चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 ऑगस्ट 2023

Date : 7 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
त्सित्सिपासला विजेतेपद
  • ग्रीसच्या अग्रमानांकित स्टेफनोस त्सित्सिपासने ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या मानांकित अ‍ॅलेक्स डी मिनाऊरला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत ’एटीपी’ मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. गेल्या १४ महिन्यांतील त्सित्सिपासचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
  • ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील उपविजेता असलेल्या त्सित्सिपासने या वर्षी तीन वेळा अंतिम फेरी गाठली. त्याआधी त्याला मेलबर्नमध्ये नोव्हाक जोकोव्हिचकडून पराभूत व्हावे लागले, तर बार्सिलोनामध्ये त्याला कार्लोस अल्कराझने नमवले. त्सित्सिपासचे कारकीर्दीतील हे दहावे ‘एटीपी’ विजेतेपद ठरले.
  • सामन्याला जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या त्सित्सिपासने आक्रमक सुरुवात केली व पहिल्या सेटमध्ये वर्चस्व राखत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही त्सित्सिपासने आपली हीच लय कायम राखताना मिनाऊरला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण, ५०८ रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार
  • रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकासित देशाच्या ध्येयाकडे आपला देश वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातही एक नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे. भारतातील सुमारे १३०० प्रमुख रेल्वेस्थानकं आता अमृत भारत रेल्वे स्थानकं म्हणून विकसित केली जातील.
  • पंप्रधान मोदींनी सांगितलं की या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ४,५०० कोटी रुपये खर्च करून तब्बल ५५ रेल्वेस्थानकं विकसित केली जातील. तर राजस्थानमध्ये देखील ५५ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल. भारतीय रेल्वेत जितकं काम केलं जातंय ते पाहून आनंद आणि आश्चर्य वाटतंय. भारतीय रेल्वेने दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनसारख्या देशांपेक्षा अधिक वेगाने गेल्या नऊ वर्षात कामं केली आहेत. या देशांपेक्षा आपल्या देशात जास्त रेल्वे रूळ टाकले आहेत.
  • पंतप्रधान मोदी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. याअंतर्गत आंध्र प्रदेशातील १८, आसाममधील ३२, बिहारमधील ५०, छत्तीसगडमधील ७, नवी दिल्लीतील ३, झारखंडमधील २०, कर्नाटकातील १३, केरळमधील ५, मध्य प्रदेशमधील ३४, महाराष्ट्रातील ४४, मेघालयमधील १, नागालँडमधील १, ओडिशातील २५, पंजाबमधील २२, राजस्थानमधील ५५, तामिळनाडूतील १८, तेलंगणातील २१, त्रिपूरातील ३, जम्मू-काश्मीरमधील ५, पुडुचेरीमधील १, उत्तर प्रदेशातील ५५, उत्तराखंडमधील ३, पश्चिम बंगालमधील ३७ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.
लोभस आणि सुंदर! चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता अपेक्षा अशी आहे की चांद्रयान ३ या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.
  • शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.
  • १ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. याला ट्रान्सलुनर इंजेक्शन म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.
  • चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधून काढणार आहे. चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे.
अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष यादी गुरुवारी
  • अकरावीच्या दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटय़ातील एकूण १ लाख ४७ हजार ८१४ (३८.३० टक्के) जागा रिक्त आहेत. तर, अद्याप अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार ५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरुवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
  • तिसऱ्या विशेष फेरीसाठी नवीन नोंदणी, अर्जात बदल, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांचे पसंतीक्रम रविवार, ६ ऑगस्ट ते मंगळवार, ८ ऑगस्ट (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत करता येणार आहेत.
  • तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, १० ऑगस्ट (सकाळी १० वाजल्यापासून) ते शनिवार, १२ ऑगस्ट (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तर कोटय़ांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश याच कालावधीत होणार आहेत.
शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची ४८ टक्के पदे रिक्त; आदिवासी विकास विभागाचा अहवाल
  • आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. आश्रमशाळांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या मंजूर ४ हजार २२० पदांपैकी तब्बल २०५७ म्हणजे ४८.७४ टक्के पदे रिक्त आहेत. दुसरीकडे, अनुदानित आश्रमशाळांमध्येही शिक्षकांची कमतरता असल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागाच्या अहवालानुसार शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचे प्रमाण हे ४८ टक्के तर अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त पदांचे प्रमाण १० टक्के आहे.
  • ज्या भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, अशा आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांना आश्रमशाळेमध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो. शिक्षणाचा हक्क कायदा २००५ नुसार या मुलांना/मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, अनेक आश्रमशाळांमध्ये विषय शिक्षकच नाही. तर अनेक शाळांचा भार हा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा विषय डोळय़ांपुढे ठेवून, शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांत शिक्षकपदांसाठी संचमान्यतेचे निकष ठरवण्यात आले आहेत. केंद्रीय कायद्यानुसार एका शिक्षकाने ३० विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे. ते ३० विद्यार्थी एकाच वर्गातील असावे, असेही नाही. शिक्षक बहुवर्ग अध्यापक राहील ते त्यात अपेक्षित होते. प्रत्येक विद्यार्थी विशिष्ट असतो. शिकण्याची, समजून घेण्याची भावना, विचार आणि गती वेगळी असते. त्यामुळे त्यांना शिकवण्याची पात्रता वेगवेगळी असू शकते. हे सर्व विद्यार्थी एकाच वर्गात आहेत म्हणून त्यांना सारखे शिकवता येणार नाही, असे निदर्शनास आले.
  • पूर्व प्राथमिक आश्रमशाळेसाठी ६० विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक, नव्वद विद्यार्थ्यांसाठी तीन, १२० विद्यार्थ्यांपर्यंत चार व २०० विद्यार्थ्यांपर्यंत ५ शिक्षक राहतील. सहावी ते आठवीसाठी ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, एकशे पाच विद्यार्थ्यांपर्यंत ३ शिक्षक असतील. इयत्ता नववीसाठी व दहावीकरिता २ असे चार शिक्षक अनुज्ञेय राहतील. त्यासाठी दोन्ही वर्गात एकूण ४० विद्यार्थी असणे आवश्यक असेल, असे ठरवण्यात आले. पण, महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत, असे निदर्शनास आले आहे.

07 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.