चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 सप्टेंबर 2023

Date : 8 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शिक्षक भरती : अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा…
  • शालेय शिक्षण विभागाची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोंदणी करतानाच स्वप्रमाणपत्र भरायचे आहे. पण हे करीत असताना एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. म्हणून विभागाने काही खबरदारी सुचविली आहे. ‘महा टीचर रिकृटमेंट’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
  • पहिली खबरदारी म्हणजे नोंदणी करताना आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक दाखल करावा. हा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. पवित्र पोर्टलची नोंदणी तसेच स्व प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया स्वतः करायची आहे. अर्ज मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र नोंदणीसाठी आवश्यक माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये भरावी. संक्षिप्त नको.
  • शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत असलेली माहिती दिलेल्या क्रमाने भरावी. या पात्रतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणास्तव राखून ठेवला असेल व असा राखून ठेवलेला निकाल १२ फेब्रुवारी २०२३ नंतर जाहीर झाला असेल तर अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत पात्रता धारण केली असे म्हटल्या जाणार नाही. पत्र व्यवहाराचा पत्ता इंग्रजीत अचूक टाकावा. उमेदवाराने वय, पात्रता, आरक्षण तसेच अन्य गटवारीबाबत न चुकता निर्विवाद दावा करणे आवश्यक आहे. अर्जात तसा दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केल्या जाणार नाही.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ यासाठी ऑनलाईन अर्जात उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण आदी बाबी नमूद केल्या आहेत. मात्र नव्या अधिसूचनेनुसार सद्यस्थितीत कागदपत्रे प्राप्त झाली असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षणबाबत बदल करता येवू शकतात. शेवटचे म्हणजे आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला सोडून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे असे प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही. केवळ आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
राजधानीत महासत्तासंमेलन ; ‘जी-२०’साठी पाहुण्यांचे आजपासून आगमन
  • शनिवार-रविवारी ‘जी-२०’ गटातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज झाली आहे. परिषदेसाठी परदेशी नेत्यांचे आगमन आज, शुक्रवारपासून सुरू होईल. ३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, अन्य अभ्यागतांसह परदेशातून येणारे असंख्य अधिकारी, नागरिकांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सजली आहे.
  • प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या ‘भारत मंडपम’ या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्रामध्ये होणाऱ्या या परिषदेच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आढावा घेतला. वर्षभर ‘जी-२०’चे अध्यक्षपद भूषवल्यानंतर या शिखर परिषदेचे यजमानपद हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. या परिषदेसाठी ३० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख, युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी, आमंत्रित-अतिथी देश तसेच, १४ आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
  • यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अन्थनी अल्बनीज यांच्यासह ‘जी-२०’ समूहातील राष्ट्रप्रमुखांचे ‘भारत मंडपम’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वागत करणार आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे मात्र परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. परिषदेमध्ये अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा होऊन काही ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

