भारतीय पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने ट्रॅप नेमबाजीत जिंकले रौप्यपदक, जाणून घ्या एकूण पदसंख्या
- चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायम आहे. रविवारी या स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाला सुवर्णासोबत रौप्य पदकही मिळाले. भारतीय नेमबाज के चेनाई, पृथ्वीराज तोंडाईमन आणि जोरावर सिंग यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तसेच महिला सांघिक ट्रॅप नेमबाजीत रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर आदिती अशोकने गोल्फमध्ये रौप्यपदक पटकावले.
- नेमबाजीत भारताने सातवे सुवर्ण जिंकले आहे. के चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजीत चमकदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजांनी ३६१ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅप शूटिंगमध्ये संघाची ही सर्वोच्च गुणसंख्या आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता के चेनाई आणि जोरावर सिंग पुरुषांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत लढतील.
अदिती अशोकने पटकावले रौप्यपदक -
- रविवारी देशाला गोल्फमध्ये पहिले पदक मिळवून दिले. आदिती अशोकने गोल्फमधे रौप्यपदक पटकावले. थायलंडच्या अपिर्चाया युबोलने शेवटच्या दिवशी शानदार कामगिरी दाखवत सुवर्णपदक पटकावले. त्याच वेळी, आदिती अशोकने शेवटच्या दिवशी अगदी सामान्य कामगिरी केली. सात स्ट्रोकची आघाडी घेतल्यानंतर सामन्याच्या शेवटी ती दोन स्ट्रोकने मागे पडली आणि सुवर्णपदक हुकले.
आतापर्यंत भारताची एकूण पदकसंख्या किती आहे?
- सुवर्णपदक : ११
- रौप्यपदक : १६
- कांस्यपदक : १४
- एकूण पदकं: ४१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली.
- ५६ वर्षांचे डॉ. प्रकाश महानवर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालकपदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या पूर्वीच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाळ गेल्या ५ मे रोजी संपल्यामुळे रिक्त झालेल्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कारभार होते. मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत हे पाहात होते.
- डॉ. महानवर हे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपाल तथा कुलपतींनी कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु निवड समिती गठीत केली होती. सर विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. या समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ. महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.
अफगाणिस्तानने भारतातला दूतावास केला बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
- भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इथल्या सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचं अफगाणिस्तानच्या दूतावासाने स्पष्ट केलं आहे. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवार, १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. या निवेदनात दूतावासाने म्हटलं आहे की नवी दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातलं आमचं कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला खूप निराशा, दुःख आणि खेद वाटतोय.
- खरंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं राज्य आल्यानंतरही तिथल्या आधीच्या सरकारचा भारतातील दूतावास सुरू होता. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतातला त्यांचा अधिकृत राजदूत कोण यावरून अलिकडेच मोठा गदारोळ झाला होता. अशातच आता अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद केला आहे. यजमान सरकारकडून आम्हाला पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या हितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यजमान सरकारला अपयश आलं असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं दूतावासाने म्हटलं आहे.
- अफगाणिस्तानने निवेदनात म्हटलं आहे की भारताबरोबरचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील वेगवेगळ्या भागीदाऱ्या पाहता हा निर्णय क्लेशदायक असला तरी आम्ही तो खूप काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे. एकीकडे भारताकडून आम्हाला पुरेसं समर्थन मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला काबूलमध्ये वैध सरकारही नाही. त्यामुळेच आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.
- दूतावास स्थलांतरित होईपर्यंत दूतावासाच्या भारतातील वाणिज्य सेवा सुरू राहतील असंही दूतावासाने स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानी दूतावासातील राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतला आहे. पाच अधिकाऱ्यांनी नुकताच देश सोडला. तसेच नवी दिल्लीतलं कामकाज थांबवण्याबद्दल दूतावासाने आधीच भारत सरकारला कळवलं होतं.
पुढील वर्षी परत येईन -पंतप्रधान मोदी; जिल्हास्तरीय गटांच्या कार्यक्रमात ग्वाही; २५ कोटी लोकांच्या जीवनात परिवर्तनाचा दावा
- ‘‘देशातील ११२ जिल्ह्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी जिल्हास्तरीय गट उपक्रम (इन्स्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम) प्रेरक गटांच्या उत्कर्षांचा पाया बनेल. या योजनेच्या यशाचा आढावा घेण्यासाठी आपण पुढील वर्षी परत येऊ,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. या उपक्रमामुळे ११२ जिल्ह्यांतील २५ कोटींहून अधिक नागरिकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचा दावाही त्यांनी केला.
