चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 जुलै 2023

Date : 5 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ला लवकरच शयनयान डबे
  • देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा या दोन ठिकाणांना अत्यंत जलद गतीने जोडण्याचे काम वंदे भारत एक्स्प्रेसने केले आहे. कोकण आणि गोव्यातील समुद्र किनारे, हिरवीगार झाडी बघायला जाण्यासाठी प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देत आहेत. तसेच, एक्स्प्रेसच्या मोठय़ा तावदानाच्या खिडक्यांतून सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य प्रवाशांना अनुभवता येत आहे. परंतु, वंदे भारतमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा १० तासांचा प्रवास कंटाळवाणा होत आहे. त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीत बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे.
  • मुंबई – गोवादरम्यानचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे. मुंबई – गोव्यादरम्यानचा ५८६ किमीचा पल्ला गाठण्यासाठी पावसाळय़ाच्या वेळापत्रकानुसार सुमारे १० तासांचा अवधी लागतो. पावसाळा वगळता अन्य कालावधीतील वेळापत्रकानुसार वंदे भारतने हे अंतर अवघ्या ८ तासांत कापता येते.  त्यामुळे इतर रेल्वे गाडय़ांच्या तुलनेत प्रवाशांचा वेळ सुमारे ३ ते ४ तासांचा वाचणार आहे. सध्या १० तास लागत असल्याने एकाच ठिकाणी बसून प्रवाशांच्या पाठीवर ताण येत आहे. खुर्चीचे रूपांतर आरामखुर्चीत करता येणे शक्य आहे. परंतु त्यामुळे पाठीमागच्या प्रवाशाची गैरसोय होते. त्यामुळे दहा तासांचा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.
  •  सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) झाली आहे. या वेळी आसन श्रेणी असलेली वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली. कमी तासांच्या आणि कमी किमीच्या अंतरासाठी वंदे भारत प्रवाशांसाठी हिताची ठरली आहे. मात्र, दूरवरच्या प्रवासासाठी ही एक्स्प्रेस त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच रेल्वे मंडळाने आयसीएफला शयनयान असलेल्या वंदे भारतची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. तसेच आयसीएफने डिसेंबरअखेपर्यंत शयनयान असलेल्या वंदे भारत तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर दोन शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस मार्गाचे अंतर ५५० किमीहून अधिक असेल. देशभरातील वंदे भारत एक्स्प्रेसला टप्प्याटप्याने शयनयान डबे जोडण्यात येतील.

