महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने वाढवली शान! अविनाश साबळेने एशियन गेम्समध्ये सलग दुसरे पदक जिंकत रचला इतिहास
- महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य असे सलग दोन पदके जिंकली. महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने चीन भारताचा तिरंगा दिमाखात फडकावत एक इतिहास घडवला आहे. भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळेने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. साबळेचे या खेळांमधील हे दुसरे पदक आहे. गेल्या आठवड्यात त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.
- २९ वर्षीय भारतीय खेळाडूने १३ मिनिटे २१.०९ सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. बहारीनच्या बिरहानू यामाताव बालेव याने १३:१७:४० या वेळेत सुवर्णपदक पटकावले, तर त्याचाच देशबांधव दाविट फिकाडू अदमासू याने १३:२५:६३ या वेळेत कांस्यपदक पटकावले. आणखी एक भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने १३:२९:९३च्या वेळेसह आपली सर्वोत्तम कामगिरी केली परंतु तो चौथ्या स्थानावर राहिला.
३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले
- अविनाश साबळेने २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:१९:५० सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये 8 मिनिटे ११.२० सेकंद वेळेसह रौप्य पदक जिंकले होते. अविनाश साबळेची हंगामातील सर्वोत्तम वेळ ८:११.६३ आहे, ज्यामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानच्या मिउरा र्युजी (SB: ८:०९.९१)च्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतासाठी उत्तम ११वा दिवस
- आशियाई क्रीडा स्पर्धेचा ११वा दिवस भारतासाठी खूप छान ठरला. भारताने एकूण १२ पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील हा दुसरा दिवस होता जेव्हा भारताने १० हून अधिक पदके जिंकली होती. याआधी आठव्या दिवशी भारताला १५ पदके मिळाली होती.
भारताकडे किती पदके आहेत?
- सुवर्ण: १८
- रौप्य: ३१
- कांस्य: ३२
- एकूण: ८१
समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर ही बातमी वाचा; महिन्याभरात ‘या’ ५ दिवशी राहणार बंद!
- वेगवेगळ्या कारणांनी राज्यातील समृद्धी महामार्ग चर्चेत राहिला आहे. आधी राजकारणामुळे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला. मात्र आता हा महामार्ग पू्र्ण झाल्यानंर दिवसभरात लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करताना दिसत आहेत. या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून या महिन्याभरात एकूण ५ दिवस समृद्धी महामार्गावरचे दोन टप्पे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यानुसारच आपलं प्रवासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. हा मार्ग बंद असताना इतर पर्यायी मार्गांचाही प्रवासी वापर करू शकतात.
महामार्ग बंद असण्याचं कारण काय?
- मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशनसाठीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन टप्प्यांमधली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली दाणार आहे. हे काम झाल्यानंतर या मार्गांवरची वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल.
कोणत्या टप्प्यांत कधी असेल वाहतूक बंद?
- समृद्धी महामार्गावर १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर हे तीन दिवस आणि नंतर २५ व २६ ऑक्टोबर हे दोन दिवस वाहतूक बंद असेल. जालना ते औरंगाबाद या पट्ट्यात या दोन कालावधीमध्ये दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येईल. हे पाच दिवस पूर्णपणे वाहतूक बंद असेल.
पर्यायी मार्ग कोणता?
- ज्या पाच दिवशी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असेल, त्या दिवशी प्रवाशांना इतर काही पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. यासाठी मुख्य मार्गावरून वाहतूक बंद असलेल्या दिवशी निधोनाजवळील जालना इंटरजेंज आयसी १४ मधून मुख्य मार्गावरून बाहेर पडता येईल. तिथून निधोना एमआयडीसीमार्गे जालना-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून केंब्रिज शाळेपर्यंत येऊन नंतर उजवीकडे सावंगी बायपासमार्गे इंटरजेंज आयसी १६ वरून पुन्हा मुख्य मार्गावर येता येईल. शिर्डीकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिशेसाठीही हाच मार्ग विरुद्ध बाजूने वापरता येईल. अर्थात इंटरजेंज आयसी १६ ते इंटरजेंज आयसी १४.
गोंदिया जिल्ह्यात चार वर्षांत पाच पालकमंत्री!
- स्थानिक पालकमंत्र्यांच्याबाबतीत गोंदिया जिल्हा नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर व राजकुमार बडोले वगळता नेहमी इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून गोंदिया जिल्ह्याला लाभले आहेत. त्यामुळे उसणवारीच्या पालकमंत्र्यांवरच गोंदिया जिल्ह्याची भिस्त दिसून आली. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत चार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाचवे पालकमंत्री मिळाले आहे.
