चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ नोव्हेंबर २०२२

Updated On : Nov 07, 2022 | Category : Current Affairs


ला लिगा फुटबॉल - बार्सिलोनाचा अर्मेनियावर विजय :
 • दुसऱ्या सत्रात खेळाडूंनी केलेल्या गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने अर्मेनियावर २-० असा विजय साकारला. हा सामना बार्सिलोनासाठी संस्मरणीय राहिला, कारण गेरार्ड पिक्यूला निरोप देण्यात आला.

 • सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र कोणालाही यश न मिळाल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.

 • दुसऱ्या सत्रात बार्सिलोनाच्या ओउस्माने डेम्बेलेने (४८व्या मिनिटाला) गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रेंकि डी जोंगने (६२व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाला २-० अशा सुस्थितीत पोहोचवले. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.

‘आयओए’मध्ये आता महिलांना समान अधिकार; नव्या घटनेला ‘आयओसी’ची मंजुरी, १० डिसेंबरला निवडणूक :
 • घटनेच्या बदलावरून अडकून राहिलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलांनाही पुरुषांबरोबर समान अधिकार मिळणारी ‘आयओए’ची नवी घटना तयार झाली असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या नव्या घटनेस मंजुरी दिली आहे.

 • ‘आयओए’च्या निवडणुकीत आता महिलांना समाधान अधिकार तर मिळणार आहेच, बरोबरीने खेळाडूंनाही स्थान देण्यात येणार आहे. ‘आयओए’ने घटनेत आजपर्यंत केलेला हा सर्वात ऐतिहासिक बदल आहे. घटनेत राज्य ऑलिम्पिक संघटनांचा मताधिकारही काढून घेण्यात आला आहे. खेळाडूंची मते दोन गटात विभागण्यात आली आहेत. एक गट खेळाडू आयोग (अ‍ॅथलिट्स कमिशन) आणि दुसरा गट सर्वोच्च ८ खेळाडूंचा असेल. त्याचबरोबर सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे पूर्णपणे व्यवस्थापन कौशल्यावर निवडली जातील. अर्थात, त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.

 • ही घटना १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘आयओए’च्या विशेष सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. सभेमध्ये घटनेची मंजुरी घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या एकसदस्यीय निवड समितीने निवडणूक १० डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे माजी सरचिटणीस उमेश सिन्हा हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.

भारतीयांना ‘ट्विटर ब्ल्यू’साठी पैसे कधीपासून भरावे लागणार? एलॉन मस्क यांनी दिलं उत्तर, म्हणाले :
 • भारतीयांनाही लवकरच ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’साठी पैसे भरावे लागणार आहेत. ‘ट्विटर’चे नवे मालक एलॉन मस्क यांनी एका महिन्यात भारतात ही सेवा सुरु होईल असं स्पष्ट केलं आहे. एका भारतीय युजरने मस्क यांच्याकडे यासंबंधी शंका उपस्थित केल्यानंतर, त्यांनीच याचं उत्तर दिलं. नुकतंच मस्क यांनी ट्विटवरील ‘ब्ल्यू टिक’साठी ८ डॉलर भरावे लागणार असल्याचं जाहीर केलं असून, काही ठिकाणी याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

 • सध्या ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सुरु करण्यात आली आहे. भारतातही महिन्याभरात ही सेवा सुरु होईल असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.

 • ट्विटरवर प्रभू नावाच्या युजरने ‘ट्विटर ब्ल्यू’ भारतात कधी सुरु होणं अपेक्षित आहे? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना मस्क यांनी, महिनाभराच्या आत सुरु होईल अशी आशा असल्याचं सांगितलं.

 • आयफोनमधील ट्विटर अॅपवर एक नोटिफिकेशन दिसत आहे. यामध्ये आम्ही आजपासून ‘ट्विटर ब्ल्यू’मध्ये नवे फिचर समविष्ट करत असून, लवकरच आणखी नवे फिचर्स दाखल होतील. आता साइन अप केल्यानंतर महिन्याला ८ डॉलर भरत ट्विटर ब्ल्यू मिळवा, असं सांगण्यात आलं आहे.

निवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नोकरदारांना दिलासा :
 • सर्व नोकरदार आणि मालकांना निवृत्ती वेतन योजनेतील तरतुदींबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयातून देण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी कायद्यातील २०१४ साली झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. या निकालामुळे १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेले कर्मचारीही निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरणार आहेत.

 • २०१४ साली झालेली घटनादुरुस्तीमधील १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेल्यांना पगाराच्या १.८६ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी देण्याची अट न्यायालयाने रद्द ठरवली. तर भविष्य निर्वाह निधीसाठी १९५२च्या कायद्यातील ६ हजार ५०० रुपयांच्या किमान वेतनाची मर्यादा १५ हजार करण्याची दुरुस्ती मात्र न्यायालयाने मान्य केली.

 • शुक्रवारी सरन्यायाधीश उदय उमेश लळित, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. सुधांशू परडीवाला यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचा केंद्र सरकारसह भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ), कर्मचारी आणि मालकांच्या संघटनांनी अभ्यास सुरू केला आहे. निकालाला अनुसरून नव्या तरतुदी आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती कामगार मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

 • ईपीएफओमधील कर्मचारी आणि मालकांच्या प्रतिनिधींनी निकालाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून अधिक अभ्यासाअंती विश्लेषण करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ईपीएफओसह सर्व संबंधितांना प्रणालीमध्ये सुधारणेसाठी वेळ देत न्यायालयाने आपल्या आदेशाला सहा महिन्यांची स्थगिती दिली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये यासंदर्भात अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुतिन यांच्याकडून भारतीयांची स्तुती; नागरिक प्रतिभावान, ध्येयवादी असल्याचे उद्गार :
 • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा भारताविषयी गौरवोद्गार काढले आहेत. भारताच्या विकासातील यशोकथेची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले, की भारतीय अत्यंत प्रतिभावान आणि ध्येयवादी आहेत. आपल्या देशाच्या विकासासाठी ते आपले योगदान सातत्याने देत आहेत.

 • परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ७ आणि ८ नोव्हेंबरला रशियाचा दौरा करणार आहेत. त्याआधी पुतिन यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी रशियाच्या राष्ट्रीय एकता दिनी ‘रशियन हिस्टॉरिकल सोसायटी’च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले, की भारताकडे पहा. अतिशय प्रतिभावान, ध्येयवादी आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध नागरिकांमुळे भारत आपल्या विकासामध्ये नवी उंची निश्चित गाठेल. भारताची दीड अब्ज लोकसंख्या निश्चितच विकासाचे ध्येय गाठेल, यात शंका नाही.

 • रशियन सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की पुतिन यांनी वसाहतवाद आणि रशियाच्या संस्कृतीबद्दलही भाष्य केले. पुतिन यांनी गेल्या गुरुवारीही रशियाच्या भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते, की आमचे भारतासोबत विशेष संबंध आहेत. जे अनेक दशकांपासून घनिष्ठ आहेत. भारतासह रशियाच्या संबंधांत कधीही कोणतेही वादग्रस्त मुद्दे नव्हते.

 • आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. हे संबंध भविष्यातही ते असेच राहतील. आपल्या देशाच्या हितासाठी ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरण’ अवलंबल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती. भारताने ब्रिटिश वसाहत ते आधुनिक राष्ट्र असा विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे, असेही पुतिन म्हणाले होते.

०७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)