चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 सप्टेंबर 2023

Date : 7 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटींचं अनुदान वितरित होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
  • राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरीत अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
  • कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.
  • दहा कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल.आणि दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या १० जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची १० हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. आणि ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.
सातारा : डॉ डी वाय पाटील यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार
  • डॉ डी वाय पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. या क्षेत्रामध्ये त्यांचे अतिशय मोठे योगदान असल्याचे विधान परिषदेचे माजी सभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले आहे.
  • माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांना आज बुधवारी  किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे मार्गदर्शक संचालक व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, बाळासाहेब सोळस्कर,नितीन भरगुडे पाटील सर्व संचालक आदी उपस्थित होते.
  • रामराजे म्हणाले,सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली डॉ डी वाय पाटील यांची  कारकीर्द त्यांना पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर, आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा थक्क करणारा प्रवास त्यांचा प्रवास आहे. त्यांच्या कार्याचा ठसा हा देशातच नव्हे तर परदेशातही उमटवलेला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील म्हणाले समाजामधील अत्यंत कर्तबगार व्यक्तींना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येते.
  • डॉ डी वाय पाटील एक असामान्य कर्तुत्व आणि नेतृत्व आहेत. अतिशय नावाजलेल्या व्यक्तीला आबांच्या नावाचा सामाजिक गौरव पुरस्कार देण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले .संचालक दिलीप पिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित
  • ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेले बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले. या शहराच्या स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा राखण्यावर लक्ष केंद्रीत केले असून गरज नसलेल्या खर्चावर कात्री लावली आहे. लाखो पौंडांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तुटवडय़ामुळे शहर प्रशासनाने दिवाळखोरी घोषित केली.
  • बर्मिंगहॅम नगर प्रशासनावर मजूर पक्षाची सत्ता आहे. १०० हून अधिक नगरसेवकांचा समावेश असलेली हे युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक प्राधिकरण आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराच्या प्रशासनाने मंगळवारी कलम ११४ नोटीस काढून दिवाळखोरी घोषित केली.
  • शहरातील नागरिकांचे आर्थिक संरक्षण करणे महत्त्वाचे असून वैधानिक सेवा वगळता नवीन खर्च थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नगर प्रशासनाने अंतरिम वित्त संचालक, फिओना ग्रीनवे यांनी स्थानिक सरकार कायद्याच्या कलम ११४ (३) अंतर्गत एक अहवाल जारी केला. समान वेतन खर्च पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे अपुरी संसाधने असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद आणखी तीव्र
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देताना केंद्र सरकारने ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख केल्यामुळे तर्कवितर्काना पुन्हा उधाण आले असून भाजपेतर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे ‘इंडिया विरुद्ध भारत’ वाद बुधवारी आणखी तीव्र झाला.
  • पंतप्रधान मोदी गुरुवारी इंडोनेशियामध्ये गुरुवारी होणाऱ्या २० व्या एशियन-इंडिया परिषद व १८ व्या ईस्ट एशिया परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्राच्या इंग्रजीमधील निवेदनामध्ये ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असे नमूद करण्यात आहे. त्यासंदर्भात भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यम व्यासपीठावरून बुधवारी माहिती दिली.केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ या उल्लेखाचे समर्थन केले. संविधानामध्येच ‘इंडिया दॅट इज भारत’ असे नमूद केले आहे. दोन्ही शब्दांचा उल्लेख संविधानामध्ये केला आहे. लोकांनी संविधानातील हा उल्लेख जरूर वाचला पाहिजे. संविधानामध्ये ‘भारत’ या शब्दाचा अर्थही ध्वनित होतो. आपण भारत असे म्हणतो तेव्हा त्यातील भावार्थ, अर्थ आणि समज स्पष्ट दिसते. त्याचे प्रतििबबही संविधानामध्ये उमटलेले दिसते, असे जयशंकर यांनी सांगितले.
  • मोदी सरकारमधील मंत्री व भाजपचे नेते ‘भारता’ची बाजू समर्थपणे लढवत असले तरी, संविधानातील ‘इंडिया’ शब्द वगळण्यासाठी विशेष अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याबाबत केंद्र सरकारने अजूनही मौन बाळगले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नकार दिला. ‘जी-२० समूहाच्या शिखर बैठकीची माहिती देणाऱ्या मोठ-मोठय़ा फलकावर इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द लिहिलेले आहेत’, असे त्यांनी सांगितले.

