चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० एप्रिल २०२१

Date : 30 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेकडून भारतात मदत दाखल; बायडन यांनी दिलेला शब्द पाळला :
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, भारतात मदत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमानं दाखल झाली असून यामध्ये करोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे.

  • Covid: “तात्काळ भारत सोडा,” अमेरिकेचा नागरिकांना संदेश - अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारं वैद्यकीय साहित्य तसंच १० लाख रॅपिट करोना टेस्ट किट पाठवण्यात आलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर - भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केलं असून यावेळी फोटो शेअर केले आहेत. ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे”.

देशात लसटंचाई नाही :
  • राज्यांच्या ‘कामगिरी’नुसार लसमात्रांचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत केंद्राने १६ कोटी लसमात्रा दिल्या आहेत. त्यापैकी १५ कोटी लसमात्रांचा वापर केला असल्याने राज्यांकडे एक कोटी लसमात्रांचा साठा आहे.

  • राज्यांना लसमात्रा पुरवल्या गेल्या नाहीत, असे देशात लसीकरण मोहिमेच्या प्रारंभापासून एक दिवसही झालेले नाही, असा युक्तिवाद करत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लशीच्या टंचाईच्या राज्यांच्या तक्रारी फेटाळून लावल्या.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी राज्यांना देण्यात आलेल्या लसमात्रांचा तक्ता प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मिझोराम, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना २० लाख ४५ हजार ८९० लसमात्रा केंद्राकडून दिल्या जाणार आहेत. ‘या लसमात्रा दोन-तीन दिवसांत संबंधित राज्यांना पुरवल्या जातील,’ अशी माहिती हर्षवर्धन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिननेही कमी केले दर; जाणून घ्या नवी किंमत :
  • कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लसीनंतर आता कोवॅक्सिन या भारत बायोटेक या कंपनीच्या लसींचे दरही कमी करण्यात आले आहे. कोवॅक्सिनचा दर आता २०० रुपयांनी घटला आहे. ही लस आता राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे.

  • काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा वाढीव दर जाहीर केला होता. त्यानुसार राज्य सरकारांना कोवॅक्सिन ६०० रुपये प्रति डोस तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रति डोस या किमतीला मिळत होती. मात्र आता या किमतीत घट करण्यात आली आहे.

  • राज्य सरकारांना आता कोवॅक्सिन ६०० ऐवजी ४०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना मात्र या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे १२०० रुपये प्रति डोस ही किंमत मोजावी लागणार आहे.

  • भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात भारत बायोटेकने म्हटलं आहे की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही आता कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने देणार आहोत.

  • कालच सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीचे नवे दर जाहीर केले. या नव्या दरांनुसार कोविशिल्ड ही लस राज्य सरकारांना आता ३०० रुपये प्रति डोस या नव्या किमतीने मिळणार आहे. त्यानंतर आता भारत बायोटेकनेही आपल्या कोवॅक्सिन लसीचा दर २०० रुपयांनी कमी केला आहे.

केंद्राने पुरवठा केल्यानेच महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण :
  • देशात सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच सांगितले आहे. केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यानेच हे साध्य करता आले, असा दावा भाजपचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

  • देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली, त्यांनतर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी अमरावती जिल्ह्य़ातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.

  • पुण्यातील सीरम संस्था करोना प्रतिबंधात्मक लस तयार करत आहे. पण लस बनवण्यासाठी कच्चा माल हा अमेरिकेतून येत होता मात्र तो अचानक बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणी के ल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे. त्यामुळे लवकरच उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढेल, असे  फडणवीस म्हणाले.

  • लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्य़ांना लसीचा साठा पुरवण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहोत. केंद्राकडून महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. दरम्यान, १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल, असा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो आहे, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चिमुकलीला २०० देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख :
  • मूळची अकोला येथील रहिवासी वैदिशा या अडीच वर्षीय चिमुकलीला तब्बल २०० पेक्षा जास्त देशांच्या राष्ट्रध्वजाची ओळख आहे. सोबतच त्या देशांच्या राजधानींची नावे सुद्धा तिला माहिती आहे. वैदिशाच्या या अलौकिक कामगिरीची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आल्याची माहिती तिचे वडील वैभव शेरेकर यांनी दिली.

  • अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवासी व सध्या चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडियाच्या पद्मपूर शाखेमध्ये कार्यरत अधिकारी वैभव शेरेकर व दीपाली शेरेकर यांची कन्या वैदिशा या अडीच वर्षांच्या चिमुकलीने असाधारण बुद्धिमत्तेचा परिचय दिला. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’नंतर आता ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये तिने स्थान पटकावले. वैदिशा दीड वर्षांची असताना तिच्या वडिलांनी फळे, फुले, पक्षी, प्राणी व भाज्यांचा फलक आणून त्याची ओळख करून दिली. वैदिशाने ते सर्व एका दिवसात पाठ केले.

  • तिला विचारले असता ती अगदी अचूक ओळखत होती. वैदिशा अडीच वर्षांची झाल्यावर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व त्या देशांचे राष्ट्रध्वज असलेले फलक आणून दिले. त्यावरून ती शिकत असताना १५ ते २० दिवसांत  २०० पेक्षा अधिक देशांच्या राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रध्वज वैदिशा अचूकपणे सांगते. वैदिशाची ही कामगिरी लक्षात घेऊन तिचे नाव ‘इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आल्याचे वैभव शेरेकर यांनी सांगितले. वैदिशाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करोनामुळे टी २० मुंबई लीग पुढे ढकलली :
  • देशातील करोना स्थितीमुळे टी २० मुंबई लीग मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई लीग मालिका पुढे ढकलत असल्याचं पत्रक त्यांनी जारी केलं आहे.

  • ‘देशातील सध्याची करोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचं ३ रं पर्व पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील’, असं ट्विट केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तर आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं मिलिंद नार्वेकर यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई लीग गव्हर्निंग कॉन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रं मिलिंद नार्वेकर यांच्याकडे डिसेंबर २०२० पासून आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र सथ्याची करोना स्थिती पाहता ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

३० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.