, ज्यांना सह-आजार आहेत त्यांना फक्त एकदाच परवानगी दिली जाईल जेव्हा त्यांचे करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण होतील.

 • हे लक्षात घेण्यासारखे आहे की राज्याने आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या ५७% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. पहिला डोस १.१८ कोटी आणि दुसरा ३७.८१ लाख लोकांना देण्यात आला आहे. दरम्यान, आगामी सणासुदीचे हंगाम पाहता पंजाबने सध्याचे कोविड -१९ निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढवले ​​आहेत. त्यांनी राजकीयसह सर्व मेळाव्यांमध्ये ३०० व्यक्तींची मर्यादा घातली आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत करोनावर उच्चस्तरीय बैठक :
 • देशात करोनाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या देशातील स्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान देशात करोना रुग्णांची २४ तासातील संख्या ३४९७३ झाली असून २६० जणांचा बळी गेला आहे.

 • देशातील निम्म्या लोकांना पहिली मात्रा दिली असून एकूण १८ टक्के लोकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ७२ कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत.  करोनामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील गणेशोत्सवावर विरजण पडले. मुंबई शहर पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश १० ते१९ सप्टेंबर या काळात लागू केला आहे. लोकांनी गणपतीचे आभासी दर्शन घ्यावे असे सुचवण्यात आले आहे.

 • दरम्यान करोनाबाबत एका पत्रकार परिषदेत निती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले, की शाळा उघडण्यासाठी मुलांच्या लसीकरणाची पूर्वअट नाही. हा निकष जगात कुठेही लागू करण्यात आलेला नाही. पण शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे आहे. दरम्यान अर्थचक्र रूळावर येत असून सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

 • आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी कोविन आयटी मंचावर डिजिटल लस प्रमाणपत्रांची सेवा उपलब्ध केली आहे. दिल्लीत करोनाचे प्रमाण कमी झाले असून संसर्ग दर केवळ ०.०५ टक्के आहे. मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे असे सांगण्यात आले. महिनाभरात राज्यात केवळ एक बळी गेला आहे.

बायडेन यांच्याकडून कोविड प्रतिबंधासाठी नव्या उपाययोजना :
 • लस न घेणारे लोक अमेरिकेला करोनाच्या साथीतून मुक्त होऊ देत नाहीत, असा आरोप अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी केला असून नवीन कठोर नियम लागू केले आहेत. अमेरिकेत करोनाची साथ अजूनही सुरू असून लाखो कामगारांनी लस घ्यावी यासाठी बायडेन प्रयत्नशील आहेत. बायडेन प्रशासनाने म्हटले आहे की, आम्ही देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे.

 • देशातील २५ टक्के लोकांनी म्हणजे ८ कोटी लोकांनी लसीकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. करोनाचा अमेरिकेला सर्वाधिक फटका बसला होता. अजूनही तेथे १ लाख ५१ हजार ५०० रुग्ण दिवसाला सापडत असून जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार जानेवारीत होती तेवढी संख्या पुन्हा दिसून लागली आहे. अमेरिकेत रोज १५०० लोक करोनाने मरण पावत आहेत.

 • आपण कोविड १९ ची बाजी कशी त्या रोगावरच उलटवू याचा विचार केला पाहिजे, असे सांगून बायडेन यांनी म्हटले आहे की, अजून ८ कोटी लोकांनी लसीकरण करून घेतलेले नाही. मुळात लसीकरण हे सुरक्षित असताना त्यांनी लसीकरणास टाळाटाळ केली आहे. उन्हाळ्यात देश करोनामुक्त झालेला असेल असे सांगून ते म्हणाले  की, डेल्टा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत.  अमेरिकेत २१ लाख कंत्राटी कर्मचारी असून त्यांचेही लसीकरण करून घेण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. उद्योगांना शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.

चांद्रयान-२च्या मदतीने अधिक चांगल्या दर्जाचे संशोधन :
 • चांद्रयान २ आर्बिटरवर असलेल्या पेलोडच्या मदतीने जी माहिती मिळाली आहे त्यातून अभिनव पद्धतीचे निष्कर्ष हाती आल्याचा दावा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने केला आहे.

 • या ऑर्बिटर यानावर आठ वैज्ञानिक पेलोड आहेत. पेलोड म्हणजे वैज्ञानिक संशोधनासाठी वापरली जाणारी उपकरणे असतात. चांद्रयान लार्ज एरिया सॉफ्ट एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, सोलर एक्स रे मॉनिटर, चंद्रा अ‍ॅटमोस्फॉरिक कंपोझिशनल एक्सप्लोअरर, ड्युअल फ्रिक्वेन्सी. इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोमीटर, टेरेन मॅपिंग कॅमेरा, आर्बिटर हाय रेझोल्यूशन कॅमेरा व ड्युअल फ्रिक्वेन्सी, रेडिओ सायन्स एक्स्परिमेंट हे  पेलोड त्यात आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीपासून चांद्र विज्ञानाबाबत इस्रोने कार्यशाळा सुरू केली असून भारतातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी व सर्व शाखांतील व्यक्तींना चंद्राच्या संशोधनाची माहिती खुली करून देण्यात आली आहे.

 • चांद्रयान२ आर्बिटर यानाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या कार्यशाळेचे बंगळूरु येथील मुख्यालयात उद्घाटन केले. मास स्पेक्ट्रोमीटर चेस -२ ने चंद्राच्या पृष्ठभूमीवरील व एक्झोस्पीअरमधील अरगॉन ४० चा अभ्यास केला आहे. त्यामुळे तेथे काही प्रमाणात किरणोत्सारी प्रक्रिया आढळून आल्या आहेत. चंद्रावर क्रोमियम व मँगेनीजचे अस्तित्वही आढळून आले आहे.

