भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
एकदिवसीय विश्वचषक २०२३ यावर्षी ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला, तरी याचे मुख्य कारण म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना होता.
मात्र १५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने, आता या मोठ्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव दिला होता, ज्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धेचे अपडेटेड वेळापत्रक लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
आता या तारखेला खेळला जाईल सामना -
पीटीआयच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपचा हाय व्होल्टेज सामना आता अहमदाबादमध्ये १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. यासह पीसीबीने त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या आयसीसी आणि बीसीसीआयच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. याशिवाय पाकिस्तान संघ आता १२ ऑक्टोबर ऐवजी १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळेल, जो भारताविरुद्धच्या सामन्याच्या तीन दिवस आधी येईल
आयसीसी अपडेटेड वेळापत्रक जारी करेल -
अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आयसीसी लवकरच नवीन अपडेटेड वेळापत्रक जारी करेल, ज्यामध्ये आणखी काही सामन्यांचे वेळापत्रक देखील बदलले जाईल. सध्या आयसीसीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान-श्रीलंका या दोन सामन्यांच्या तारखा बदलू शकतात. १२ तारखेला होणारा श्रीलंका-पाकिस्तान सामना १० तारखेला गेला, तर १० तारखेला होणाऱ्या इंग्लंड-बांगलादेश सामन्याचे वेळापत्रकही बदलू शकते. दुसरीकडे या सामन्याऐवजी १२ तारखेला कोणता सामना होणार हे चित्र आयसीसीच्या अंतिम वेळापत्रकातच स्पष्ट होणार आहे.
‘फिच’ने अमेरिकी अर्थव्यवस्थेबाबत नेमके काय केले? त्याचा भारतावर परिणाम काय?
'फिच’कडून अमेरिकेच्या पतमानांकनात घट करण्यात आली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे पतमानांकन कमी करणे हे त्या अर्थव्यवस्थेविषयी दीर्घावधीसाठी अनिश्चिततेच्या दृष्टिकोनालाच दर्शविणारे असते. त्यामुळे हे चिंतेचे कारण आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने तिचेच पतमानांकन कमी केल्याने जगासह भारतावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
पतमानांकनाचे निकष काय असतात? ते कशावरून निश्चित करतात?
१) देशाची आर्थिक स्थिती – आयात-निर्यात, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय कर्ज, व्याजाच्या रकमेचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाशी असणारे प्रमाण, देशाचे ऋणको कोण आहेत इ.
२) आर्थिक धोरणे – आर्थिक समानता, व्यवसाय करण्यातील सहजसुलभता, ऋण उपलब्धता, परकीय चलनाची उपलब्धता
३) अर्थराजकीय वातावरण – देशातील चळवळी, कामगार क्षेत्रातील अस्वस्थता
४) सरकारविरुद्ध असंतोष – राजकीय विरोध, विकास प्रकल्पांना मिळणारा पाठिंबा अथवा विरोध
५) आर्थिक धोरणाची अंमलबजावणी – नोकरशाहीची उत्पादकता, भ्रष्टाचाराचा नायनाट, सरकारी खात्यातील समन्वय
६) परराष्ट्र संबंध – शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध, सौहार्द
७) मानवी विकासासाठी केले जाणारे प्रयत्न – शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात होणारी प्रगती
या सर्व घटकांचा मानांकन देताना विचार केला जातो.
‘आय फ्लू’ म्हणजे काय?
मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दररोज अंदाजे १०० रुग्ण सापडत आहेत, तर मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे २० ते २५ रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमधील जिल्हा रुग्णालयातही दररोज जवळपास २५ रुग्ण येत आहेत. त्यामुळे जुलैत राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे.
आय फ्लू होण्याचे कारण ?
आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होतो. आर्द्रता आणि दूषित पाण्यामुळे या हंगामात बरेच जीवाणू आणि विषाणू वाढतात, त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्याचा सामान्यतः प्रौढांपेक्षा लहान मुलांवर अधिक परिणाम होतो.
