चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० नोव्हेंबर २०२१

Date : 30 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाळा उद्यापासूनच - मुलांना टप्प्याटप्प्याने प्रवेश; शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना :
  • करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे राज्यातील प्राथमिक शाळा बुधवार, १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी शाळा नियोजित तारखेलाच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने सोमवारी स्पष्ट केले.

  • याबाबत आरोग्य विभागापाठोपाठ शिक्षण विभागानेही मार्गदर्शक सूचनाही प्रसृत केल्या असून, गर्दी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत.

  • सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता.

  • आरोग्य विभागाने आणि डॉक्टरांच्या कृतिगटाने त्यास मंजुरी दिली होती. मात्र, ओमायक्रॉनच्या भीतीमुळे प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही, असा प्रश्न निर्माण झाला.

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा - भारताचा रामनाथन अजिंक्य :
  • भारताच्या रामकुमार रामनाथनने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पहिलेवहिले जेतेपद पटकावले. त्याला या जेतेपदासाठी कारकीर्दीत तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली.

  • सहाव्या मानांकित रामकुमारने मनामा येथे झालेल्या स्पर्धेतील (एटीपी ८० दर्जा) एकेरीच्या अंतिम सामन्यात रशियाच्या एव्हग्नी कार्लोव्स्कीला ६-१, ६-४ अशी धूळ चारली. त्याला याआधी कारकीर्दीत सहा वेळा चॅलेंजर स्पर्धाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २७ वर्षीय रामकुमारने मनामा येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र उत्कृष्ट खेळ केला.

  • त्याच्या आक्रमक सव्‍‌र्हिसचे कार्लोव्स्कीला प्रत्युत्तर देता आले नाही. त्यामुळे पहिला सेट त्याने ६-१ असा मोठय़ा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कार्लोव्स्कीने खेळात सुधारणा केली; पण रामकुमारने त्याला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. या कामगिरीमुळे रामकुमारने ८० गुणांची कमाई केली असून जागतिक एकेरी क्रमवारीत तो अव्वल २०० खेळाडूंमध्ये प्रवेश मिळवू शकतो.

आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल ट्विटरचे ‘सीईओ’ :
  • ट्विटर या समाजमाध्यम मंचाचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले.

  • पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण चमूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले.

  • जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

द. आफ्रिकेतील विमानसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन :
  • करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीपोटी दक्षिण आफ्रिकेतील देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी जगभरातील देशांना केले.

  • प्रवासविषयक निर्बंध टाळण्यासाठी विज्ञानविषयक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन डब्ल्यूएचओचे आफ्रिकेसाठीचे विभागीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सर्व देशांना केले.

  • ‘प्रवासविषयक निर्बंध करोना विषाणूचा फैलाव काहीसा कमी करण्यात भूमिका बजावू शकतात; मात्र त्यांच्यामुळे जीवन आणि उपजीविका यांवर फार मोठा बोझा पडतो’, असे त्यांनी एका निवेदनात सांगितले.

  • ‘निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली, तर ते अनावश्य किंवा अनाहुत नसावे, तर आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीनुसार शास्त्रीय आधारावर असावेत’, अशी अपेक्षा मोएती यांनी व्यक्त केली.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट - कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज फैसला :
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी—२० क्रिकेटच्या १५व्या हंगामासाठी संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे आठही संघ नेमके कुणाकुणाला संघात ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

  • प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम राखण्याची परवानगी आहे. त्यामध्ये तीन भारतीय आणि एक विदेशी अथवा दोन भारतीय आणि दोन विदेशी अशा रचनेसह संघमालक खेळाडूंना कायम राखू शकतात. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड या तीन खेळाडूंना आधीच कायम राखल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली; परंतु अन्य संघांतील खेळाडू मंगळवारीच स्पष्ट होतील.

  • ‘आयपीएल’च्या नव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य संघांना नकोशा झालेल्या खेळाडूंमधून या नव्या संघांना तीन खेळाडूंची निवड करण्याची १ ते २५ डिसेंबरदरम्यान संधी आहे.  मग जानेवारीमध्ये खेळाडूंची लिलावप्रक्रिया होईल.

Twitter ला मिळणार Made In India सीईओ… जाणून घ्या पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण :
  • जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली.

  • कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे.

  • ट्विटरच्या या घोषणेनंतर पराग अग्रवाल यांच्या नावाची सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. पण अचानक चर्चेत आलेले पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण याबद्दल अनेकांना ठाऊक नाहीय. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

३० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.