चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 जून 2023

Date : 30 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचा शास्त्रज्ञांकडून शोध, तब्बल पंचवीस वर्षांच्या नोंदीचे विश्लेषण
  • विश्वाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. मात्र जागतिक पातळीवर आतापर्यंत झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाला दिशा देणारे नवे संशोधन समोर आले आहे.  ब्रम्हांडातील अतिशय कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, तब्बल पंचवीस वर्षे घेतलेल्या पल्सार (मृत तारे) नोंदींचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती आले. लायगोने शोधलेल्या गुरुत्वीय लहरींच्या शोधापेक्षा हे संशोधन वेगळे ठरले आहे.
  • राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रांत झालेल्या पत्रकार परिषदेत या संशोधनाची माहिती देण्यात आली. आयएनपीटीए, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा फंडामेंटल रीसर्च इन्स्टिट्यूट, आयआयटी रुरकी, आयसर भोपाळ, आयआयटी हैद्राबाद, आयमएससी, रमण रीसर्च इन्स्टिट्यूट, जपानमधील कुमामोटो या संस्थांतील शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग होता. सुमारे शंभर वर्षांपूर्वी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सांगितले होते. त्याचा पुरावा २०१५-१६मध्ये लायगोच्या संशोधनातून हाती आला होता.
  • दीर्घिकांच्या केंद्रांमध्ये महाकाय कृष्णविवरे असतात, या संशोधनाला २०२०मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. गुरुत्वीय लहरींच्या पार्श्वभूमीचे पुरावे मिळवण्यासाठीच्या संशोधनासाठी जर्मनीतील एफेल्सबगै रेडिओ दुर्बिण, युरोपातील लव्हेल दुर्बिण, फ्रान्समधील नॅन्सरेडिओ दुर्बिण,  इटलीमधील सार्डिना रेडिओ दुर्बिण, नेदरलँडमधील वेस्टरबोर्क दुर्बिण, पुण्याजवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण यांचा वापर करण्यात आला.
  • भारत, युरोप, जपानमधील शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडातील सर्वोत्तम घड्याळ मानल्या गेलेल्या पल्सार ताऱ्यांचे निरीक्षण केले. सूर्यापेक्षा काही कोटीपट अधिक वस्तुमान असलेल्या महाकाय कृष्णविवरांच्या संयोगातून गुरुत्वीय लहरी तयार होत असाव्यात असे आतापर्यंत मानले जात होते. या गृहितकाला बळ देणारे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले. आता शंभरहून अधिक पल्सारच्या निरीक्षणातून गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करून ब्रह्मांड तयार होताना अगदी सुरुवातीच्या काळातील घडामोडींचा अभ्यास केला जाणार आहे.
राज्यातील “या” अधिकाऱ्यांना IAS दर्जा बहाल
  • लोकसेवा आयोगामार्फत निवड होत राजपत्रित अधिकारी होण्याचे प्रत्येक होतकरू सुशिक्षीत तरूणाचे ध्येय असते आणि निवड झाल्यावर कधीतरी सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी सुप्त ईच्छा तो बाळगून असतात. मात्र निवडकांनाच अशी संधी प्राप्त होते. अशीच संधी आता राज्यातील काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. तसे नोटिफिकेशन केंद्र सरकारच्या विनंतीने राष्ट्रपती भवनातून निघाले आहे.
  • राज्यातील खालील अधिकाऱ्यांना आता आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा बहाल होणार आहे. जी.एम.गढीकर, पी.बी.खपले, ए.पी.पाठक, जी.आर.खरात, डॉ.पी.पी.देवरे, एम.डब्लू.साळवे, एम.पी.देशमुख, डॉ.बी.एन.बस्तेवाड. यांना १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर नियूक्ती मिळेल.