प्रादुर्भाव झाल्यास काय करावे?
वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळे सूजणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापणी चिकट होणे, डोळ्यातून चिकट द्रव्य स्रवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. कधीकधी अंधूक दिसते. हा आजार साधारणपणे पाच ते सात दिवसांत बरा होत असला तरी डोळे येतात त्यावेळी होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायक असतो. त्यामुळे त्यावर स्वत:च्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर चिन्हे आणि लक्षणांच्या आधारे त्याचे निदान केले जाते. ज्यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि स्नेहक आयड्रॉप्स आणि मलमांचा समावेश आहे.
आय फ्लू कसा पसरतो ?
आय फ्लूचा प्रतिबंध आणि प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी. संक्रमित व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू न वापरणे. हा आजार थेट संपर्कात आल्याने किंवा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने होते. साधारणपणे टॉवेल, उशाचे अभ्रे, नळ, दाराच्या कड्या इत्यादी वस्तूंच्या स्पर्शाने हा आजार पसरतो. संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा संपर्कात येते तेव्हा संक्रमण होते. संक्रमित हात डोळ्यांना लागल्यास संसर्ग होतो.
पद्मश्री अरविंद गुप्ता यांची प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयात भेट
आपल्या देशातील तरुण मुलांपर्यंत आपल्या खऱ्या संस्कृतीचे वाङ्मय पोहोचावयास हवे त्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा ही सर्व संस्कृती पुस्तकात किंवा कपाटात बंद होईल. त्यांचा वापर व्यवहारात केला गेला नाही, तर देश प्रगतीपथावर जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी कशी करेल ? असे मत पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास श्री.गुप्ता यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. गुप्ता हे वैज्ञानिक खेळणी तयार करण्यामध्ये निष्णात असून त्यांनी वाई येथे आल्यानंतर प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास भेट देऊन येथे सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेमध्ये ६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेतील हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह असून त्यांच्या आधारे ‘धर्मकोशा’ची निर्मिती करण्यात येथे ही गोष्ट स्पष्ट होताच श्री. गुप्ता म्हणाले, ‘धर्म माणसाच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम करत असतो. आहार-विहार, धार्मिक स्थळांच्या रचना इतकेच नव्हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती ही संस्कृतीशी निगडीत असते. त्यामुळे देवधर्म न मानणाऱ्या अथवा नास्तिक असणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा विचार केलेला नाही तर ते एका विशिष्ट प्रकारच्या आनंदालाही मुकलेले आहेत. ‘
यानंतर गुप्ता म्हणाले,जुन्या प्रथा व परंपरा या सर्वच त्याज्य न मानता अथवा त्यांचा अनावश्यक आग्रह न धरता व नवीन प्रथा व परंपरा सर्वच्या सर्व न स्वीकारता योग्य व चांगले स्वीकारून कालानुरूप त्यामध्ये बदल केला जाणे आवश्यक आहे. अन्यथा जीवन निरस व जड होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. श्री. गुप्ता यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी सन्मान केला. यावेळी सहसचिव भालचंद्र मोने व संचालक नंदकुमार बागवडे हे उपस्थित होते.
निसर्गात कविता शोधणारा कवी काळाच्या पडद्याआड, ना. धों. महानोर यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध कवितासंग्रह!
ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले.
चित्रपटांसाठी गीतलेखन
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी छेत्री, झिंगन, गुरप्रीत भारतीय संघात
तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री, अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या २२ सदस्यीय पुरुष फुटबॉल संघात समावेश करण्यात आला आहे. हांगझो येथे २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी छेत्रीच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या पसंतीचा संघ पाठविण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) प्रयत्नशील होता.
