टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे
देशाच्या राजकारणाची दिशा तुष्टीकरणाकडून तृप्तीकरणाकडे नेण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याबरोबरच देशभर ‘स्नेहयात्रा’ काढण्याची सूचना मोदींनी केली. काँग्रेस २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे हे मोठे पाऊल मानले जात़े
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या राजकीय प्रस्तावात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका करण्यात आली. हाच धागा जोडून घेत मोदींनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात, नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा मुद्दा मांडला. बहुसंख्यच नव्हे तर, अन्य समाजाशीही भाजपने समन्वय साधला पाहिजे, त्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवली पाहिजे. स्नेहयात्रा ही सद्भावना यात्रा असली पाहिजे, असा संदेश मोदींनी भाजपच्या कार्यकारिणीतील सदस्यांना दिला.
हैदराबादमधूनच सरदार पटेलांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचा पाया रचला होता. भारत एक आहे, आता श्रेष्ठ बनवण्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी जनतेचे हित आणि सुशासन हा द्वीसूत्री कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्याद्वारे ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चे ध्येय गाठायचे आहे म्हणजेच देशाला तृप्तीकरणाकडे घेऊन जायचे आहे, असे मोदींनी स्पष्ट केल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेससारखे काही पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत पण, त्यावर भाजपने हास्य वा व्यंग करू नये. त्यांच्या चुका भाजपने करू नयेत. काँग्रेससारख्या पक्षांच्या घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. २००४ ते २०१४ हा दहा वर्षांचा धोरणलकव्याचा, भ्रष्टाचाराचा काळ भाजपने आणि देशानेही विसरू नये, असेही मोदी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ पर्यंत ईशान्य भारतातील सर्व प्रश्न सोडवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते हैदराबादमधील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राजकीय विषयांवर बोलत होते. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अमित शाह यांनी ईशान्य भारतात आता आगामी काळात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत, असंही सांगितल्याचं शर्मा यांनी नमूद केलं. ते रविवारी (३ जुलै) हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, “२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ईशान्य भारतात विकास कामांना गती मिळाली आहे. ईशान्य भारतातील ६० टक्के भागातून अफ्स्पा कायदा (AFSPA Act) हटवण्यात आला आहे. केंद्र सरकारने नागालँडमधील ७ जिल्ह्यांमधील १५ पोलीस स्टेशनच्या परिसरातून अफ्स्पा कायदा हटवला आहे. मणिपूरच्या ६ जिल्ह्यातील १५ पोलीस स्टेशनच्या भागातूनही अफ्स्पा हटवला आहे. याशिवाय आसाममधील २३ जिल्ह्यांमधून पूर्णपणे आणि एका जिल्ह्यातून काही प्रमाणात हा कायदा हटवला. आगामी काळात या भागात कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.”
“मोदींविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं” - अमित शाह यांनी गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं मत व्यक्त केलं. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं या निर्णयाने सिद्ध केलं. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, असाही आरोप अमित शाह यांनी केला.
व्यायामशाळा, निर्जन कारखाने, खाणी, शाळा, जुने वायुनिर्मिती प्रकल्प अशा विचित्र ठिकाणांनाच रंगमंच करून तेथे नाटक सादर करण्याची किमया साध्य केलेले आणि जगातील सर्वात प्रयोगशील नाटय़दिग्दर्शकांपैकी एक असलेले पीटर ब्रुक यांचे शनिवारी पॅरीस येथे देहावसान झाले. ते ९७ वर्षांचे होते.
ब्रुक यांनी शेक्सपियरच्या आव्हानात्मक नाटकांपासून ते महाभारताच्या नाटय़रूपांतरापर्यंतच्या प्रयोगांसाठी ‘रिकाम्या जागां’चा रंगमंच म्हणून वापर करण्याचा अफलातून आविष्कार घडवला. त्यांनी शहरांतील व्यायामशाळा, विद्यालये, कारखाने, खाणी, इतकेच नाही तर जुने वायुनिर्मिती प्रकल्प या ठिकाणांचा वापर रंगमंच म्हणून केला.