वंदे भारत तीन स्वरूपात

  • १०० किमीपेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो
  • १०० ते ५५० किमीसाठी वंदे चेअर कार
  • ५५० किमीहून अधिक प्रवासासाठी वंदे स्लीपर (शयनयान)
अमेरिकेत गुरू पौर्णिमेला १० हजार जणांचं सामूहिक भगवद्गीता पठण
  • गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भारतात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील भारतीय नागरिक आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सोमवारी अमेरिकेतही भगवद्गीता पारायण यज्ञ या भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तब्बल १० हजार लोकांनी सामूहिक भगवद्गीता पठण केलं आहे.
  • गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने भारताबाहेर अमेरिकेच्या टेक्सास येथे तब्बल १० हजार लोकांनी सामूहिक भगवद्गीता पठण केलं. गेल्या अनेक वर्षांपासून येथे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. अबालवृद्ध नागरिक टेक्सासच्या अलेन इस्ट सेंटर येथे जमतात आणि सामूहिक भगवद्गीता पठण करतात. भगवद्गीता पारायण यज्ञ या कार्यक्रमाचे योगा संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशन यांनी आयोजित केला होता.
  • जगप्रसिद्ध धार्मिक गुरू पुज्य गणपती सचिदानंद याच्या उपस्थितीत या सामूहिक भगवद्गीतेचं पठण करण्यात आले. अवधुता दत्ता पिठम ही एक आंतरराष्ट्रीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे. श्री गणपती सचिदानंद स्वामींनी १९६६ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.
  • दहा हजार लोकांनी एकत्र येऊन गीतेचं पठण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम येथे आयोजित केला जातो. हिंदू सनातन धर्माची जनजागृती आणि प्रसार व्हावा याकरता या कार्यक्रमाचे अमेरिकेत आयोजन केले जाते.
समान नागरी कायद्याची घाई नको!, संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांची भूमिका
  • देशभर समान नागरी कायदा लागू करण्याची घाई न करता विविध धर्मातील वैयक्तिक कायदे, जमातींच्या प्रथा-परंपरा-नियम यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे, अशी भूमिका बहुसंख्य भाजपेतर पक्षांनी सोमवारी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत घेतल्याचे समजते. संसदेच्या विधि व न्याय, तक्रार निवारण आणि कार्मिक विषयक स्थायी समितीची बैठक सोमवारी झाली. यावेळी विधि आयोगाच्या वतीने समान नागरी संहितेसंदर्भात सादरीकरण झाले.
  • बैठकीत वैयक्तिक कायद्यातील सुधारणांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. विविध धर्माचे कायदे, लग्नासंदर्भातील तरतुदी, दत्तकविषयक नियम, संमतीवय अशा मुद्दय़ांसंदर्भात आयोगाकडून सदस्यांनी माहिती घेतली. समान नागरी कायद्याला आम आदमी पक्ष (आप) तसेच, बहुजन समाज पक्षाने तत्त्वत: पाठिंबा दिला आहे. आता मात्र, सर्व धर्माशी व जमातींशी चर्चा केल्याशिवाय सरकारने निर्णय घेऊ नये, अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे. काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. समान नागरी संहितेवर केंद्र सरकारने मसुदा तयार केल्यानंतर विरोध करायचा की, पाठिंबा द्यायचा हे ठरवले जाईल, असे काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले. केंद्र सरकारने घाईघाईने निर्णय घेऊ नये, सखोल चर्चा झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्पष्ट केले आहे. विधि आयोगाच्या सादरीकरणाचा अभ्यास केल्यानंतर स्थायी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी सदस्यांकडून सविस्तर मते मांडली जाऊ शकतात.
  • आतापर्यंत सुमारे ९ लाख सूचना विधि आयोगाकडे आल्याचे समजते. विविध धर्मातील वैयक्तिक कायदे व तरतुदींसंदर्भात विधि आयोगाकडून समितीच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष व भाजपचे राज्यसभेतील खासदार सुशीलकुमार मोदी यांनी विविध धर्माअंतर्गत वैयक्तिक कायद्यांसंदर्भात विधि आयोगाची मते जाणून घेतली जातील, अशी माहिती बैठकीपूर्वी दिली होती.
भारताने रचला इतिहास! बलाढ्य कुवेतला ५-४ अशी धूळ चारत सॅफ चॅम्पियनशिपवर कोरले नाव
  • भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कुवेतचा पराभव केला. या विजयासह त्याने नवव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा ५-४ असा पराभव केला. बंगळुरूच्या ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर निर्धारित ९० मिनिटे दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत होते. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही कोणत्याही संघाला दुसरा गोल करता आला नाही. अशा परिस्थितीत पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.
  • सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने आपला उत्कृष्ट विक्रम कायम राखत नववे विजेतेपद पटकावले आहे. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा ४-२ असा दुसरीकडे कुवेतने बांगलादेशचा १-० असा पराभव केला. भारतीय संघ दुसऱ्यांदा कुवेतविरुद्ध खेळला. याआधी ‘अ’ गटात दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी होती.

भारताने ही स्पर्धा जिंकली

  • अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने नवव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. भारत यापूर्वी १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये चॅम्पियन बनला होता. स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात, भारत नऊ वेळा चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे आणि चार वेळा उपविजेता ठरला.
  • भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा ४-४ असा पराभव केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर निर्धारित ९० मिनिटे दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत होते. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही कोणत्याही संघाला दुसरा गोल करता आला नाही. अशा परिस्थितीत पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.

