चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 फेब्रुवारी 2024

Date : 1 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
क्रिकेटपटू दीप्ती शर्माचा गौरव; योगी सरकारकडून पोलीस दलातील ‘हे’ पद बहाल
 • भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आग्रा येथील या क्रिकेटपटूला यूपी पोलिसात डीएसपी पद देण्यात आले आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर दीप्तीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महिला क्रिकेटचाही महत्त्वाचा वाटा होता.

दीप्तीला मिळाले डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र -

 • आग्राच्या अवधपुरी भागात राहणाऱ्या दीप्ती शर्माचा उत्तर प्रदेश सरकारकडून सत्कार करण्यात आला आहे. तिने अष्टपैलू कामगिरीने मिळवलेल्या यशाचे उत्तर प्रदेश सरकारने कौतुक केले. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी तिचा गौरव केला. यावेळी दीप्तीला तीन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आणि डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द करताना त्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 • गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी २०२३ मध्ये दीप्तीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रौप्य पदकही जिंकले होते. दीप्तीने भारतीय महिला संघाला एकदाच नव्हे तर अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे.
 • दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या नवीन आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचबरोबर तिची सहकारी गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिनेही एका स्थानाचा फायदा घेतला असून ती गोलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फिरकीपटू नॉनकुलुलेको लाबाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीचा दीप्तीला फायदा झाला. लाबाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यात केवळ एक विकेट घेतली होती. यामुळे ती तीन स्थानांनी घसरली आणि दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर गेली.
एमपीएससीकडून उमेदवारांवर कारवाईचा बडगा, गैरवर्तनामुळे उमेदवार झाले प्रतिरोधित
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार, गैरवर्तणूक करून नियमाचे उल्लंघन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना एमपीएससीच्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात आली असून एमपीएससीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली.
 • सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब २०२२ या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता २० नोव्हेंबर २०२२ पासून म्हणजेच या परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
 • सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या दिनांकापासून पाच वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे. धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता २० नोव्हेंबर २०२२ पासून म्हणजेच या परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
 • सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करून बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून (२३ जानेवारी, २०२३ पासून) २ वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे. केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.
‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात आता ड्रोन केंद्रांचे जाळे; सहा विभागीय, बारा जिल्हास्तरीय ड्रोन केंद्रांची निर्मिती प्रस्तावित
 • राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, सहा विभागीय आणि बारा जिल्हास्तरीय ड्रोन केंद्र निर्माण केली जाणार आहेत. या ड्रोन केंद्राचे मुख्यालय आयआयटी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. तसेच प्रशासकीय क्षेत्रातही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. या अनुषंगाने महाराष्ट्राला ड्रोन हब म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईने महाराष्ट्र ड्रोन मिशन हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला.
 • या अहवालात ड्रोन अभियानाची उद्दिष्टे, ड्रोन तंत्रज्ञानाच्या उपयोगाच्या संभाव्य शक्यता, आव्हाने, ड्रोन वापरासंदर्भातील प्रचलित नियम आणि कायदे आदींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने राज्यातील अभियांत्रिकी शैक्षणिक आणि संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा, औद्योगिक आस्थापना यांच्या सहभागातून ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. विविध प्रशासकीय विभागांकडून त्यांच्या समस्येनुसार आणि प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर पाच वर्षांत हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे नियोजन आहे.
 • या प्रकल्पाद्वारे ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित परिसंस्था निर्माण होऊन त्याचा वापर औद्योगिक आस्थापना, नवउद्यमी आणि बाह्य वापरकर्त्यांना व्यापारी तत्त्वावर करणे शक्य आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्हा, विभाग आणि केंद्रस्तरीय ड्रोन केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात कृषी, आपत्ती निवारण, सर्वेक्षण, पुरवठा आणि वितरण अशा विविध क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र ड्रोन अभियान या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून २३८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी, त्यात बदल या अनुषंगाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हाती ‘लाल चोपडी’; ११ वाजता लोकसभेत सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प!
 • देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं, तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का? याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात नव्याने कोणती तरतूद केली जाते? याकडेही अर्थजगताचं लक्ष असेल.