द्विपक्षीय बैठका

  • शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज, शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ आणि संयुक्त अरब अमिरातींचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. मोदी-बायडेन यांच्यातील चर्चा प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि युक्रेन-रशियाचे युद्ध या विषयांवर होणार असल्याचे समजते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं?
  • सध्या इंडिया नाव जाऊन देशाचं नाव भारत ठेवलं जाणार ही चर्चा जोरात आहे. संसदेचं विशेष अधिवेशनही याच कारणासाठी बोलवलं जातं आहे अशीही चर्चा रंगली आहे.
  • भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला वेगवेगळ्या विदेशातल्या मान्यवरांना स्नेहभोजनाचे जे निमंत्रण पाठवलं आहे त्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. त्यावरुन इंडिया नाव हटवलं जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.
  • आपल्या देशाला भारत आणि इंडिया अशी दोन नावं आहेत. भारतीय संविधानात INDIA That is Bharat असा उल्लेख आहे. त्यामुळेच आपल्या देशाला इंडियाही म्हटलं जातं आणि भारतही. ही दोन नावं आपल्या देशाला एका सखोल चर्चेनंतर आणि बऱ्याच वाद विवादानंतर मिळाली आहेत.
  • १९ सप्टेंबर १९४९ या दिवशी या नावाच्या निमित्ताने एक संविधान सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भूमिका मांडली होती. तर काही सदस्यांनी तेव्हाही इंडिया या नावाला विरोध दर्शवला होता.
‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद आणखी तीव्र
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देताना केंद्र सरकारने ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख केल्यामुळे तर्कवितर्काना पुन्हा उधाण आले असून भाजपेतर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे ‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद बुधवारी आणखी तीव्र झाला.
  • पंतप्रधान मोदी गुरुवारी इंडोनेशियामध्ये गुरुवारी होणाऱ्या २० व्या एशियन-इंडिया परिषद व १८ व्या ईस्ट एशिया परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्राच्या इंग्रजीमधील निवेदनामध्ये ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असे नमूद करण्यात आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यम व्यासपीठावरून बुधवारी माहिती दिली.
  • केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ या उल्लेखाचे समर्थन केले. संविधानामध्येच ‘इंडिया दॅट इज भारत’ असे नमूद केले आहे. दोन्ही शब्दांचा उल्लेख संविधानामध्ये केला आहे. लोकांनी संविधानातील हा उल्लेख जरूर वाचला पाहिजे. संविधानामध्ये ‘भारत’ या शब्दाचा अर्थही ध्वनित होतो. आपण भारत असे म्हणतो तेव्हा त्यातील भावार्थ, अर्थ आणि समज स्पष्ट दिसते. त्याचे प्रतििबबही संविधानामध्ये उमटलेले दिसते, असे जयशंकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद भरतीत अर्जांचा पाऊस; वाशीम जिल्ह्यातील २४२ पदांकरिता तब्बल ‘इतके’ अर्ज
  • बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध १८ प्रकारातील २४२ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कातून अंदाजे १ कोटी १८ लाख रुपयाचा महसूल जमा झाला आहे.
  • वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका ( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विवधि २४२ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
  • त्यानुसार आवश्यक त्या पदाकरीता शैक्षनिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राखीव प्रवर्गातून नऊशे तर खुल्या प्रवर्गातून एक हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले होते. त्यानुसार २४२ पदाकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कापोटी १ कोटी १८ लाख रुपयाचा महसुल जमा झाला आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षार्थी आता वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील गुणांच्या सीमारेषेची ‘स्‍पर्धा’ चर्चेत; कारण काय, वाचा…
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल ६ सप्‍टेंबरला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांच्‍या सीमारेषेची (कट ऑफ) माहिती महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण, सध्‍या मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर विविध संवर्गातील गुणांच्‍या सीमारेषेची ‘स्‍पर्धा’ समाजमाध्‍यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे.
  • या निकालानंतर जाहीर झालेली गुणांची सीमारेषा ही सर्वसाधारण संवर्गासाठी १०८ इतकी आहे. इतर मागासवर्ग, भटक्‍या जमाती-क, भटक्‍या जमाती-ड, आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटक आणि निरधिसुचित जमाती – अ या संवर्गासाठीदेखील गुणांची सीमारेषा १०८ इतकीच असल्‍याने चर्चेला तोंड फुटले आहे. इतर संवर्गाच्‍या गुणांच्‍या सीमारेषेमध्‍येदेखील अल्‍प तफावत दिसून आली आहे.
  • सर्वसाधारण आणि महिला संवर्गातही फारसा फरक नाही. गुणांची सीमारेषा ही साधारणपणे १०१ ते १०८ दरम्‍यान आहे. केवळ दिव्‍यांग आणि क्रीडा कोट्यासाठी ही सीमारेषा कमी दिसून आली आहे. स्‍पर्धेच्‍या या परीक्षांमध्‍ये गुणवत्‍तेची सीमारेषाच एकमेकांमध्‍ये मिसळल्‍याची प्रतिक्रिया समाजमाध्‍यमांमध्‍ये व्‍यक्‍त होऊ लागली आहे. गुणांची स्‍पर्धा इतकी तीव्र असेल, तर आरक्षणाचा फायदाच काय, असा सवालदेखील विचारला जात आहे.
  • सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती यांच्‍या गुणांच्‍या सीमारेषेत जाणवणारी तफावत दिसून येत होती, पण अलीकडच्‍या काळात गुणांची स्‍पर्धा वाढली आहे. आता सर्व संवर्गामध्‍ये बरोबरीचे पात्रतेचे गुण घेणारे उमेदवार दिसून आले आहेत, असे स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. अमोल पाटील यांनी सांगितले.

 

तीन वर्षांत भारताला जगज्जेता बुद्धिबळपटू मिळण्याची शक्यता! ;विश्वनाथन आनंदचे मत :
  • भारतामध्ये प्रतिभावान बुद्धिबळपटूंची संख्या मोठी असली, तरी आपल्याला पुढील जगज्जेता मिळण्यासाठी २०२५ सालापर्यंतचा कालावधी लागेल, असे मत दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले.

  • ‘‘तुम्ही जर विश्वविजेतेपदाच्या किताबाची चर्चा करत असाल, तर आपल्याला २०२५ सालापर्यंत पुढील जगज्जेता मिळू शकेल, त्यापूर्वी नाही. विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही सोपा आणि वेगवान मार्ग उपलब्ध नाही. आपल्याला तयारीसाठी बराच वेळ मिळेल, पण बऱ्याच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागेल,’’ असे आनंद म्हणाला.

  • विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने पुढील वर्षीच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीतून माघार घेतल्याने ही लढत आता आव्हानवीर स्पर्धेतील विजेता ग्रँडमास्टर इयान नेपोम्निशी आणि उपविजेता ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात होणार आहे. त्यामुळे डी. गुकेश, आर प्रज्ञानंद आणि अर्जुन इरिगेसी या युवा भारतीय बुद्धिबळपटूंना जगज्जेतेपदासाठी आव्हान देण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

  • ‘‘पुढील एक-दोन वर्षांत कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यावरूनच आपल्याला पुढील विश्वविजेता कोण होऊ शकेल, याचा अंदाज येईल,’’ असेही आनंदने नमूद केले.

डायमंड लीग अंतिम टप्पा - नीरजच्या कामगिरीकडे लक्ष :
  • भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा कारकीर्दीमधील आणखी एका ऐतिहासिक क्षणाच्या उंबरठय़ावर आहे. गुरुवारी होणाऱ्या डायमंडस लीग अ‍ॅथलेटिक्सच्या अंतिम टप्प्यात नीरजकडेच संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे.

  • एका महिन्याच्या विश्रांतीनंतर नीरज लुसानमधील डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक मिळवून अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला होता. दुखापतीमुळे नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. लुसानच्या स्पर्धेत ८९.०८ मीटर भालाफेक करून त्याने बाजी मारली होती.

  • यापूर्वी नीरज २०१७ आणि २०१८मध्ये अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला होता. मात्र, त्याला पदककमाई करण्यात अपयश आले. नीरजला अनुक्रमे सातव्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

  • या वेळी नीरजला विजेतेपदासाठी पहिली पसंती मिळत आहे. जगज्जेता अँडरसन पीटर्सच्या गैरहजेरीत नीरजसमोर चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जॅकूब वॅडलेचचे आव्हान असेल. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर नीरजने चार स्पर्धेत जॅकूबवर मात केली. जॅकूब नीरजपेक्षा अधिक अनुभवी आहे, हीच त्यासाठी या वेळी जमेची बाजू राहील. यातील विजेत्यास जागतिक स्पर्धेसाठी थेट प्रवेशिका मिळणार आहे. परंतु नीरजने याआधीच ८५.२० मीटरचा पात्रता निकष पार करून जागतिक स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.

युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; इतर देशांमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करता येणार :
  • नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. NMC ने युक्रेनच्या ‘मोबिलिटी प्रोग्राम’ला मान्यता दिली. त्यामुळे असे सर्व विद्यार्थी आता इतर देशांच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

  • इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार एनएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आदेशाचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. तर, हे त्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे, ज्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये नवीन नियम लागू झाल्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला होता.

भारताची भूमिका कायम :

  • तसेच, एनएमसीने असे म्हटले आहे की, युक्रेनच्या मोबिलिटी प्रोग्राम अंतर्गत पदवी ही मूळ युक्रेनियन विद्यापीठाद्वारे जारी केली जाईल. तर, युक्रेनमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्यांच्या अभ्यासात रशियन आक्रमणामुळे व्यत्यय आला होता, त्यांना भारतीय महाविद्यालयांमध्ये त्यांचे शिक्षण सुरू ठेवू न देण्याबाबत भारताची भूमिका कायम आहे.

  • भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा २०१९ तसेच कोणत्याही परदेशी वैद्यकीय संस्थांमधून भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्थानांतरीत करण्याच्या नियमांमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी जुलै २०२२ मध्ये लेखी उत्तरात ही माहिती लोकसभेला दिली होती.

सुमारे १८ हजार वैद्यकीय विद्यार्थी युक्रेनमधून परतले :

  • मागील वर्षी, स्क्रिनिंग टेस्ट रेग्युलेशन २००२ ची जागा फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग रेग्युलेशन २०२१ ने घेतली होती. ज्यामध्ये अभ्यासक्रमाचा कालावधी, विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त वर्षांची अट होती.

  • फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुमारे १८ हजार वैद्यकीय विद्यार्थी युक्रेनमधून परतले. FMGE परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आकडेवारीवर आधारित, मागील पाच वर्षांत सुमारे तीन हजार ते चार हजार भारतीय विद्यार्थी दरवर्षी युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गेलेले होते.

‘बुकर’ पुरस्कारासाठी लघुयादी जाहीर ; १७ ऑक्टोबरला निवड; यंदा नवोदितांऐवजी दिग्गजांमध्ये स्पर्धा :
  • कथात्म साहित्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांसाठी यंदाची नामांकनांची लघुयादी जाहीर झाली असून यंदा पाच राष्ट्रांमधील सहा कादंबऱ्यांचा त्यात समावेश आहे.

