चालू घडामोडी आणि दिनविशेष - 30 एप्रिल 2023

Date : 30 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार ‘ही’ सेवा; जाणून घ्या
  • भारतात सध्या Reliance Jio , VI आणि Airtel या आघाडीच्या कंपन्या आहेत. त्यामध्ये जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपली ५जी सेवा अनेक शहरांमध्ये सुरु केली आहे. वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क अजून सुरु करता आलेले नाही आहे. मात्र कंपनी त्यावर काम करत आहे. एकीकडे या सर्व कंपन्या आपल्या ५ जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला BSNL ही सरकारी टेलिकॉम कंपनी अजूनही आपल्या ४ जी नेटवर्कवरच काम करत आहे.
  • खरेतर अजूनही बीएसएनएल कंपनी आपले ४जी नेटवर्क लॉन्च करू शकलेली नाही आहे. कंपनी ४जी नेटवर्क सुरु करण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये काम करत आहे. नुकताच बीएसएनएलने आपला एक पायलट प्रोजेक्ट पंजाब राज्यात सुरु केला होता. आतापर्यंत बीएसएनएलने १३५ टॉवर्स इंस्टॉल केले आहेत. अजून ७५ टॉवर्सवर कंपनी काम करत आहे.
  • बीएसएनएलचे सगळे टॉवर्स इन्स्टॉल झाल्यावर तीन महिने कंपनी याचे टेस्टिंग करणार आहे. त्यानंतर कंपनी ४जी नेटवर्क वरील आपल्या कामाचा वेग अधिक तीव्र करेल. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, ”पायलट प्रोग्रॅम संपल्यानंतर देशभरात बीएसएनएलच्या टॉवर्सवर काम सुरु होईल. त्यामुळे दररोज २०० टॉवर्स इन्स्टॉल केले जातील. ”ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनी आपले ४जी नेटवर्क लॉन्च करू शकते असे देखील असे देखील अश्विनी वैष्णव म्हणाले.

कधी होणार लॉन्च ?

  • रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की बीएसएनएलचे ४ जी नेटवर्क ५ जी नेटवर्कच्या रोलआउटसाठी वापरले जाईल. टेलिकॉम ऑपरेटर एक सॉफ्टवेअर अपडेट जारी करेल ज्यानंतर लोकांना 5G सेवा मिळायला सुरुवात होईल.

