चालू घडामोडी आणि दिनविशेष - 31 जानेवारी 2024

Date : 31 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
क्रिकेटपटू दीप्ती शर्माचा गौरव; योगी सरकारकडून पोलीस दलातील ‘हे’ पद बहाल
 • भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आग्रा येथील या क्रिकेटपटूला यूपी पोलिसात डीएसपी पद देण्यात आले आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर दीप्तीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महिला क्रिकेटचाही महत्त्वाचा वाटा होता.

दीप्तीला मिळाले डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र -

 • आग्राच्या अवधपुरी भागात राहणाऱ्या दीप्ती शर्माचा उत्तर प्रदेश सरकारकडून सत्कार करण्यात आला आहे. तिने अष्टपैलू कामगिरीने मिळवलेल्या यशाचे उत्तर प्रदेश सरकारने कौतुक केले. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी तिचा गौरव केला. यावेळी दीप्तीला तीन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आणि डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द करताना त्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 • गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी २०२३ मध्ये दीप्तीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रौप्य पदकही जिंकले होते. दीप्तीने भारतीय महिला संघाला एकदाच नव्हे तर अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे.
 • दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या नवीन आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचबरोबर तिची सहकारी गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिनेही एका स्थानाचा फायदा घेतला असून ती गोलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फिरकीपटू नॉनकुलुलेको लाबाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीचा दीप्तीला फायदा झाला. लाबाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यात केवळ एक विकेट घेतली होती. यामुळे ती तीन स्थानांनी घसरली आणि दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर गेली.
केंद्र-राज्यांच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विसंगती
 • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असा दावा राज्य शासन सातत्याने करीत असते. संपूर्ण राज्य आता या योजनेचे लाभार्थी असल्याचा ढोलही बडवला जातो. परंतु, केंद्राच्या अखत्यारितील ‘एम्स’ रुग्णालयात या योजनेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. नागपूर ‘एम्स’ने या योजनेअंतर्गत मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या डायलेसिसची संख्या परस्पर घटवल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
 • नागपूर ‘एम्स’मधील तीन रुग्णांचे डायलेसिस थांबल्यावर याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी ९९६ व्याधींवरील उपचारांचा समावेश होता. नंतर त्यात २१३ नव्या व्याधींवरील उपचारांची भर पडल्याने आता एकूण १ हजार २०९ व्याधींवर उपचार होतो. या योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. यात मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायलेसिसचाही समावेश आहे. दरम्यान, डायलेसिस सुरू असलेल्या रुग्णांवर ४२ दिवसांत १८ डायलेसिस व्हावे याकरिता या योजनेद्वारे १९ हजार ८०० रुपयांचे पॅकेज मंजूर केले जाते. त्यानुसार नागपुरातील राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह लता मंगेशकर रुग्णालय आणि इतर काही खासगी रुग्णालयांत डायलेसिस होतात. परंतु केंद्राच्या अखत्यारित असलेल्या एम्सने या पॅकेजमध्ये इतके डायलेसिस देणे शक्य नसल्याचे सांगत परस्पर डायलेसिस कमी केले.
 • आधी ही संख्या १२ वरून आठवर आणि नंतर चक्क सहापर्यंत खाली आणण्यात आली. त्यामुळे जास्त डायलेसिसची गरज असलेल्या रुग्णांवरील उपचार अचानक थांबले. काही रुग्णांनी याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील अधिकाऱ्यांकडे मदत तक्रारी केल्या. एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर अशा तक्रारी आल्याचे मान्य केले. त्यामुळे एम्सला खुलासा मागण्यात आला व सोबतच परस्पर डायलेसिस थांबवता येत नसल्याचेही बजावण्यात आले. थांबवलेले डायलेसिस तत्काळ सुरू न केल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला. या पत्रानंतर तरी एम्स डायलेसिसची संख्या पूर्ववत करेल की नाही, याकडे गरीब रुग्णांचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीला पहिला धक्का; चंदीगडच्या महापौरपदी भाजपाच्या उमेदवाराचा विजय
 • मंगळवारी झालेल्या चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मनोजकुमार सोनकर यांचा विजय झाला आहे. इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक होती. या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. भाजपाच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांचा पराभव केला.
 • पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि प्रचंड वादानंतर चंदीगड महापौर पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्याने भाजपाचा विजय झाला आहे. या निवडणुकीला इंडिया आघाडीचं लिटमस टेस्ट म्हटलं जात होतं. यातच पहिल्याच इंडिया आघाडीच्या निवडणुकीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.
 • महापालिकेचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु, उपायुक्त आणि भाजपचे काही नगरसेवक उशिरा आल्याने मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्यास तासभर उशीर झाला.
 • खासदार किरण खेर सभागृहाची पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांनी प्रथम मत दिले. त्यानंतर तासभर चाललेल्या या प्रक्रियेत एकूण ३६ मते पडली. यापैकी आप आणि काँग्रेसला मिळून २० मते मिळाली. तर, भाजपाला १५ मते मिळाली. तर, एक मत खेर यांच्याकडे होतं.
 • सुरुवातीला १८ जानेवारी रोजी होणारी निवडणूक पीठासीन अधिकारी आजारी पडल्याने ६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या स्थगितीबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाने ३० जानेवारी रोजी मतदान घेण्याचे निर्देश दिले.

