चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 जून 2023

Date : 9 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने नोंदवला विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला सातवा भारतीय
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणेने एक खास कामगिरी केली. त्याने कसोटी कारकिर्दीतील १०० झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. रहाणे कसोटी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ विकेट गमावून १५१ धावा केल्या आहेत.
  • सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑलआऊट होईपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४६९ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पॅट कमिन्स आणि बोलंड यांच्या रूपाने संघाची शेवटची जोडी मैदानात होती. सिराजच्या चेंडूवर कमिन्सने फटका खेळला, चेंडू रहाणेकडे पोहोचला. त्याने कोणतीही चूक न करता हा झेल घेतला. अशात कमिन्स बाद झाला. तो बाद होताच रहाणेने झेलचे शतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५८ कसोटी डावांमध्ये १०० झेल घेतले आहेत. यादरम्यान एका डावात सर्वाधिक ५ झेल घेतले आहेत.

सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत अजिंक्य ७ व्या क्रमांकावर -

  • भारताकडून कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने १६३ सामन्यात २०९ झेल घेतले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३४ सामन्यात १३५ झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०० सामन्यांमध्ये ११५ झेल घेतले आहेत. विराट कोहली १०९ झेलांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रहाणे कसोटी फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे
  • उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, भारतीय संघाने १५१ धावसंख्येवर ५ विकेट गमावल्या आहेत. भारताकडून अजिंक्य रहाणे २९ धावा करून नाबाद आहे. श्रीकर भरतने ५ धावा केल्या आहेत.
मोसमी वारे केरळमध्ये दाखल, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी
  • मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाले. हवामान विभागाने आनंदाची ही माहिती दिली आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस केरळमध्ये पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने काल, बुधवारी जाहीर केले होते. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल झाले आहे.
  • अरबी समुद्र, बंगालाच्या उपसागरातही मोसमी वाऱ्याने आगेकूच केली आहे. केरळच्या बहुतेक भागासग तमिळनाडूमध्येही मोसमी वारे धडकले आहे. मोसमी वारे केरळमध्ये चार जून रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. पण, अरबी समुद्रात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नव्हते. शिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांची प्रगती संथ गतीने सुरू होती.

मिझोराममध्येही आनंद सरी

  • मोसमी वारे केरळ आणि तमिळनाडूत दाखल होत असतानाच मोसमी वाऱ्याच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने ईशान्यत धडक दिली आहे. मिझोराममध्येही आनंद सरींचा शिडकाव सुरू झाला आहे.

