चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 जुलै 2023

Date : 31 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शुबमन गिलने रचला इतिहास! बाबर आझमला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम
  • भारत आणि वेस्ट इंडिज संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी केनिंगस्टन येथे खेळला. ज्यामध्ये वेस्ट इंडिजने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने ३६.४ षटकांत ४ गडी गमावून १८२ धावा केल्या. त्यामुळे संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने एक खास कारनामा केला आहे.
  • टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात गिलने ३४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. शुभमन गिल आता पहिल्या २६ डावांनंतर वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
  • दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात गिलने ४० चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील २६व्या वनडेमध्ये १३५२ धावा पूर्ण केल्या आहेत. २६ डावांनंतर गिल वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आला आहे. या प्रकरणात त्याने पहिल्या २६ डावात १३२२ धावा करणाऱ्या बाबर आझमला मागे टाकले आहे. आता गिल त्याच्याही पुढे गेला आहे.

पहिल्या २६ एकदिवसीय डावांत सर्वाधिक धावा करणारे अव्वल ५ खेळाडू -

  • शुबमन गिल – १२५२ धावा
  • बाबर आझम – १३२२ धावा
  • जोनाथन ट्रॉट – १३०३ धावा
  • फखर जमान – १२७५ धावा
  • रॅशी व्हॅन डर डुसेन – १२६७ धावा
आता ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीम!; हुतात्म्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांची घोषणा
  • ‘‘देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्यदिनापूर्वी ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीम सुरू केली जाईल,’’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक संवाद कार्यक्रमाच्या १०३ व्या भागात बोलताना मोदी म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’चे सर्वत्र वातावरण आहे.
  • १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्रदिन जवळ आला आहे. यानिमित्त देशाच्या हुतात्मा वीर आणि वीरांगनांना अभिवादनासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) ही देशव्यापी मोहीम सुरू केली जाणार आहे. मोदींनी सांगितले, की देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील आणि लाखो ग्रामपंचायतींत विशेष शिलालेखही उभारण्यात येतील. या अभियानांतर्गत देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. देशाच्या गावा-गावातून, कानाकोपऱ्यातून साडेसात हजार कलशांमधून गोळा केलेली माती देशाची राजधानी दिल्लीत आणण्यात येईल. .
  • या यात्रेद्वारे देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ कलशातील माती आणि वृक्षारोपण करून ‘अमृत वाटिका’ उभारण्यात येईल. ही वाटिका ‘एक भारत : श्रेष्ठ भारता’ चे भव्य प्रतीक बनेल.  गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त मी लाल किल्ल्यावरून आगामी २५ वर्षांच्या अमृतकाळासाठी ‘पंच प्रण’विषयी (पाच प्रतिज्ञा) बोललो होतो. ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे पाच प्रतिज्ञांच्या-संकल्पांच्या पूर्ततेसाठी शपथही घेणार आहोत, असे ते म्हणाले. देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाची आपली छबी (सेल्फी) ‘yuva.gov.in’ या संकेतस्थळावर प्रसृत करण्याचेही आवाहन मोदींनी यावेळी देशवासीयांना केले.
  • गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले. ते म्हणाले, ‘‘यावेळी पुन्हा प्रत्येक घरावर तिरंगा फडकावायचा आहे आणि ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला कर्तव्याची जाणीव होईल. स्वातंत्र्यासाठी असंख्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव राहील. स्वातंत्र्याचे मूल्य समजेल. प्रत्येक देशवासीयाने या अभियानात अवश्य सहभागी व्हावे.
सिंगापूरचे सात उपग्रह ‘इस्रो’कडून नियोजित कक्षेत; ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी सिंगापूरच्या सात उपग्रहांना ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले. ‘इस्रो’ने सांगितले, की प्रक्षेपणानंतर सुमारे २३ मिनिटांनी आघाडीचा उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाला. त्यानंतर इतर सहा उपग्रहही आपापल्या कक्षेत स्थिरावले. या महिन्यात बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ‘इस्रो’ची ही आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम होती. ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे (एनएसआयएल) ही मोहीम राबवली गेली.
  • ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले, की प्रमुख उपग्रह ‘डीएस-एसएआर’ आणि इतर सहा उपग्रहांसह सात उपग्रह ‘पीएसएलव्ही-सी५६’द्वारे नियोजित कक्षांत यशस्वीरित्या सोडण्यात आले. शनिवारी सुरू झालेल्या २५ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंच प्रक्षेपक रविवारी सकाळी साडेसहाच्या नियोजित वेळेच्या एक मिनिटानंतर ‘सतीश धवन अवकाश केंद्रा’च्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून (लॉंच पॅड) प्रक्षेपित करण्यात आला. ‘इस्रो’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की हे प्रक्षेपक एका मिनिटानंतर सकाळी सहा वाजून ३१ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. कारण त्याच्या मार्गात अंतराळातील कचरा येण्याची शक्यता होती.

