चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 सप्टेंबर 2023

Date : 9 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फौजदार व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत… 
  • महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हाकेंद्रांवर यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • पीएसआय पदासाठी विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर पीएसआयची पूर्व परीक्षा ही २ डिसेंबरला होणार आहे. अनेक वर्षांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांची जाहिरात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  • या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे.
  • पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून महागाई भत्त्यात वाढ, आता ‘एवढा’ मिळणार भत्ता!
  • राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
  • गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मान्यता दिली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
  • सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘ग्लोबल साऊथ’ संकल्पना नेमकी काय आहे?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत हा ग्लोबल साऊथचा आवाज बनत आहे,’ असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
  • नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या समस्यांवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी नुकतेच सांगितले.
  • जी-२० परिषदेचे शेर्पा किंवा निमंत्रक अमिताभ कांत यांनी ही परिषद ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज असेल, असे म्हटले आहे. जपानच्या पंतप्रधानांनीही ‘ग्लोबल साऊथ’चे महत्त्व प्रतिबिंबित केले होते. मात्र ‘ग्लोबल साऊथ’ म्हणजे नेमके काय? याविषयी…
जागतिक नेत्यांचे दिल्लीत आगमन; पारंपरिक भारतीय नृत्य, संगीताने स्वागत
  • G20 Summit Delhi 2023 जी २० परिषदेसाठी जागतिक नेत्यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाले. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आदींचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत या सर्वच नेत्यांबरोबर भरीव फलदायी चर्चा होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
  • विमानतळावर पारंपरीक नृत्य- संगीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी स्वागतादरम्यान सुहास्य वदनाने वाद्यांच्या तालावर ठेका धरला. त्यांनी या विशेष स्वागताचा उल्लेख ‘एक्स’वरही केला. त्यांनी भारतीय संस्कृतीविषयी दाखविलेल्या या आपलेपणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नंतर ‘एक्स’वर केला.

पाहुण्यांचे बहुभाषिक स्वागत

  • जी२०चे प्रतिनिधी आणि इतर आंतरराष्ट्रीय पाहुणे हे परिषदस्थळी येतील, तेव्हा त्यांचे स्वागत त्यांच्या भाषेत केले जाणार आहे. त्यानुसार जर्मनमध्ये ‘विलकोमेन’, तुर्कीमध्ये ‘होसगेल्डिनिझ’, फ्रेंचमध्ये ‘बिनेव्हेन्यु’, स्पॅनिशमध्ये ‘बिनेव्हेनिडो’, इंडोनेशियनमध्ये ‘सेलामत दातांग’ अशा शब्दांसह स्वागत फलक रंगविले आहेत.
कराडला सर्वांत मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र!, नाईट लॅंडिंग झाले यशस्वी
  • कराड विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरू असल्याची माहिती अँबिशिएन्स एव्हीएशान फ्लाईंग क्लबचे संचालक परवेझ दमानिया यांनी दिली. विमानतळ व्यवस्थापक कुणाल देसाई, प्रशिक्षण केंद्राचे पंकज पाटील आदी उपस्थित होते. परवेझ दमानिया म्हणाले की, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नुकतेच येथे नाईट लॅंडिंग यशस्वी झाले आहे.
  • कराड विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर येथे राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. या विमानतळावर विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. हे ज्यादाची  हवाई वाहतूक नसलेले विमानतळ आहे. त्यामुळे याचा वापर वैमानिक प्रशिक्षण केंद्रासाठी सुरू करता येईल असा मानस होता. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. कराड विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीशी तीन वर्षांचा करार सुध्दा करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठीची पाच विमाने विमानतळावर आणण्यात आली आहेत.
  • अजूनही मोठ्या क्षमतेची विमाने आणण्यात येतील. यातील दोन विमाने दोन आसनी तर एक विमान चार आसनी आहे. यासाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगर केला असून, नाईट लॅंडिंगही करण्यात आले आहे. या विमानतळाची विस्तारवाढ झाल्यानंतर या ठिकाणी  राज्यातील मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिकांसह देशभरातून सुमारे २५ विद्यार्थ्यांना सध्या इथे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनवण्यासाठी दोनशे तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खाजगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचा विश्वासही दमानिया यांनी दिला आहे.
जपानमध्ये विद्यार्थ्यांऐवजी शाळेत जाणार रोबो; घरबसल्या विद्यार्थी करणार अभ्यास
  • अनेक लहान मुलांना शाळेत जायला आवडतं नाही. अशा मुलांना जर कोणी असा पर्याय दिला की तुमच्या ऐवजी दुसरे काणी शाळेत जाऊ शकते तर त्यांना नक्कीच ही कल्पना आवडेल. पण हे कसं शक्य आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या ऐवजी दुसरा कोणी कसा काय शाळेत जाऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, जपानमध्ये लवकरच असा पर्याय विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांऐवजी शाळेमध्ये रोबो हजेरी लावणार आहे आणि विद्यार्थी घरबसल्या शाळेत काय शिकवले जात याची माहिती मिळवू शकतात.