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

 • पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला!
 • २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली.
 • २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री बनल्या.
 • निर्मला सीतारमण यांच्याव्यतिरिक्त याआधी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केंद्रीय महिला अर्थमंत्री म्हणून १९७० साली अर्थसंकल्प सादर केला होता.
 • यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सलग ६ अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
 • मोरारजी देसाईंनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० अर्थसंकल्प मांडले!
 • त्याखालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदम्बरम, यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी ५ केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.
भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची घसरण;१८० देशांमध्ये ९३व्या स्थानी, डेन्मार्क पहिल्यास्थानी
 • सन २०२३मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात १८० देशांमध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. भारताची गुणसंख्या सन २०२२मध्ये ४० होती, ती घसरून ३९ झाल्याचे ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ ही संस्था सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार देशांची भ्रष्टाचार क्रमवारी ठरवते. संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वात कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.
 • भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची गुणसंख्या ३९ अशी आहे. भारताच्या बाबतीत भ्रष्टाचार निर्देशांकातील चढउतार इतके कमी आहेत की कोणतेही ठोस निष्कर्ष काढता येत नाहीत. तथापि, निवडणुकांआधी, मूलभूत हक्कांसाठी ‘गंभीर धोका’ ठरू शकणारे दूरसंचार विधेयक मंजूर झाल्यास भारतात नागरी स्वातंत्र्याचा आणखी संकोच होताना आढळेल, असे भाकीतही या अहवालात करण्यात आले आहे.

आशियात सिंगापूर प्रथम

 • भ्रष्टाचार निर्देशांक ० ते १०० या पातळीदरम्यान मोजला जातो. शून्य म्हणजे अत्यंत भ्रष्ट आणि १०० म्हणजे भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ. सन २०२३मध्ये भारताची गुणसंख्या ३९ होती, तर २०२२ मध्ये ती ४० होती. सन २०२२ मध्ये भारत ८५व्या स्थानी होता. आशियात सिंगापूरने भारताला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
परदेशातून शिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थिसंख्येत घट अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालातील चित्र
 • एकीकडे भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असताना परदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२०-२१ मध्ये ४८ हजार ३५ परदेशी विद्यार्थ्यांनी भारतातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता, तर २०२१-२२ मध्ये ४६ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. त्यात विद्याशाखानिहाय प्रवेश, परदेशी विद्यार्थी, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर अशा विविध पद्धतीची आकडेवारी देण्यात आली आहे.
 • देशभरातील १ हजार १६२ विद्यापीठे, ४२ हजार ८२५ महाविद्यालये आणि १० हजार ५७६ एकल संस्थांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. या अहवालानुसार देशभरातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या ४.३३ कोटी झाली. २०२०-२१ मध्ये ही संख्या ४.१४ कोटी होती. तसेच उच्च शिक्षणातील प्रवेश गुणोत्तरामध्येही वाढ झाली. २०२०-२१ मध्ये २७.३ असलेले प्रवेश गुणोत्तर २०२१-२२ मध्ये २८.४ पर्यंत पोहोचले.
 • सर्वेक्षणातील माहितीनुसार, जगभरातील १७० देशांतील ४६ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी भारतातील शिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला. त्यात सर्वाधिक ७४.८ टक्के विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व, तर १५.८ टक्के विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. भारतातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी नेपाळ (२८ टक्के) या देशातील आहेत. त्या खालोखाल अफगाणिस्तान (६.७ टक्के), अमेरिका (६.२ टक्के), बांगलादेश (५.६ टक्के), संयुक्त अरब अमिराती (४.९ टक्के), भूतान (३.३ टक्के) या देशांतील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून एकट्या अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत परदेशातून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी आहे.

 

जगभरातल्या श्रीमंतांमधला अदाणी-अंबानींचा दबदबा संपला? टॉप १० मधून बाहेर, पाहा नवीन यादी

 • जगभरातल्या टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भारतातले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी दोघेही हा यादीतून बाहेर पडले आहेत. २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतली रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदाणी समुहाबद्दल एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी समुहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली आहे. शेअर्स पडल्यामुळे अदाणी यांची नेटवर्थ एका आठवड्यात खूप कमी झाली आहे. परिणामी जगातल्या १० सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदाणी यांचं नाव बाहेर झालं आहे.
 • हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे एकाच आठवड्यात अदाणींची नेटवर्थ खूप घसरली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची संपत्ती आता ८४.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. या नेटवर्थच्या जोरावर ते जगातले १२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याआधी ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

पहिल्या १२ अब्जाधीशांची यादी

१. बर्नार्ड अर्नॉल्ट – १८९ अब्ज डॉलर्स
२. एलोन मस्क – १६० अब्ज डॉलर्स
३. जेफ बेझॉस – १२५ अब्ज डॉलर्स
४. बिल गेट्स – १११ अब्ज डॉलर्स
५.वॉरेन बफेट – १०७ अब्ज डॉलर्स
६. लॅरी एलिसन – ९९.५ अब्ज डॉलर्स
७. लॅरी पेज ९० – अब्ज डॉलर्स
८. स्टीव्ह बाल्मर – ८६.९ अब्ज डॉलर्स
९. सेर्गी ब्रिन – ८६.४ अब्ज डॉलर्स
१०. कार्लोस स्लिम – ८५.७ अब्ज डॉलर्स
११. गौतम अदाणी – ८४.४ अब्ज डॉलर्स
१२. मुकेश अंबानी – ८२.२ अब्ज डॉलर्स

विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश! मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची MPSCला विनंती

 • राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून, मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.”
 • “त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 • “महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रात म्हटलं.

अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदे आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय

 • राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेली १७ संवर्गातील पदे आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पदांमध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास  निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, साहाय्यकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, वनरक्षक, कोतवाल, वन-अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी, पोलीस पाटील यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे आदिवासी युवक, युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे राज्य शासनाने म्हटले आहे.
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पदे आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भरण्याचे ठरविण्यात आले. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय  घेण्यात आला.  
 • ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या २५ ते ५० टक्यांदरम्यान आहे, अशा सर्व गावांमध्ये अधिसूचित संवर्गातील ५० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येतील. त्याचबरोबर ज्या गावांची आदिवासींची लोकसंख्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांमध्ये (कोतवाल व पोलीस पाटील वगळून) २५ टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्यात येणार आहेत. तसेच या गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील संवर्गातील पदे सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार तसेच गुणवत्तेनुसार भरली जातील.
 • भरती प्रक्रिया राबविताना स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणारी पदे संबंधित महसुली विभागातील अनुसूचित जमातीच्या स्थानिक भाषा अवगत असलेल्या अर्हताधारक उमेदवारांमधून भरण्यात यावीत. अधिसूचित १७ संवर्गामध्ये  तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास  निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, सहायकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, वनरक्षक, कोतवाल, वन-अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, पोलीस पाटील या पदांचा समावेश आहे.

१० महिन्यांत पंजाब सरकारने दिल्या २६ हजार नोकऱ्या, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दावा

 • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारची स्थापना झाल्यापासून १० महिन्यांत एकूण २६०७४ नौकऱ्या दिल्या आहेत, असा दावा केला आहे. त्यांनी १८८ जणांना कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. या समारंभावेळी ते बोलत होते.

योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे

 • “राज्य एक नवी क्रांती अनुभवत आहे. येथे युकवांना सरकारी नोकरी देऊन सशक्त केले जात आहे. मागील १० महिन्यांपासून योग्यतेवर आधारित नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत २६०७४ जणांना नोकरी देण्यात आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात तरुण-तरुणींना आणखी नोकऱ्या दिल्या जातील,” असे भगवंत मान म्हणाले.
 • “निवडणुकीत अन्य पक्षांनी मतदारांना पक्त आश्वासन दिले होते. आम्ही मतदारांना हमी दिली होती. आम्ही हळूहळू दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू,” असेही भगवंत मान म्हणाले.

५०० आम आदमी क्लिनिकची सुरुवात

 • ‘राज्य सरकारने प्रति महिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे,’ असेही भगवंत मान यांनी सांगितले. पंजाब सरकारने नुकतेच ५०० आम आदमी क्लिनिक सुरू केले आहेत. याबाबत बोलताना ‘या आम आदमी क्लिनिकमध्ये आम्ही रुग्णांची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने साठवून ठेवतो. यामुळे प्राणघातक आजारांविरोधात लढण्यास मदत होते,’ असेही मान यांनी सांगितले.

माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

 • भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण(वय-९७) यांचे आज(मंगळवार) निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.
 • शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. आजची पिढी भलेही त्यांना आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखत असेल, मात्र त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते राज्यसभा खासदारही होते. सहा वर्षे ते भाजपामध्ये राहिले होते.
 • शांती भूषण आणि त्यांचे पुत्र प्रशांत भूषणही आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. मात्र कालांतराने हे दोघेही आम आदमी पार्टीपासून दूर झाले होते.
 • मोरारजी सरकारमध्ये होते कायदा मंत्री - शांती भूषण हे मोरारजी देसाई सरकारमध्ये १९७७ ते १९७९ पर्यंत कायदा मंत्री होते. त्यांनी आपल्या आयुष्यात लोककल्यणाशी निगडीत अनेक मुद्दे उचलले होते. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ फेब्रुवारी २०२२
महाविद्यालयांमध्ये लशीचे २ डोस घेतलेल्यांनाच प्रवेश :

विद्यार्थ्यांचे आठवडय़ाभरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश राहणार आहे. तर, लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सामंत म्हणाले, की उद्या एक फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. पण, लशीचे दोन डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश राहणार असल्यानेच या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचे आहेत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून, त्यांनी गतीने लसीकरण होण्यासाठी शिबिरे घ्यावीत. ठोसकृती करावी असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. खासगी महाविध्यालयांसाठीही विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणाची सक्ती राहणार आहे. राज्यातील करोनाचा आढावा व कुलगुरुंशी बोलून १५ फेब्रुवारीनंतर पुढील परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, जॉइंट डायरेक्टर, डायरेक्टर यांना खर्च करण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. महाविद्यालयांमधील कंत्राटी कर्माच्याऱ्यांना किमान वेतनात वाढ देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.