३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये एअरटेलचे ५ जी नेटवर्क

  • भारती एअरटेल कंपनीने आपले ५जी नेटवर्क ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये सुरु केले आहे. कंपनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांना काही विशिष्ट प्लॅन्ससह अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. दुसऱ्या बाजूने रिलायन्स जिओने सुद्धा आपले ५जी नेटवर्क अनेक राज्यांमध्ये सुरु केले आहे. देशात सध्या २ टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्यांनी आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. बजेट कमी असल्यामुळे वोडाफोन-आयडिया कंपनी अजूनही आपले ५जी नेटवर्क सुरु करू शकलेले नाही आहे.
इजिप्तमध्ये आठव्या शतकातील बुद्ध मूर्तीचा शोध, संशोधकांच्या चमूत महाराष्ट्रातील शैलेश भंडारे
  • साधारण आठव्या शतकात भारत आणि रोमन साम्राज्यामध्ये इजिप्तमार्गे होणारा व्यापार, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अनेक देशांमधील प्रसार यांचा नव्याने एका संशोधनातून दाखला मिळाला आहे. इजिप्तच्या बेरेनीके बंदरावर संशोधकांना गौतम बुद्धांची मूर्ती आणि शिलालेख सापडले असून याबाबत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला.
  • अमेरिकन-पोलिश मोहिमेने केलेल्या उत्खननात २०१८ साली डेलावेअर विद्यापीठचे प्रा.स्टीव्हन साइडबोथम आणि त्यांच्या संघाला गौतम बुद्ध यांची इसिस देवीला समर्पित केलेली संगमरवरी मूर्ती शहराच्या मुख्य रोमन काळातील मंदिरासमोर उत्खननात सापडली. परंतु तेव्हा या मूर्तीचे फक्त धड संशोधनात सापडले होते. मूर्तीबाबत जर्मन परिषदेत पुरातत्वशास्त्रज्ञ शैलेश भंडारे यांनी ही मूर्ती गौतम बुद्धांची असल्याचे सांगितले होते. करोनाकाळानंतर २०२२ साली झालेल्या उत्खननात या मूर्तीचे शीर सापडले. त्यामुळे ही मूर्ती गौतम बुद्धांचीच असल्याचे स्पष्ट झाले. या मूर्तीशिवाय, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना रोमन सम्राट फिलिप द अरब २४४ ते २४९ इ.स. पूर्वच्या शासनाशी संबंधित संस्कृत भाषेतील शिलालेखदेखील सापडला आहे. हा शिलालेख बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित असावा, असे भंडारे यांनी सांगितले.
  • या शिलालेखाचा पुरातत्त्वशास्त्रज्ञ बारकाईने अभ्यास करत आहेत. इसिस देवीच्या मंदिरातील इतर शिलालेख हे ग्रीक भाषेतील आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिरात सातवाहनांच्या मध्य-भारतीय राज्याची दुसऱ्या शतकातील दोन नाणीही या उत्खननात सापडली. गेल्यावर्षी, जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ही मूर्ती सापडली होती. अलीकडेच इजिप्तच्या पुरातत्त्व परिषदेने हे संशोधन जाहीर केले. हे संशोधन प्रा. स्टीव्हन साइडबोथम, शैलेन भंडारे आणि अन्य पुरातत्त्व शास्त्रज्ञ अमेरिकेतील पुरातत्त्व संस्थेसमोरही सादर करणार आहेत. या संशोधनामुळे भारतीय पुरातत्त्व अभ्यासात महत्त्वाची भर पडली आहे. इजिप्तमधील बौद्ध धर्मासाठी आतापर्यंत उत्खनन केलेला हा सर्वोत्तम पुरावा आहे, असे भंडारे यांनी सांगितले.

भारत आणि इजिप्तचे ऐतिहासिक नाते..

  • भारत आणि रोमन साम्राज्यामधील दुवा म्हणजे इजिप्त. ७०० ते ८०० वर्षांपूर्वी म्हणजेच ८ व्या शतकात रोमन साम्राज्य आणि भारतातील आयात-निर्यात समुद्र व भू-मार्गे होत असे. त्यामुळे इजिप्त हे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील रोमन-युगीन बंदरे व्यापारात गुंतलेली होती. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे बेरेनीके हे बंदर. मिरपूड, रत्ने, कापड आणि हस्तिदंत यांच्या व्यापारासाठी भारतातून जहाजे या बंदरावर येत. बेरेनीके येथे माल उतरवून तो उंटांवर लादून वाळवंट ओलांडून नाईल नदीपर्यंत पोहोचवला जात असे. त्यानंतर तो उर्वरित रोमन साम्राज्यात विक्रीसाठी जात होता.
गलवानमधील शहिदाची पत्नी लष्करात लेफ्टनंटपदी
  • जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चिनी फौजांशी झालेल्या संघर्षांत शहीद झालेले नायक दीपक सिंह यांच्या पत्नी लेफ्टनंट रेखा सिंह यांना शनिवारी लष्करात अधिकारी म्हणून सेवेत दाखल करून घेण्यात आले. २९ वर्षांच्या रेखा यांनी चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना पूर्व लडाखमधील एका आघाडीवरील युनिटमध्ये तैनात करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  •  त्यांचे पती नायक सिंह हे आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये होते आणि नंतर त्यांना बिहार रेजिमेंटच्या १६व्या बटालियनशी संलग्न करण्यात आले. गलवान संघर्षांत जखमी झालेल्या सैनिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल २०२१ साली त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. ‘वीर चक्र’ हा युद्धाच्या काळातील देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.