  • तर १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर सतिशकुमार दत्तात्रय खडके, संजय श्रीपतराव काटकर, डॉ.माधव नामदेव कुसेकर, पराग सुरेश सोमण, अनिलकुमार खंडेराव पवार, सचिन बंडोपंत कलंत्रे, श्रीधर बापुराव दुबे, विकास मारोती पानसरे व मनोज विजय रानडे यांना आयएएसच्या दर्जा बहाल करीत नियूक्ती मिळेल. प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांना नियूक्ती मिळण्याची शक्यता आहे. वर्धा येथे जात पडताळणी अधिकारी म्हणून कार्यरत जी.एम.गढीकर यांचाही यास समावेश झाला आहे.
मध्य प्रदेशमधील विद्यार्थ्यांना सावरकरांवरील धडा! महाराष्ट्रातील ‘या’ दोन थोर नेत्यांचाही अभ्यासक्रमात समावेश
  • कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेला धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. यावरू देशभर वाद झाला. भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. आता मध्य प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रम अद्यायवत करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, त्यांनी नव्या अभ्यासक्रमात सावरकरांचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री इंदर सिंग परमार यांनी याबाबत माहिती दिली.
  • “हिंदुत्त्वाचे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आता नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासाचा भाग असतील”, असं इंदर सिंग परमार यांनी सांगितलं. परंतु, विरोधी पक्ष काँग्रेसने याला राजकीय खेळी म्हणून संबोधले आहे.
  • शात या शैक्षणिक वर्षांपासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अनेक राज्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. देशाचा इतिहास आणि देशाच्या स्वातंत्र्य, विकास आणि प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान परशुराम, भगतिंह, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचे जीवन आणि गीता आदींविषयीचे धडे मध्य प्रदेशातील शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
  • “आम्ही एक समिती तयार केली आहे. कोणत्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, हे ही समिती ठरवेल. तसंच, कोणत्या इयत्तेत हे धडे समाविष्ट करायचे हेही ठरवलं जाईल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतीय समाजातील माहिती, भारतातील थोर व्यक्तीमत्त्व यांची माहिती अभ्यासक्रमातून दिली जात आहे”, अशी माहिती इंदर सिंग परमार यांनी दिली.
  • “भारतीय क्रांतीकारकांना काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात योग्य जागा दिली नाही. सावरकरांशिवाय वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, भगतसिंह, लोकमान्य टिळक आदींविषयीचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत”, असंही परमार म्हणाले.
सिकंदर रझाने मोडला १९ वर्षांहून अधिक जुना विक्रम, पहिल्यांदाच घडला ‘हा’ पराक्रम
  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरम्यान, दोन नवे संघ विश्वचषक खेळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या क्वालिफायर सामने खेळवले जात आहेत. आता सुपर ६ मध्ये पोहोचलेल्या संघांमधील सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, ओमानविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आणखी एक अप्रतिम खेळी केली. त्याने आपल्याच देशाच्या १९ वर्षांहून अधिक जुन्या माजी खेळाडूचा विक्रम मोडीत काढला.