विधानसभेतील गैरवर्तनप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. तसाच न्याय राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातही व्हायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना आहे.

आमदार नियुक्तीचा हा मुद्दा घेऊन आपण न्यायालयात जाण्याचा विचार करीत असून, त्याबाबत उद्या मुंबईत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार आहे. त्यात राज्यपालांचा अनादर करण्याचा हेतू नसून भाजपाच्या निलंबित आमदारांना न्यायालयाचा जसा दिलासा मिळतो तसाच तो राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या प्रलंबित प्रकरणातही मिळायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील निर्बंध शिथिल ; सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी :

करोनाची विशेषत: ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू  लागताच सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली.

त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून  आता ही लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे.

येमेनने यूएईच्या रोखाने डागलेले क्षेपणास्त्र नष्ट :

इस्रायलचे पंतप्रधान इसाक हझरेग हे संयुक्त अरब अमिरातीच्या ऐतिहासिक भेटीवर आलेले असतानाच, येमेनच्या हुथी दहशतवादी गटाने या देशाच्या रोखाने डागलेले एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र यूएईच्या हवाई संरक्षण दलांनी सोमवारी अडवून नष्ट केले, असे देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

या हल्ल्यामुळे काहीही नुकसान झाले नाही व या क्षेपणास्त्राचे तुकडे वर्दळीच्या भागांच्या बाहेर पडले, असे संरक्षण मंत्रालयाने ‘डब्ल्यूएएम’ या देशाच्या अधिकृत वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले.

‘येमेनमधील ज्या ठिकाणावरून क्षेपणास्त्र डागले गेले, त्या ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर मिसाईल लाँचर नष्ट करण्यात यूएईचे हवाई संरक्षण दल व कोअ‍ॅलिशन कमांड यांना यश मिळाले,’ असे मंत्रालयाने सांगितले. येमेनमधील अल जौफ येथील आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्याचे फलाट स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० वाजता नष्ट करण्यात आल्याचे सांगताना याचा व्हिडीओही मंत्रालयाने प्रसारित केला.

प्रचारावरील निर्बंध अंशत: शिथिल ; ‘रोड शो’, पदयात्रांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत :

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारावरील निर्बंध निवडणूक आयोगाने सोमवारी अंशत: शिथिल केल़े  घरोघरी प्रचारासाठीची प्रचारकांची मर्यादा दहावरून २०, तर प्रचारसभेतील उपस्थितांची मर्यादा ५०० वरून एक हजार इतकी करण्यास आयोगाने परवानगी दिली़  मात्र, मोठय़ा जाहीर सभांसह ‘रोडे शो’ आणि पदयात्रांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आह़े

मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र, आयुक्त राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील करोनास्थितीचा सोमवारी आढावा घेतला़ त्यानंतर प्रचारावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला़  राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आतापर्यंत खुल्या जागेत ५०० जणांचा सहभाग असलेल्या प्रचारसभा घेण्याची परवानगी होती़  ही मर्यादा एक हजार इतकी वाढविण्यात आली आह़े.

शिवाय घरोघरी प्रचारासाठी १० प्रचारकांना परवानगी देण्यात आली होती़  ही मर्यादा आता २० इतकी करण्यात आली आह़े ‘रोड शो’, पदयात्रा, वाहनांद्वारे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर ११ फेब्रुवारीपर्यंत बंदी कायम राहील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल़े   पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आह़े  यामुळे किमान पहिल्या टप्प्यात तरी राजकीय पक्षांना मोठय़ा प्रचारसभा आणि ‘रोड शो’ आयोजित करता येणार नाहीत़.

प्रो लीग हॉकी (महिला) - भारतीय महिलांकडून चीनचा ७-१ असा धुव्वा :

भारतीय महिला संघाने सोमवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये विजयी पर्दापण करताना सलामीच्या लढतीत चीनचा ७-१ असा धुव्वा उडवला.

यंदा मस्कत (ओमान) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून भारतीय महिला संघाला प्रथमच यामध्ये खेळण्याची संधी लाभत आहे. त्यांनी चीनविरुद्धच्या सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पाचव्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १२व्या मिनिटाला नेहाच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली.

उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला अधिकच धार आली. ४०व्या मिनिटाला अनुभवी वंदना कटारियाने भारताचा तिसरा गोल केला. त्यानंतर चीनने ४३व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. मग शर्मिला देवीने सलग दोन मिनिटांत दोन गोल झळकावत भारताला ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर ५०व्या मिनिटाला गरुजत कौर, तर ५२व्या मिनिटाला सुशिलाने गोल झळकावल्याने भारताने हा सामना ७-१ असा फरकाने जिंकला. उभय संघांत मंगळवारी सलग दुसरा सामना खेळवला जाणार आहे.

01 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.