चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ जून २०१९

Date : 25 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विरल आचार्य यांचा राजीनामा :
  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेचे खंदे समर्थक आणि गेले काही दिवस गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याशी चलनवाढ, व्याजदर आणि विकास या मुद्दय़ांवर मतभेद झालेले डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिने बाकी असतानाच राजीनामा दिला आहे. याआधी डिसेंबरमध्ये गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनीही कार्यकाल संपण्याच्या नऊ महिने आधीच पदत्याग केला होता.

  • व्यक्तिगत कारणास्तव पद सोडत असल्याचे आचार्य यांनी म्हटले आहे. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवर ठाम असलेले आचार्य यांनी मतभेदामुळेच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. गेल्या सात महिन्यांत रिझव्‍‌र्ह बँकेचा तडकाफडकी राजीनामा देणारे ते दुसरे वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत.

  • आठवडाभरापूर्वीच डॉ. आचार्य यांनी राजीनामा दिला असून २३ जुलै २०१९ नंतर आपण पदावर राहू शकत नाही, असे राजीनामापत्रात म्हटले आहे. त्यांच्या राजीनामापत्रावर सक्षम अधिकारी विचार करीत आहेत, असे रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे. आचार्य यांची नेमणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने केली होती, त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे अधिकार या समितीलाच आहेत.

  • विरल आचार्य हे आधी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक होते. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची तीन वर्षांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली होती, त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी  पद स्वीकारले होते.

जयशंकर यांना राज्यसभेची उमेदवारी :
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केल्यानंतर त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

  • राज्यातील दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार असतील.

  • राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द घालवलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता. ३० मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निधन :
  • चेन्नई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणारे तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक व्ही. आर. लक्ष्मीनारायण यांचं वयाच्या 91 व्या वर्षी रविवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. व्हीआरएल नावाने प्रसिद्ध असलेले लक्ष्मीनारायण 1951 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. उद्या (25 जून) त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • लक्ष्मीनारायण यांनी 1977 मध्ये भ्रष्टाचाराच्या एका आरोपाखाली इंदिरा गांधी यांना अटक केली होती. लक्ष्मीनारायण यांनी 1945 मध्ये मद्रास ख्रिश्चियन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या पोलीस कारकिर्दिची सुरुवात केली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

  • आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना त्यांना सीबीआयचे संलालक म्हणून नियुक्त करण्याची इच्छा होती. मात्र तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांनी लक्ष्मीनारायण यांना पुन्हा तामिळनाडूमध्ये आणलं आणि पोलीस महासंचालक बनवलं.

  • लक्ष्मीनारायण यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, चरण सिंह, मोरारजी देसाई यांच्यासह अनेक पंतप्रधानांच्या अंतर्गत काम केलं होतं. 1985 साली ते तामिळनाडूचे पोलीस महासंचालक पदावरुन निवृत्त झाले.

किल्ले रायगडला राजधानीचा दर्जा द्यावा, खासदार अमोल कोल्हेंची संसदेतील पहिल्या भाषणात मागणी :
  • मुंबई : किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत आपलं पहिलंच भाषण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली.

  • जर, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विचार होत असेल, तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचाही विचार केला पाहिजे. रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करुन राजधानी केल्यास, ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं

  • छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही निर्माण करणारे पहिले राजे होते. 17 व्या शतकात सगळीकडे साम्राज्यवाद सुरु असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रायगडसह अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. महाराजांनी या वास्तू स्वत:च्या नावे केल्या नाहीत किंवा कुटुंबातील व्यक्तींच्याही नावे केल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती म्हणून जपले, आपणही या संपत्तीं संवर्धन केलं पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

  • केंद्रात बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे या सरकारने शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची 17 व्या शतकात होता तशी पुर्नबांधणी करावी. असं झाल्यास हे जगातील आठवं आश्चर्य असेल आणि हीच शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

क्रिकेट विश्वचषकातील आजवरचे हॅटट्रिकवीर :

लंडन : इंग्लंडमधील विश्वचषकाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. विश्वचषकाच्या या रणांगणात प्रत्येक सामन्यागणिक अनेक विक्रमांची रास रचली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान संघांमधील सामन्यात अशाच एका विक्रमाची नोंद झाली आहे.

साऊदम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं हॅटट्रिकची नोंद करत विश्वचषकात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा शमी हा भारताचा दुसरा तर जगातला केवळ दहावा गोलंदाज ठरला. शमीनं अखेरच्या षटकात अगदी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला माघारी धाडत टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

शमीच्या याच विक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर नजर टाकूया विश्वचषकातल्या आजवरच्या हॅटट्रिकवीरांवर...

  • सकलेन मुश्ताक (पाकिस्तान, 1999)

  • चामिंडा वास (श्रीलंका, 2003)

  • ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया, 2003)

  • लसिथ मलिंगा (श्रीलंका, 2007 आणि 2011)

  • केमार रोच (वेस्ट इंडिज, 2011)

  • स्टीव्हन फिन (इंग्लंड, 2015)

  • जीन पॉल ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका, 2015)

दिनविशेष :
  • जागतिक कोड त्वचारोग दिन

महत्वाच्या घटना 

  • १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

  • १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

  • १९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.

  • १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

  • १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

  • १९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

  • २०००: मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.

जन्म 

  • १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

  • १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

  • १९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

  • १९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.

  • १९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.

  • १९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.

  • १९२४: संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९७५)

  • १९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.

  • १९३१: भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)

  • १९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.

  • १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३४: डेन्मार्कचा राजा नील्स यांचे निधन.

  • १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

  • १९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइडऑर यांचे निधन.

  • १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

  • १९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.

  • २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

  • २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.