 

Australian Cricket ने जाहीर केले अवॉर्ड्स; वॉर्नर-स्टॉइनिसला मिळाला मोठा पुरस्कार, पाहा सर्व विजेत्यांची लिस्ट
 • सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. सिडनी येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला. डॅशिंग अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसची पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड म्हणून निवड करण्यात आली.
 • वॉर्नरने तिसऱ्यांदा पुरुषांचा वनडे प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे. ३६ वर्षीय वॉर्नर मतदानाच्या काळात ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ४२.४६च्या सरासरीने ५५२ धावा केल्या. ज्यात चार अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. त्याने एमसीजी येथे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १०६ धावा केल्या होत्या. जवळपास तीन वर्षांतील त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते.
 • स्टॉइनिसने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. ३३ वर्षीय खेळाडूने ३१.५४च्या सरासरीने आणि १६८.५च्या स्ट्राइक रेटने ३४७ धावा केल्या. शिवाय ८ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा स्टॉइनिस हा ऑस्ट्रेलियने खेळाडू ठरला. पर्थ स्टेडियमवर त्याने श्रीलंकेविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
 • त्याच वेळी, बेथ मुनी महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर ठरली. मतदानाच्या काळात ५९४ धावा केल्याबद्दल मुनीने हा पुरस्कार पटकावला. तिने वर्षातील महिला वनडे प्लेयर ऑफ द इयर खेळाडूच्या शर्यतीत मॅग लॅनिंगला केवळ एका मताने पराभूत केले. मूनी यांना २५ तर लॅनिंग यांना २४ मते मिळाली. ताहलिया मॅकग्राला महिला टी-२० आंतरराष्ट्रीय प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. मॅकग्राने गेल्या वर्षी १६ सामन्यांत ६२.१४ च्या सरासरीने ४३५ धावा केल्या होत्या. २७ वर्षीय खेळाडूने २०२२ मध्ये १३ विकेट्सही घेतल्या होत्या.
उच्च शिक्षणात मागासवर्गीय टक्का वाढला ; ‘एआयएसएचई’च्या अहवालातील निष्कर्ष
 • देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासावर्गीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१४-१५ ते २०२०-२१ दरम्यान वाढत असल्याचा निष्कर्ष उच्च शिक्षणाबाबत सर्वेक्षण करणाऱ्या ‘एआयएसएचई’ या संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या काळात ४७ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
 • केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, २०२०-२१मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या ४ कोटी १३ लाख विद्यार्थ्यांमध्ये १४.२ टक्के विद्यार्थी अनुसूचित जातीचे असून ५.८ टक्के विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या ३५.८ टक्के इतकी असून एकत्रितपणे मागास विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५.८ इतके आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २०१९-२०च्या तुलनेत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे ओढा २०१४-१५ पासून वाढत असून हे प्रमाण २७.९६ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
 • अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील संख्या २०१९-२०मध्ये २१.६ लाख इतकी होती. ती २०२०-२१मध्ये २४.१ लाखांवर पोहोचली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१४-१५ पासून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात ४७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
 • केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २०११पासून ‘एआयएसएचई’ अहवाल तयार करण्यात येतो. त्यामध्ये  विद्यार्थी नोंदणी, शिक्षण माहिती, पायाभूत दर्जा, आर्थिक स्थिती आदी निकषांवर माहिती गोळा करण्यात येते. २०२०-२१च्या अहवालात प्रथमच उच्च शिक्षण संस्थांनी या सर्वेक्षणासाठी संकेतस्थळावर माहिती जमा केली आहे.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा : खेळाडूंनी सकारात्मक वातावरणाचा लाभ घ्यावा -अनुराग ठाकूर

 • गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडा वातावरण बदलले आहे. खेळाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. खेळाडूंना काही कमी पडणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, आता चमकदार कामगिरी करण्याची वेळ तुमची असल्याचे सांगत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना साद घातली.
 • खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचे भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात शानदार सोहळय़ात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. यावेळी राज्याच्या  क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया, केंद्रीय क्रीडा व युवक खात्याचे राज्यमंत्री नितीश प्रमाणिक हे उपस्थित होते.
 • खेळाडूंना मार्गदर्शन करतानाच ठाकूर यांनी गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. गेल्या वर्षी स्पर्धेत नोंदविण्यात आलेले सर्व १२ विक्रम हे मुलींनी नोंदवले होते. आता मुलींनी मागे वळून न बघता पुढे जायला हवे आणि मुलांनी आपली कामगिरी विक्रमापर्यंत उंचवावी, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील क्रीडाप्रेमी आहेत. देशातील खेळाडूंशी ते सातत्याने संपर्क साधत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही भारत भरारी घेत आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या पाच वर्षांत केंद्र शासनाने अतिशय मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. भविष्यात भारताला क्रीडा ताकद करणे आता तुमच्या हातात आहे, असे सांगून ठाकूर यांनी खेळाडूंना प्रेरित केले.
 • उद्घाटन सोहळय़ात अविनाश साबळे व निखहत झरीन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचे भारतीय उपखंडात परिणाम शक्य ; तज्ज्ञांचे मत

 • झपाटय़ाने कमी होणारा विदेशी चलनाचा साठा, ऊर्जेचे देशव्यापी संकट, सरकारी अन्नधान्य वितरण केंद्रांवरील चेंगराचेंगरी आणि गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरलेला पाकिस्तानी रुपया, या घटकांमुळे पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिकदृष्टय़ा गर्तेत जात असून, याचे भारतीय उपखंडात गंभीर परिणाम होऊ शकतील, असे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे.
 • या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, शाहबाझ शरीफ सरकार ‘बेल-आऊट पॅकेज’साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी मंगळवारी  वाटाघाटी सुरू करणार असून,  पाकिस्तानवर कठोर आणि संभाव्य राजकीदृष्टय़ा धोकादायक अशा पूर्वअटी लादल्या जाऊ शकतील, असे या तज्ज्ञांनी सांगितले.
 • पाकिस्तानातील अस्थैर्याचा परिणाम म्हणून या भागात वाढणाऱ्या दहशतवादाचाच केवळ भारताला धोका नाही, तर बाह्य शत्रूवर लक्ष केंद्रित करून देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्नही पाकिस्तान करू शकतो.
 • ‘पाकिस्तानातील सध्याच्या आर्थिक संकटातून राजकीय संकट जन्म घेत आहे. पैसा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्या अटी घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच काही काळासाठी त्रास सहन करावा लागेल आणि त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतील’, असे भारताचे पाकिस्तानातील माजी राजदूत टीसीए राघवन म्हणाले.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ जानेवारी २०२२
अद्भुत, अविश्वसनीय, असामान्य…; राफेल नदालचे विक्रमी २१वे ग्रँड स्लॅम :

वय वर्षे ३५, त्यात ऑस्ट्रेलियन स्पर्धेत यापूर्वीचे अजिंक्यपद १३ वर्षांपूर्वी मिळवलेले आणि अंतिम सामन्यात आपल्यापेक्षा युवा, तडफदार प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सेटची पिछाडी… प्रतिकूल वाटणारे असे अनेक अडथळे धुळीला मिळवत स्पेनच्या राफेल नदालने रविवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी २१व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदावर दिमाखात नाव कोरले.

त्याचबरोबर, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या पुरुषांच्या टेनिसमधील महान त्रिमूर्तीमध्ये आकडेवारीच्या निकषावर त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले.

नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत विसावे ग्रँड स्लॅम जिंकले. यानंतर दुखापती, करोनामुळे सराव आणि सहभागावर येत असलेल्या मर्यादा आणि वाढते वय अशा विविध कारणांमुळे नदालची वाटचालही फेडररप्रमाणेच २० अजिंक्यपदांपाशी थबकली असे वाटत होते.

अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द दाखवत त्याने त्याच्या दृष्टीने सर्वाधिक खडतर ठरत आलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावून दाखवलेच. पण, त्याचबरोबर जोकोविचसह अनेक युवा आणि गुणवान प्रतिस्पध्र्यांच्या गर्दीत आपण हरवलेलो नाही आणि हरलेलोही नाही, याचा जणू खणखणीत पुरावाच नदालने सादर केला.

ओदिशा खुली बॅडमिंटन स्पर्धा - उन्नती, किरण यांना जेतेपद :

किशोरवयीन उन्नती हुडा आणि बिगरमानांकित किरण जार्ज या भारतीय खेळाडूंनी रविवारी ओदिशा खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरले.

जवाहरलाल नेहरू बंदिस्त स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत १४ वर्षीय उन्नतीने भारताच्याच स्मित तोश्निवालला २१-१८, २१-११ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. सुपर १०० दर्जाची स्पर्धा जिंकणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरली. उपांत्य फेरीत तिने मालविका बनसोडला नमवले होते.

