चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जुलै २०२१

Date : 30 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ :
  • राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

  • दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला.

  • गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ :
  • देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या ४३ हजार ५०९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख २८ हजार ११४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

  • देशात गेल्या २४ तासांत ६४० जणांचे मृत्यू झाले असून देशभरात आतापर्यंत एकूण करोनाबळींची संख्या ४ लाख २२ हजार ६६२ झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ४४०४ ने वाढ होऊन ती ४ लाख ३ हजार ८४० इतकी झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १.२८ टक्के इतकी आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३८ इतकी आहे. दैनंदिन रुग्णवाढीच्या दरात वाढ होऊन तो २.५२ टक्के झाला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.३८ इतका नोंदला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

  • आतापर्यंत एकूण ३ कोटी ७ लाख १ हजार ६१२ जण करोनामुक्त झाले असून मृत्यू दर १.३४ इतका नोंदला गेला आहे. बुधवारी १७ लाख २८ हजार ७९५ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४६ कोटी २६ लाख २९ हजार ७७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकूण ४५.०७ कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

‘कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती :
  • भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.

  • ब्राझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  • ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल, सगळ्यांनीच वाचावा असा :
  • करोनामुळे संपूर्ण जगाचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. करोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे.

  • अशात गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे.

  • “कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरं वाटलं”, असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्याासाठी लस घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा :
  • राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

  • कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

भारताची हाराकिरी; १० षटकातील धावसंख्येच्या नीचांकाची नोंद :
  • भारताविरुद्धची टी २० मालिका श्रीलंकेनं २-१ ने जिंकली. भारताने या सामन्यात ८१ धावा करत श्रीलंकेसमोर ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघाची टी २० सामन्यातील सर्वात निराशाजनक कामगिरी क्रीडाप्रेमींनी अनुभवली. पहिल्या १० षटकात सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली आहे. भारताने १० षटकात ५ गडी गमवून ३९ धावा केल्या.

  • भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची कामगिरी निराशाजनक झाली. भारताचा कर्णधार शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकात चमीराच्या गोलंदाजीवर धनंजया डि सिल्वा हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संघाच्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल बाद झाला.

  • संघाच्या २४ धावा असताना संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या वैयक्तिक १४ धावा असताना हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. नितीश राणाही भारता डाव सावरू शकला नाही. दासून शनाकाने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

३० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.