चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 फेब्रुवारी 2024

Date : 8 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे
 • पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीनप्रसंगी आता तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे. महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू केली जाणार आहेत. या माध्यमातून वाहनचालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील. ९५ किलोमीटरच्या हा महामार्गावर दर दोन किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे.
 • मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी सुरक्षा सुविधा सहजपणे आणि तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही सोय करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी दूरसंचार क्षेत्रातील ‘वी’ कंपनीने एक विशेष करार केला आहे. त्याअंतर्गत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन  दूरध्वनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या करारानुसार वी कंपनी सर्व केंद्रांना नेटवर्क देणार आहे. दर दोन किमीवर ही दूरध्वनी केंद्रे उभारली जाणार असून त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे प्रवाशांना शक्य होईल
 • प्रत्येक आपत्कालीन दूरध्वनी केंद्रावरील नेटवर्क सुरळीत ठेवण्याची व्यवस्था ‘वी’ कंपनी करेल. नेटवर्कमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी महामार्ग पोलीस नियंत्रण कक्ष आणि आपत्कालीन दूरध्वनी केंद्र अशी दोन्हीकडे ‘वी’ कंपनीची सेवा असेल. उपकरणांची देखभाल करून तसेच प्रवाशांच्या चौकशी आणि तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे काम रस्ते विकास महामंडळ करणार आहे.पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर दर दोन किलोमीटरवर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे उभारण्यात येतील. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
 • प्रवाशांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देत आहोत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवास सुरक्षितपणे व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. आपत्कालीन दूरध्वनी केंद्र हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
सोलापूर विद्यापीठात बीएस्सी परीक्षेत ५० गुणांच्या पेपरला ९९ गुण 
 • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार पुन्हा उजेडात आला आहे. बिएस्सी  द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ९९ गुण देण्यात आल्याचे दिसून आले.
 • जुळे सोलापुरातील वसंधरा महाविद्यालय आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवाढीचा अनुभव घेतला आहे. गेल्या आक्टोंबरमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असता गुणपत्रिका पाहून विद्यार्थी व पालकांना धक्का बसला.
 • ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ८२ गुणांपासून ९९ गुण बहाल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. विद्यापीठ परीक्षा विभागात अधुनमधून गोंधळाचा कारभार समोर येतो. त्यात आता गुणवाढीची भर पडली आहे. दरम्यान, परीक्षेत जादा गुण मिळाल्याचा प्रकार केवळ कारकुनी चुकांमुळे झाला आहे. त्यात योग्य दुरूस्ती केली जाईल, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम, म्हणतात…
 • दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. जोपर्यंत शालेय शिक्षण मंत्री व सचिव महामंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेत नाहीत व लेखी पत्र देत नाहीत तोपर्यंत बहिष्कार चालूच राहील, असे महामंडळाने म्हटले आहे.
 • पवित्र पोर्टल व शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरती, संच मान्यता व अतिरिक्त शिक्षक समायोजन, वेतनेतर अनुदान आदी मागण्यांसाठी महामंडळाने बहिष्कारास्त्र उगारले आहे. दरम्यान, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याकरिता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक पार पडली. त्यात या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारिणीची पुण्यात सभा पार पडली.
 • महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सभेत राज्यातील दहावी व बारावीच्या उन्हाळी परीक्षेकरिता शाळांच्या इमारती व कर्मचारी वर्ग उपलब्ध न करून देण्याचा ठराव पारित केला. बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
 • अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यासंदर्भातील पत्र नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधुरी सावरकर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे देण्यात आले. तसेच यापूर्वी मुख्यमंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे या बहिष्कारावर तोडगा न निघाल्यास यंदा परीक्षा कशा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भारतीय वंशाच्या राजकारणी श्रीला फ्लेथर यांचे निधन
 • भारतीय वंशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेथर यांचे मंगळवारी ब्रिटनमध्ये निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.एक शिक्षिका, राजकारणी असण्या व्यतिरिक्त, श्रीला हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये त्यांच्या सुंदर साडय़ांसाठी ओळखल्या जात होत्य. फ्लेथर या बर्कशायरमध्ये विंडसर व मेडेनहेडचे प्रतिनिधित्व केले होते.
 • मेमोरियल गेट्स कौन्सिलचे आजीवन अध्यक्ष म्हणून, लंडनच्या हाइड पार्क कॉर्नर येथे आयकॉनिक मेमोरियल गेट्सच्या बांधकामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या सुमारे ५० लाख राष्ट्रकुल सैनिकांना श्रद्धांजली म्हणून आयकॉनिक मेमोरियल गेट्सची निर्मिती करण्यात आली आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टला गूगलचे आव्हान

 • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टच्या चॅट जीपीटीचा बोलबाला असतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दुसरी बलाढय़ कंपनी गूगलने बार्ड या चॅटबॉट प्रणालीची घोषणा केली आहे. सर्वसामान्य वापरकर्त्यांना ही प्रणाली उपलब्ध करून देण्यापूर्वी काही विश्वसनीय परीक्षकांकडून (टेस्टर) त्याचे मूल्यमापन केले जाईल, अशी माहिती गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ब्लॉगमध्ये दिली आहे.
 • बार्ड ही प्रणाली सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच कुतूहल शमविण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल, असे पिचई यांनी सांगितले आहे. जगातील ज्ञान, सत्ता, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. वापरातील सोपेपणा हे या प्रणालीचे खास वैशिष्टय़ असेल. 
 • नासाच्या जेम्स वेब अवकाश टेलिस्कोपसारखा गुंतागुंतीचा विषय अगदी ९ वर्षांच्या लहान मुलालाही समजेल अशा भाषेत सांगितला जाईल, असा दावा पिचई यांनी केला आहे. तुम्हाला सर्चमध्ये (शोध इंजिन) लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामथ्र्य लाभलेली गुंतागुंतीची माहिती आणि एकापेक्षा अधिक दृष्टिकोन पाहायला मिळतील आणि ते समजायला सोपे आणि वापरण्यासाठी सुरक्षित असतील, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी गूगलने लॅमडा हे भाषाविषयक प्रारूप वापरात आणले आहे. त्यावरच बार्डची उभारणी करण्यात आली आहे.
 • स्पर्धा वाढणार : गूगलच्या या घोषणेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढणार आहे. मायक्रोसॉफ्टने काहीच महिन्यांपूर्वी चॅट जीपीटी सर्वासाठी खुले केले, त्याच्या वापरकर्त्यांची संख्या काही कोटी इतकी आहे. या चॅटबॉटची निर्मिती करणाऱ्या ओपनएआयमध्ये मायक्रोसॉफ्टने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

 • अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar. बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.
 • या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली. या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.

NISAR उपग्रह नेमका कसा आहे?

 • एका SUV च्या आकाराच्या या उपग्रहाचे वजन हे सुमारे २७०० किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे ७४७ किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. या उपग्रहामध्ये मुख्यतः synthetic aperture radar (SAR)चा वापर केला गेला आहे. तसंच १२ मीटर ( ३९ फूट ) व्यासाची एक जाळीदार अँटिना या उपग्रहाला असणार आहे. यामुळे ढगाला भेदत, कोणत्याही वातावरणात जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.

NISAR मोहिमेची उद्दीष्ट्ये काय आहेत?

 • विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या १२ दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. विशेषतः पृथ्वीच्या कवचामध्ये होणार बदल, त्याच्या हालचालीची अचूक नोंद करणे शक्य होणार आहे. यामुळे भूकंप, भूस्खलन किंवा जमिनीवरील अन्य घटनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे. तसंच भूजल पातळी, बर्फाची जाडी, बर्फाची हालचाल, हिमनदीचा प्रवाह यांच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे. यामुळे पर्यावरणातील बदलांची नोंद, अभ्यास करणे आणि त्यावरुन अचूक अनुमान काढण्यास मदत होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी

 • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकदाही त्याने पीसीबीला फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती दिली नाही.
 • आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत. आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही. पीसीबीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती दिलेली नाही, मात्र त्याला नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
 • ३५ वर्षीय आसिफने ३५ प्रथम श्रेणी, ४२ लिस्ट ए आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ११८, ५९ आणि ६३ विकेट्स घेतल्या आहेत. आसिफ आफ्रिदीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आहे. आसिफने ३१ ऑगस्ट रोजी नॅशनल टी-२० कपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.
 • या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी, आसिफचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता. परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

अर्थसंकल्पाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप खासदारांना कानमंत्र

 • आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेला कानमंत्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना दिला. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येकाला त्यातून लाभ मिळेल. ही बाब खासदारांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
 • अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अदानी प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हल्लाबोल केला असताना ‘लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व केंद्र सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांची व योजनांची माहिती दिली पाहिजे,’ असे आवाहन मोदींनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पुढील वर्षी पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करून ‘निवडणुकीचा अर्थसंकल्प’ मांडण्याची संधी केंद्र सरकारकडे होती; पण २०२३-२४चा अर्थसंकल्प लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मांडल्याचा आरोप कोणीही करू शकणार नाही. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.
 • तुर्कस्तान व सीरियामध्ये तीव्र भूकंपांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल बोलताना मोदींनी गुजरातमधील भूकंपाचा अनुभव सांगितला. भूकंपामुळे गुजरातचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडून पुन्हा गुजरातने स्वत:ला घडवले; पण त्यासाठी कित्येक वर्षे कष्ट सोसावे लागले. तुर्कस्तान व सीरियातील नागरिक कुठल्या संकटाला सामोरे जात आहेत, हे समजू शकतो. या देशांना भारताने तातडीने मदत पाठवली आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
 • सरकारविरोधी भावनेवर संवादाचा उपाय - या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून त्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने खासदारांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे, अधिकाधिक लोकसंवादातून सरकारविरोधातील मतांची तीव्रता कमी होते, असा सल्ला मोदींनी दिला.

08 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.