दोन दिवसांत बंगाल, कर्नाटकमध्येही

  • मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक हवामान असल्यामुळे पुढील ४८ तासांत मोसमी वारे लवकरच पूर्ण तमिळनाडू व्यापून कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पोहचेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीयांची व्हिसा प्रतीक्षा कमी करावी; अमेरिकी सिनेटरची राष्ट्राध्यक्षांना विनंती
  • भारतीय नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी अध्यक्ष जो बायडेन यांनी प्राधान्याने लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि काँग्रेसमन मायकेल वॉल्ट्झ यांनी केली आहे.
  • अमेरिकेच्या व्हिसासाठी पहिल्यांदा मुलाखतीची वेळ मिळण्यास भारतीय नागरिकांना सध्या सरासरी ४५० ते ६०० दिवस प्रतीक्षा करावी लागते. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून लोकांच्या एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्काने त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जाते, याकडे मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांनी बायडेन प्रशासनाचे लक्ष वेधले. मेनेंडेझ हे सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, तर वॉल्ट्झ हे अमेरिकेचे कायदेमंडळ असलेल्या काँग्रेसच्या भारतविषयक धोरणांकडे लक्ष देणाऱ्या हाऊस इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष आहेत. या दोघांनी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र चर्चादरम्यान भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी ६०० दिवसांपर्यंत प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न उपस्थित केला.
  • २१ व्या शतकातील अमेरिकेचे भारताशी असलेले आर्थिक, धोरणात्मक, सुरक्षाविषयक संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत असे मेनेंडेझ म्हणाले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असताना आपण ही समस्या सोडवण्यासाठी काय करणार आहोत, असा प्रश्न वॉल्ट्झ यांनी विचारला.
  • ही समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्र विभाग परिश्रम घेत असून त्यासाठी अनेक उपाय करण्यात आल्याचे परराष्ट्र साहाय्यकमंत्री रेना बिटर यांनी मेनेंडेझ आणि वॉल्ट्झ यांना सांगितले.
  • भारतामधून व्हिसासाठी नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. आम्ही या वर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार आहोत. यासाठी आम्ही अत्यंत कार्यक्षमतेने पावले टाकत आहोत.
देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० गाड्यांमध्ये एकट्या मारुतीच्या ‘या’ सात कार्स
  • देशामध्ये सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत. त्यामध्ये मारूती सुझुकी, ह्युंदाई , टाटा मोटर्स, किया एमजी मोटर्स आणि अन्य अशा कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या युनिट्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्व कंपन्यांनी मिळून पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण ३,३४,८०० युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये मारूती सुझुकीने चांगले प्रदर्शन केले आहे. मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या १० कार्समध्ये मारूतीच्या ७ गाड्यांचा समावेश होता. ह्युंदाई मोटर्सची एक तर टाटा मोटर्सच्या २ गाड्यांचा समावेश आहे.
  • मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या १० गाड्यनामध्ये मारुतीच्या बलेनो, स्विफ्ट, वॅग्नर, ब्रिझा, इको आणि डिझायर व अर्टिगा या गाड्यांचा समावेश आहे. तर ह्युंदाईच्या क्रेटा आणि टाटा मोटर्सच्या Nexon आणि पंच या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची मे महिन्यामध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. या बाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० कार्स

  • मारूती सुझुकी Baleno – १८,७०० युनिट्स
  • मारूती सुझुकी Swift – १७,३०० युनिट्स
  • मारूती सुझुकी WagonR – १६,३०० युनिट्स
  • ह्युंदाई मोटर्स Creta -१४,४४९ युनिट्स
  • टाटा मोटर्स Nexon – १४,४२३ युनिट्स
  • मारूती सुझुकी Brezza – १३,३९८ युनिट्स
  • मारूती सुझुकी Eeco – १२, ८०० युनिट्स
  • मारूती सुझुकी Dzire – ११,३०० युनिट्स
ChatGpt चे निर्माते सॅम ऑल्टमन घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या सविस्तर
  • OpenAI ने गेल्या वर्षी नोहेंबर २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सॅम ऑल्टमन आपल्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा कंपनीने ChatGPT सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरू झालेल्या AI क्रांतीचे नेतृत्व हे ऑल्टमन यांच्याकडे होते. तसेच ते आयआयटी दिल्ली येथे भेट देणार आहेत.
  • जगभरातील AI रेग्युलेशनमध्ये भारताची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे असे ऑल्टमन म्हणाले आहेत. ऑल्टमन पुढे म्हणाले, ” जी २० परिषद लवकरच होणार आहे. यामध्ये या प्रकारच्या संभाषणामध्ये भारत मोठी भूमिका बजावू शकतो. ” भारताच्या स्टॅकबद्दल ऑल्टमन यांना त्यांचे मत विचारले असता, ते म्हणाले भारताने दिलेल्या योगदानामुळे मी प्रभावित झालो आहे. तसेच भारत सरकार AI चा वापर इतर सेवांसह एकत्रित करून देखील करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
  • सॅम ऑल्टमन म्हणाले, ”राष्ट्रीय टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय मालमत्ता याबाबतीत भारताने जे काही केले आहे ते खूप प्रभावी आहे. मात्र ही टेक्नॉलॉजी इतर सेवांमध्ये कसे एकत्रित करून वापरता येईल यावर सरकारने भर दिला पाहिजे. आम्ही सर्व सरकारी सेवांना अधिक चांगले करण्यासाठी Language-Learning मॉडेल (LLMs ) चा वापर करण्यास सुरूवात करू. ”
  • न्यूक्लिअर फ्युजन टेक्नॉलॉजीबद्दल आपण उत्सुक असल्याचा खुलासा सॅम ऑल्टमन यांनी केला. ओपनएआयचे सीईओ ऑल्टमन यांनी Helion Energy मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जगातील पहिलाफ्युजन प्लांट तयार करण्याची कंपनीची योजना आहे जी अमर्यादित स्वछ ऊर्जा तयार करण्यासाठी सक्षम असेल.

