चालू घडामोडी - ११ डिसेंबर २०१८

Date : 11 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘ब्रेग्झिट’ला पाठिंब्यासाठी थेरेसा मे यांचे शर्थीचे प्रयत्न :
  • लंडन : ‘ब्रेग्झिट’ कराराच्या मुद्दय़ावर ब्रिटिश संसदेत मंगळवारी मतदान होणार असतानाच, या मुद्दय़ावर लोकप्रतिनिधींनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी सोमवारी निकराचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, युरोपीय संघटनेतून एकतर्फी माघार घेण्यास ब्रिटन मोकळा असल्याचा निर्णय युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने दिला आहे.

  • मतदानाच्या पूर्वसंध्येला आलेल्या न्यायालयाच्या या निकालामुळे ब्रेग्झिट थांबवण्यासाठी दुसऱ्यांदा सार्वमत घेण्याची मागणी उफाळण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींचे मतदान ब्रेग्झिटचे भाग्य ठरवणार असून, त्यामुळे मे यांनाही पायउतार व्हावे लागू शकते.

  • मे यांनी गेल्या महिन्यात ब्रसेल्ससोबत करारातून बाहेर पडण्याच्या मुद्दय़ावर स्वाक्षरी केली होती. या मुद्दय़ावर विभाजित असलेल्या मे यांच्या सरकारला मंगळवारच्या मतदानात फार मोठा पराभव पत्करावा लागू शकतो. गेली ४६ वर्षे व्यापारातील आपला मुख्य भागीदार असलेल्या बेल्जियमशी संबंध तोडण्याच्या अटी या करारात नमूद करण्यात आल्या आहेत.

  • युरोपीय संघटनेच्या २७ नेत्यांसोबत येत्या गुरुवार व शुक्रवारच्या नियोजित परिषदेत सहभागी होण्यापूर्वी, मंगळवारचे मतदान लांबणीवर टाकून ब्रेग्झिटच्या मसुद्यात ब्रिटनसाठी आणखी सवलती मिळवण्याचे प्रयत्न करण्याबाबत मे यांच्यावर दबाव आहे.

अग्नि ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
  • बालसोर : भारताच्या अग्नि ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी येथील डॉ. अब्दुल कलाम बेटांवर सोमवारी यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटरचा आहे. स्वदेशी बनावटीच्या अग्नि ५ क्षेपणास्त्राची ही सातवी चाचणी असून ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

  • अग्नि ५ हे तीन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून १७ मीटर उंच व २ मीटर रुंद आहे. १.५ टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, एकात्म चाचणी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाच्या तळावरून मोबाईल लाँचरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. सामरिक दल कमांड तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी ही चाचणी केली. यात रडार, देखरेख उपकरणे, देखरेख स्थानके यांचा सहभाग होता.

  • उच्च वेगाचा संगणक व चुका विरहित आज्ञावली यांच्या मदतीने या क्षेपणास्त्राचे उड्डाण अचूकपणे झाल्याचे सांगण्यात आले. हे क्षेपणास्त्र अशा पद्धतीने सोडण्यात आले की, एका विशिष्ट मार्गावर पोहोचल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीकडे वळून लक्ष्यावर आघात करू शकले. त्याचा मार्ग संगणकाने निश्चित केलेला होता. हे क्षेपणास्त्र जेव्हा पुन्हा पृथ्वीच्या  वातावरणात प्रवेश करते तेव्हा त्याचे घर्षण होऊन तापमान चार हजार अंश सेल्सियसपर्यंत वाढते पण त्याला स्वदेशी  बनावटीचे उष्णतारोधक कवच असल्याने आतले तापमान पन्नास अंश सेल्सियसच्या खाली राहते. यात गायरो इनर्शियल सिस्टीम, डिजिटल कंट्रोल सिस्टीम यांचा वापर केला असून रडार व इलेक्ट्रो ऑप्टिकल यंत्रणांच्या निरीक्षणानुसार क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य भेद केला आहे.

  • अग्नि ५ क्षेपणास्त्राच्या पहिल्या दोन चाचण्या २०१२ व २०१३ मध्ये घेण्यात आल्या होत्या. ३१ जानेवारी २०१५ रोजी तिसरी, २६ डिसेंबर २०१६ रोजी चौथी, तर या वर्षी अठरा जानेवारीला पाचवी चाचणी करण्यात आली. अखेरची चाचणी ३ जून २०१८ रोजी झाली होती.

  • क्षेपणास्त्रांचा पल्ला - अग्नि १- ७०० कि.मी., अग्नि २- २००० कि.मी., अग्नि ३- २५०० कि.मी., अग्नि ४- ३५०० कि.मी., अग्नि ५-५००० कि.मी.

ताजमहाल दर्शन महागले, तिकीट दरात २०० रुपयांची वाढ :
  • आग्र्याच्या ताजमहालचे सौंदर्य न्याहाळणं आता महाग झालं आहे. कालपासून(दि.10) येथे प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्या तिकीट दरांनुसार पर्यटकांना आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

  • तर परदेशी पर्यटकांसाठी 1300 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय सार्क देशांमधून आलेल्या पर्यटकांना 540 रुपयांऐवजी 740 रुपये शुल्क आकारलं जाईल.

