भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला पुन्हा भिडणार; नेपाळच्या पराभवानं झालं शिक्कामोर्तब!
भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषकादरम्यान झालेला पहिला सामना पावसानं धुवून नेला. त्यामुळे दोन्ही देशांमधल्या क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. या सामन्यात भारताची फलंदाजी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे पूर्ण सामनाच रद्द करून दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. यावेळी पाकिस्तान तीन गुणांसह सुपर फोरमध्ये दाखल झालं. मात्र, सोमवारी दुबळ्यानेपाळ संघाला लीलया पराभूत करत भारतानं आपलं सुपर ओव्हरचं तिकीट कन्फर्म केलं. मात्र, याचबरोबर पाकिस्तानशी पुन्हा एकदा सामना होण्यावरही शिक्कामोर्तब केलं!
भारताचा नेपाळवर दणदणीत विजय
सोमवारी नेपाळविरोधात झालेल्या सामन्यामध्ये भारतानं तब्बल १० विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. भारतानं गोलंदाजी स्वीकारून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत नेपाळच्या फलंदाजांनी अत्यंत चिवट खेळ करत बलाढ्य भारतासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं. भारताची दिग्गज सलामीवीरांची जोडी, अर्थात कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी डावाला सावध सुरुवात केली खरी. मात्र, पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. पावसामुळे तब्बल दीड तासाचा खेळ वाया गेल्यामुळे सामना थेट २३ षटकांचा झाला. विजयासाठीचं आव्हानही कमी होऊन १४५पर्यंत खाली आलं.
पावसाच्या ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीने नेपाळच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिलं नाही. रोहित शर्मा (नाबाद ७४) व शुबमन गिल (नाबाद ६७) या दोघांनी १४७ धावांची अभेद्य सलामी देत भारताला लीलया विजय मिळवून दिला.
आशिया चषकाचं वेळापत्रक!
दरम्यान, आशिया चषकाच्या नियोजनानुसार लीग स्तरावरील ग्रुपमधील पहिल्या दोन संघांमध्ये सुपर फोर स्तरावर पुन्हा सामना होतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातच सुपर फोरमधला पहिला सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेत होणार आहे. पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी सुपर फोरमधील सर्व सामने आता श्रीलंकेतील हंबनटोटामध्ये खेळवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सातारा : डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर पुरस्कार
देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान आदी ठिकाणी ठोस कामगिरी करून उत्तुंग यश मिळणाऱ्या डॉ. डी. वाय पाटील यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराचे यंदाचे २७ वे वर्षे आहे. यापूर्वी राज्यातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथे जन्म झालेले ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे डॉ डी. वाय. पाटील नावाने सर्वांना परिचित आहेत. त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली.
कार्यकर्ता, महापौर, आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा थक्क करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे. त्यांच्या कार्याचा ठसा हा देशातच नव्हे तर परदेशातही उमटवलेला आहे. याची दखल घेत भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. पुरस्कार वितरण विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद आबा पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे वितरण गोकुळाष्टमीस बुधवार (दि. ६) रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मार्गदर्शक संचालक नितीन पाटील, व संचालक मंडळाने केले आहे.
अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास देहाचं काय केलं जातं? जाणून घ्या…
अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून विविध अंतराळ मोहिमा काढल्या जातात. २०२५ साली चंद्र आणि मंगळवार अंतळावीर पाठवण्याची नासाची योजना आहे. यापूर्वीही नासाने अनेकदा मानवाला अवकाशात पाठवलं आहे. पण, मानवाला अंतराळात पाठवणं धोकादायक काम आहे. गेल्या ६० वर्षात २० अंतराळवीरांचा अवकाशात मृत्यू झाला आहे.
१९८६ ते २००३ दरम्यान नासा स्पेस शटल दुर्घटनांमध्ये १४, १९६७ साली अपोलो लाँच पॅड फायरमध्ये ३ आणि १९७१ साली सोयुझ मोहिमेत ३ अशा २० अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अवकाशात, चंद्रावर किंवा मंगळवार अंतराळवीरांचं मृत्यू झाला, तर त्यांच्या देहाचं काय केलं जातं? याबद्दल नासाच्या ‘द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थ’चे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी माहिती दिली आहे.
इमॅन्युएल उर्क्विएटा म्हणाले, “जर एखाद्या अंतराळवीराचा अवकाशात किंवा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मृत्यू झाला असेल, तर काही तासांतच त्याचा मृतदेह कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवता येतो.”
“जर हे चंद्रावर घडले तर बाकीचे अंतराळवीर काही दिवसांत मृतदेह घेऊन येऊ शकतात. यासाठी नासाने प्रोटोकॉल तयार केले आहेत. घाईत कोणताही मृतदेह पृथ्वीवर आणला जात नाही. बाकीचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित येण्यास नासाचं प्राधान्य आहे,” असं इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी सांगितलं.
