चालू घडामोडी - ०२ डिसेंबर २०१८

Date : 2 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-चीन-रशिया यांच्यात बारा वर्षांनी चर्चा :
  • भारत,चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर येथे त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम  राबवण्याचे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खुली जागतिक अर्थव्यवस्था व  बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा असेही या वेळी सांगण्यात आले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शुक्रवारी ही त्रिपक्षीय चर्चा झाली असून बारा वर्षांतील ही दुसरी चर्चा आहे. जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली असून मोदी यांनी म्हटले आहे की, रशिया,  भारत व चीन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा ही उत्तम झाली असून भारताच्या बाजूने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक विषयांवर उहापोह झाला. तत्पूर्वी मोदी, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्यातही त्रिपक्षीय चर्चा झाली.

  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पुतिन, मोदी व जिनपिंग यांनी आपसातील सहकार्यावर विचार मांडले. दोन्ही देशात संपर्कही वाढवण्यात येणार आहे. ब्रिक्स, एससीओ, एएएएस या संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न करून सहकार्य वाढवले जाईल.

  • दहशतवाद, हवामान बदल यासारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यावर या देशांचे मतैक्य झाले आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, अतिशय सकारात्मक अशी ही बैठक होती. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी  ही त्रिपक्षीय चर्चा सुरू केल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. जागतिक शांतता व भरभराट यात तीनही देशांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यात दहशतवाद, मानवतावादी मदत व इतर क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे, असे गोखले यांनी स्पष्ट केले.

आता ड्रोनकडून अवयवांची वाहतूक :
  • अवयव प्रत्यारोपणामध्ये वाहतूक कोंडीची अडचण येऊ नये यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत रुग्णालयांना ड्रोनपोर्ट्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.

  • मोठय़ा आकाराच्या ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यानंतर महिन्याभराने परवाने देण्यास सुरुवात होणार आहे, सध्या २.० या ड्रोन धोरणावर काम सुरू आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्ये हवाई मार्गिका तयार करण्यावरही विचार सुरू आहे, असे सिन्हा म्हणाले.

  • अवयव प्रत्यारोपण सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये ड्रोनपोर्ट्स तयार केल्यानंतर अवयव वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींचे प्रमाण कमी होणार आहे. नव्या धोरणावर १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्लोबल एव्हिएशन परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

  • ड्रोनचा वापर वाढावा आणि त्यामध्ये सुलभता यावी यासाठी विशेष डिजिटल स्पेसनिर्मिती केली जाणार आहे. सामान वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार असून त्याविषयीची श्वेतपत्रिका लवकरच काढण्यात येईल, असे सिन्हा म्हणाले.

जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश : अमेरिकेचा उत्तम ‘सीईओ’ :
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सिनीयर हे १९८९ मध्ये देशाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्या देशाची वाटचाल वेगळ्या दिशेने सुरू झाली. ४१ वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वी ते रोनाल्ड रेगन यांच्यासमवेत आठ वर्षे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्षाला पुढे जाऊन अध्यक्षपद मिळण्याची दीडशे वर्षांतील ही पहिलीच घटना.

  • एकीकडे सोविएत रशियाचे विसर्जन होत असताना अमेरिका त्या वेळी महाशक्ती म्हणून उदयास येत होता. त्यातच बुश यांच्या धोरणांनी उर्वरित जगात अमेरिकेची विश्वासार्हता वाढवली व व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचे भूत गाडण्याचा प्रयत्न केला. देशांतर्गत गोष्टींकडे त्यांनी काहीसे दुर्लक्ष केले असा एक आरोप त्यांच्यावर होता, कर न वाढवण्याचे आश्वासन ते पाळू शकले नव्हते. त्यानंतर १९९२ मध्ये देशाची सूत्रे बिल क्लिंटन यांच्याकडे गेली.

  • जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचा जन्म मॅसॅच्युसेट्समधील मिल्टन येथे झाला, गुंतवणूक बँकरचे ते पुत्र होते. अमेरिकी नौदलात त्यांनी पर्ल  हार्बरच्या हल्ल्यानंतर वैमानिक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पॅसिफिकमधील कामगिरी देण्यात आली. वयाच्या अठराव्या वर्षी ते वैमानिक झाले. टॉर्पेडो बॉम्बर विमानांचे सारथ्य त्यांनी केले होते. त्यांनी १९४४ मध्ये हवाई हल्ल्यांच्या वेळी त्यांचे विमान पाडले गेले, त्या वेळी त्यांच्या जिवावर बेतले होते.

  • १९४५ मध्ये नौदलातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा विवाह बार्बरा बुश यांच्याशी झाला. त्यांना सहा मुले होती. पहिला मुलगा जॉर्ज वॉकर बुश (ज्युनियर) नंतर देशाचा अध्यक्ष झाला. कला शाखेत पदवी घेतल्यानंतर कालांतराने बुश (सीनीअर) टेक्सासला गेले. वडिलांच्या उद्योग संबंधांचा वापर करून त्यांना तेल उद्योगात नोकरी मिळाली. वयाच्या चाळिशीत ते अब्जाधीश झाले. त्यांच्या  मुलीच्या अकाली मृत्यूने त्यांना धक्का बसला. 

लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी :
  • बीजिंग : चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जिनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह अंतराळात पाठवायचे ठरविले आहे.

  • पुढील दोन वर्षांत १० उपग्रह पाठवण्यात येतील आणि २०२६ पर्यंत कंपनीचे २७२ उपग्रह अंतराळात असतील. त्यामुळे जगभर मोफत वायफाय मिळू शकेल.

  • लिंकशुअरचे कार्यकारी प्रमुख वाँग जिंगयिंग यांनी सांगितले की, या योजनेची तयारी पूर्ण झाली असून, ती यशस्वी होण्यासाठी आम्ही ३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. अर्थात या उपग्रहांद्वारे मोफत वायफाय सेवा सर्वांना मिळणार असली तरी भविष्यात या गुंतवणुकीतून मोठा फायदाही मिळू शकेल.

'काळा पैसा व दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक' :
  • ब्युनस आयर्स : काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे शुक्रवारी सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेत भारताचे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.

  • परिषदेतही जागतिक मुद्यांवर चर्चा करताना दहशतवाद व आर्थिक गुन्हे ही जगासमोरील दोन सर्वांत मोठी आव्हाने असून, त्याचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले.

  • परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद व आर्थिक गुन्ह्यांविरोधात सर्वच राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

  • मोदी यांनी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन, जर्मनीच्या चॅन्सलेर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे प्रमुख शिंजो आबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर तिघांनी एक छोटेसे निवेदनही केले.

  • त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत व अमेरिका यांचे संबंध पूर्वीपेक्षा सुधारले असून, यापुढे परस्परांत सहकार्य कायम राहील. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनीही त्यास दुजोरा दिला.

दिनविशेष :
  • जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

महत्वाच्या घटना

  • १४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

  • १९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.

  • १९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

  • १९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

  • १९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

  • १९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.

  • १९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.

  • १९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

  • २००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म 

  • १८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)

  • १८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

  • १८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)

  • १९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.

  • १९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.

  • १९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

  • १९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)

  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.

  • १९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

  • १९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)

  • १९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.

  • १९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)

  • १९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्‍ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)

  • २०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.