  • गर्दी आटोक्यात आणून ताजमहालच्या मुख्य ढाच्यावरील भार कमी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 200 रुपयांचं हे शुल्क मुख्य कबरीच्या दर्शनासाठी आकारण्यात येणार आहे. इंडियाटुडेच्या वृत्तानुसार 2016 नंतर ताजमहालच्या तिकीट दरात झालेली ही आठवी दरवाढ आहे. यापूर्वी भारतीय पर्यटकांना 50 रुपये आणि विदेशी पर्यटकाला 1100 रुपये मोजावे लागत होते.

ब्रिटिश पंतप्रधानांची संसदेत अग्निपरीक्षा :
  • लंडन : युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कारनाम्याच्या सरकारने तयार केलेल्या मसुद्यावर ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात मंगळवारी होणारे मतदान ही पंतप्रधान तेरेसा मे यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

  • संसदेने हा प्रस्ताव फेटाळला तर ‘ब्रेक्झिट’ला खो बसेल एवढेच नव्हे तर मे यांना पंतप्रधानपदही गमवावे लागू शकेल.

  • दरम्यान, गेली ४६ वर्षे युरोपीय संघाचा सदस्य असलेल्या ब्रिटनने त्यातून बाहेर पडण्याचा औपचारिक प्रस्ताव दिला असला तरी प्रत्यक्ष फारकतीच्या २९ मार्च या नियोजित तारखेपूर्वी ब्रिटन हा प्रस्ताव एकतर्फी मागे घेऊ शकतो, असा निकाल युरोपीय संघाच्या न्यायालयाने सोमवारी दिला. 

पाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स ५०० अंकांनी कोसळला :
  • मुंबई -  मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा पिछाडीवर पडल्याचे मोठे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.

  • मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, सेंसेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला आहे. तर दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे. 

  • दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला कालही शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स 609.58 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही  187 आंकांनी घसरण झाली होती. 

नरेंद्र मोदी सरकारला बसलेले पाच झटके :
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे आपण हे पद सोडत आहोत असे उर्जित पटेल यांनी म्हटले असले तरी नरेंद्र मोदी सरकारसाठी हा एक मोठा झटका आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधीवरुन मोदी सरकार आणि आरबीआयमध्ये वाद होता. आरबीय बोर्डाची मागच्या महिन्यात बैठक झाली. त्यावेळी उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

  • नरेंद्र मोदी सरकारमधील परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांना लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला. राजीनामा द्यावा लागलेले ते मोदी सरकारमधील पहिले मंत्री आहेत. अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले.

  • उर्जित पटेल यांच्याआधी याचवर्षी जून महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी त्यांची नाराजी प्रगट केली नव्हती. कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत आहोत असे त्यावेळी ते म्हणाले होते. मोदी सरकारच्या कारभारावर ते नाराज असल्याची त्यावेळी चर्चा होती. पण आता त्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सरकार आणि रिझव्‍‌र्ह बॅंक यांच्यातील वादासह अनेक मुद्यांवर परखड भूमिका मांडली. ‘रिझव्‍‌र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच आहे. अशा बळकट संस्था देशाच्या फायद्याच्याच असतात असे सांगून त्यांनी मोदी सरकारचे कान टोचले आहेत.

  • दोन वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदी सरकारने नोटाबंदीचा मोठा निर्णय जाहीर केला. सर्वसामान्य जनतेला आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तासन तास रांगेत उभे रहावे लागले. काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचाराला लगाम घालणे, काश्मीरमधील दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे असे उद्देश त्यामागे होते. पण बंदी घातलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा बँकेत पुन्हा जमा झाल्या. त्यामुळे ना काळा पैसा बाहेर आला. ना काश्मीरमधील दहशतवादी कारवाया थांबल्या.

  • फ्रान्सच्या डासू कंपनीबरोबर केलेल्या ३६ राफेल फायटर विमानांच्या करारावरुनही मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. राफेल मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीला खरेदी केल्याचा मोदी सरकारवर आरोप आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अनेकांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली या कराराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी आपला निर्णय राखून ठेवला आहे. उद्या निर्णय विरोधात गेला तर मोदी सरकारच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

  • जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केले होते. परस्परविरोधी विचारधारेचे हे सरकार पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कोसळले. जम्मू-काश्मीरमध्ये मोदी सरकारचं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. राजकीय आघाडीवर इथे स्थिरता नाही तसेच राज्यातील दहशतवादी कारवायांनाही पूर्णपणे लगाम घालता आलेला नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.

  • १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

  • १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

  • १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

  • २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.

  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

जन्म 

  • १८४३: क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९१०)

  • १८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)

  • १८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)

  • १८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

  • १८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

  • १९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

  • १९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)

  • १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)

  • १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)

  • १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

  • १९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)

  • १९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

  • १९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)

  • १९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२३)

  • १९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

  • १९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)

  • २००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च१९०९)

  • २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)

  • २००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी१९२०)

  • २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

  • २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.