चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ नोव्हेंबर २०२०

Date : 9 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बायडेन यांच्याकडून जागतिक नेत्यांना मोठय़ा अपेक्षा :
  • अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, अमेरिकेशी कॅनडाचे निकटचे संबंध आहेतच,  भौगौलिक स्थिती व व्यक्तिगत संबंध यामुळे दोन्ही देशांत आर्थिक संबंध मजबूत आहेत. कोविड १९ साथीचा मुकाबला, शांतता व सर्वसमावेशकता, आर्थिक भरभराट, हवामान बदल या मुद्दय़ांवर नवीन प्रशासनाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. हे दोन्ही  देश एकत्रितपणे जागतिक आव्हानांना तोंड देतील.

  • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, अमेरिका हा आमचा महत्त्वाचा मित्र देश आहे. सामुदायिक अग्रक्रमांच्या मुद्दय़ांवर आम्ही काम करू. त्यात हवामान बदल, व्यापार व सुरक्षा यांचा समावेश आहे.

  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बायडेन यांच्याकडून नव्या भागीदारीची अपेक्षा व्यक्त केली असून नवीन अध्यक्षांची निवड ही अमेरिकेसाठीच नव्हे तर आमच्यासाठीही महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.

भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्याचे संकेत :
  • भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी ही २१ व्या शतकास आकार देणारी ठरेल, तसेच दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत केले जातील, असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत.

  • भारत व अमेरिका यांच्यात चांगले संबंध राहावेत असे मत बायडेन यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. यापूर्वी बायडेन हे जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी  दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट  स्पष्ट केले होते.  सध्या दोन्ही देशातील व्यापार दीडशे अब्ज डॉलर्सचा आहे. बायडेन यांनी भारत—अमेरिका संबंधाबाबत अनेकदा मते व्यक्त केली आहेत.

  • अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचाराच्या वेळी भारतातील हवा वाईट असल्याचे जे वक्तव्य केले होते त्याला बायडेन यांनी आक्षेप घेतला होता. एखाद्या मित्र देशाबाबत कुणी असे बोलेल का, असे सांगून बायडेन यांनी म्हटले होते, की हवामान बदलाचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत.

  • बायडेन यांनी असेही म्हटले आहे, की कमला हॅरिस व मी दोघांनाही भारताशी भागीदारी महत्त्वाची  वाटते. दोन्ही देशातील मैत्रीच्या संबंधांना मध्यवर्ती स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

एच १ बी व्हिसासाठीच्या मर्यादेत वाढीची अपेक्षा :
  • उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठीच्या एच १ बी व्हिसाची मर्यादा वाढवण्याचा विचार असल्याचे बायडेन प्रशासनाने त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात जाहीर केले होते, त्या प्रमाणे सत्ताग्रहणानंतर त्यांचे प्रशासन  पावले उचलणार आहे.

  • हजारो भारतीयांना मिळणाऱ्या एच १ बी व्हिसाचा  कार्यक्रम ट्रम्प प्रशासनाने  रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना व कंपन्यांना फटका बसला होता.  आता एच १ बी व्हिसा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत होणार असल्याची चिन्हे आहेत.

  • बायडेन यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात एच १ बी व्हिसा  पुन्हा पूर्ववत करण्याचे संकेत देण्यात आले  होते. एवढेच नव्हे, तर जास्त कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली एच १ बी व्हिसा मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

  • एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असतो,  तो विशेष कौशल्ये असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना दिला जातो. बायडेन प्रशासन परदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रीनकार्डची मर्यादाही वाढवणार आहे.

आठ वर्षांचा तुरुंगवास भोगताना घेतल्या ३१ पदव्या; सुटका होताच मिळाली सरकारी नोकरी :
  • सामान्यपणे तुरुंगामधून मोठी शिक्षा भोगून आल्यानंतर कैदी आयुष्याला कंटाळतात किंवा अधिक हिंसक होऊन पुन्हा गुन्हेगारी विश्वाकडे वळतात. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करणारे अगदीच मोजके लोकं असतात. गुजरातमधील भावनगरमध्ये सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या कैद्याची चर्चा आहे. येथे राहणाऱ्या भानूभाई पटेल नावाच्या कैद्याने आठ वर्षांच्या तुरुंगवासाच्या कालावधीमध्ये ३१ पदव्या घेतल्या.

  • विशेष म्हणजे तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला सरकारी नोकरीचीही ऑफर मिळाली. नोकरीनंतर पाच वर्षांनी त्यांनी २३ पदव्या घेतल्या. यानंतर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने भानूभाईंची दखल घेत त्यांच्या या विक्रमाची नोंद घेतली.

  • सामान्यपणे तुरुंगामधून परतलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जात नाही. मात्र तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर भानूभाईंना अंबेडकर विद्यापिठाकडून नोकरीची ऑफऱ देण्यात आली. नोकरीनंतर त्यांनी पाच वर्षांमध्ये २३ पदव्या संपादित केल्या. त्यांनी आतापर्यंत ५४ पदव्या घेतल्या आहेत.

  • करोनाच्या कालावधीमध्ये भानूभाईंनी आपल्या अनुभवांचे कथन करणारी तीन पुस्तकं लिहिली आहेत. तुरुंगावासापासून विश्वविक्रमापर्यंतचा प्रवास त्यांनी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये तीन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये कथन केला आहे. गुजरातीमधील पुस्तकाचे नाव, ‘जेलना सलिया पाछळ की सिद्धी’ असं आहे. इंग्रजीमधील पुस्तकाचे नाव बिहाइण्ड बार्स अ‍ॅण्ड बियॉण्ड असं नाव आहे. १३ व्या विधानसभा निवडणुकींमध्ये भानूभाई प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

०९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.