आणखी एक मोहीम

  • डॉ. सोमनाथ यांनी नियंत्रण कक्षातून सांगितले, की ‘एनएसआयएल’साठी हे ध्रूवीय उपग्रह प्रक्षेपक (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल- ‘पीएसएलव्ही’) प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आमच्या या प्रक्षेपकावर विश्वास दाखवल्याबद्दल मी सिंगापूर सरकारने प्रायोजित केलेल्या ग्राहकांचे आभार मानतो. आम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आणखी एक ‘पीएसएलव्ही’ मोहीम राबवणार आहोत.
Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी कराराचं महत्त्व
  • एखाद्या विमा कंपनीकडून आयुर्विमा पॉलिसी घेताना इच्छुक विमेदार विमा कंपनी बरोबर जो करार करतो, तो आयुर्विमा करार. आता आयुर्विमा कराराची थोडीशी शास्त्रशुद्ध व्याख्या करावयाची झाली तर असं म्हणता येईल की ‘विमा करार हा विमेदार आणि विमा कंपनी यांच्यातील असा करार असतो, ज्याद्वारे एक पक्ष (विमा कंपनी) दुसऱ्या पक्षाने (विमेदाराने) दिलेल्या मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास (विमेदारास) करारात नमूद केल्याप्रमाणे आर्थिक नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई देण्याचे आश्वासन देत असतो.
  • मुळात हा ‘करार’ असल्यामुळे भारतीय करार कायद्यातील तरतुदी इथेही लागू होतात. म्हणजेच विमा करारात सुद्धा

-प्रस्ताव (Proposal)
-स्वीकृती (Acceptance)
‌-प्रतिफल (Consideration)
-कायदेशीर उद्दिष्ट (Legal object)
-करार पात्रता (Capacity to contract)

इत्यादी गोष्टी आवश्यक असतात.

  • विमा कराराची सुरुवात अर्थातच प्रस्तावाने होते. जाहिराती पाहून, इंटरनेटवरील माहिती मिळवून, एजंटाशी चर्चा करून अशा विविध मार्गाने विमा इच्छुक व्यक्ती विमा योजनेबाबत माहिती मिळविते आणि आपला प्रस्ताव (प्रपोजल फॉर्म) विमा कंपनीकडे (वयाचा दाखला आणि प्रथम प्रीमियमच्या रक्कमेसहित) दाखल करते. आता हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, स्वीकारायचा असेल तर तो नेहमीच्या अटी, शर्ती प्रीमियम नुसार की त्यासाठी काही ज्यादा प्रीमियम आकारायचा याचा विमा कंपनी अभ्यास करते.
IPL 2024 चा हंगाम विदेशात होणार? जाणून घ्या काय आहे कारण
  • क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलबाबत एक मोठी बातमी आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ लवकरच आयोजित केली जाऊ शकते. एका अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा हंगाम परदेशातही होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहिती नुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएल २०२४ चे आयोजन करू शकते. त्यासाठी लवकरच खिडकीचा शोध घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. आयपीएल २०२४ मार्चमध्ये आयोजित केले जाऊ शकते. त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. पण सध्या संपूर्ण लक्ष २०२३ च्या विश्वचषकावर आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जाईल.
  • बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “होय, आम्हाला पुढील आयपीएलमध्ये येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. आमच्याकडे जूनमध्ये इंग्लंडची मालिका आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका तसेच विश्वचषक आहे. पण आता काहीही नियोजन करणे खूप घाईचे आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनाकडे आपल्या सर्वांचे लक्ष आहे. डिसेंबर-जानेवारीमध्येच कोणताही निर्णय घेतला जाईल.”

31 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.