चालू घडामोडी - ०३ सप्टेंबर २०१८

Date : 3 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
काश्मीरच्या खोऱ्यात दुसऱ्या कारगिल मॅरेथॉनचं आयोजन :
  • कारगिल : काश्मीरच्या खोऱ्यात आज शांतेतच्या दौडचं अर्थात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या मॅरेथॉनला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट कारगिलमध्ये पोहोचली आहे.

  • देशभरातील 1200 पेक्षा जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी घेतला. सर्जिकल स्ट्राईकमागील मराठी चेहरा असणारे राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते कारगिल मॅरेथॉनला फ्लॅगऑफ करण्यात आला. काश्मीर खोऱ्यात शांतता आणि एकता नांदावी हा या मॅरेथॉनमागचा हेतू आहे.

  • कारगिल म्हटलं की आपल्याला 1999 चं युद्ध आठवतं. इथल्या महाकाय हिमालायीन पर्वतरांगांच्या साक्षीनेच भारताने पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या होत्या. शिवाय ज्या ताशी नामग्याल या मेंढपाळाने पाकच्या सीमेवरच्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला सर्वात प्रथम कळवली होती, तेही इथलेच. पण कारगिलची ओळख केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित ठेवणं हे त्यावर अन्याय केल्यासारखं होईल.

  • सरहदचे संजय नहार हे काश्मीरसोबत अगदी 90 च्या दशकापासून जोडले गेलेत. काश्मीरमधल्या अनेक अनाथ मुलांना पुण्यात आणून ते सांभाळतायत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतायत. ज्या कारगिलने देशासाठी इतकं केलंय, त्यांना बदल्यात अधिक काय देता येईल या विचारातून चर्चा सुरु असताना इथं मॅरेथॉनची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली.

इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजांची गेल्या १०० वर्षातली सर्वोत्तम कामगिरी :
  • साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या वरच्या फळीतील फलंदाजीचं कंबरडं मोडलं. पहिल्या सत्राअखेर इंग्लंडचे चार फलंदाज माघारी परतले होते आणि धावसंख्या केवळ 57 होती.

  • साधारणपणे भारतीय गोलंदाजीला कसोटीत सरासरीपेक्षा कमीच मानलं जातं. मात्र यावेळी भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांनी असा विक्रम केला, जो गेल्या 100 वर्षात कधीही पाहायला मिळाला नाही.

  • भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चार कसोटी सामन्यांमधील आतापर्यंतच्या सात डावांमध्ये 42 विकेट घेतल्या आहेत. 43 च्या स्ट्राईक रेटने या विकेट घेतल्या आहेत, जो एक विक्रम आहे. यापूर्वी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी 45 च्या स्ट्राईक रेटने इंग्लंडच्या 77 विकेट घेतल्या होत्या.

  • भारतीय वेगवान गोलंदाजांचं नेतृत्त्व इशांत शर्मा करत आहे, ज्याने आतापर्यंत (चौथ्या कसोटीचं पहिलं सत्र) 12 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर 10 विकेटसह हार्दिक पंड्या, तर जसप्रीत बुमराच्या खात्यात नऊ विकेट जमा झाल्या आहेत.

गोविंदा रे गोपाळा! देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह :
  • नवी दिल्ली - देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून मथुरा, द्वारकेसह मुंबईतील इस्कॉन मंदिरात रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतहीगोपाळकाल्याचा उत्साह शिगेला पोहचला असून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जन्माष्टमीच्या ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • गेल्या २० ते २५ दिवसांपासून सुरू असलेला थरांचा सराव, प्रायोजकत्व मिळविण्यासाठीची धडपड, मोठ्या रकमेच्या हंड्या फोडण्याचा मानस, स्पर्धेसह तितकेच खेळीमेळीचे वातावरण आणि थरांवर थर रचण्यासाठी सुरू असलेला उत्साह; असे सारे काही ‘याची देही याची डोळा’ पाहण्याचा योग मुंबईकरांना आज मिळणार आहे.

  • शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषत: थर रचण्यासाठीची स्पर्धा दिवसभर रंगणार असतानाच सुरक्षेची काळजी गोविंदांना घ्यावी लागणार आहे. सकाळीच आपल्या मंडळाच्या हंडीला सलामी देत घराबाहेर पडणारा गोविंदा ‘मच गया शोर सारी नगरी मे...’ म्हणत मुंबापुरीच्या उत्साहात भर टाकेल.

  • विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.

इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; विधेयकाला मंजुरी :
  • नवी दिल्ली : राज्यातील विशेषत: मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क दुरुस्ती विधेयकासह (एमएओबी) एकूण तीन विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.

  • त्यामध्ये गुजरात कमाल शेतकी जमीनधारणा दुरुस्ती विधेयक २०१५, गुजरात कमाल शेतकी जमीनधारणा दुरुस्ती विधेयक २०१७ या दोन विधेयकांचाही समावेश आहे. महाराष्ट्र सदनिका मालकी हक्कासंदर्भातील आधीच्या कायद्यानुसार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतील सर्वच्या सर्व सदनिकाधारकांची संमती असल्याशिवाय त्या इमारतीचा पुनर्विकास करता येत नसे.

  • पण आता त्या इमारतीतील ५१ टक्के सदनिकाधारकांनी पुनर्विकासाच्या बाजूने कौल दिला, तर त्या प्रक्रियेला परवानगी देण्याची दुरुस्ती या कायद्यात करण्यात आली आहे.

भूकंपानंतर ३ वर्षांनी नेपाळमधल्या १७ व्या शतकातील कृष्णमंदिराचे द्वार भक्तांसाठी खुले :
  • अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या नेपाळ या छोट्याशा देशात अनेक प्राचीन हिंदू मंदिरे देखील आहे. ही मंदिरे पाहण्यासाठी, त्यांची कलात्मकता, प्राचीन इतिहास डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक दूरून नेपाळमध्ये येतात. मात्र २०१५ साली झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे नेपाळचा चेहरामोहरा बदलला. जवळपास साडे आठ हजार लोकांचे बळी या भूकंपात गेले. अनेक प्राचीन मंदिरांचं मोठं नुकसान झालं. भूकंपामुळे नेपाळमधील १७ व्या शतकातील कृष्णमंदिरांचेही मोठं नुकसान झालं.

  • भूकंपानंतर या मंदिराचे द्वार भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. या काळात मंदिराच्या बांधकामाचं काम हाती घेण्यात आले. अखेर भूकंपानंतर तीन वर्षांनी मंदिरांचे द्वार गोकुळाष्टमीनिमित्त भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी ललितपुरमधल्या कृष्णमंदिरात जमते. सिद्धि नरसिंह मल्ल यांनी १७ व्या शतकात हे मंदिर बांधलं. भारतीय शिखर शैलीत हे मंदिर बांधलं गेलं आहे.

  • तीन मजली कृष्ण मंदिराच्या पहिल्या मजल्यावर महाभारतातील काही प्रसंग कोरले आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर रामायणातील काही प्रसंग कोरण्यात आले आहेत. या मंदिराभोवती एक कथा गुंफली आहे. असं म्हणतात, राजा मल्ल यांना भगवान कृष्ण आणि राधानं स्वप्नात दर्शन देऊन त्याच्याच महलपरिसरात कृष्ण मंदिर बांधण्यास सांगितलं होतं.

  • या आदेशाचं पालन करत मल्लनं हे कृष्ण मंदिर बांधलं. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळला ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. यात ललितपुरच्या मंदिराचंही मोठं नुकसान झालं. अखेर तीन वर्षांनी मंदिरांचं दार भाविकांसाठी खुले करण्यात आल्यानं भाविकांची मोठी रिघ श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात जमली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

  • १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.

  • १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.

  • १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.

जन्म

  • १८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५)

  • १८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

  • १९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.

  • १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)

  • १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)

  • १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.

  • १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै१९८०)

  • १९३१: नाटककार श्याम फडके यांचा जन्म.

  • १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.

  • १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

  • १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)

मृत्यू

  • १६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.

  • १९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.

  • १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.

  • १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)

  • १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)

  • १९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.

  • २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.

  • २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.