मात्र, त्यांनी या तिघांची नावे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) पाठवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागाबाबत साशंकता होती. परंतु, आता प्रमुख खेळाडूंच्या निवडीस आशियाई क्रीडा स्पर्धेचे संयोजक आणि आशियाई ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळाली आहे. आशियाई क्रमवारीतील अव्वल आठ संघांनाच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविण्याची क्रीडा मंत्रालयाची योजना होती. त्यामुळे भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा या स्पर्धेतील सहभागाबाबत अनिश्चितता होती. मात्र, ‘एआयएफएफ’च्या प्रयत्नांनंतर दोन्ही संघांना हांगझो येथील स्पर्धेसाठी पाठविण्याचा क्रीडा मंत्रालयाने निर्णय घेतला.
भारतीय संघ
९ गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंह मोइरांगथेम.
९ बचावपटू : संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंह, आशीष राय.
९ मध्यरक्षक : जॅक्सन सिंह थौनाओजम, सुरेश सिंह वांगजाम, अपुया राल्टे, अमरजीत सिंग कियाम, राहुल केपी, नौरेम महेश सिंग.
९ आक्रमकपटू : शिवा शक्ती नारायणन, रहीम अली, सुनील छेत्री, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंह, रोहित दानू.
जगासमोर नवी युद्धचिंता ; चीनचा विरोध धुडकावून अमेरिकेच्या नॅन्सी पलोसी तैवान दौऱ्यावर :
चीनचा विरोध झुगारून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी मंगळवारी तैवानमध्ये दाखल झाल्या. मंगळवारी रात्री तैपईच्या विमानतळावर पलोसी उतरल्यानंतर चीनने आगपाखड करण्यास सुरुवात केली असून तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. आधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षांमुळे जग पोळले असताना चीन आणि अमेरिकेत वाढता तणाव आशिया खंडासाठी नवी युद्धचिंता घेऊन आला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून चीनने तैवानवर दावा करीत आहे. त्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यात वाद आहेत. तैवान हा आमच्याच देशाचा भाग असून गरज लागल्यास सक्तीने तो आमच्या देशाशी जोडू, अशी धमकी याआधीही चीनने दिली आहे. तैवान प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकचे प्रयत्न असून त्यामुळे चीन आणि अमेरिकेत वादाच्या ठिणग्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नॅन्सी पलोसी यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे.
चीनकडून लष्करी कुमक - पलोसी यांनी जर तैवानचा दौरा केला तर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. बायडेन प्रशासनाने त्यांना परत मायदेशी बोलावून घ्यावे, अशी स्पष्ट मागणी चीनने केली होती. चीनने तैवान सीमेजवळ लष्करी कुमकही तैनात केली आहे.
नोकरभरती पुन्हा वादग्रस्त ; निवड प्रक्रिया लोकसेवा आयोगाकडून काढून घेण्याचा सरकारचा घाट :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील वाढता ताण, नोकरभरती वाढविण्याची बेरोजगार तरूणांची मागणी आणि विविध विभागातील रिक्त पदांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील दुय्यम सेवा निवड मंडळे पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली शिंदे- फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत. दोन दशकांपूर्वी या दुय्यम सेवा निवड मंडळांद्वारे केल्या जाणाऱ्या नोकरभरती प्रक्रियेत अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे घोटाळे उघड झाल्यामुळे ही मंडळे बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे ही मंडळे पुन्हा कार्यान्वित केल्यास नोकरभरतीमध्ये पारदर्शकता राहील का, ही भीती व्यक्त होत आहे.
राज्यात विविध विभागांतील सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. राज्यातील विविध शासकीय विभागात १० लाख ७० हजार मंजूर पदांपैकी आठ लाख २६ हजार पदे भरली गेली असून सुमारे २०-२२ टक्के म्हणजेच अडीच लाख पदे रिक्त आहेत. यातील सुमारे २५ ते ३० हजार पदे राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील असून उर्वरित पदे राज्य सरकारमार्फत भरण्यात येतात. त्यामुळे एकीकडे रिक्त पदामुळे प्रशासनावर ताण पडत असून दुसरीकडे लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.
