चालू घडामोडी - २९ ऑक्टोबर २०१८

Date : 29 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदी सर्वांत विश्वासू मित्र - शिंजो आबे :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वांत विश्वासू मित्रांपैकी एक आहेत, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या संदेशात आबे यांनी म्हटले की, भारत एक जागतिक शक्तीच्या रुपाने समोर येत आहे.

  • प्रशांत महासागर क्षेत्रात जपान भारताबरोबरील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी इच्छुक आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन धावणारच असा विश्वास व्यक्त करत ज्यादिवशी ही ट्रेन धावेल तो दिवस भारत-जपान यांच्या मैत्रीतील नवे पर्व असेल, असे ते म्हणाले.

  • नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वोत्कृष्ट नेता असल्याचे सांगत आबे म्हणाले, जपान आणि भारताच्या संबंधातून जगाला खूप काही देण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र मोदींचे मत असल्याचे आबे यांनी सांगितले. जपान आणि भारतादरम्यान सुरक्षा, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, पर्यावरण आणि पर्यटनासारख्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढेल. सध्या पंतप्रधान मोदी हे जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

  • जपान भारताचा आर्थिक विकास आणि पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही सर्व क्षेत्रात चांगल्या स्थितीत आहोत आणि जपान भारताची आर्थिक वृद्धी आणि जपानच्या सर्वोत्कृष्ट तंत्राचा वापर करत हायस्पीड रेल्वे, भूमिगत मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. ज्या दिवशी शिंकनसेन बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद धावतील तो दिवस भारत-जपानच्या भविष्यातील मैत्रीचा चमकता तारा सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.

अयोध्येतील जमिनीच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी :
  • अयोध्येतील बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. संजय किशन कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्यापुढे आव्हान याचिकांची सुनावणी होणार आहे.

  • २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने १९९४ मध्ये मशीद हा इस्लामचा एकात्मिक भाग नसल्याच्या निकालावर फेरविचाराचा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यास नकार दिला होता.

  • अयोध्या जमीन वादाच्या सुनावणीतूनच तेव्हा तो मुद्दा उपस्थित झाला होता. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा नागरी दावा पुराव्यांच्या आधारे निकाली काढता येईल. पूर्वीच्या निकालाशी त्याचा काही संबंध नाही असा निकाल २ विरुद्ध एक मताने दिला होता.

  • न्या. अशोक भूषण यांनी वेगळा निकाल देताना असे म्हटले होते, की १९९४ मधील निकालात पाच सदस्यांच्या न्यायपीठाने मशीद हा इस्लामचा एकात्म भाग नाही असे म्हणण्यामागे काही कारण असू शकते असे प्रतिपादन  केले होते. न्या. एस. अब्दुल नझीर यांनी मात्र मशीद हा इस्लामचा एकात्म भाग आहे की नाही हे ठरवण्यासाठी धार्मिक श्रद्धांचा विचार करण्याची गरज प्रतिपादन केली होती.

भारत मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • भारत सध्या अनेक मोठ्या बदलांना सामोरा जातो आहे. सध्या गुंतवणूक करायची असेल तर भारत हा एक उत्तम देश आहे. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय माणसांनी प्रगती करावी आणि भारताच्या प्रगतीलाही हातभार लावावा. वैश्विक शांततेत भारताची भूमिका महत्त्वाची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर आहेत. सध्या ते जपान मध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्या समुहाशी संवाद साधत आहेत.

  • सध्याच्या घडीला भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. बुलेट ट्रेन-स्मार्ट सिटी, न्यू इंडिया ही भारताच्या विकासाची पावलं आहेत. न्यू इंडिया अर्थात नवभारत घडवायचा असेल तर मला तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हवं आहे असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान येथील बांधवांना केलं.

  • एवढंच नाही तर जगातली सर्वात मोठी शिल्पकृती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी तुम्ही जरूर भारतात या असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिभा जेवढी महान होती तेवढेच महान शिल्प आम्ही साकारले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • गेल्या वर्षी भारतीय वैज्ञानिकांनी १०० सॅटेलाइट अंतराळात सोडले. आपण चांद्रयान आणि मंगळयानही इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी खर्चात पाठवलं आहे.

  • भारतीय वैज्ञानिक आता गगनयान अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहेत. मेक इन इंडिया हा एक वैश्विक ब्रांड म्हणून उदयास येतो आहे. भारत दर्जेदार उत्पादनं तयार करतो आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल उत्पादनांच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय :
  • नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंबंधी निवेदन जारी केले आहे.

  • या निवेदनानुसार, ९१८ निर्णयांपैकी ९६ टक्के निर्णयांची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली आहे. त्यासाठी सरकारने २९४ अधिसूचना काढल्या. उर्वरीत निर्णय हे अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. 

  • जीएसटी हा केंद्र व राज्य या दोन सरकारांनी संयुक्तपणे राबविण्याचा कर असल्याने राज्य सरकारांनीही जवळपास तेवढ्याच अधिसूचना काढल्या. देशातील अप्रत्यक्ष कर व्यवस्थेशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे निर्णय घेत आहेत, अशा नव्या सहकारी सांघिक व्यवस्थेला मार्ग दाखवण्याचे काम ही परिषद करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सायन रुग्णालयात आता ‘निर्भया केंद्र’ :
  • मुंबई : लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसा, विनयभंग, अ‍ॅसिड हल्ला अशा घटनांतील पीडितांसाठी सायन रुग्णालयात लवकरच ‘निर्भया केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञांना उपचार करणे सोपे होणार आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेच्या शरीरासोबतच मनावरही खोल घाव झालेले असतात. ही बाब केंद्रस्थानी ठेवून सायन रुग्णालयात लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येईल.

  • मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात हे केंद्र काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञ असे विविध शाखेतील तज्ज्ञ एकाच वेळी पीडितेवर उपचार करतात. यापूर्वी केईएमच्या मानसोपचार विभागात अशा पीडितांवर उपचार केले जायचे. याविषयी, केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक पातळीवर स्थिर करणे गरजेचे असते. त्यामुळे पीडितांच्या उपचारासाठी या केंद्राची मोठी मदत होणार आहे.

  • पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, सायन रुग्णालयात अशा प्रकरणातील अनेक पीडित सातत्याने येत असतात. साधारण महिन्याला असे ५० रुग्ण येथे येतात, तर केईएममध्ये अशा १०-१२ रुग्णांवर महिन्याला उपचार करण्यात येतात. त्यामुळे आता सायन रुग्णालयाही या केंद्रासाठी विशेष जागा देण्यात आली आहे.

राज्यातील विधि अधिकाऱ्यांसाठी ११ कोटींचे लॅपटॉप :
  • मुंबई : न्यायालयातील प्रलंबित खटल्यातील कागदपत्रांचा पसारा कमी करण्यासाठी आता राज्यभरातील विविध कोर्टांतील १८५५ विधि (न्यायिक) अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. त्यासाठी सरकारला तब्बल ११ कोटी १३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावाला विधि व न्याय विभागाने हिरवा कंदील दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत ही खरेदी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

  • उच्च न्यायालयाच्या अपील शाखा ‘हायटेक’ होण्यासाठी २०१३मध्ये न्यायिक अधिकाºयांसाठी १५०९ लॅपटॉपची खरेदी करण्यात आली होती. मात्र त्याच्या वापरासाठी निश्चित केलेला पाच वर्षांचा कार्यकाल संपल्याने नव्याने लॅपटॉप खरेदी करण्याची मागणी विभागाकडून आली होती.

  • तसेच १५०९ अधिकाºयांबरोबरच गेल्या पाच वर्षांत नियुक्ती केलेले व येत्या काही महिन्यांत नव्याने भरती करण्यात येणाºया विधि अधिकाºयांसाठी ही एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय विभागाकडून करण्यात आला. त्याबाबचा प्रस्ताव गेल्या वर्षी १७ आॅक्टोबरला विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता.

  • शासकीय कामकाजासाठी लागणारी साहित्य सामग्री खरेदी करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीने नवीन १८५५ लॅपटॉप खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात २९ तारखेला मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या व नव्याने भरण्यात येणाºया विधि अधिकाºयांसाठी ११ कोटी १३ लाख रुपये किमतीचे लॅपटॉप खरेदीला सरकारने हिरवा कंदील दाखविला.

जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा - मोदी :
  • टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत. भारत-जपानदरम्यान 13व्या वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014ला जपानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंबरोबर 12वी बैठक करणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोतल्या भारतीय समुदायातील लोकांच्या एका कार्यक्रमात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केलं. दिवाळीच्या दिवसांत ज्याप्रमाणे दिवा सगळीकडे प्रकाश पसरवत असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही जगभरात भारताचा नावलौकिक वाढवा, याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. देश मोठ्या बदलांना सामोरा जात आहे.

  • जनधन, आधार आणि मोबाइलच्या वापरामुळे भारतात पारदर्शकता आली आहे. त्यामुळेच भारताकडे दुसरे विकसनशील देशही प्रभावित झाले आहे. भारताच्या असलेल्या यंत्रणेचा अभ्यास केला जातोय. तसेच भारतातल्या BHIM App आणि Rupay Card संदर्भात अनेक देशांना उत्कंठा आहे. भारतात जवळपास 100 कोटी मोबाईल धारक असावेत, अशात भारतात 1 जीबी डेटा हा कोल्ड ड्रिंकच्या एका छोट्याशा बॉटलपेक्षाही कमी किमतीत मिळतो.

  • आपण फार कमी खर्चात चांद्रयान आणि मंगळयान अवकाशात पाठवलं आहे. आता 2022मध्ये भारत गगनयान पाठवण्याच्या तयारीला लागला आहे. गगनयान हे पूर्णतः भारतीय बनावटीचं असणार आहे आणि त्यातून अंतरिक्षात प्रवास करणाराही भारतीयच असेल. 

९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवड :
  • यवतमाळ ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झालं. काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

  • 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी 2018 असे तीन दिवस साहित्याचा मेळा यवतमाळमध्ये भरणार आहे.

  • पहिल्यांदाच साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या नाहीत. सर्वानुमते संमेलनाध्यक्षाची निवड करण्याचे साहित्य महामंडळाने ठरवले होते. त्यानुसार डॉ. अरुण ढेरे यांची एकमताने निवड झाली.

दिनविशेष :
  • जागतिक स्ट्रोक दिन

महत्वाच्या घटना 

  • १८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

  • १९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

  • १९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.

  • १९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

  • १९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

  • १९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

  • १९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.

  • १९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

  • १९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

  • १९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

  • १९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.

  • २००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.

  • २००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

  • २०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

जन्म 

  • १८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)

  • १९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)

  • १९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.

  • १९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)

  • १९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

  • १९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल१८९५)

  • १९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन.

  • १९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.