चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ ऑक्टोबर २०२०

Date : 31 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही; अलाहाबाद न्यायालयाचा मोठा निर्णय :
  • धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला. दरम्यान, यावेळी न्यायालयानं जोडप्याची याचिकेदेखील फेटाळून लावली. तसंच यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना संबंधित दंडाधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्याची सूट दिली आहे.

  • याचिकाकर्त्याने कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांपैकी एक व्यक्ती हिंदू आणि दुसरी व्यक्ती मुस्लीम आहे.

  • मुलीनं २९ जून २०२० रोजी हिंदू धर्म स्वीकारला आणि एका महिन्यानंतर ३१ जुलै रोजी विवाह केला. केवळ विवाहासाठी धर्मांतरण करण्यात आल्याचं नोंदींवरून स्पष्ट होत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने नूरजहां बेगम खटल्याच्या निर्णयाचा हवाला दिला, ज्यामध्ये न्यायालयानं विवाहासाठी धर्मांतरण करणं मान्य नसल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणात हिंदू समाजातील मुलीनं धर्मांतरण करून मुस्लीम समजातील मुलाशी विवाह केला होता.

‘आरोग्यसेतु’ची सक्ती जेएनयूकडून रद्द :
  • करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या आरोग्यसेतु उपयोजनाची (अ‍ॅप)  सक्ती येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने रद्द केली आहे. या विद्यापीठाचे विद्यार्थी व कर्मचारी यांना हे उपयोजन भ्रमणध्वनी संचावर वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. पण आता या उपयोजनाचा वापर अनिवार्य नसून ऐच्छिक  असल्याचे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी स्पष्ट केले आहे.

  • २१ ऑक्टोबरला विद्यापीठाच्या प्रशासनाने असा आदेश जारी केला होता की, विद्यार्थी व कर्मचारी यांनी आरोग्यसेतु उपयोजन डाऊनलोड करणे सक्तीचे आहे. पण आता त्यावर दुरुस्तीपत्रक जारी करण्यात आले असून त्यात म्हटल्यानुसार ही सक्ती रद्द करण्यात आली आहे. याबाबत असा दावा करण्यात आला होता की, आरोग्यसेतु उपयोजनाला कायद्याचा कुठलाही आधार नसून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आवारात खुलेपणाने फिरण्याचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

  • आरोग्यसेतू उपयोजनेच्या सक्तीला विरोध करणारे वकील चिंतन निराला यांनी म्हटले आहे की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ही केंद्र सरकारची शैक्षणिक संस्था आहे.  १९६६ च्या कायद्यानुसार या संस्थेला काही अधिकार देण्यात आले असले तरी हे विद्यापीठ किंवा त्याचे कुलसचिव यांना आरोग्यसेतु उपयोजनाची सक्ती करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे कुलसचिवांनी हे उपयोजन सक्तीचे करण्याचा जारी केलेला आदेश हा १९६६ मधील कायद्यातील तरतुदीच्या विरोधात जाणारा आहे.

आत्मनिर्भर भारत - भारतीय लष्करानं लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅपसारखं मेसेजिंग अ‍ॅप :
  • आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्करानं व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच एक नवं अ‍ॅप विकसित केलं आहे. लष्करानं विकसित केलेल्या या अ‍ॅपला ‘सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट’ (SAI) असं नाव देण्यात आलं आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एन्ड टू एन्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणं आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देतं. गुरुवारी संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली.

  • “लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेलं हे अ‍ॅप कमर्शिअल मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्राम, संवाद यांच्यासारखंच आहे. हे एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करतं. साई लोकल इन हाऊस सर्व्हर आणि कोडिंगसोबतच सुरक्षेच्या फीचर्सच्या बाबतीत इतर अ‍ॅप पेक्षा उत्तम आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बदलणंदेखील शक्य आहे,” असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं.

  • संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार या अ‍ॅपची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुपच्या पॅनलद्वारे चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, एनआयसीवर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या फायलिंगवरही काम सुरू आहे. याव्यतिरिक्त हे अ‍ॅप iOS प्लॅटफॉर्मवरही आणण्याचं काम सुरू आहे. “साई हे अ‍ॅप संपूर्ण लष्कराद्वारे वापरलं जाणार आहे जेणेकरून या सेवेसह सुरक्षित संदेशांच्या देवाणघेवाणीची सुरूवात होऊ शकेल,” असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रयत्नशील” :
  • “एसटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन दिवाळीपूर्वी देणे ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल,” असे वक्तव्य परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे.

  • “करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. परंतु अशा परिस्थितीतदेखील एसटी सुरू ठेवणे महामंडळाचे कर्तव्य असून घटलेल्या उत्पन्नामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील मिळणे अशक्य झाले आहे,” असे अनिल परब म्हणाले. महामंडळाने राज्य शासनाकडे कर्मचाऱ्यांचे पगार सोबतच एसटीच्या दैनंदिन खर्चासाठी एकूण ३६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

  • परंतु शासनाचेदेखील उत्पन्न कमी झाल्यामुळे केवळ शासनावर अवलंबून न राहता इतर पर्यायांची चाचपणी महामंडळ करत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे महामंडळाची प्राथमिक असून त्यासाठी दर महिन्याला २९२ कोटी रुपयांची आवश्यकता महामंडळाला आहे. एसटीला मिळणारे दैनंदिन २२ कोटी रुपयांचे उत्पन्न लॉकडाऊन काळात पूर्णपणे बंद होते. सध्या हे उत्पन्न ५ ते ६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमित पंघालसह भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत :
  • नँटिस (फ्रान्स) येथे सुरू असलेल्या अ‍ॅलेक्सि व्हॅस्टिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अमित पंघाल (५२ किलो),  कविंदर सिंग बिश्त (५७ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी दिमाखदार विजयांसह अंतिम फेरी गाठली आहे.

  • चार वेळा आशियाई पदक विजेत्या शिवा थापाला (६३ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत लॉनीस हॅम्राओऊने त्याला २-१ असे नामोहरम केले.

  • आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कविंदरने फ्रान्सच्या बेनिस जॉर्ज मेल्कुमियानचा ३-० असा पाडाव केला. जेतेपदासाठी त्याचा फ्रान्सच्या सॅम्युएल किस्तोहरीशी सामना होणार आहे. इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संजीतने अमेरिकेच्या शेरॉड फुल्गमचा २-१ असा पराभव केला. त्याच्यापुढे अंतिम फेरीत सोहेब बॉफियाचे आव्हान असेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितने अमेरिकेच्या ख्रिस्टोफर हेरेराला नमवले.

३१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.