- या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित ‘संकल्प सप्ताहा’च्या प्रारंभ सोहळय़ात मोदी बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले, की आकांक्षी जिल्हा कार्यक्रम स्वतंत्र भारतातील अग्रगण्य दहा उपक्रमांच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हे प्रेरक जिल्हे आता इतरांसाठी प्रेरणादायक जिल्हे बनले आहेत. यानुसार पुढील वर्षांपर्यंत पाचशे गटांपैकी किमान १०० प्रेरणादायक गट निर्माण होतील. मोदींनी यावेळी विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना १०० गट निवडून विविध निकषांनुसार त्यांची राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त कामगिरी घडवून आणण्याची सूचना केली.
- मोदी म्हणाले, की मला विश्वास वाटत आहे, की २०२४ मध्ये आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भेटू आणि या उपक्रमाच्या यशाचा आढावा घेऊन मूल्यांकन करू. या संदर्भात पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी तुमच्याशी पुन्हा संवाद साधेन. मोदींनी या संदर्भातील एका संकेतस्थळाचा प्रारंभ आणि एका प्रदर्शनाचे उद्घाटन केले. माझ्याइतकी प्रदीर्घ काळ सरकार चालवण्याची संधी फार कमी जणांना मिळते, असे सांगून मोदी म्हणाले, की मी अनुभवावरून सांगतो की केवळ अर्थसंकल्प बदल घडवत नाही, जर आपण उपलब्ध संसाधनांचा नियोजनपूर्वक विनियोग आणि अभिसरण केले, तर जिल्हास्तरीय गटांसाठी कोणत्याही नवीन निधीशिवायही काम होऊ शकते. यावेळी त्यांनी संसाधनांच्या न्याय्य वितरणावर भर आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले.
सरासरीपेक्षा कमी पाऊस; मोसमी पावसाचा हंगाम समाप्त; ९४.४ टक्के पर्जन्यमानाची नोंद
- एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करीत मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. दीर्घकाळापासून हंगामात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस होत आला असला तरी यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असतानाही सरासरी ८२० मिमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.
- प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय असूनही यंदा मोसमी पाऊस सामान्य राहिला. देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या ९४.४ टक्के मोसमी पाऊस झाला. ‘एल-निनो’चा प्रभाव मार्च २०२४ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, हिंदू महासागरीय द्वि-ध्रुविता (इंडियन ओशन डायपोल) डिसेंबरअखेरपर्यंत सक्रिय राहणार आहे. त्याचा चांगला परिणाम दक्षिण भारतातील यापुढील पावसावर होऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.
- ऑनलाइन पत्रकार परिषदेत महापात्रा म्हणाले, की १ जून ते ३० सप्टेंबर हा मोसमी पावसाचा कालखंड आहे. यंदा या कालखंडातील पाऊस सामान्य राहिला. या काळात देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ८२० मिमी पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ९४.४ टक्के आहे. सरासरीच्या ५.६ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र, सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के प्रमाण ‘सामान्य’ धरले जाते. त्यामुळे यंदा मोसमी पर्जन्यमान देशभरात सामान्य राहिले.
- प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाला होता. त्यामुळे यंदा देशात कमी पर्जन्यमानाचा अंदाज होता. यंदा पाऊस उशिरा सक्रिय झाला. त्यामुळे जूनमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला; देशाच्या बहुतेक भागांत मोठा खंड पडला. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत सरासरी भरून काढली. हवामान विभागाच्या उपविभागांचा विचार करता, ७३ टक्के भागांत सामान्य पर्जन्यवृष्टी झाली. १८ टक्के भागांत कमी पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला. पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
हांगझाऊ मध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच! अॅथलेटिक्समध्ये १०००० मीटर शर्यतीत कार्तिकने रौप्य तर गुलवीरने जिंकले कांस्यपदक
- चीनमधील हांगझाऊ शहरात सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कार्तिक कुमारने २८:१५:३८ या वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर गुलवीरने २८:१७:२१ या वेळेसह कांस्यपदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील म्हणजे ट्रॅक आणि फील्डमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी सहाव्या दिवशी किरण बालियानने महिलांच्या शॉट पुट प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.
- आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण १० सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय १४ रौप्य आणि १४ कांस्यपदकेही जिंकली असून, त्यानंतर एकूण पदकांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे. सध्या, भारताला अॅथलेटिक्समध्ये आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये भालाफेक स्पर्धेत सर्वांच्या नजरा नीरज चोप्रावर असतील.
- आशियाई खेळ २०२३च्या सातव्या दिवशी महिलांच्या टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेतही भारताची कामगिरी दिसून आली. भारताच्या सुतीर्थ आणि अहिका मुखर्जी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यासह या स्पर्धेतील भारताचे पदकही निश्चित झाले आहे.