 

एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धा - अल्फियाची सुवर्णकमाई :
  • भारताच्या अल्फिया पठाणने माजी विश्वविजेत्या कझाकस्तानच्या लज्जत कुंगेबायेव्हाला पराभवाचा धक्का देत एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अल्फियाला २०२१च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • कझाकस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे झालेल्या या स्पर्धेतील ८१ किलोवरील वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या अल्फियाने २०१६च्या जागतिक स्पर्धेतील विजेत्या कुंगेबायेव्हावर ५-० अशी सहज मात केली. अल्फियाने युवा जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. एलोर्डा चषक स्पर्धेच्या माध्यमातून तिने वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदार्पण केले.

  • तसेच ४८ किलो वजनी गटातील दोन भारतीय बॉक्सिंगपटूंमध्ये झालेल्या अंतिम लढतीत गितिकाने कलैवानी श्रीनिवासनचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत भारताच्या जमुना बोरोने उझबेकिस्तानच्या निगिना उक्तामोव्हाकडून ०-५ अशी हार पत्करली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • त्याचप्रमाणे ज्योती गुलिया (५२ किलो), साक्षी (५४ किलो), सोनिया (५७ किलो), नीमा (६३ किलो), ललिता (७० किलो) आणि बबिता बिश्त (९२ किलो) यांनी महिलांमध्ये, तर कुलदीप कुमार (४८ किलो), अनंत चोपडे (५४ किलो), सचिन (५७ किलो) आणि जुग्नू (९२ किलो) यांनी पुरुषांमध्ये कांस्यपदक मिळवले.

स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास विशिष्ट लोकांपुरता मर्यादित नाही :
  • ‘‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास हा मर्यादित काळापुरता किंवा ठराविक लोकांपुरताच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढय़ात आपले बलिदान दिले. स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने प्रतिबिंबित करणारा आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी देणारा ‘नवा भारत’ निर्माण करण्याची गरज आहे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

  • येथे थोर स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ३० फूट उंच कांस्य पुतळय़ाचे अनावरण केल्यानंतर जाहीर सभेस संबोधित करताना मोदी बोलत होते.

  • ते म्हणाले, की आपल्या सरकारने गेल्या आठ वर्षांत स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विविध धोरणे अंमलात आणली. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नवा भारत हा त्यांच्या स्वप्नांचा भारत असावा. या भारतात गरीब, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, आदिवासी आणि दलित यांना समान संधी मिळतील. स्वातंत्र्यलढा हा केवळ काही वर्षांचा, काही प्रदेशांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही. हा देशाच्या कानाकोपऱ्याचा इतिहास आहे. हा सर्व कानाकोपऱ्यातील लोकांच्या बलिदानाचा आणि हौतात्म्याचा इतिहास आहे. यातही भारताची विविधता आणि संस्कृती दिसून येते.

  • इंग्रजांविरुद्ध अल्लुरी यांच्या ‘दम है तो मुझे लो’ या घोषणेचे स्मरण करून मोदी म्हणाले, की अशा घोषणांचा वापर करून देशातील जनतेने स्वातंत्र्यसंग्रामात अनेक आव्हाने आणि संकटांचा धैर्याने सामना केला.

निवृत्तीचा कोणताही विचार नाही; अफवांवर पोप फ्रान्सिस यांचं स्पष्टीकरण :
  • पोप फ्रान्सिस यांनी राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस राजीनामा देणार असल्याची बातमी वेगाने पसरली होती. मात्र, ही अफवा असून मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा देणार नाही, असे पोप फ्रान्सिस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