सिकंदर रझाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या -

  • सुपर ६ मध्ये सिकंदर रझाने ओमानविरुद्ध ४९ चेंडूत ४२ धावा केल्या. तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही, परंतु त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४००० धावा नक्कीच पूर्ण केल्या. हा आकडा गाठण्यासाठी त्याला १२७ डाव खेळावे लागले, जे झिम्बाब्वेकडून इतक्या धावा करण्यासाठी सर्वात कमी आहेत.
  • यापूर्वी ग्रँड फ्लॉवरने १२८ डावांत ४००० धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने २००४ साली सहा हजार धावा केल्यानंतर निवृत्ती घेतली, म्हणजेच त्यापूर्वी त्याने चार हजार धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. आता सिकंदर रझा त्यांच्याही पुढे गेला आहे. दुसरीकडे, यानंतर ब्रेंडन टेलरने १२९ डावांतच चार हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. अँडी फ्लॉवरने १३३ डावांत तर शॉन विल्यम्सने १३५ डावांत ४००० धावा पूर्ण केल्या.

सिकंदर रझाची आयसीसी क्रमवारीतही कमाल -

  • सिकंदर रझाने गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. यामुळेच त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत उल्लेखनीय झेप घेतली आहे. सध्या संघ किमान दोन सामने खेळेल. त्याचबरोबर सुपर ६ मध्ये जर चांगली कामगिरी केली, तर आणखी सामने मिळू शकतील. त्यानंतर संघ विश्वचषकातील मुख्य सामने खेळताना दिसेल.
  • सिकंदर रझा याआधी पंजाब किंग्जकडून आयपीएल खेळताना त्याने दोनदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. येत्या सामन्यांमध्ये झिम्बाब्वे आणि खुद्द सिकंदर रझा यांची कामगिरी कशी होते हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, सिकंदर रझा पुढे इतर संघांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
दिल्लीतल्या औरंगजेब रोडचं नाव बदललं, ‘या’ लोकप्रिय राष्ट्रपतींच्या नावे रस्त्याला नवी ओळख
  • नई दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) बुधवारी लुटियन्स दिल्लीतल्या एका रस्त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील एका रस्त्याचं नाव औरंगजेब लेन असं होतं जे आता बदललं जाणार आहे. या रस्त्याला भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव दिलं जाणार आहे. एनडीएमसीच्या बैठकीत बुधवारी (२९ जून) याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
  • याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये एनडीएमसीने औरंगजेब रोडचं नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं केलं होतं. पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या रस्त्याचं नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर औरंगजेब रोडला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं.
  • आता इथल्या लेनचं नाव देखील बदललं आहे. औरंगजेब लेन मध्य दिल्लीत अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडला जोडते. या लेनला पूर्वी औरंगजेब लेन असं नाव होतं. जे बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करावं याबाबत एक प्रस्ताव सदस्य समितीसमोर ठेवण्यात आला होता, ज्याला आज (२८ जून) मंजुरी देण्यात आली.
  • एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, लेनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली म्युनिसिपल अॅक्ट १९९४ च्या कलम २३१ च्या उप-कलम (१) च्या खंड अ संदर्भात मांडण्यात आला होता. त्यानंतर औरंगजेब लेनचं नामकरण डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करण्यास परिषदेने मान्यता दिली आहे.

 

अग्निपथ योजनेला तुफान प्रतिसाद; ६ दिवसांत भारतीय हवाई दलाकडे २ लाखांहून अधिक अर्ज :
  • भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच अग्नीपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा होताच देशभर याचे पडसाद उमटले. बिहारसह उत्तरेतील अनेक राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलकांनी रेल्वेगाड्या पेटवून दिल्या. एकीकडे देशात अग्निपथ योजनेला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र अनेक तरुणांनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत भारतीय हवाई दलाला २ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • भारतीय हवाई दलाने मंगळवारी एक ट्वीट केलं असून आतापर्यंत अग्निपथ योजनेअंतर्गत १ लाख ८३ हजार ६३४ जणांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. तसेच तुम्हालाही अग्निवीर बनायचं असेल तर https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज भरण्याचं आवाहन हवाई दलाकडून करण्यात आलं आहे.

  • खरंतर, १४ जून २०२२ रोजी अग्रिपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बिहारसह अनेक राज्यांमध्ये तत्काळ निदर्शने झाली. तसेच मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून सार्वजनिक मालमत्तेचे मोठं नुकसान झालं. अग्निपथ योजना मागे घ्यावी अशी तीव्र मागणी आंदोलकांनी केली होती. या योजनेनुसार, १७ आणि २१ वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यदलात भरती करून घेतले जाईल. ४ वर्षानंतर त्यातील २५ टक्के जवानांना नियमित सैन्यदलात सामावून घेतले जाईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

  • देशभरातून या योजनेला विरोध झाल्यानंतर केंद्र सरकारने नोकरीत भरती होण्याची कमाल वयोमर्यादा २३ पर्यंत वाढवली. यानंतर आता सैन्यदलाकडून भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या सहा दिवसातच २ लाखाहून अधिक तरुणांनी नोंदणी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०२२ आहे.

उपराष्ट्रपतीपदाची ६ ऑगस्टला निवडणूक :
  • उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी काढली जाणार असून १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

  • २० जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

  • लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव; राज्य मंत्रिमंडळात नामकरणाचा निर्णय :
  • शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली़ नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून, या निर्णयांद्वारे शिवसेनेने हिंदुत्ववादी आणि आगरी-कोळी समाजातील मतपेढी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

  • शिवसेनेतील बंडाळीमुळे अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नामांतराचे निर्णय घेत ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाशी आणि शिवसेनेच्या पाठिराख्या आगरी-कोळी समाजाच्या भावनांशी बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

  • औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केला. मात्र, केंद्र सरकारने त्यास अजूनही मंजुरी दिलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी नामांतराचा विषय महत्त्वाचा होता. या पार्श्वभूमीवर नगरविकास   विभागाकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला.

