भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी गुरुवारी सरळ गेममध्ये शानदार विजय मिळवून मलेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. बी साईप्रणीत आणि माजी राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सातव्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावरील चीनच्या झँग यि मॅनचा फक्त २८ मिनिटांत पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या माजी विश्वविजेत्या सिंधूपुढे पुढील फेरीत चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगचे कडवे आव्हान असेल. ताय झूची सिंधूविरुद्धची आतापर्यंतच्या लढतींमधील कामगिरी १६-५ अशी सरस आहे. गेल्या आठवडय़ात मलेशिया खुल्या स्पर्धेतही ताय झू हिने सिंधूला उपांत्यपूर्व फेरीतच हरवले होते.
पुरुष एकेरीत प्रणॉयने चायनीज तैपेईच्या वांग झू वेईला २१-१९, २१-१६ असे नामोहरम केले. उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा जपानच्या कांटा त्सुनेयामाशी सामना होणार आहे. साईप्रणीतने चीनच्या लि शी फेंगकडून १४-२१, १७-२१ अशी ४२ मिनिटांत हार पत्करली. याचप्रमाणे कश्यपने इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित अँथनी सिनिसुका गिनटिंगकडून १०-२१, १५-२१ असा पराभव पत्करला.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे समपदस्थ वांग यी यांची गुरुवारी बाली येथे बैठक झाली. या वेळी चीनने सांगितले की, सीमेवर स्थिती ‘स्थिर’ आहे. दोन्ही देशांकडे सीमा भागात शांती आणि स्थैर्य कायम ठेवण्याची क्षमता आहे.
जयशंकर यांनी इंडोनेशियातील बाली येथे वांग यांच्याबरोबर चर्चा केली. या वेळी विशिष्ट प्रलंबित मुद्दय़ांना महत्त्व दिले. लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसंबंधी प्रलंबित मुद्दय़ावर तात्काळ मार्ग काढण्याच्या आवश्यकतेकडे जयशंकर यांनी वांग यांचे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध हे परस्पर सन्मान, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितांच्या आधारावर असावेत, यावर भर दिला.
जयशंकर-वांग यांच्या बैठकीबाबत चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, योग्य वेळी या संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. ‘‘मीसुद्धा या बैठकीवर लक्ष ठेवून आहे. कृपया अधिक माहितीसाठी प्रतीक्षा करा,’’ असेही त्यांनी सांगितले.
‘‘जयशंकर यांच्या प्रासंगिक मतांवर आम्ही लक्ष दिले आहे. भारत आणि चीन सीमेवरील स्थिती स्थिर आहे, असे मत आहे,’’ असे लिजियान यांनी सांगितले. भारत- चीन हे परस्परांचे महत्त्वाचे शेजारी आहेत. दोन्ही देशांकडे सीमेवर शांती कायम ठेवण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.
वादग्रस्त कारकिर्दीमुळे चर्चेत असलेल्या बोरिस जॉन्सन यांना अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. पत्रकार, खासदार, महापौर आणि परराष्ट्रमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा, तितकाच खाचखळग्यांचा. तुर्की वंशाच्या जॉन्सन यांचा जन्म १९ जून १९६४ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांचे आई-वडिल ब्रिटीश होते. त्यामुळे त्यांच्या जन्माची नोंदणी अमेरिकेसह ब्रिटीश वाणिज्य दूतावासांत झाली. त्यामुळेच त्यांना दोन्ही देशांचे नागरिकत्व मिळाले.
* जॉन्सन यांचे शालेय शिक्षण इंग्लडमधील एका बोर्डिग शाळेत झाले. तेथे ते एक गुणसंपन्न विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. एटॉल महाविद्यालयातील एक शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. त्यानंतर ऑक्सफोर्डच्या बॅलीयोल महाविद्यालयातून पदवी मिळवली. या दरम्यान ते ऑक्सफोर्डच्या संघटनेचे अध्यक्ष झाले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बोरिस यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. १९८७ मध्ये त्यांनी ‘द टाइम्स’ वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम सुरू केले. परंतु माहितीतील त्रुटींच्या आरोपांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘द टेलीग्राफ’मध्येही काम केले. या वृत्तपत्रात त्यांनी युरोपीय समुहाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी प्रगतीकडे आणखी एक पाऊल टाकत सहायक संपादक म्हणून काम पाहिले.
पत्रकारितेतील प्रवासादरम्यानच जॉन्सन यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. २००१ मध्ये हनले येथील सुरक्षित हुजूर पक्षाकडून मायकल हेसल्टाइन यांच्या जागी खासदार झाले. ते पुढील आठ वर्षे हेनलेचे खासदार होते. त्या व्यतिरिक्त आठ वर्षे ते लंडनचे महापौर होते. चार वर्ष ते उक्सब्रिज आणि दक्षिण रूशलिपचे खासदार होते. २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणूनही काम केले. २०१६ मध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्यांना मोठय़ा टीकेला तोंड द्यावे लागले.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेच्या ‘फोर्स कमांडर’पदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्या जागी करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये तिनईकर यांना ‘फोर्स कमांडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिनईकर यांचे अथक समर्पण, अमूल्य सेवा आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस त्यांचे आभारी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांनी ३६ वर्षे भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. २०१५ ते २०१६ या काळात त्यांनी ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग आणि २०१३ ते २०१४ या काळात ‘माउंटन ब्रिगेड’चे ‘कमांडर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
२००८ ते २०१२ दरम्यान त्यांनी व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये भारताचे संरक्षण प्रभारी म्हणून आणि २००० मध्ये सिएरा लिओनमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेत अधिकारी म्हणून काम केले. अगदी अलीकडे, त्यांनी मध्य भारतात लष्करी क्षेत्राचे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले.
याआधी, त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयात २०१९ ते २०२१ पर्यंत अतिरिक्त महासंचालक आणि २०१८ ते २०१९ पर्यंत ‘स्ट्राइक इन्फंट्री डिव्हिजन’मध्ये ‘डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले.
एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तसेच, उद्धव ठाकरेंच्या गटाने विधानसभेच्या कामकाजालाही आव्हान दिले आहे, जिथे नवीन सभापती निवडले गेले आणि त्यानंतर बहुमत चाचणी घेतली गेली, ही बहुमत चाचणी बेकायदेशीर असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ज्या १६ बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी २८ जून रोजी राज्यपालांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आल्याचे दिसत असून, त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर काही तासांतच राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला विधीमंडळात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.
यावर, भाजपा नेत्यांनी भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी “राफेलपेक्षाही वेगवान अशा जेटच्या वेगाने काम केले”, अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांनी टिप्पण केली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आणि बहुमत चाचणी देखील जिंकत, सरकार स्थापन केले.
भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन टी २० सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल (७ जुलै) साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये खेळवला गेला. कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बर्मिंगहॅममधील पाचव्या कसोटीतून बाहेर पडलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्याच्या माध्यमातून मैदानावर परतला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात विराट कोहलीचा एक विक्रम मागे सोडला.
नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. ईशान किशनच्या साथीने त्याने स्वत: डावाची सलामी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर रोहितचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने १४ चेंडूंत चार षटकांरांच्या मदतीने २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने टी २० कर्णधार म्हणून सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण केल्या.
रोहित शर्माने २९ डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी विराट कोहलीने ३० डावांमध्ये कर्णधार म्हणून एक हजार धावा केल्या होत्या. विराट कोहलीने टी २० कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.