 

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा :महाराष्ट्राला १० पदके; वैभव पाटील, पूर्वा सावंत यांना सुवर्णपदक :
  • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १० पदके मिळवली. कुस्ती, ॲथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलििफ्टगमधील पदकांचा यात समावेश आहे. हरयाणाने बुधवारी ८७ पदकांसह (३० सुवर्ण, २३ रौप्य, ३४ कांस्यपदक) अव्वल स्थान गाठले असून, महाराष्ट्र ७३ पदकांसह (२६ सुवर्ण, २५ रौप्य, २२ कांस्य) दुसऱ्या स्थानी आहे.

  • जलतरणात ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात आर्यन वर्णेकरने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या २०० मीटर व ८०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मुंबईच्या आन्या वालाने रौप्यपदके कमावली. ॲथलेटिक्सच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या प्रांजली पाटीलने १४.३८ सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले, तर तिहेरी उडीत पूर्वा सावंतने १२.६९ मीटर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावले. मल्लखांबमध्ये राज्याला सांघिक रौप्यपदक मिळाले.

  • वेटलिफ्टिंगमध्ये प्रतिक्षा कडूने मुलींच्या ७६ किलो वजनीगटात १५९ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले. कुस्तीत मुला-मुलींच्या संघांनी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या ५५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्या वैभव पाटीलने सुवर्णपदक मिळवले. मुलींच्या ५३ किलो वजनी गटात कल्याणी गादेकरने रौप्यपदक मिळवले, तर ६५ किलो वजनी गटात पुण्याच्या पल्लवी पोटफोडेने कांस्यपदक जिंकले.

मितालीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
  • भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिने महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.मितालीने २३२ एकदिवसीय सामन्यांत ७,८०५ धावा केल्या आहेत.

  • याचप्रमाणे एकूण १०,८६८ धावांसह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकंदर धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने ८९ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले, तर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तिला केवळ १२ कसोटी सामने खेळायला मिळाले. क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकारात द्विशतक झळकावणारी ती भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. मितालीने २०१९ मध्येच ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली होती आणि मार्चमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेण्याची शक्यता तिच्याबाबत वर्तवण्यात आली होती.

  • ‘‘भारतीय संघाचा निळय़ा रंगाचा पोशाख परिधान करण्याच्या निश्चयाने एका लहान मुलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे अभिमानास्पद आहे. या प्रवासात अनेक चढ-उतारही पाहायला मिळाले,’’ असे मितालीने ‘ट्विटर’वरील आपल्या निवेदनात म्हटले.

  • ‘‘प्रत्येक स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाले आणि माझ्या आयुष्यातील गेली २३ वर्षे ही परिपूर्ण, आव्हानात्मक आणि आनंदी होती. सर्व प्रवासाप्रमाणे हादेखील कधी तरी थांबणार होता. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे,’’ असे मितालीने म्हटले आहे. मितालीने सहा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय-अमेरिकी मुलीचे यश :
  • अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय हरिणी लोगन या भारतीय वंशाच्या मुलीने कडव्या लढतीनंतर यंदाची ‘स्क्रिप्स स्पेिलग बी’ स्पर्धा जिंकली. पहिल्यांदाच स्पर्धेचा निकाल ९० सेकंदांच्या ‘स्पेल ऑफ’ (टायब्रेकरद्वारे) लागला. ज्यामध्ये २६ पैकी २२ शब्दांची योग्य स्पेलिंग अचूक सांगत तिने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकला.