  • आता हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधू, कश्यपची विजयी सलामी :
  • पीव्ही सिंधूने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत बुधवारी विजयी सलामी नोंदवली, तर सायना नेहवालला गाशा गुंडाळावा लागला. माजी विश्वविजेत्या सिंधूने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करीत थायलंडच्या जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावरील पोर्नपावी चोचूवाँगला २१-१३, २१-१७ असे नामोहरम केले. सिंधूने चोचूवाँगविरुद्ध आठव्या सामन्यापैकी पाचवा विजय मिळवला आहे. सातव्या मानांकित सिंधूची पुढील फेरीत थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानशी गाठ पडणार आहे. परंतु सायनाने अमेरिकेच्या इरिस वांगकडून ३७ मिनिटांत ११-२१, १७-२१ असा पराभव पत्करला.

  • पुरुष एकेरीत माजी राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपने दुखापतीतून सावरत सकारात्मक वाटचाल करताना कोरियाच्या हीओ क्वांग ही याला २१-१२, २१-१७ असे नमवले. जागतिक क्रमवारीत ३९व्या क्रमांकावरील कश्यपचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या कुनलावत विटिडसार्नशी सामना होणार आहे.

  • मिश्र दुहेरीत बी सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीला जागतिक क्रमवारीत २१व्या क्रमांकावरील नेदरलँड्सच्या रॉबिन टॅबेलिंग आणि सेलेना पीक जोडीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. भारतीय जोडीने ५२ मिनिटांच्या संघर्षांनंतर १५-२१, २१-१९, १७-२१ अशी हार पत्करली.

विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर लंडन; परदेशातील विद्यार्थ्यांनाही किफायतशीर शिक्षण; ‘क्यूएस’च्या यादीत मुंबईचाही समावेश :
  • विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी ‘क्यूएस’ने जाहीर केली आहे. लंडन हे जगातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट शहर असल्याचे या यादीतून दिसून येत आहे. परदेशातील विद्यार्थ्यांनाही लंडनमध्ये किफायतशीर आणि चांगले शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा, विद्यापीठांचा दर्जा याबाबतीत लंडन सरस असल्याचे या यादीत म्हटले आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर मुंबई असल्याचेही ‘क्यूएस’ने म्हटले आहे.

  • क्यूएस विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर यादी दरवर्षी जाहीर केली जाते. यंदा २०२३साठीची यादी जाहीर करण्यात आली आहे. लंडननंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर दक्षिण कोरियातील सेऊल आणि जर्मनीमधील म्युनिच ही शहरे आहेत. चौथ्या क्रमांकावर झुरिच आणि पाचव्या क्रमांकावर मेलबर्न ही शहरे आहेत. मुंबई या यादीत १०३ व्या क्रमाकांवर असली तरी भारतात विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शहर मुंबई असल्याचे या यादीत म्हटले आहे. मुंबईत किफायतशीर शिक्षण मिळत असले तरी विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, असे नमूद करण्यात आले आहे. या यादीत बंगळूरु ११४ व्या, चेन्नई १२५ व्या आणि दिल्ली १२९ व्या क्रमांकावर आहे.

  • यादी कशाच्या आधारावर..किफायतशीर शिक्षण, गुणवत्ता, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचा दर्जा, शैक्षणिक व विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा आणि या शहरांतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची मते यांच्या आधारावर ही यादी तयार केली जाते.

यादी काय सांगते?

  • ‘क्यूएस’कडून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट १४० शहरांची यादी जाहीर
  • लंडन पहिल्या तर सेऊल व म्युनिच दुसऱ्या क्रमांकावर.
  • मुंबई १०३ व्या, बंगळूरु ११४व्या आणि चेन्नई १२५व्या क्रमांकावर
  • अरब देशांमधील  दुबई हे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहर. जगात दुबई ५१ व्या क्रमांकावर
  • लॅटिन अमेरिकेतील ब्युनॉस आयर्स सर्वोत्कृष्ट शहर. जगात २३ व्या स्थानावर.

30 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.