  • एवढचं नाहीतर तर पोप फ्रान्सिस यांना कर्करोग झाल्याची अफवाही पसरवण्यात आली होती. मात्र, मला कोणताही गंभीर आजार नसून गुडघ्याचा त्रास झाल्यामुळे मी दवाखान्यात गेलो असल्याचे पोप यांनी स्पष्ट केले. तसेच पोप फ्रान्सिस या महिन्यात कॅनडाला भेट देणार असून लवकरच मॉस्को आणि कीव दौऱ्यावरही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • पोप यांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे एक महिना त्यांना चालण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना व्हिलचेअरचा वापर करावा लागत आहे. पोप यांच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यातच त्यांनी गुडघ्यावर जास्त दाब देऊन चालल्यामुळे छोटसे फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांना गुडघ्यावर दाब देण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. पोप फ्रान्सिस या आठवड्यात काँगो आणि दक्षिण सुदानला भेट देणार होते. परंतु त्यांना आणखी उपचाराची गरज आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला.

‘अग्निपथ’चा वाद आता सर्वोच्च न्यायालयात; योजना रद्द करण्याच्या याचिकेवर पुढील आठवड्यात होणार सुनावणी :
  • केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या योजनेविरोधात विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ही अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

  • यासंदर्भात बोलताना याचिकाकर्त्यांचे वकील एम एल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”आम्ही केंद्र सरकारने काढलेल्या अग्निपथ योजनेची नोटीफिकेशन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सरकार नवीन योजना आणू शकतात. मात्र, ती चुकीची की बरोबर, ते सरकारने तपासले पाहिजे.”

  • गेल्या महिन्यात केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ ही योजना सुरू केली होती. हा ऐतिहासीक निर्णय असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, योजनेला विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना विरोध बघता वयोमर्यादेतदेखील वाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही या योजनेविरोधात देशातभरात विद्यार्थ्यांकडून हिंसक आंदोलनं करण्यात आली.

  • एकीकेड या योजनेला विरोध होत असला, तरी दुसरीकडे तिन्ही सेना प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत ‘अग्निपथ’ योजना रद्द होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच लवकरच या योजनेंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती दिली होती. तसेच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले होते.

जगप्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक पीटर ब्रुक यांचे देहावसान ; रुक्ष जागांवर रंगमंचीय आविष्कार घडवणारा रंगकर्मी :
  • व्यायामशाळा, निर्जन कारखाने, खाणी, शाळा, जुने वायुनिर्मिती प्रकल्प अशा विचित्र ठिकाणांनाच रंगमंच करून तेथे नाटक सादर करण्याची किमया साध्य केलेले आणि जगातील सर्वात प्रयोगशील नाटय़दिग्दर्शकांपैकी एक असलेले पीटर ब्रुक यांचे शनिवारी पॅरीस येथे देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते.  

  • ब्रुक यांनी शेक्सपियरच्या आव्हानात्मक नाटकांपासून ते महाभारताच्या नाटय़रूपांतरापर्यंतच्या प्रयोगांसाठी ‘रिकाम्या जागां’चा रंगमंच म्हणून वापर करण्याचा अफलातून आविष्कार घडवला. त्यांनी शहरांतील व्यायामशाळा, विद्यालये, कारखाने, खाणी, इतकेच नाही तर जुने वायुनिर्मिती प्रकल्प या ठिकाणांचा वापर रंगमंच म्हणून केला. 

  • १९७० मध्ये शेक्सपियरच्या ‘ए मिडसमर नाईटस् ड्रीम’च्या प्रयोगात संपूर्ण पांढऱ्या रंगाचे नेपथ्य आणि चमकदार रेशमी वेशभूषेतील कलावंतांनी सर्कशीतील

  • प्लेट-स्पिनिंग कौशल्याचा वापर करून घडवलेला अफलातून नाटय़ाविष्कारामुळे ब्रुक यांचे नाटय़ेतिहासातील स्थान निश्चित झाले. या नाटकाचे नेपथ्य सॅली जेकब्स यांनी केले होते. सुंदर जंगल आणि अथेनियन कोर्टच्या पारंपरिक ‘ड्रीम सेट’ची जागा ब्रुक यांच्या कल्पनेतून आलेल्या पांढऱ्या रंगातील नेपथ्याने घेतली. 

05 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.