महाआघाडीसाठी ‘भारत’ आद्याक्षरांचा नवा प्रस्ताव

  • ‘भारता’च्या अद्याक्षरांचा नवा अर्थ लावत काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी विरोधकांच्या महाआघाडीला ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे नवे नाव सुचवले आहे. भाजपेतर महाआघाडीने ‘एलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो’ (भारत) असे नवे नाव घेतले तर भाजप काय करेल, असा सवाल थरूर यांनी इंडिया विरुद्ध भारत असा नाहक वाद घालणे भाजपने थांबवले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अमेरिकेत ‘सनातन दिना’ची घोषणा, ‘या’ दिवशी होणार साजरा; महाकुंभ अभिषेक सोहळ्यात दिली माहिती
  • द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगाशी करून सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबतचे विधान केले. ज्यावरून देशभरात सध्या वाद सुरू आहे. तर याप्रकरणी उदयनिधी यांच्याविरोधात आता गुन्हाही दाखल झाला आहे. एकीकडे भारतात हा वाद सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेच्या एका शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंटुकी येथील लुईव्हिल शहराच्या महापौरांनी शहरात ३ सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
  • उपमहापौर बार्बरा सेक्स्टन स्मिथ यांनी महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या वतीने लुईसविले येथील केंटुकीच्या हिंदू मंदिरात महाकुंभ अभिषेक सोहळ्यादरम्यान सनातन धर्म दिनाची अधिकृत घोषणा वाचून दाखवली. आध्यात्मिक गुरू चिदानंद सरस्वती, परमार्थ निकेतन, ऋषिकेशचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर आणि भगवती सरस्वती, लेफ्टनंट गव्हर्नर जॅकलिन कोलमन, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ केशा डोर्सी आणि इतर अनेक आध्यात्मिक गुरू आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
  • महाकुंभ अभिषेक सोहळ्यानिमित्त मंदिरात सात दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसांत मंदिरात पूजा आणि होम-हवन करण्यात आले. प.पू स्वामीजी आणि पूज्य स्वाध्वी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

  • शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचं मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे यांनी समर्थन केलं होतं.

गुन्हाही दाखल झाला

  • याप्रकरणी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाद उफाळल्यानंतर काय दिलं होतं स्पष्टीकरण?

  • “मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.
नरेंद्र मोदी इंडियाचे नव्हे, भारताचे पंतप्रधान; सरकारी पुस्तिकेतही नाव बदललं!
  • दिल्लीमध्ये ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून, त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला. प्रेसिडंट ऑफ भारत केल्यानंतर आता प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज बुधवारी निघणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज इंडोनेशिया येथे जाणार आहेत. ASEAN-India सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) चं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत.
  • पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” (भारताचे पंतप्रधान) असा करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली.
  • केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असले तरी, त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रपतींच्या राजपत्रामधून ‘इंडिया’ हा शब्द गायब होऊन ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधानदुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
  • भाजपेतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नामकरण ‘इंडिया’ असे झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ‘इंडिया’ या शब्दावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही, ‘इंडिया’ नाव घेतल्याने सत्ता मिळत नसते, विरोधकांची महाआघाडी ‘इंडिया’ नव्हे तर ‘घमंडिया’ असल्याची टीका केली होती. त्यानंतर संविधानातील ‘इंडिया’ हा उल्लेख वगळण्यासंदर्भातील चर्चेला बळ मिळाले.

 

हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन :
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.

  • भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पीआर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे.

  • अंतिम पुरस्कारासाठी हरमनप्रीतची बेल्जियमच्या आर्थर डी स्लूवर, टॉम बून, जर्मनीच्या निक्लास वेलेन आणि नेदरलॅंड्सच्या थिएरी ब्रिंकमनशी स्पर्धा असेल. महिलांत सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही.

  • यंदाच्या नामांकनाचे वैशिष्टय़ म्हणजे हरनप्रीत, श्रीजेश आणि सविता यांना सलग दुसऱ्या वर्षी नामांकन मिळाले आहे. विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला करण्यात येईल.

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांकडून करकपातीचे सूतोवाच ; पहिल्याच भाषणात अर्थव्यवस्था सावरण्याचे आश्वासन :
  • लिझ ट्रस यांनी मंगळवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ट्रस यांची या पदावर अधिकृत नियुक्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी ‘१०, डाऊिनग स्ट्रीट’ या अधिकृत निवासस्थानी पंतप्रधान म्हणून पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी करकपात करतानाच देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. 