  • २ जूनला घेण्यात आलेल्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत अमेरिकेसह जगभरातील २३४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

  • ही स्पर्धा जिंकण्यासाठी अखेरीस आठवीत शिकणाऱ्या हरिणी हिने ‘मुरहेन’ या शब्दाची स्पेलिंग सांगितली. एका सुंदर लहान पक्ष्याचे हे नाव आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील दोन्ही अंतिम स्पर्धक हे भारतीय मूळ वंशाचे होते. उपविजेता विक्रम राजू हासुद्धा भारतीय वंशाचा आहे.

  • हरिणीला पियानोगिटारची आवड - हरिणीला रचनात्मक लेखन आवडते. शाळेत एक पुस्तक प्रकाशित करण्याचाही तिचा मनोदय आहे. वेगवेगळे शब्द शिकण्याबरोबरच तिला पियानो आणि गिटार वाजवणे आवडते.

  • ५० हजार डॉलरचे बक्षीस - ‘स्क्रिप्स स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्या हरिणी हिला ५० हजार डॉलर (सुमारे ३८ लाख ८० हजार रुपये) आणि १२ वर्षीय विक्रम राजू याला २५ हजार डॉलर (सुमारे १९ लाख ४० हजार रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले. २०२० मध्ये करोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती, तर गेल्या वर्षी २०२१ मध्ये ऑनलाइन घेण्यात आली होती.

कर्जे आणखी महाग ; रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्धा टक्का व्याजदरवाढ :
  • MSBSHSE 12th Result 2022 : महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेनुरूप व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ केली. महिनाभरात झालेल्या दुसऱ्या तर दशकभरातील सर्वात मोठय़ा दरवाढीमुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जदारांवर मासिक हप्त्याचा भार वाढणार आहे. या निर्णयाच्या अपेक्षेने अनेक बँकांनी कर्ज व्याजदरात पतधोरणापूर्वीच वाढ केली.

  • रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर  शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीअंती व्याजदर वाढीचा हा निर्णय

  • एकमताने घेण्यात आला. रेपो दरातील सलग दुसऱ्या वाढीनंतरही, हे दर करोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीपेक्षा कमीच आहेत, असे गव्हर्नर दास यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. शिवाय करोना साथीच्या काळात स्वीकारलेल्या ‘परिस्थितीजन्य उदारते’च्या भूमिकेत बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेच त्यांनी सूचित केले.

  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दरातील वाढीचा अंदाज कायम ठेवत चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाई दरासंबंधी अंदाजातील एका टक्क्याची वाढ ही युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे असल्याचे नमूद करताना, ‘युद्धामुळे महागाईचेच जागतिकीकरण झाले आहे,’ असे ते म्हणाले.

यंदा प्रवेश सुकर ; बारावीचा ९४.२२ टक्के विक्रमी निकाल; गेल्या वर्षी वाढविलेल्या जागांचा या वर्षी फायदा :
  • गेल्यावर्षी सर्वाना उत्तीर्ण करण्याचे धोरण बाळगून जाहीर झालेल्या बारावीच्या शंभर टक्के निकालानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या वाढवून दिलेल्या जागा यंदा कशा भरायच्या हा महाविद्यालयांसमोरील प्रश्न यंदाच्या बारावीच्या निकालाने सोडवल्याचे दिसत आहे. यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला. करोनामुळे गेल्यावर्षी रद्द झालेल्या परीक्षेचा निकाल वगळता यंदाचा निकाल हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी निकाल जाहीर केला. मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर परीक्षेचे नियोजन करून परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली होती.

  • यंदा परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षा न दिलेल्या साधारण ९३ हजार विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून यातील बहुतेक विद्यार्थी यंदा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे गेल्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांना वाढवून दिलेल्या जागा यंदाही भरणार असल्याचे दिसते आहे.

  • यंदा विज्ञान शाखेतील ६ लाख २४ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ६ लाख २२ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख १२ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ४ लाख २० हजार ३९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ४ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून नोंदणी केलेल्या ३ लाख ५५ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ३ लाख २४ हजार ६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४७ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

  • ४६ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ४३ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयटीआयच्या नोंदणी केलेल्या ९२७ विद्यार्थ्यांपैकी ९२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या. राज्यातील विज्ञान शाखेतील आठ, कला शाखेतील सात, वाणिज्य शाखेतील सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.

०९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.