“समजा मंगळ मोहिमेवर ( ३०० दशलक्ष किलोमीटर ) जाताना एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला, तर गोष्ट वेगळी असेल. तेव्हा अंतराळवीरांचा मृतदेह वेगळ्या चेंबरमध्ये किंवा बॉडी बॅगमध्ये ठेवतात,” अशी माहिती इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी दिली. ‘एनडीटीव्ही वर्ल्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
मागण्या मान्य झाल्याशिवाय धान्य करार नाही ; रशिया
पाश्चात्त्य देशांनी आपल्या मागण्या केल्याशिवाय नवीन धान्य करार केला जाणार नाही असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी जाहीर केले. सहा आफ्रिकी देशांना मोफत धान्यपुरवठा करण्याविषयीचा करार अंतिम टप्प्यात आहे असेही पुतिन यांनी सांगितले.
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी सोमवारी रशियाच्या दौऱ्यात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी एर्दोगन यांनी धान्य कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुतिन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या वर्षी तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला होता. त्यामुळे, युद्धादरम्यान युक्रेनला काळय़ा समुद्रातील तीन बंदरांमधून धान्य आणि इतर वस्तूंची निर्यात करणे शक्य झाले होते. जुलैमध्ये या कराराची मुदत संपल्यानंतर रशियाने त्यातून माघार घेतली. आपल्या धान्य आणि खतांच्या निर्यातीतील अडथळे दूर करण्याचे आश्वासन देणाऱ्या समांतर कराराचे पालन झाले नाही, अशी रशियाची तक्रार आहे.
पोटनिवडणुकांमध्ये ‘इंडिया’ची आज कसोटी
झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल या सहा राज्यांतील ७ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून विरोधकांच्या ‘इंडिया’ची ही पहिला परीक्षा असेल. झारखंड, त्रिपुरा व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये ‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार असून केरळ व पश्चिम बंगालमध्ये घटक पक्षांमध्ये लढत होत आहे.
झारखंडमधील डुमरी मतदारसंघामध्ये झारखंड मुक्ती मोच्र्याचा उमेदवार रिंगणात असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्रिपुरामध्ये बोक्सानगर व धनपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘माकप’ने उमेदवार उभे केले असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घोसी मतदारसंघामध्ये सप उमेदवाराविरोधात काँग्रेस तसेच अन्य प्रादेशिक पक्षांनी उमेदवार दिला नाही. या विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचे पारडे जड आहे.
केरळमध्ये पुथुपल्ली मतदारसंघामध्ये काँग्रेस व माकप एकमेकांविरोधात लढतील. ही जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. उत्तराखंडमध्ये बागेश्वर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही समाजवादी पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी मतदारसंघामध्ये माकपला काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा - प्रज्ञानंदला नमवत अरविंद विजेता :
आर. प्रज्ञानंदला अखेरच्या फेरीत पराभूत करत भारताच्या २२ वर्षीय अरविंद चिथंबरमने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अरविंदने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने आठव्या फेरीत अर्जुन इरिगेसीवर मात करत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले होते. या पराभवामुळे इरिगेसीची सलग २९ सामने अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. मग नवव्या फेरीत अरिवदने प्रज्ञानंदला नमवत जेतेपद निश्चित केले.
स्पर्धेअखेरीस ग्रँडमास्टर अरिवदच्या खात्यावर ७.५ गुण होते. प्रज्ञानंदला सात गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच इरिगेसीने (६.५ गुण) संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.
राज्यातील ३१ गावे बँक व्यवहाराविना ; राज्यस्तरीय समितीसमोर लवकरच चर्चा :
केंद्र सरकार ‘डिजिटल’ व्यवहारासाठी आग्रही असतानाच राज्यातील ३१ गावांमध्ये अद्याप बँक व्यवहारच होत नाहीत. या संदर्भातील आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे.
राज्यातील १ हजार ८०० गावांमध्ये बँका पोहोचल्याच नाहीत काय, असा प्रश्न अलीकडेच मुख्य सचिवांनी उपस्थित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने ५६ गावांची यादी राज्य सरकारला पाठविली आणि त्यातील ३१ गावांमध्ये अजूनही व्यवहारालाही बँक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा मुद्दा तिसऱ्या क्रमांकावर चर्चेत ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बँकच नसल्याने डिजिटल बँक, डिजिटल रुपया, व्यवहारातील पारदर्शकता हे ओघानेच येणारे विषय अनेक गावांत नाहीत. अनेक गावांत बँक प्रतिनिधी असले तरी आंतरजाल सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारी ‘रेंज’च उपलब्ध नसल्याने व्यवहार काही पुढे सरकत नाहीत.
