चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जून २०२२

Date : 4 June, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मानांकन कुस्ती स्पर्धा - पाच वर्षांनंतर साक्षीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण :
  • भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने पाच वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचा दुष्काळ शुक्रवारी संपवला. तिने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेच्या मानांकन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या मानसी व दिव्या काकरन यांनीही सुवर्ण कामगिरी केली.

  • २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत प्रकाशझोतात आलेल्या साक्षीला त्यानंतर कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र, नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत तिने चांगली कामगिरी केली. त्यापाठोपाठ तिला ‘यूब्ल्यूब्ल्यू’ मानांकन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश आले.

  • ६२ किलो वजनी गटातील अंतिम लढतीमध्ये साक्षीने आक्रमक शैलीत आणि चपळाईने खेळ केला. या लढतीत सुरुवातीला तिची प्रतिस्पर्धी इरिना कुझनेत्सोव्हाकडे ५-३ अशी आघाडी होती. मात्र, साक्षीने जोरदार प्रतिहल्ला केला आणि ७-४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर साक्षीने कुझनेत्सोव्हाला चितपट करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा - आनंदची विजयाची हॅट्ट्रिक :
  • भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील तिसऱ्या फेरीत चीनच्या वांग हाओवर मात केली. पाच वेळा विश्वविजेत्या आनंदचा हा सलग तिसरा विजय ठरला.

  • ५२ वर्षीय आनंदने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्ह आणि व्हेसेलिन टोपालोव्ह यांचा पराभव केला होता. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री झालेली आनंद आणि हाओ यांच्यातील तिसऱ्या फेरीची नियमित लढत ३९ चालींअंती बरोबरीत संपली. मग अर्मागेडन डावात आनंदने ४४ चालींमध्ये सरशी साधताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

  • या कामगिरीसह आनंदने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम ठेवले. त्याच्या खात्यावर ७.५ गुण आहेत. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो (६ गुण) आणि नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन (५.५ गुण) गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

मुखपट्टी न वापरल्यास विमान प्रवासास बंदी; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश :
  • विमानतळ आणि विमानात मुखपट्टीचा वापर आणि अन्य करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. ते पुन्हा  उद्भवू पाहते आहे. अशा परिस्थितीत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दंड वसूल करावाच, शिवाय अशा लोकांना विमान प्रवासास प्रतिबंध असलेल्यांच्या (नो फ्लाय) यादीत टाकावे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

  • विमान प्रवासात नियमांचे पालन होत नाही, असे वारंवार दिसते. त्यामुळेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि अन्य विभागांनी नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी कार्यवाही करावी. विमानतळ आणि विमानात मुखपट्टीचा वापर आणि हात स्वच्छ करण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार वैमानिक, हवाई सुंदरी आणि अन्य कर्मचाऱ्यांना मिळावेत यासाठी ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना नव्याने सक्तीचे आदेश द्यावेत, असे  प्रभारी मुख्य न्यायमूर्ती बिपीन संघी आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या पीठाने सूचविले.

  • नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने १० मे रोजी करोना नियमांचे कठोर पालन करण्याबाबत अन्य एक आदेश जारी केला होता, अशी बाजू ‘डीजीसीए’च्या वकील अंजना गोसाई यांनी मांडली.  करोना संसर्ग झाल्याने त्या दूरचित्रसंवादाद्वारे  सुनावणीत सहभागी झाल्या.

  • ‘नियम आहेत, पण अंमलबजावणी होत नाही’ - ‘‘ करोना संदभातील नियम पूर्वीपासून आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही, ही समस्या आहे.’’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या १८ जुलैला होणार आहे.  न्यायालयाने हा आदेश एका जनहित याचिकेवर दिला. ही याचिका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांच्या ५ मार्च २०२१ रोजी कोलकाता ते नवी दिल्ली दरम्यानच्या विमान प्रवासातील अनुभवावर आधारीत आहे. विमानांत प्रवासी मुखपट्टीचा वापर करीत नाहीत, असे त्यांना दिसले होते.

आता स्टेशन चुकणार नाही! रेल्वेनं प्रवाशांसाठी सुरू केली ‘ही’ खास सेवा :
  • रेल्वेचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर मानला जातो. त्यातच भारतीय रेल्वे प्रवाशांना सतत वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देत असून त्यात नवीन अपडेट करत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे तुम्ही स्टेशन चुकण्याची चिंता न करता ट्रेनमध्ये आरामात झोपू शकता. रेल्वे तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या २० मिनिटे आधी उठवेल. यामुळे तुमचे स्टेशन चुकणार नाही आणि तुम्ही झोप देखील पूर्ण करू शकाल. रेल्वेच्या या खास सुविधेबद्दल जाणून घेऊया.

  • रेल्वेच्या या विशेष सेवेचे नाव ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ असे आहे. ट्रेनने प्रवास करते वेळी अनेकांना झोप येते आणि यामुळे त्यांचे स्टेशन चुकते. असा प्रकार सहसा रात्रीच्या प्रवासादरम्यान होतो. या समस्येवर मात करण्यासाठी ही सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने १३९ क्रमांकाच्या चौकशी सेवेवर ही सुविधा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी चौकशी प्रणाली क्रमांक १३९ वर अलर्ट सुविधा मागू शकतात.

  • ट्रेनमधील प्रत्येक प्रवासी या विशेष सेवेचा लाभ घेऊ शकतो. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असेल. या सेवेसाठी रेल्वेकडून केवळ तीन रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तुम्ही ही सेवा घेतल्यास, तुमच्या स्टेशनच्या २० मिनिटे आधी तुमच्या फोनवर अलर्ट पाठवला जाईल. जेणेकरून तुम्ही तुमचे सामान वगैरे व्यवस्थित ठेवून स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरू शकता.

तुम्ही अशा प्रकारे ही सेवा सुरू करू शकता :

  • ‘डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म’ सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांना IRCTC हेल्पलाइन १३९ वर कॉल करावा लागेल.
  • कॉल आल्यावर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. डेस्टिनेशन अलर्टसाठी आधी ७ नंबर आणि नंतर २ नंबर दाबावा.
  • त्यानंतर प्रवाशांकडून १० अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल.
  • पीएनआर प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला पुष्टी करण्यासाठी १ नंबर डायल करावा लागेल.
  • या प्रक्रियेनंतर, सिस्टम PNR नंबरची पडताळणी करेल आणि वेकअप अलर्ट फीड करेल.
  • त्याचा पुष्टीकरण एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर प्राप्त होईल.

 

०४ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.