‘तोफखाना रेजिमेंट’मध्ये प्रथमच पाच महिला अधिकारी

  • भारतीय लष्कराच्या तोफखाना (आर्टिलरी) रेजिमेंटमध्ये प्रथमच पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या महिला अधिकाऱ्यांनी शनिवारी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये (ओटीए) यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. लेफ्टनंट महक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट आदिती यादव, लेफ्टनंट पायस मुद्गिल, आणि लेफ्टनंट आकांक्षा सैनी अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पाच महिला अधिकाऱ्यांपैकी तिघींची चीनलगतच्या सीमाभागात तैनात पथकांत नियुक्ती करण्यात आली. अन्य दोन महिला अधिकाऱ्यांची पाकिस्तानलगतच्या आघाडीच्या आव्हानात्मक सीमा भागात नियुक्त करण्यात आले आहे. तोफखाना रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय लष्करातील परिवर्तनाची सुचिन्हे दिसत आहेत. जानेवारीत लष्करप्रमुख मनोज पांडेंनी तोफखाना विभागांत महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची घोषणा केली होती. सरकारनेही या प्रस्तावास मंजुरी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १०० व्या ‘मन की बात’साठी भाजपाकडून जय्यत तयारी, सार्वजनिक प्रसारणासाठी चोख व्यवस्था
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या दर रविवारी जनतेशी ‘मन की बात’मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी हा नियम पाळला आहे. याच ‘मन की बात’चा उद्या, रविवारी १०० वा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. रेडिओच्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या या संवादाचा १०० वा कार्यक्रम दणक्यात करण्याकरता भाजपाच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, देशासह परदेशातही एकूण ४ लाख ठिकाणी हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याकरता नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
  • इंडियन एक्स्प्रेसला भाजपा महासचिव दुष्यंत गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “परदेशासह देशभरात जवळपास ४ लाख ठिकाणी मन की बात ऐकण्याकरता नियोजन करण्यात आले आहे. सर्व खासदार, आमदार आणि अन्य सदस्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भाजपाचे प्रमुख जे. पी. नड्डा हा कार्यक्रम ऐतिहासिक होण्याकरता सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपावण्यात आली आहे.”
  • “दुसऱ्या देशातील भारतीय राजदुतांवरही ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मन की बातचा हा कार्यक्रम राजभवनात होणार असून पद्म पुरस्कार विजेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे”, अशीही माहिती देण्यात आली.
  • दुष्यंत गौतम यांनी सांगितलं की, “सत्तेत आल्यानंतर ऑक्टोबर २०१४ पासून मन की बातला ५२ भारतीय भाषा आणि ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावरील विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रियाही भाजपा नेत्यांकडून येत आहे.”
ट्विटरने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेचं खातं केलं लॉक, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या
  • देशातील प्रमूख वृत्तसंस्था ‘एशियन न्यूज इंटरनेशनल’ ( एएनआय ) चे ट्विटर खाते लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे. याबाबत ‘एएनआय’च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ‘हे खातं अस्तित्वात नाही’ असं ट्विटरवर लिहिलं आहे.
  • स्मिता प्रकाश यांनी ट्विटरकडून आलेल्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहेत. त्यात म्हटलं की, “ट्विटर खाते बनवण्यासाठी तुमचं वय कमीत-कमी १३ वर्षे असलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे तुमचं खातं लॉक करण्यात आलं असून, ट्विटरवरून काढून टाकलण्यात आलं आहे.”
  • स्मिता प्रकाश ट्वीट करत म्हणाल्या की, “जे लोक ‘एएनआय’ला फॉलो करतात, त्यांच्यासाठी वाईट बातमी आहे. ट्विटरने भारताची सर्वात मोठी वृत्त कंपनी, जिचे ७.६ मिलियन फॉलोअर्स आहेत, ते खाते बंद केलं आहे. सोनेरी टिकच्याऐवजी, निळे टिक देण्यात आलं आहे. तसेच, खातं लॉक केलं आहे.”
  • दरम्यान, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेचे देशात १०० ठिकाणी कार्यालये आहेत. ‘एएनआय’ ही संस्था रोज देश आणि विदेशात घडणाऱ्या घटनांची माहिती, फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्याच्या आधारावर अनेक माध्यमे वृत्त चालवत असतात.

30 एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.