सार्वजनिक बँकांच्या शाखांची संख्या दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. २०१९ मध्ये सार्वजिक बँकांची संख्या आठ हजार ५९४ होती. आता ती घसरून सात हजार ६३२ आहे. गेल्या काही दिवसांत बँकांचे विलीनीकरण झाल्यानेही ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. बँक ऑफ बडोदामध्ये देना आणि विजया या बँकांचे विलीनीकरण झाले. सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाली तसेच इंडियन बँकेत अलाहबाद बँकचे विलीनीकरण झाले. त्यामुळेही शाखा कमी झाल्याचे सांगण्यात येते. एक बाजूला व्यवहार ‘डिजिटल’ करा असा आग्रह असताना सुमारे १ हजार ८०० बँकांचे व्यवहार रडतखडत सुरू आहेत. तर ३१ गावांत बँक व्यवहाराच होत नाहीत. त्यावर सोमवारी बैठकीत चर्चा होईल असे सांगण्यात येते.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात ओढवला मृत्यू :
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.
अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. पुढील प्रक्रिया सध्या सुरु आहे”. दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
विश्लेषण : कुर्की म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या कायद्याचं पंजाबमधील भीषण वास्तव काय आहे :
पंजाबमधील ६५ वर्षीय शेतकरी बलविंदर सिंग यांनी २९ ऑगस्ट रोजी मुक्तसर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या केली आहे. त्यांनी स्थानिक सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. पण या कर्जाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले होते. त्यामुळे स्थानिक सावकारानं त्यांच्याविरोधात कुर्की अंतर्गत न्यायालयीन खटला दाखल केला होता. त्यामुळे बलविंदर सिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत होते. दरम्यान, त्यांनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पंजाबमध्ये कुर्कीचा मुद्दा सध्या खूपच चर्चेत आहे. कुर्की म्हणजे काय? आणि कुर्की कायद्याचं भीषण वास्तव नेमकं काय आहे, याचं विश्लेषण करणारा हा लेख.
कुर्की म्हणजे काय - कुर्की म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जमीन, कर्ज देणाऱ्या संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे गहाण ठेवणे. संबंधित शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर संबंधित जमीन कुर्कीअंतर्गत जप्त केली जाते. बँकांशिवाय खासगी सावकार, कमिशन एजंट यांच्या पैशांसाठी शेतकऱ्यांविरुद्ध अशाप्रकारचे आदेश काढले जातात.
कुर्की कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते - सिव्हिल प्रोसिजर कोड -१९०८ च्या कलम ६० अन्वये कुर्की आदेश अंमलात आणला जातो. या कलमान्वये शेतकर्याची गहाण ठेवलेली जमीन बँकेच्या किंवा सावकाराच्या नावावर नोंदवली जाते. काही ठिकाणी अशा जमिनीचा लिलाव केला जातो. शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास सावकार न्यायालयातून कुर्की आदेश मिळवू शकतो. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कुर्की प्रक्रिया सुरू होते. या कलमाअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन किंवा ट्रॅक्टर गहाण ठेवला जाऊ शकतो.
पंजाबमध्ये कुर्की कायद्यावर बंदी नव्हती का - पंजाबमध्ये यापूर्वी सत्तेत असणाऱ्या अकाली दल आणि काँग्रेस या दोन्ही सरकारांनी कुर्कीवर बंदी घातल्याचा दावा केला आहे. ‘कर्ज कुर्की खतम, फसल दी पुरी रकम’ (karza kurki khatam, fasal di poori rakam) या घोषणेवर काँग्रेसने २०१७ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.
केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार नाकारला आहे. करोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २०२२ सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला आहे. या पुरस्काराला आशियाचा नोबल पुरस्कार असे देखील संबोधले जाते.
२०१६ ते २०२१ या कालावधीत शैलेजा केरळच्या आरोग्य मंत्री होत्या. याच काळात देशभरासह केरळात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार झाला होता. केरळमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैलेजा यांचे मोठे योगदान आहे.
फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. “मॅगसेसे हे कम्युनिस्ट विरोधी होते. एक व्यक्ती म्हणून माझा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. मात्र मी एक राजकारणी असल्यामुळे यासंदर्भात पक्षाशी चर्चा केली. त्यानंतरच हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबाबत मी पुरस्कार समितीची आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेजा यांनी दिली आहे.
“मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. हा एक मोठा पुरस्कार असला तरी तो एका गैर सरकारी संस्थेकडून देण्यात येतो. ही संस्था सामान्यत: कम्युनिस्टांच्या तत्वांचे समर्थन करत नाही”, असेही शैलजा म्हणाल्या आहेत. ‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना १९५७ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.