  • श्रीलंकी लेखक शेहान करूणतिलका यांच्या ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ ही कादंबरी यंदा आशियाई राष्ट्रांमधील लेखकांचे स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत असून ८७ वर्षांचे ब्रिटिश लेखक अ‍ॅलन गार्नर यांच्या ‘ट्रीकल वॉकर’ला नामांकन मिळाले आहे. गार्नर हे बुकरसाठी नामांकन मिळालेले आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक आहेत. याखेरीज अमेरिकेच्या एलिझाबेथ स्ट्राऊट यांची कुटुंब कहाणी ‘ओह विल्यम’ , झिम्बाब्वेच्या नोव्हायोलेट बुलावायो यांची राजकीय कादंबरी ‘ग्लोरी’ , अमेरिकी लेखक पर्सिवल एवरेट यांची ‘द ट्रीज’ ही रहस्यकथा , आणि क्लेअर कीगन या आयरिश लेखिकेची स्मॉल ‘थिंग्ज लाईक दीज’ धर्मकेंद्रीत कादंबरी यंदा पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत.   

  • यंदाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष इतिहासतज्ज्ञ नील मॅकग्रेगर पुरस्कारांची घोषणा करताना म्हणाले की, ‘या सर्व लेखकांनी केवळ त्यांच्या कादंबरीत काय घडते आहे, ते पोहोचवणारीच भाषा वापरली आहे असे नव्हे, तर त्यांनी एक जग किंवा विश्व निर्माण केले आहे, ज्यात आपण बाहेरचे म्हणून प्रवेश करतो आणि ते आपलेसे करतो.’ पुरस्काराची महती सांगताना ते म्हणाले की, ‘इंग्रजी भाषेची किमया आणि शब्दांची जादू अनुभवण्याची संधी बुकर पुरस्कारांमुळे मिळते.

  • परीक्षक समितीमध्ये मॅकग्रेअर यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ शाहिदा बारी, इतिहासतज्ज्ञ हेलन कॅस्टर, टीकाकार एम जॉन हॅरीसन, साहित्यिक अलीन माबांकोऊ यांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी निवड समितीकडे १६९ कादंबऱ्या आल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन, नेताजी बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’ अर्थात ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. याच मार्गावर प्रजासत्ताक दिन परेडसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. उद्घाटनानंतर बोस यांच्या जीवनावर आधारीत ड्रोन शोचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

  • दरम्यान, सरकारकडून पुढील चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेला ‘कर्तव्य पथ’ हा हिरवाईने नटलेला आहे. १६.५ किलोमीटरचा हा रस्ता लाल ग्रेनाईटने बनलेला आहे. या मार्गावर सुशोभित कालवे, अत्याधुनिक सार्वजनिक सुविधा, विविध राज्यांची खाद्यसंस्कृती दर्शवणारी १६ दुकाने उभारण्यात आली आहेत.

  • पर्यटकांसाठी ॲम्फी थिएटर सुविधादेखील या मार्गावर आहे. या परिसरात १ हजार गाड्यांच्या पार्किंगची क्षमता असलेल्या ४ अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. विविध प्रदर्शने आणि रात्रीच्या आकर्षक प्रकाश व्यवस्थेमुळे पर्यटकांना कर्तव्यपथाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. कर्तव्यपथाची उभारणी करताना पर्यावरण संवर्धनाचे भानही ठेवण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे नियोजन, ऊर्जा बचतीसाठी आवश्यक यंत्रणा या परिसरात बसवण्यात आली आहे. कर्तव्यपथ परिसरात सहा पार्किंग व्यवस्था, महिलांसाठी ६४ तर पुरुषांसाठी ३२ प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठीही या परिसरात विशेष सुविधा पुरविण्यात आली आहे.

पाठय़पुस्तकाला कोऱ्या पानांची जोड ; पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण पुस्तके :
  • राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून पाठय़पुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठय़पुस्तके दिली जाणार आहेत. या पुस्तकाचे तीन किंवा चार भाग असतील. सत्रानुसार विद्यार्थ्यांनी तो भाग घेऊन जायचा असल्याने दप्तराचे ओझेही वाढणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर काही पाठय़पुस्तके तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली.

  • शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • केसरकर म्हणाले, की शाळांमध्ये पुस्तके अनेक वर्षांपासून मोफत दिली जातात. पण अनेक मुलांकडे वह्या घेण्याइतकेही पैसे नसतात. काही संस्था वह्या वाटपाचा उपक्रम राबवतात. मात्र मुलांनी वह्या मिळण्यासाठी वाट पाहात राहायची का, हा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर वह्याही मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नावीन्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यात अभ्यासक्रमाच्या धडय़ांबरोबर लेखनासाठीची कोरी पानेही समाविष्ट असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ती पुस्तके सोयीस्कर ठरतील.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यात शालेय स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, कला-क्रीडा आदींचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

०८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.