चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ नोव्हेंबर २०२२

Date : 5 November, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या पुरुष संघाने आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक :
  • अनुभवी सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशियाई स्क्वॉश सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुवेतचा २-० असा पराभव करून पहिले सुवर्णपदक जिंकले. रमित टंडनने अली आरामजीसोबत (११-५, ११-७, ११-४) सरळ गेम जिंकला. यामुळे भारताला १-० अशी आघाडी मिळाली. यानंतर भारताचा स्टार खेळाडू सौरव घोषालने विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • सौरव घोषालने अम्मर अल्तामिमीचा (११-९, ११-२, ११-३) असा पराभव करत संघाला अजेय आघाडी मिळवून दिली. अभय सिंग आणि फलाह मोहम्मद यांच्यातील तिसरा सामना खेळला गेला नाही कारण रमित टंडन आणि सौरव घोषाल यांच्या विजयानंतर भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले होते.

  • महिला संघाने कांस्यपदक जिंकले - या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकावले आहे. महिला संघ उपांत्य फेरीत मलेशियाकडून १-२ असा पराभूत झाला. पहिल्या लेगमध्ये हाँगकाँगकडून ०-३ ने पराभूत होऊन महिला संघाने ग्रुप बी मध्ये दोन विजय आणि एक पराभवासह दुसरे स्थान मिळवले. मात्र महिला संघाने इराण आणि सिंगापूरचा पराभव केला.

  • आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२२ - आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२२ चेंगजू, दक्षिण कोरिया येथे ३१ ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुषांच्या स्पर्धेत भारताने सुवर्ण, तर कुवेत संघाला रौप्य आणि हाँगकाँगला कांस्यपदक मिळाले. २०२१ मध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला विभागातील सुवर्णपदक हाँगकाँग संघाने पटकावले.

राज्याची शालेय शिक्षणस्थिती देशात सर्वोत्तम ; शैक्षणिक कामगिरी श्रेणी निर्देशांकानुसार पहिले स्थान :
  • करोनाच्या संसर्गामुळे जवळपास संपूर्ण वर्ष शाळा बंद असलेल्या २०२०-२१ या वर्षांत राज्य हे शालेय शिक्षणिक स्थितीच्या प्रतवारीत सर्वोत्तम ठरले. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ आणि पंजाबही हजारपैकी ९२८ गुण मिळवून प्रथम स्थानी आहे.

  • केंद्रीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रवेश, समन्याय आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अशा पाच निकषांनुसार राज्यांची शालेय शिक्षणाची प्रतवारी (परफॉर्मन्स ग्रेिडग इंडेक्स) जाहीर करण्यात येते. यातील सर्व निकषांमध्ये मिळून ७० मापदंड निश्चित करण्यात आले. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांच्या संकेतस्थळावर शाळांनी नोंदवलेली माहिती विचारात घेण्यात येते.

  • यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता. मात्र २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत राज्याची ५९ गुणांची वाढ झाली. पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यप्रणाली या दोन निकषांमध्ये राज्याची कामगिरी सुधारल्याचे दिसते.

राज्यात दोन लाख कोटींचे प्रकल्प ; लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही :
  • ‘‘केंद्राने महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी, तर रस्ते विकासासाठी ५० हजार कोटींसह दोन लाख कोटींचे विविध प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यातून राज्यात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील’’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला.

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्यात यंदा ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा शिंदे- फडणवीस सरकारने केली आहे. महासंकल्प रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर आदी उपस्थित होते.

  • केंद्र सरकारने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरुवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याबद्दल मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

  • महाराष्ट्रात गृह आणि ग्रामविकास विभागात मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘‘विकसित भारतासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुद्रा योजनेद्वारे तरुणांना स्वयंरोजगारासाठी २० लाख कोटी रूपयांची मदत केली. याचा मोठा लाभ महाराष्ट्रातील तरुणांनाही झाला. स्टार्टअप, लघु उद्योग यासाठी शासन मदत करीत आहे.

  • ग्रामीण भागातील बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांत आठ कोटी महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करीत आहेत. बचत गटांना साडेपाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन निर्मिती व रोजगार निर्मितीही होत आहे.’’

इस्राएलमध्ये पुन्हा नेतान्याहू :
  • इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले बेन्यामिन नेतान्याहू पुन्हा एकदा पंतप्रधानाच्या खुर्चीत बसण्यास सिद्ध झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारांच्या आघाडीला ‘क्नेसेट’ (इस्रायलचे कायदेमंडळ) १२०पैकी ६४ जागा मिळाल्या आहेत.

  • इस्रायलमध्ये चार वर्षांत पाचव्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून क्नेसेटचे चित्र स्पष्ट झाले. नेतान्याहू यांच्या लिकूड पार्टीला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या. मावळते पंतप्रधान याईर लपिड यांच्या येश आतिद पक्षाला २४ जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र सर्वात धक्कादायक निकाल हा नेत्यानाहू यांचा मित्रपक्ष असलेल्या रिलिजियस झिओनिझम या पक्षाचा लागला. अतिउजवा आणि कडवा धार्मिक अशी ओळख असलेला हा पक्ष १४ जागांसह क्नेसेटमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला.

  • अरब अल्पसंख्याकांच्या हदाश-ताल आणि युनायटेड अरब यांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. बालाद पक्षाला ३.२५ टक्के मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. एकेकाळी सत्तेत असलेल्या लेबर पार्टीने जेमतेम मते मिळवत चार जागा जिंकल्या.

  • एक वर्तुळ पूर्ण - २०१९ साली नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर वेगवेगळय़ा विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांची सत्ता गेली. केवळ नेत्यानाहूंना सत्तेतून बाहेर करणे, एवढाच या आघाडीचा उद्देश होता. त्यानंतर नेतान्याहूंनी राजकीय संन्यास घेतला. त्यानंतर चार वर्षे देशात राजकीय अस्थैर्य होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे निर्विवाद सत्ता आल्यामुळे एक वर्तूळ पूर्ण झाले असून देशाला स्थिर सरकार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा - शिवा थापा उपांत्यपूर्व फेरीत :
  • भारताच्या शिवा थापाने आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ६३.५ किलो वजनी गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाच वेळा आशियाई पदक विजेता असलेल्या शिवाला या वेळी मंगोलियाच्या ब्याम्बात्सोगट तुगुल्डुरचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.

  • अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासून कमालीचा आक्रमक खेळ केला. एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले चढवण्याची स्पर्धाच दोघांमध्ये सुरू होती. पंचांना लढतीचा निकाल लावतानाही तेवढाच विचार करावा लागला. अखेरीस शिवाचा अनुभव आणि वेगवान हालचाली निर्णायक ठरल्या. पंचांनी शिवाच्या बाजूने ३-२ असा कौल दिला.

  • अन्य लढतीत ६७ किलो वजनी गटात भारताच्या अमित कुमारने तैवानच्या झेंग रॉंग हुआंगचे आव्हान एकतर्फी लढतीत परतवून लावले. अमितची गाठ आता उझबेकिस्तानच्या मुयडन्कहुजाएव असादखुजाशी पडणार आहे. त्यापाठोपाठ ७१ किलो वजनी गटात सचिनने थायलंडच्या पीरापत यीसुन्हनोएनचा असा पराभव करून आगेकूच कायम राखली.

०५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.