टॅब्लेटच्या मदतीने रोबोवर नियंत्रण केले जाईल

  • जपानमधील एका शाळेने विद्यार्थी गैरहजर असताना त्यांच्या जागी रोबोट्स वापरण्याची योजना आखली आहे जेणेकरून रोबोच्या मदतीने गैरहजर विद्यार्थीघरबसल्या अभ्यास करू शकतील. मायक्रोफोन, स्पिकर्स आणि कॅमेरा असलेले हे रोबोट्स आणि विद्यार्थी एकमेकांसह संवाद साधू शकतात. विद्यार्थ्यांना ३ फूट लांब रोबो शाळेच्या मैदानातही नेता येणार आहे. टॅब्लेटच्या मदतीने विद्यार्थी रोबो नियंत्रित करू शकतात. यामध्ये स्पीकर लावण्यात आले असून, त्याच्या मदतीने विद्यार्थी घरून जे काही बोलेल ते रोबोट ऑडिओच्या स्वरूपात वर्गात सादर करेल. नुकताच त्याचा यशस्वी प्रयोगही झाला. कुमामोटो शहरातील शाळातील वर्गात नोव्‍हेंबरमध्‍ये रोबो उपलब्ध होतील यासाठी नियोजन केले जात आहे.

अभ्यासाचे नुकसान टाळणे आहे उद्देश्य

  • या नवीन उपक्रमाचा उद्देश गैरहजर विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आहे. शाळेतीतल सर्व कामे विद्यार्थ्यांना घरबसल्या रोबोटच्या माध्यमातून करता येणार आहेत. कोविड १९ नंतर, जपानमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अनेक मुलांना गुंडगिरीमुळे तर अनेकांना रॅगिंगमुळे शाळेत जायचे नसते. त्यामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.

रोबोट विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर करेल

  • रोबोद्वारे संवाद साधणे हे पूर्णपणे वास्तववादी(realistic) नाही, परंतु इतरांशी संवाद साधण्यास जे विद्यार्थ्यी घाबरतात त्यांना किमान वास्तवाची ( reality) जाणीव करून दिली जाऊ शकते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिक भीतीही दूर होण्यास मदत होणार आहे. खरेतर, जपानमध्ये २०२१ मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या २४४,९४० वर पोहोचली आहे जी विक्रमी नोंद होती.

 

नीरज चोप्राने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय :
  • भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चौप्राने एक नवा इतिहास रचला आहे. प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफी जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. डायमंड लीगच्या पुरुष गटातील अंतिम फेरीत २४ वर्षीय नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करुन आपल्या कारकिर्दीतील नवा विजय नोंदवला आहे.

  • चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज आणि जर्मनीच्या जुलियन वैब्बरला मागे टाकत नीरजने या ट्रॉफीला गवसणी घातली आहे. पहिल्या फेरीत नीरजला मागे टाकत याकूब वाडलेजने ८४.१५ मीटर भालाफेक करत आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नान नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करत स्पर्धेत पुनरागमन केले. तिसऱ्या फेरीत ८८ मीटर, चौथ्या फेरीत ८६. ११ मीटर, पाचव्या फेरीत ८७ मीटर आणि सहाव्या अंतिम फेरीत नीरजने ८३.६० मीटर अंतरावर भालाफेक करत विजय मिळवला. ८६.९४ मीटरच्या सर्वोच्च प्रयत्नासह वाडलेजने दुसरे स्थान पटकावले. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये ही डायमंड लीग पार पडली.