  • स्कॉटलंडमधील सुटीकालीन निवासस्थानी ट्रस यांनी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. तत्पूर्वी मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. आपल्या पहिल्या भाषणात ट्रस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी लादलेल्या युक्रेन युद्धामुळे ब्रिटनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, आपण त्याचा यशस्वी मुकाबला करू, अशी ग्वाही त्यांनी दिले. 

  • आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन या नव्या मंत्रिमंडळातील भारतीय वंशाचा एकमेव चेहरा असण्याची शक्यता आहे. जॉन्सन यांचे विश्वासू, माजी गृहमंत्री प्रीती पटेल आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ट्रस  मंत्रिमंडळात सहभागी होण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे.

  • मंत्रीमंडळात भारतीय वंशाचा एकमेव चेहरा - ट्रस मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे वडील क्रिस्टी यांचा जन्म गोव्यात झाला, तर आई उमा फर्नाडिस यांचा जन्म मॉरिशसमधील तमिळ कुटुंबातला आहे.

‘बांग्लादेश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार’; शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा :
  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल (सोमवार) शेख हसीना यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज हसीना यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दोघांमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि नातं मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली.

  • संपूर्ण आशियामध्ये, बांगलादेशातून निर्यातीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय आर्थिक सर्वसमावेशक भागीदारी करारावर चर्चा सुरू करू.” असे मत बैठकीनंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे. तसेच आगामी काळात भारत-बांगलादेश संबंध नवीन उंची गाठतील, असेही मोदी म्हणाले.

  • भारत आणि बांग्लादेशमध्ये पॉवर ट्रान्समिशन लाईनवरही चर्चा - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत दिल्लीत संयुक्त निवेदन जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत-बांगलादेश यांच्यातील व्यापार वेगाने वाढत आहे. “आम्ही आयटी, स्पेस आणि न्यूक्लियर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये पॉवर ट्रान्समिशन लाईनवरही चर्चा सुरू आहे.

  • बांगलादेशातील पूरस्थिती, दहशतवाद मुद्द्यांवर चर्चा - यावेळी दोन्ही नेत्यांनी पाणीवाटपाच्या महत्त्वाच्या करारावरही स्वाक्षऱ्या केल्या. जवळपास जगातील ५४ नद्या भारत-बांगलादेश सीमेवरून वाहतात. हा करार दोन्ही देशांमधील लोकांच्या उपजीविकेशी संबंधित आहे. तसेच या दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील पूरस्थिती, दहशतवाद, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आज कन्याकुमारीतून आरंभ :
  • सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारपासून कन्याकुमारी येथून सुरू होत आहे. ३,५७० किलोमीटरच्या या यात्रेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सज्ज झाले आहेत. काँग्रेस पक्षाने या पदयात्रेचे वर्णन आजपर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम असा केला आहे.

  • महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेने संघटित होणे हे या पदयात्रेचे उद्दिष्ट आहे. वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती असमानता या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच, पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता आणि पूर्वग्रहदूषित राजकारणाविरोधात देश आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

  • या पदयात्रेला प्रांरभ करण्यापूर्वी राहुल गांधी त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबदुर येथील स्मृतीस्थळी जाऊन प्रार्थनासभेत भाग घेतील. त्यानंतर कन्याकुमारी येथील कार्यक्रमात राहुल सहभागी होतील. तिथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असतील. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या हाती खादीचा राष्ट्रध्वज देण्यात येईल आणि त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात येईल.

  • ३,५७० किलोमीटरची ही पदयात्रा कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत असेल.

मिस्त्री यांच्या निधनानंतर गडकरींचे नवे आदेश, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड :
  • टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्ट संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल, असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे. “सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी सीट बेल्ट बीप प्रणाली देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे”, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

  • या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावला जाणार आहे. या आदेशाची येत्या तीन दिवसांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. सायरस मिस्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहेत.

  • “मागील सीटवर बसलेल्यांनी सीट बेल्ट लावण्याची गरज नाही असे लोकांना वाटते. चारचाकीत प्रवास करताना फक्त पुढे बसलेल्यांनीच सीट बेल्ट लावायचा असतो, अशी लोकांची समजूत आहे. पुढे आणि मागे बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावला पाहिजे”, असे आवाहन एका कार्यक्रमात गडकरी यांनी नुकतेच केले होते.

  • अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने येत असताना सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज कारला पालघरमध्ये अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासोबतच जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला आहे. मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कार पुलाच्या कठड्याला धडकताच कारमधील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या. त्याचवेळी मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने त्यांचे संरक्षण होऊ शकले नाही. या अपघातानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेसदंर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

०७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.