पुरुषांच्या अंतिम फेरीत किरणने भारताचा प्रियांशू राजावतला २१-१५, १४-२१, २१-१८ असे तीन गेममध्ये पराभूत केले. ५८ मिनिटांपर्यंत रंगलेली ही लढत जिंकून किरणने कारकीर्दीतील पहिले जेतेपद मिळवले. याव्यतिरिक्त ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांच्या जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत संयोगिता घोरपडे-श्रुती मिश्रा जोडीचा २१-१२, २१-१० असा धुव्वा उडवून जेतेपदावर मोहोर उमटवली.

मिश्र दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि जॉली यांना पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत रवीकृष्ण आणि शंकर प्रसाद यांनाही अंतिम फेरीत विजयाने हुलकावणी दिली.

देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र होणार स्पष्ट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार जाणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल :

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमपासून सुरू होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र स्पष्ट करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.

चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक सर्वेक्षण करोनाच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग स्पष्ट करेल. आर्थिक सर्वेक्षण सर्वेक्षण हा चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असेल आणि यामध्ये देशाचा जीडीपी नऊ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाचे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

एच- १ बी व्हिसासाठी नोंदणी १ मार्चपासून :

अमेरिकेत सन २०२३ साठी एच- १ बी व्हिसा मिळविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे. पात्र अर्जदारांमधून निवड झालेल्यांची यादी ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन प्रसिद्ध केली जाईल, असे अमेरिकेच्या फेडरल इमिग्रेशन एजन्सीने स्पष्ट केले आहे.

एच -१ बी व्हिसा हा नॉन इमिग्रंट व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सैद्धांतिक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या विशेष पदांवर परकीय व्यक्तींची नोकरभरती करता येते. दरवर्षी भारत आणि चीनसारख्या देशांमधून अशा हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसावर अवलंबून असतात. 

यासंदर्भात यूएस सिटिझनशिप अ‍ॅन्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस ( यूएससीआयएस)ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२३ वर्षाच्या एच-१ बी कॅपसाठी प्रारंभिक नोंदणीचा कालावधी हा १ मार्चपासून सुरू होईल. तो  १८ मार्च २०२२ पर्यंत राहील.  या कालावधीत इच्छुक अर्जदार आणि त्यांच्या प्रतिनिधींना ऑनलाइन नोंदणी प्रणालीद्वारे सोपस्कार पूर्ण करता येतील. 

जर १८ मार्चपर्यंत  पुरेसे अर्ज आले, तर पात्र अर्जदारांतून यादृच्छिकपणे (रॅन्डमली) निवड केली जाईल.

संबंधितांना तसा ऑनलाइन संदेश पाठविला जाईल, असे यूएससीआयएसने स्पष्ट केले आहे.

लसीमुळे कोविड १९ सह ‘या’ २१ आजारांपासून संरक्षण, WHO चं लसीकरणासाठी आवाहन :

जगभरात करोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे. करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत.

मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लसींबाबत जनजागृती करत आतापर्यंत लसीमुळे संरक्षण मिळालेल्या एकूण २१ आजारांची माहिती दिली आहे. तसेच सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन केलंय.

व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.

समान कामासाठी समान वेतन; हे सरकारचं घटनात्मक उद्दिष्ट - सर्वोच्च न्यायालय :

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या एका निकालामध्ये असं म्हटलं आहे की समान कामासाठी समान वेतन हे सरकारचं घटनात्मक उद्दिष्ट आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि बेला एम. त्रिवेदी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की पद आणि वेतनश्रेणीचे समीकरण हे न्यायपालिकेचे नसून कार्यपालिकेचे प्राथमिक कार्य आहे. त्यामुळे सामान्यत: न्यायालये नोकरीच्या मूल्यमापनाच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत जे सामान्यत: वेतन आयोगासारख्या तज्ञ संस्थांवर सोपवले जाते, असे न्यायालयाने नमूद केले.

खंडपीठाने म्हटले, कारण अशा नोकरीच्या मूल्यांकनामध्ये विविध घटकांचा समावेश असू शकतो, ज्यामध्ये संबंधित डेटा आणि कर्मचाऱ्यांच्या विविध गटांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी स्केल यांचा समावेश असू शकतो.असे मूल्यांकन आर्थिक परिणामांशिवाय कठीण आणि वेळखाऊ दोन्ही असेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जोपर्यंत एखाद्या पदासाठी वेतनश्रेणी निश्चित करताना गंभीर त्रुटी झाल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी ठोस सामग्री उपलब्ध नाही आणि अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयाचा हस्तक्षेप अत्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत न्यायालय अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांना सामोरे जाण्यास सक्षम असेल.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) म्हणून काम करणार्‍या व्यक्तीच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्याच्या याचिकेला परवानगी देणार्‍या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या अपीलाच्या सुनावणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, रिट याचिका तसेच पुनर्विलोकन याचिकेत दिलेल्या आदेशांमध्ये समान कामासाठी समान वेतन हे तत्त्व लागू करून उच्च न्यायालयाने स्वतःला पूर्णपणे चुकीची दिशा दिली आहे.

31 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.