चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जुलै २०२२

Date : 30 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भव्य उद्घाटन सोहळय़ासह राष्ट्रकुलला प्रारंभ :
  • बर्मिगहॅम शहराचा समृद्ध संगीत वारसा आणि सर्वसमावेशकता याचे दर्शन घडवणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळय़ासह गुरुवारी मध्यरात्री २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. 

  • अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या या सोहळय़ाची ड्रमर अब्राहम पॅडी टेटेच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. मग विविध सादरीकरणांच्या माध्यमातून बर्मिगहॅम शहराची विविधता दर्शवण्याचा प्रयत्न झाला. यात भारतीय शास्त्रीय गायिका आणि संगीतकार रंजना घटक यांच्या सादरीकरणाचाही समावेश होता. करोनानंतर कोणत्याही कठोर निर्बंविना होणारी ही पहिलीच जागतिक दर्जाची क्रीडा स्पर्धा असल्याने उद्घाटन सोहळय़ाला चाहतेही मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

  • त्यानंतर सहभागी राष्ट्रांच्या संचलनाला सुरुवात झाली. दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी ध्वजवाहकाच्या भूमिकेत भारताच्या पथकाचे नेतृत्व केले. ब्रिटनच्या राष्ट्रगीतासह या अडीच तास चाललेल्या सोहळय़ाची सांगता झाली.

गुजरातमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना; आता परदेशातून सोन्याची आयात करणे होणार सोपे :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरामधील गांधी नगर येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (IIBX) उद्घाटन केले. या बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून आता देशातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर हे एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे. या एक्सचेंजद्वारे डीलर्स, रिफायनरीज आणि परदेशी बँकांना भारताकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे.

  • सध्या सोन्याच्या व्यापारालाच परवानगी - गांधीनगर जवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे. देशातील हे पहिले आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज असेल. भविष्यात एक्सचेंजमध्ये चांदीचा व्यापार करण्याची योजना आहे, परंतु सध्या फक्त सोन्याच्या व्यापाऱालाच मान्यता देण्यात आली आहे.

  • एक्सचेंजमुळे काय फायदा होईल - सध्या फक्त काही बँका आणि केंद्रीय बँकांनी मंजूर केलेल्या नामांकित एजन्सींना थेट सोने आयात करण्याची परवानगी होती. आता देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यानंतर, पात्र ज्वेलर्स सोन्याची थेट आयात करू शकतील. त्यावर स्थानिक शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ही सूट सोने शहराबाहेर नेईपर्यंतच मिळणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी - देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSE IFSC-SGX कनेक्ट प्लॅटफॉर्मचेही उद्धाटन केले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजचे सदस्य NSE IFSC मध्ये निफ्टी डेरिव्हेटिव्हसह व्यापार करू शकतील. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली आहे.

मिग-२१ च्या उर्वरित चार स्कॉड्रन २०२५ पर्यंत सेवाबाह्य ; भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण :
  • भारतीय हवाई दलातील मिग-२१ च्या उर्वरित चार लढाऊ स्कॉड्रन येत्या तीन वर्षांत (२०२५ पर्यंत) सेवाबाह्य केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

  • यापैकी एक स्कॉड्रन  आगामी सप्टेंबरमध्येच सेवाबाह्य होणार आहे. त्याचप्रमाणे मिग-२९ लढाऊ जेटच्या तीन स्कॉड्रनही पुढील पाच वर्षांत सेवेतून बाहेर काढण्याचे नियाजन भारतीय हवाई दलाने केले असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.

  • राजस्थानमधील बारमर येथे गेल्या रात्री हवाई दलाचे एक मिग-२१ विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या घटनेचा वरील निर्णयाशी कोणताही संबंध नाही, तर सोविएत रशियात तयार झालेली ही मिग विमाने सेवाबाह्य करण्याचा निर्णय हा भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिकीकरण करण्याच्या मोहिमेचा भाग आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. बारमर येथे झालेल्या मिग दुर्घटनेत विंग कमांडर एम. राणा आणि फ्लाइट ल्युटेनंट अद्वितीय बाल या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. एका स्कॉड्रनमध्ये सामान्यत: १७ ते २० लढाऊ विमाने असतात.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारतीय संघांचा विजयारंभ ; हम्पीची रोमहर्षक सरशी; साधवानी, विदितचीही चमकदार कामगिरी :
  • भारताच्या खुल्या आणि महिला विभागांतील सहाही संघांनी शुक्रवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने पहिल्याच दिवशी रोमहर्षक सरशी साधली.

  • खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ९४व्या मानांकित झिम्बाब्वेला ४-० अशी धूळ चारली. पहिल्या पटावर पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या विदित गुजराथीने मकोटो रॉडवेलला ४९ चालींमध्ये पराभूत केले. या लढतीत रॉडवेलने विदितला चांगली झुंज दिली. मात्र, अखेरच्या चालींमध्ये चमकदार कामगिरी करत विदितने विजय प्राप्त केला. प्रतिभावान युवा खेळाडू अर्जुन इरिगेसीने ऑफलाइन ऑलिम्पियाड स्पर्धेत पदार्पणात मसान्गो स्पेन्सरला ३८ चालींमध्ये नमवले. तसेच एसएल नारायणन आणि के. शशिकिरण यांनीही विजयारंभ करताना अनुक्रमे एमराल्ड मुशोरे आणि जेमुसे झेम्बा यांना पराभूत केले.

  • खुल्या विभागातील भारताच्या ‘ब’ आणि ‘क’ संघांनाही विजयी सुरुवात करण्यात यश आले. ‘ब’ संघाने संयुक्त अरब अमिराती, तर ‘क’ संघाने दक्षिण सुदान संघांचे आव्हान परतवून लावले. ‘ब’ संघातील डी. गुकेशला संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने ४१ चालींमध्ये ओमरान अल होसानीवर मात केली. तत्पूर्वी, रौनक साधवानीने अल ताहेर अब्दुलरहमान मोहम्मदला नमवत ‘ब’ संघाचा सर्वात पहिला विजय नोंदवला होता. तसेच बी. अधिबननेही आपला सामना जिंकला. निहाल सरिनने इब्राहिम सुल्तानला ६२ चालींमध्ये पराभूत करण्याची कामगिरी केली. भारताच्या ‘क’ संघाकडून अभिजीत गुप्ता, मुरली कार्तिकेयन, एस. पी. सेतुरामन आणि अभिमन्यू पुराणिक यांनी विजय मिळवले.

  • महिला गटातील भारताच्या ‘अ’ संघाने ताजिकिस्तानचा पराभव केला. भारताची तारांकित खेळाडू कोनेरू हम्पीने पहिल्या पटावर ४१ चालींमध्ये नादेझदा अ‍ॅन्टोनोव्हानेवर सरशी साधली. या लढतीच्या सुरुवातीला हम्पीला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. मात्र, २४व्या चालीवर अ‍ॅन्टोनोव्हाने चूक केली आणि यानंतर हम्पीने तिला पुनरागमनाची संधी न देता विजयाची नोंद केली. आर. वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनी अनुक्रमे सब्रिना अबरोरोव्हा आणि होटामी यांना पराभूत केले. तानिया सचदेवला रुखशोना सायदोव्हाने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तानियाने १०३ चालींमध्ये सरशी साधत ‘अ’ संघाला ४-० असा विजय मिळवून दिला. द्रोणावल्ली हरिकाला या लढतीसाठी विश्रांती देण्यात आली.

मोदींच्या नियोजनामुळे देशात वाघांच्या संख्येत वाढ ; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन :
  • जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या नियोजनबद्ध योजनांमुळे देशात वाघांची संख्या वाढली, अशा शब्दांत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मोदींच्या नेतृत्त्वाचा गौरव केला. भारतातील वाढलेल्या वाघांचे श्रेय अप्रत्यक्षपणे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना दिले.

  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने चंद्रपूर येथील वनप्रबोधिनीत जागतिक व्याघ्रदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

  • भारतात ५२ व्याघ्रप्रकल्पांसोबतच ३२ हत्तीसंवर्धन प्रकल्प असून केंद्राच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सूचित केले. वाघ हे शक्तीचे प्रतीक आहे आणि जैवविविधता, जंगल, पाणी आणि हवामान सुरक्षेचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे मत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी व्यक्त केले. व्याघ्र संवर्धनात भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे.

  • कंबोडिया, चीन, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि रशिया यांसारख्या देशांना व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र येण्यासाठी सहकार्य करत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे चौबे म्हणाले. यावेळी जंगलात तथा व्याघ्र संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या देशातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

३० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.