चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 09, 2022 | Category : Current Affairs


ICC हॉल ऑफ फेममध्ये या तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला, जाणून घ्या :
 • ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तीन दिग्गज खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल, पाकिस्तानचा अब्दुल कादिर आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू चार्लोट एडवर्ड्स यांचा समावेश केला आहे.

 • मतदान प्रक्रियेद्वारे निवडलेले तिघेही सध्याच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होतील. यावेळी पाकिस्तानचे खेळाडू आणि अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर म्हणाले की, “ही बातमी ऐकून कुटुंबासाठी खूप मोठा सन्मान आहे, आम्ही ही एक मोठी उपलब्धी म्हणून पाहतो, माझे वडील जर आज हयात असते तर त्यांना ही हा पुरस्कार मिळाल्याचे कौतुक वाटले असते. आज ते जिथे असतील तिथेही त्यांना आनंदच झाला असेल.”

 • अब्दुल कादिर यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले पण आताही पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचा ज्यावेळी उल्लेख केला जातो तेव्हा कादिर यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. त्याच्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने ६७ कसोटी सामने, १०४ एकदिवसीय सामने खेळले आणि अनुक्रमे २३६ आणि १३२ बळी घेतले.

‘हवामान बदलांवर खारफुटी सर्वोत्तम उपाय’; इजिप्तमधील ‘सीओपी २७’ परिषदेत भारताची ग्वाही :
 • हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी खारफुटी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव म्हणाले. येथे संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणीय बदल परिषदेचे वार्षिक अधिवेशन ‘सीओपी २७’ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पर्यावरणासाठी खारफुटी संघटने’च्या स्थापनेवेळी ते बोलत होते.

 • संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशियाने या संघटनेची स्थापना केली असून भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन आणि श्रीलंकेने तिचे सदस्यत्व स्वीकारले आहे. ही संघटना स्थापन करण्यामागे मोठी सागरी किनारपट्टी लाभलेल्या देशांमध्ये खारफुटीचे संवर्धन आणि वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना यादव म्हणाले की, भारताला खासफुट संवर्धनाचा पाच दशकांचा अनुभव आहे. या अनुभवाचा जगाला निश्चित फायदा होईल. वातावरण बदलामुळे वाढणारी समुद्राची पातळी, वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण याविरोधात खारफुटी म्हणजे नैसर्गिक सैन्य आहे. खारफुटीच्या संवर्धानाचा समावेश हा राष्ट्रीय कार्यक्रमात करणे ही काळाची गरज आहे.

झेलेन्स्की यांची रशियाशी सशर्त चर्चेची तयारी :
 • रशियासोबत आमच्या अटींवर शांतता चर्चा होऊ शकते, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी मांडली. आतापर्यंत व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलण्यास अजिबात तयार नसलेल्या झेलेन्स्कींनी एक पाऊल मागे घेतले आहे. अर्थात त्यांच्या अटी पुतिन मान्य करणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

 • जागतिक समुदायाने पुतिन यांना खऱ्याखुऱ्या शांतता चर्चेसाठी तयार करावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. रशियाने हल्ला केल्यापासून ते ‘रशियाशी चर्चा केवळ अशक्य आहे,’ असेच सांगत होते. मात्र अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमुळे चित्र काहीसे बदलले आहे.

 • अमेरिकेचे सेनेट आणि हाऊसमध्ये रिपब्लिकन पार्टीचे प्राबल्य झाल्यास युक्रेनला आतासारखी आर्थिक आणि लष्करी मदत सुरू राहणे अवघड असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी आपली भाषा बदलली असली तरी त्यांनी घातलेल्या अटी या अत्यंत जाचक असल्यामुळे पुतिन तयार होण्याची शक्यता कमी आहे.

 झेलेन्स्कींच्या अटी

 • रशियाने बळकावलेला प्रांत परत करावा
 • युद्धात झालेल्या संहाराची नुकसान भरपाई द्यावी
 • रशियाने केलेल्या युद्धगुन्ह्यांचे खटले सुरू करावेत
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या चिन्हाचे अनावरण :
 • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये जी-२० समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अभिमानाची आणि प्रचंड संधी उपलब्ध करून देणारी बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना (थिम) आणि संकेतस्थळाचे अनावरण झाले.

 • ‘स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात सर्व सरकारे आणि नागरिकांचे आपापल्या परीने योगदान राहिले आहे. जेव्हा लोकशाही ही संस्कृती होते, तेव्हा संघर्षांला विराम देता येऊ शकतो, हे भारत जगाला दाखवून देऊ शकतो,’ असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळ यातून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. जी-२० अध्यक्षपद भारताकडे येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

 • जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.

 • प्रगती आणि प्रकृती (निसर्ग) हे एकत्र नांदू शकतात. त्यातून कायमस्वरूपी विकास साधता येईल.

अमेरिकेत ‘मध्यावधी’साठी आज मतदान :
 • अमेरिकी काँग्रेसवर अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण राहणार की माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकनचे हे ठरवणाऱ्या मध्यावधी निवडणुकीसाठी अमेरिकेत आज, मंगळवारी मतदान होणार आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदासाठी निवडणुका होणार आहेत. 

 • अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील. मध्यावधी निवडणुकीतून अध्यक्षांच्या दोन वर्षांतील कामगिरीवर मतपत्रिकेतून अंशत: सार्वमत व्यक्त होत असते.  

 • अमेरिकेला सध्या तीव्र राजकीय ध्रुवीकरणाला तोंड द्यावे लागत आहे. ढासळती अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क आणि लोकशाहीच्या भवितव्याबाबत व्यापक चिंता व्यक्त केली जात असताना अमेरिकी संसदेची आगामी रचना कशी असेल, हे या निवडणुकीद्वारे निश्चित होईल.अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी प्रचार मोहिमेत मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी रिपब्लिकन पक्षावर, ‘निवडणुकीस नकार देणाऱ्यांनी मतपत्रिकांमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप केला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी, वाढत्या डाव्या विचारसरणीला विरोध करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.

 • याँकर्स येथील सारा लॉरेन्स महाविद्यालयामध्ये रविवारी संध्याकाळी बायडेन यांनी पाच राज्यांतील चार दिवसांच्या प्रचार मोहिमेची सांगता केली. सभेत त्यांनी डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी हॉचूल यांचा जोरदार प्रचार केला. त्यांचा सामना रिपब्लिकनच्या ली झेल्डिन यांच्याशी आहे. निवडणूक नाकारणाऱ्यांसाठी कोणत्याही निवडणुकीचे दोनच निकाल असतात- एक तर ते जिंकतात किंवा त्यांची फसवणूक केली गेलेली असते, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर केली. ट्रम्प यांनी मियामीमध्ये समर्थकांसमोर बोलताना प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांना उद्देशून ‘‘लॉक हर अप!’’ असे उद्गार काढले. अमेरिकी संसदेच्या मुख्य सभागृहावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा रिपब्लिकनांचा प्रयत्न आहे. सेनेटच्या ३५ जागा मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

०९ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)