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी काही निवडक जिल्ह्यातील पालकमंत्री यांची यादी जाहीर केली. त्यात गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचे धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आघाडी आणि युती कुणाचेही शासन असो गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री यांची संगीतखूर्ची सातत्याने सुरूच आहे. १९९९ या वर्षी जिल्हा निर्मितीपासून बाहेरील जिल्ह्याचा पालकमंत्री ही जणू काही काळ्या दगडावरची रेषच ठरली आहे.
- जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा कार्यकाळ पाहता स्थानिक नेतेमंडळींना भोपळाच अधिक मिळाला आहे. मागील काळात डोकावल्यास केवळ १९९५ च्या युती शासनात आमगावचे महादेवराव शिवणकर आणि २०१४ च्या युती शासनात सडक अर्जुनीचे राजकुमार बडोले या दोन नेत्यांनाच हे पद भुषविता आले आहे. त्या व्यतिरीक्त गोंदिया जिल्ह्याला कधीही स्थानिक पालकमंत्री लाभलेला नाही. त्यातही २०१९ चे मविआ शासन ते आजची महायुतीपर्यंत मागील ४ वर्षांत गोंदिया जिल्ह्याला अनिल देशमुख, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे, सुधीर मुनगंटीवार ते आता विद्यमान धर्मराव बाबा आत्राम असे ४ वर्षांत ५ पालकमंत्री आणि त्यातही कुणी स्थानिक नाही.
अल्फ्रेड नोबेल कोण होते? नोबेल पुरस्कार कधी, कुठे आणि कसा सुरू झाला? वाचा जगातल्या सर्वोच्च पारितोषिकाबद्दल सर्वकाही
- जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. यंदाचं पहिलं नोबेल पारितोषिक वैद्यक क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलं आहे. करोना रोगावरील प्रभावी लशीच्या संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ कॅटलिन करिको आणि ड्र्यु वेसमन यांना यांदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्विडनच्या कॅरिलोन्स्का संस्थेच्या नोबेल परिषदेकडून करिको आणि ड्र्यु वेसमन यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक भारतीयांनाही नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
- स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथ ठाकूर (साहित्य) आणि सी. व्ही. रमण (भौतिकशास्त्र) या दोन भारतीयांना नोबेल मिळालं होतं. तर स्वातंत्रोत्तर काळात आमर्त्य सेन, हर गोविंद खुराना, अभिजीत बॅनर्जी, मदर तेरेसा, सुब्रमण्यम चंद्रशेखर आणि कैलास सत्यार्थी यांना वेगवेगळ्या श्रेणींमधलं नोबेल मिळालं आहे. परंतु, तुम्हाला नोबेल पुरस्काराविषयी माहिती आहे का? हा पुरस्कार जगात सर्वोच्च का मानला जातो? त्याची सुरुवात कधीपासून झाली आणि कोणी केली? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती नसतील तर ती या लेखाद्वारे मिळतील.
- रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र/जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद करून ठेवली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी १९०१ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेली १२३ वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. केवळ १९४० ते १९४२ या काळात यात खंड पडला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे या तीन वर्षांमध्ये नोबेल पुरस्कार देता आले नव्हते.
हरियाणा, दिल्ली यांना विजेतेपद; नाशिक येथील २४ वी राष्ट्रीय दोरउडी स्पर्धा
- महाराष्ट्र हौशी रोप स्किपिंग (दोरउडी) संघटना आणि क्रीडा भारती नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये आयोजित २४ व्या राष्ट्रीय दोरउडी स्पर्धेत सर्वाधिक १८० गुणांसह हरियाणा संघाने प्रथम तर, १४० गुणांसह दिल्ली संघ द्वितीयस्थानी राहिला. एकूण १२८ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीयस्थानी राहिला. मुलींच्या गटात सर्वाधिक १६० गुणांसह दिल्ली संघाने प्रथम, १४८ गुणांसह हरियाणा द्वितीय तर, १३२ गुणांसह मध्यप्रदेश संघ तृतीयस्थानी राहिला.
- स्पर्धेत ११, १४, १७ वर्षे आणि वरिष्ठ गट पुरुष, महिला अश्या चार गटांचा समावेश होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र हौशी रोप स्किपिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव ,अमित घुगे, विजय बनछोडे, नाशिक जिल्हा दोरउडी संघटनेचेे अध्यक्ष शाम बडोदे, क्रीडा भारती नाशिकचे अध्यक्ष विनोद शिरभाते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. के. आहिरे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र संघटनेचे सचिव संजय पाटील यांनी केले. आभार पवन खोडे यांनी मानले.