चालू घडामोडी - १४ मार्च २०१८

Date : 14 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सौरमालेजवळ पंधरा नवीन बाग्रहांचा शोध :
  • टोकियो इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सौरमालेजवळ पंधरा नवीन बाह्यग्रह सापडल्याची घोषणा केली असून, त्यातील एका ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे.

  • तांबडय़ा लहान बटू ताऱ्यांभोवती हे ग्रह फिरत असून या संशोधनामुळे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेवर नवा प्रकाश पडणार आहे. लालबटू ताऱ्यांपैकी के २-१५५ हा तारा पृथ्वीपासून दोनशे प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच्या भोवती महापृथ्वीसारखे तीन ग्रह फिरत असून ते पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.

  • ताऱ्याभोवती सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या ग्रहाचे नाव के २-१५५डी असे ठेवण्यात आले आहे. तो गोल्डीलॉक झोन म्हणजे वसाहतयोग्य पट्टय़ात आहे. तेरुयुकी हिरानो यांच्या नेतृत्वाखाली  हे संशोधन झाले असून, नासाच्या केप्लर दुर्बिणीने  दुसऱ्या मोहिमेत मिळवलेल्या माहितीच्या आधारे हे पंधरा ग्रह शोधण्यात आले आहेत. या संशोधकांनी स्पेनमधील नॉर्डिक ऑप्टिकल टेलिस्कोप व हवाई येथील सुबारू टेलिस्कोप यांच्या मदतीने पृथ्वीवरून निरीक्षणे केली.

  • हिरानो यांनी सांगितले, की यातील एक ग्रह वसाहतयोग्य टप्प्यात असून त्रिमिती जागतिक हवामान सादृश्यीकरणाच्या आधारे तेथे द्रवरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. पण तसे असेलच अशी खात्री देता येत नाही.(source: loksatta)

मिनिमम बॅलन्स’ न ठेवल्याने एसबीआयने बंद केली ४१.१६ लाख बचत खाती :
  • स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने ४१.१६ लाख बचत खाती बंद केली आहेत. १ एप्रिल ते ३१ जानेवारी या कालावधीत ज्या खात्यांना मिनिमम बॅलन्सही ठेवता आलेला नाही अशी ही खाती आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

  • गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महिन्याचा मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या किंवा मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम ठेवणाऱ्या बचत खात्यांसाठी दंडाचे शुल्क कमी केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दंडाचे हे शुल्क आणखी कमी केले होते. तरीही मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम किंवा रक्कमच नाही अशी सुमारे ४१.१६ लाख बचत खाती एसबीआयने बंद केली आहेत. ‘लाइव्हमिंट डॉट कॉम’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • एसबीआयमध्ये सुमारे ४१ कोटी बचत खाती आहेत. ज्यापैकी १६ कोटी बचत खाती ही प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येतात. प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत येणाऱ्या बचत खाती, सेवानिवृत्त लोकांची बचत खाती, अल्पवयीन बचत खाती यांना मिनिमम बॅलन्सच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.

  • मंगळवारपासून स्टेट बँकेने बचत खातेदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ठराविक शिल्लक अर्थात मिनिमम बॅलन्सपेक्षा आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या नव्या निर्णयाचा फायदा एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे.(source: loksatta)

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन :
  • केंब्रिज (इंग्लंड) : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

  • केंब्रिजमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी हॉकिंग यांची प्राणज्योत मालवली. हॉकिंग यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुलं आहेत. 'आमचे वडील महान शास्त्रज्ञ होते, त्यांचं कार्य पुढील अनेक वर्ष स्मरणात राहील' अशा भावना हॉकिंग यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

  • भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरी, सापेक्षतावाद आणि कृष्णविवरावरील त्यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे. (source: loksatta)

यापुढे LoU आणि LoCs जारी करण्यास बँकांना बंदी :
  • मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील 13 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने कठोर पाऊल उचललं आहे. यापुढे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' (LoU) आणि 'लेटर ऑफ कम्फर्ट' (LoCs) जारी करण्यास तातडीने बंद घातली आहे.

  • एलओयू म्हणजे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'. हे एकप्रकारे हमीपत्र असतं. हे पत्र एक बँक दुसऱ्या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट दिलं जातं.

  • बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्टच्या आधारे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी या दोघांनी कर्ज मिळवलं. हे दोघेही कर्जाची रक्कम बुडवून देशाबाहेर पसार झाले आहेत. त्यामुळे आरबीआयने आता एलओयू आणि एलसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • भारतात केल्या जाणाऱ्या आयातीसाठी ट्रेड क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी सध्या अस्तित्वात असलेल्या तरतुदींनुसार दिली जाऊ शकते, असंही आरबीआयने स्पष्ट केलं.(source: abpmajha)

‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ!, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन :
  • नवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

  • न्यायालयाने १५ डिसेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशाने बँक खाती ‘आधार’शी जोडून घेण्यास व मोबाइल फोन ग्राहकांनी ‘आधार’शी निगडित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास ३१ माचपर्यंत मुदत वाढवून दिली होती. न्यायालयाने मंगळवारी ही मुदत हटविली आणि आधीचा अंतरिम आदेश अंतिम निकाल होईपर्यंत लागू केला. म्हणजेच ‘आधार’ सक्तीच्या वैधतेवर निकाल होईपर्यंत, या दोन गोष्टींसाठी सक्ती लागू असणार नाही.

  • मात्र, केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या योजनांचे लाभ व अनुदान यासाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या लाभार्थींसाठी ‘आधार’ जोडणीसाठी ३१ मार्च हीच अंतिम मुदत कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • ‘आधार’ सक्तीस आव्हान देणाºया देशभरात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवर सध्या सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. आधी ठरविलेल्या मुदतीच्या आधी सुनावणी पूर्ण होऊन निकाल होणार नाही, हे लक्षात घेऊन हा नवा आदेश देण्यात आला.

  • सरकारी योजनांसाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदतही वाढवावी, असा आग्रह याचिकाकर्त्यांनी धरला नाही आणि केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही मुदत कायम ठेवून बाकीच्या बाबतीत अंतरिम आदेश विस्तारित करण्याची सूचना केली.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना

  • १९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

  • १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

  • १९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

  • २०००: कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

  • २००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

  • २००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

  • २०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

जन्म

  • १८७४: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९५१)

  • १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९५५)

  • १८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)

  • १९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च१९७९)

  • १९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)

  • १९३३: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

  • १९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

  • १९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

  • १९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

  • १९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८८३: जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)

  • १९३२: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)

  • १९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

  • २००३: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९३२)

  • २०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.