 • एक्सएसएम पेलोडने सूर्याच्या ज्वाळांचा चंद्रावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे. आयआयआर पेलोडच्या मदतीने हायड्रॉक्सिल रेणू, पाण्याचे बर्फ सापडले असून हायड्रेशनचे (जलीकरण) गुणधर्म तेथे आढळून आले आहेत. डीएएफएसएआर या उपकरणाच्या मदतीने चंद्रावर पृष्ठभागाखालील बर्फाचे अस्तित्व सापडले आहे. धु्रवीय भागात काही वेगळे गुणधर्म दिसून आले आहेत. प्रदान या पोर्टलच्या मदतीने बायलूलू केंद्रात मिळालेली माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

जगभरातल्या अनेक देशांपेक्षा भारतातल्या ‘या’ राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग अधिक; केंद्रानं दिली आकडेवारी :
 • देशात गेल्या काही दिवसात अचानक करोना रुग्णवाढ झाल्याचं दिसत आहे. असं असताना करोना लसीकरणाचा वेगही वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. देशात आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे.

 • शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने याबाबतची आकडेवारी दिली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे.

 • सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवसाला देण्यात येणाऱ्या लसींची तुलना इतर देशांशी केली आहे. उत्तर प्रदेशात एका दिवसात अमेरिकेपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दिवसाला ११.७३ लाख डोस दिले आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण ८.०७ लाख इतकं आहे. गुजरातमध्ये मेक्सिकोपेक्षा अधिक लस दिल्या गेल्यात. गुजरात दिवसाला ४.८० लाख, तर मेक्सिकोत ४.५६ लाख लस दिल्या गेल्यात.

 • कर्नाटक आणि रशियाची तुलना केल्यास रशियात दिवसाला २.८४ लाख, तर कर्नाटकात ३.८२ लाख लसी दिल्या गेल्यात. मध्य प्रदेश आणि फ्रान्सची तुलना केल्यास मध्य प्रदेशात ३.७१ लाख लसी, तर फ्रान्समध्ये २.८४ लाख लसी दिल्या गेल्यात. हरयाणा आणि कॅनडाची तुलना केल्यास हरयाणात १.५२ लाख लसी, तर कॅनडात ०.८५ लाख लसी दिल्या गेल्यात.

अपराजित भारत उपांत्यपूर्व फेरीत :
 • भारतीय संघाने साखळीत ब-गटातून सर्वाधिक १६ गुणांसह अपराजित राहून ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी भारताने हंगेरी आणि मोल्डोव्हाला नमवले. परंतु स्लोव्हेनियाने मात्र बरोबरीत रोखले.

 • साखळीतील नऊ फेऱ्यांअंती भारताने आघाडी घेताना ७ विजयांची आणि दोन बरोबरींची नोंद केली. भारताशी फ्रान्स आणि स्लोव्हेनिया या संघांनी बरोबरी साधली. हंगेरीचा संघ १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. १३ सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्यपूर्व फे रीत भारताची क-गटातील दुसऱ्या संघाशी गाठ पडणार आहे.

 • सातव्या फेरीत भारताने हंगेरीचा ४-२ असा पाडाव केला. यात विश्वनाथन आनंद, निहाल सरिन आणि कोनेरू हम्पीच्या विजयांचा सिंहाचा वाटा होता. आर. वैशाली आणि द्रोणावल्ली हरिका यांनी आपापले सामने बरोबरीत सोडवले, तर पेंटाला हरिकृष्णाने सामना गमावला.

 • आठव्या फेरीत भारताने मोल्डोव्हाचे आव्हान ५-१ असे मोडित काढले. विदित गुजराथी, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी आणि आर. प्रज्ञानंद यांनी विजयाची नोंद केली, तर बी. अधिबान आणि श्री बी सविता यांनी बरोबरीत समाधान मानले.

एका षटकात ६ षटकार, भारतीय खेळाडूने २० चेंडूत केल्या ११२ धावा :
 • मूळचा भारतीय असणाऱ्या जसकरण मल्होत्राने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूंमध्ये ६ षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच षटकामध्ये ६ षटकार लगावणारा तो जगातील केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. अमेरिकेकडून खेळताना जसकरणने पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात ५० व्या षटकामध्ये ही भन्नाट कामगिरी केली. त्याने १७३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १६ षटकार आणि ४ चौकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ २० चेंडूंमध्ये ११२ धावा कुटल्या.

 • मूळचा पंजाबमधील असणाऱ्या जसकरणचा हा केवळ सातवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. या सामन्यामध्ये या ३१ वर्षीय खेळाडूने तुफान फटकेबाजी केली. या सामन्याआधी त्याची सर्वोच्च धावसंख्या अवघी १८ इतकी होती. शेवटच्या षटकामध्ये त्याने गाउडी टोका या गोलंदाजाला एकापाठोपाठ एक सहा षटकार लगावले. जसकरण पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

 • त्याने १२४ चेंडूंमध्ये १७३ धावांची खेळी केली. अमेरिकेने नऊ गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या. पापुआ न्यू गिनीच्या संघाला १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांनी हा सामना १३४ धावांनी गमावला. दोन सामन्यांची मालिका अमेरिकेने २-० अशी जिंकली.

 • जसकरण मल्होत्राआधी गिब्सने हा कारनामा केलाय. त्याने २००७ मध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना ही कामगिरी केलेली. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंहनेही २००७ मध्ये टी २० विश्वचषकामध्ये अशीच कामगिरी केलेली. युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकामध्ये सहा षटकार लगावले होते. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी २० सामन्यामध्ये एका षटकात सहा षटकार लगावले होते.

११ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)