१९७० मध्ये शेक्सपियरच्या ‘ए मिडसमर नाईटस् ड्रीम’च्या प्रयोगात संपूर्ण पांढऱ्या रंगाचे नेपथ्य आणि चमकदार रेशमी वेशभूषेतील कलावंतांनी सर्कशीतील
प्लेट-स्पिनिंग कौशल्याचा वापर करून घडवलेला अफलातून नाटय़ाविष्कारामुळे ब्रुक यांचे नाटय़ेतिहासातील स्थान निश्चित झाले. या नाटकाचे नेपथ्य सॅली जेकब्स यांनी केले होते. सुंदर जंगल आणि अथेनियन कोर्टच्या पारंपरिक ‘ड्रीम सेट’ची जागा ब्रुक यांच्या कल्पनेतून आलेल्या पांढऱ्या रंगातील नेपथ्याने घेतली.
ब्रुक यांचा नाटय़वर्तुळात दरारा होता, मात्र त्यांनी व्यावसायिकता नाकारल्यामुळे ते या क्षेत्रात लौकिकार्थाने कमी प्रसिद्ध होते. सतत नवकल्पनांच्या शोधात असलेल्या ब्रुक यांनी आणखी काहीतरी वेगळे करण्यासाठी देश सोडला. १९७० मध्ये ब्रिटन सोडून ते पॅरिसमध्ये दाखल झाले. तेव्हापासून ते तेथेच होते. ‘ल मॉँद’ या फ्रेन्च वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ब्रुक १९७४ पासून फ्रान्समध्ये होते आणि शनिवारी पॅरिसमध्ये ते निवर्तले. ते नव्वदीतही सक्रिय होते.
प्रकाश, शब्द, इम्प्रोव्हायझेशन आणि अभिनय यांच्या संपूर्ण हुकूमतीवर रिकाम्या जागांचे रूपांतर रंगमंचात करता येऊ शकते, या विश्वासातून ब्रुक यांनी अनेकदा पारंपरिक रंगमंचांपासून अंतर राखले. ‘‘मी कोणत्याही रिकाम्या जागेला रंगमंच म्हणू शकतो,’’ असे ब्रुक यांनी १९६८ मध्ये लिहिलेल्या ‘द एम्प्टी स्पेस’ या अफलातून पुस्तकात लिहून ठेवले आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. या निवडणुकीत नार्वेकर यांना १६४ मते मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या सत्तासंघर्षांत भाजप व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला. यामुळे सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिली.
आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन आमदार तटस्थ राहिले. निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी नेते अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले व शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी सन्मानपूर्वक नार्वेकर यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले. आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भूषविलेल्यांमध्ये नार्वेकर हे सर्वात तरुण आहेत. राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे नार्वेकर हे १६वे अध्यक्ष आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर नार्वेकर यांनी सर्वाचे आभार मानले व सर्वाना समान न्याय देण्याची ग्वाही दिली. संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या महाराष्ट्र विधानसभा या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्दल सर्वाचे आभार मानताना, सभागृहातील कामकाजाचा क्षण आणि क्षण शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी खर्च करू, असेही त्यांनी सांगितले. विधानमंडळ हे राज्यातील तेरा कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. लोकप्रतिनिधींमार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतिमान राहणे आवश्यक आहे. मात्र सभागृहात विधेयके चर्चेविना संमत होणे अयोग्य असून सभागृहात दर्जेदार चर्चा व्हावी, परिणामकारक वैधानिक कामकाज होण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक िनबाळकर हे नार्वेकर यांचे सासरे. यामुळेच राज्यातील उभय सभागृहांच्या पीठासीन अधिकारीपदी सासरे व जावयाची जोडी काम करणार आहे. सासरे-जावई जोडीचा अनेकांनी उल्लेख केला.
पिछाडीवरुन पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धचा ब-गटातील सलामीचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. इंग्लंडकडून इसाबेला पीटरने नवव्या मिनिटाला, तर भारताकडून वंदना कटारियाने २८व्या मिनिटाला गोल केला.
भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही. यानंतर पीटरने भारताच्या बचाव फळीला चकवत चेंडू गोल जाळय़ात मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मग २८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी कटारियाने संधीचा फायदा घेत गोल करताना भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
भारताने अखेरच्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न वाढवले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आता भारताचा पुढील सामना मंगळवारी चीनशी होणार आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.