  • नीरजने २०२१ साली पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्याआधी २०१८ मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवले होते. या यशानंतर डायमंड लीग जिंकण्याची इच्छा नीरजने बोलून दाखवली होती. अथक प्रयत्नानंतर नीरजचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

हाजी अली दर्गा परिसरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ :
  • हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे. या दर्ग्याचे नुतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे. तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले.

  • “ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती. ही कल्पना त्यांना आवडली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या ध्वजस्तंभाची आठवण करून दिली आणि त्याला मान्यताही दिली”, असेही सोहेल खंडवानी म्हणाले. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

  • जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ इजिप्तच्या कैरोमध्ये आहे. हा ध्वजस्तंभ २०२१ मध्ये बांधण्यात आला होता. त्यापूर्वी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सर्वात उंच्च ध्वजस्तंभ होता. त्याची उंची १७१ मीटर होती.

नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा, प्रेरणा ; पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्तव्यपथ’चे उद्घाटन :
  • भारत जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दाखविलेल्या मार्गावर चालला असता, तर आता प्रगतीचा नवा उच्चांक गाठला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्य पथ असे नामकरण करण्यात आले. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मोदी बोलत होते. नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • ‘‘गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्सवे किंवा राजपथ आता इतिहासात जमा झाला आहे आणि कायमचा पुसला गेला आहे. आता हा कर्तव्यपथ असेल,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले. जर भारताने सुभाषचंद्र बोस यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले असते, तर देश नवीन उंचीवर पोहोचला असता; दुर्दैवाने त्यांना विसरले गेले, असेही पंतप्रधान म्हणाले.

  • सुधारित मार्ग हा मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये नवे संसद भवन, नवीन सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान यांचा समावेश आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन :
  • ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “२०१५ आणि २०१८ मध्ये झालेल्या ब्रिटनच्या माझ्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भेटीच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. मी त्यांचा दयाळूपणा कधीही विसरू शकणार नाही. एका भेटीत त्यांनी महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात दिलेला रुमाल दाखवला होता. ते माझ्या कायम लक्षात राहील.”

बंकिगहम पॅलेसने जारी केलेले प्रसिद्धीपत्रक

  • संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटर्स म्हणाले, “महाराणी एलिझाबेथ द्वितीय संयुक्त राष्ट्राच्या खूप चांगल्या मित्र होत्या. त्यांनी न्यू यॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयाला दोनदा भेट दिली होती. त्यांचा अनेक पर्यावरणीय आणि सामाजिक कामांमध्ये सहभाग होता. ग्लासगो येथे त्यांनी पर्यावरणीय बदलावरही भाष्य केलं होतं. त्यांच्या निधनाने मी दुःखी आहे.”

  • विशेष म्हणजे नुकतीच महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची नियुक्ती केली होती. एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. यात विस्टन चर्चिल यांच्यापासून लिज ट्रस यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.

कोहिनूर मुकुटाचे काय होणार? जाणून घ्या :
  • ब्रिटनचे महाराणी पद सर्वाधिक काळ भुषवणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. प्रकृतीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय उपचार सुरू असताना वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. महाराणी यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या समाप्तीनंतर प्रिन्स चार्लस ब्रिटनच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी आहेत. महाराणी यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर मुकुटाचे काय होणार याबाबत जगभरात उत्सुकता आहे.

  • या वर्षाच्या सुरवातीला महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती. प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होताच त्यांच्या पत्नी कॅमिला यांना प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याचे मुकुट मिळेल, असा आदेश महाराणीने काढला होता, याबाबतचे वृत्त आहे. १०५.६ कॅरेटचा कोहिनूर हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले

  • १८४९ साली ब्रिटिशांनी भारतातील पंजाबवर ताबा मिळवल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात सजवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटाचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक हिऱ्याच्या मालकीवरुन भारतासह चार देशांमध्ये अनेक शतकांपासून वाद सुरू आहेत. जॉर्ज सहावे यांच्या १९३७ मधील राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांच्या आई महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी प्लॅटिनम धातूच्या मुकुटामध्ये हा हिरा सजवण्यात आला होता. हा मुकुट लंडन टॉवरमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

  • एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या २५ व्या वर्षी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी ब्रिटनचे महाराणी पद स्वीकारले होते. त्यांचे वडील जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर त्या ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या. २० नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा प्रिन्स फिलीप यांच्याशी विवाह झाला होता. फिलीप यांचे गेल्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर गुरुवारी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही जगाचा निरोप घेतला.

09 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.