चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ मे २०२२

Date : 5 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इस्रोची शुक्रावरील मोहिमेसाठी तयारी सुरू; लवकरच अंतराळयान पाठवणार; शुक्राच्या पृष्ठभागावरील रहस्याचा शोध :
  • चंद्र आणि मंगळावर यान पाठवल्यानंतर, सौर मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे हे पाहण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळयान पाठवण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) करत आहे. शुक्राला वेढून असलेल्या गंधकयुक्त आम्लयुक्त (सल्फ्युरिक अ‍ॅसिड) ढगांखालील रहस्यांचा शोध घेणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे.

  •  शुक्र मोहिमेवर विचार झालेला आहे, तिचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे व तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे ‘शुक्र विज्ञानावरील’ एक दिवसाच्या बैठकीला संबोधित करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. या मोहिमेच्या प्रभावी फलितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले.

  • ‘शुक्र मोहिमेची आखणी करणे व ती प्रत्यक्षात आणणे यांची क्षमता भारताकडे असल्यामुळे, अतिशय कमी वेळेत ही मोहीम पूर्ण करणे भारताला शक्य आहे’, असे सोमनाथ त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले.  ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणे आणि त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे असे लक्ष्य ठेवण्याचा इस्रोने विचार केला आहे. या वर्षांत पृथ्वी व शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे, की प्रणोदकाचा (प्रॉपेलंट) कमीत कमी वापर करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची स्थिती त्यानंतर २०३१ साली उपलब्ध राहणार आहे.

  • शुक्रावरील यापूर्वीच्या मोहिमांमधील प्रयोगांची पुनरुक्ती करू नये आणि चांद्रयान-१ व मार्स ऑर्बिटर मिशन यांच्या वेळी जसे उच्च प्रभावी फलित साध्य झाले होते, तसेच पुन्हा करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सोमनाथ यानी सांगितले.

जागतिक प्रश्नांवर विचारविनिमय; नॉर्डिक देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंडच्या  (नॉर्डिक देश) पंतप्रधानांशी स्वतंत्र अशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी उभय पक्षांचे संबंध दृढ करण्यासह प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींबाबत विचारविनिमय केला.

  •  डेन्मार्कमध्ये जर्मनीहून मंगळवारी आल्यानंतर मोदींनी युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नॉर्डिक देशांच्या चारही प्रमुखांची भेट घेऊन ही चर्चा केली. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये होत असलेल्या दुसऱ्या भारत-नॉर्डिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर या भेटी झाल्या. मोदीनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांची सर्वप्रथम भेट घेतली. दोन्ही नेत्यांतील ही पहिलीच भेट होती.

  • दोन्ही देशांच्या संबंधांचा त्यांनी साकल्याने आढावा घेतला. या भेटीनंतर मोदींनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, की सागरी अर्थव्यवस्था, पर्यावरणानुकूल ऊर्जा, अवकाश, आरोग्य आदी क्षेत्रांत परस्परसहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. भारताने नुकत्याच जाहीर केलेल्या आक्र्टिक्ट धोरणामागे नॉर्वेची प्रमुख भूमिका आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही सांगितले, की दोन्ही नेत्यांनी जागतिक घडामोडींवरही चर्चा केली.

  • भारत आणि नॉर्वे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य असल्याने या व्यासपीठावर उभय देशांच्या हितसंबधित जागतिक बाबींवर संवाद होत असतो. दोन्ही नेत्यांत पर्यावरणानुकूल इंधन, सौर आणि पवनऊर्जा, पर्यावरणानुकूल सागरी वाहतूक, मत्स्यव्यवसाय, जलव्यवस्थापन, पावसाच्या पाण्याची साठवण, अवकाशक्षेत्रातील सहकार्य, दीर्घकालीन पायाभूत गुंतवणूक,आरोग्य व सांस्कृतिक देवाणघेवाणीवर यावेळी भरीव चर्चा झाली.

भारत रशियाला युद्धबंदीस प्रवृत्त करेल; डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा आशावाद :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत आपण युक्रेनमधील युद्धाबाबत चर्चा केली, तसेच तेथील नागरिकांवर (रशियाने तसेच रशिया समर्थकांनी) केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या अत्याचारांचा मुद्दाही उपस्थित केला. हे युद्ध थांबविण्यासाठी भारत रशियाला प्रवृत्त करेल, अशी आपल्याला आशा वाटते, अशी स्पष्ट भूमिका डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी मंगळवारी येथे मांडली. 

  • रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या दोन महिन्यांत युरोपमधील ज्या नेत्यांनी भारताकडे इतक्या स्पष्टपणे अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यात फ्रेडरिक्सन या एक आहेत. कोणत्याही कारणाविना रशियाने युक्रेनवर केलेल्या या बेकायदा हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आमचा अत्यंत स्पष्ट संदेश आहे की, त्यांना हे युद्ध थांबवून तेथील नरसंहाराचा अंत करावा लागेल, असे त्यांनी बजावले आहे.

  • यावेळी त्यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी होते. या दोघांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेविषयी माहिती देताना मोदी यांनी सांगितले की, आम्ही युक्रेनवर चर्चा केली आहे. युद्धबंदी व्हावी, तसेच रशिया-युक्रेन वादावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा, अशी भारताची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हीच भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सोमवारी बर्लिनमध्येही मांडली होती.

  • जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्क दौऱ्यास सुरुवात झाली. डेन्मार्कच्या पंतप्रधान  फ्रेडरिक्सन यांच्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी भारत डेन्मार्कदरम्यानच्या पर्यावरणानुकूल व्यूहात्मक भागीदारीच्या प्रगतीबाबतचा (ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) आढावा घेतला. त्याच बरोबर जागतिक आणि प्रादेशिक बाबींवरही विचारविनिमय करण्यात आला. 

लहान मुलांसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ वर्धक मात्रेच्या चाचणीसाठी अर्ज :
  • ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वर्धक मात्रा म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यासाठी ‘भारत बायोटेक’ कंपनीने देशाच्या औषध नियामकांकडून परवानगी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • सध्या, कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या लशींची दक्षता मात्रा (प्रिकॉशन डोज) ज्यांनी पहिल्या मात्रेनंतर ९ महिने पूर्ण केले आहेत अशा १८ वर्षांवरील सर्वाना दिला जातो.

  •  ‘हैदराबाद येथील भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची सुरक्षितता, प्रतिक्रियाजन्यता आणि रोगप्रतिकारक क्षमता यांचे मूल्यमापन करण्यासाठी २ ते १८ वर्षे वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांसाठी वर्धक मात्रा म्हणून या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याकरिता भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) २९ एप्रिलला अर्ज केला होता’, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

०५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.