अनेक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे दुय्यम सेवा निवड मंडळातील घोटाळे उघड झाल्यानंतर जून १९९९मध्ये दुय्य्म सेवा निवड मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर जिल्हााधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांच्या माध्यमातून किंवा विभागाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जात होती. मात्र यातही गोंधळ आणि भरतीला विलंब होत होऊ लागल्यानंतर मार्च २०१८ मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यातही घोटाळे झाल्याचे उघडकीस आल्याने नोकरभरती नेमकी कशी करायची यावरून संरकारची चिंता वाढली होती.
पवार, शिंदे, फडणवीस दिल्लीत येणार एकत्र :
उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर एका व्यासपीठावर येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन दिल्लीत ७ ऑगस्टला होऊ घातले आहे. या निमित्ताने ही नेतेमंडळी एकत्र दिसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकले असले तरी अनेक जिल्ह्यात ते घटले आहे. शिवाय बांठिया आयोगाने ओबीसींची दाखवलेली लोकसंख्या फारच कमी आहे, ओबीसी संघटनांच्या मते ही लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे. त्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन होत असून उभय नेत्यांनी उपस्थित राहण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातून ओबीसी बांधव दिल्लीत दाखल होत असून शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : लॉन बॉल्स : महिला संघाला सुवर्णपदक :
भारतीय महिला संघाने मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव केला.
भारतीय संघात लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सेलिना आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश होता. यात लवली चौबेने भारतीय संघाची आघाडी सांभाळली, त्यानंतर पिंकी, सेलिना आणि तिर्की यांनी आपले कौशल्य पणाला लावले. या क्रीडा प्रकारात एखाद्या भारतीय संघांने अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
सुवर्णपदकाच्या या लढतीत भारतीय महिला संघाने ८-२ अशी आघाडी घेतली होती. पण, दक्षिण आफ्रिकेच्या महिला खेळाडूंनी कमालीची चिवट झुंज देत सामन्याची स्थिती ८-८ अशी बरोबरीत राखली. थाबेलो मुहान्गो, ब्रिजेट कलिटझ, एस्मे क्रुगर आणि जोहान्ना स्निमन या चौघींचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश होता.
भारतीय महिलांनी अखेरच्या तीन फेऱ्यात आपली कामगिरी उंचावली. या अखेच्या तीन फेऱ्यातील भारतीय महिलांची कामगिरी सोनेरी क्षणासाठी निर्णायक ठरली. दरम्यान, याच खेळातील तिहेरीतही भारतीय महिलांनी आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १५-११ असा पराभव केला.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : गुकेशचा शिरॉव्हवर धक्कादायक विजय ; भारत-ब संघाचा ; सलग पाचवा विजय :
युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अॅलेक्सी शिरॉव्हवर धक्कादायक विजयाची नोंद केली. या बळावर भारत-ब संघाने मंगळवारी खुल्या गटात स्पेनला २.५-१.५ असे नामोहरम केले.
अप्रतिम रणनीतीमुळे गुकेशने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद करताना भारत-ब संघाच्याही सलग पाचव्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. या विजयानिशी गुकेशने लाइव्ह रेटिंगमध्ये विदित गुजरातीला मागे टाकले. बी. अधिबाननेही दिमाखदार कामगिरी करताना ग्रँडमास्टर एडय़ुडरे इटूरिझगाला हरवले. निहाल सरिनने अँटन गुइजरला बरोबरीत रोखले. परंतु आर. प्रज्ञानंदने सांतोस लॅटासाकडून पराभव पत्करला. याचप्रमाणे भारत-अ आणि भारत-क संघांनी अनुक्रमे रोमानिया आणि चिली संघांवर २.५-१.५ अशा फरकाने विजय मिळवले.
महिला गटात भारत-अ संघाच्या सलग पाचव्या विजयात पुन्हा तानिया सचदेवने चमकदार विजयी कामगिरी केली. या संघाने फ्रान्सला २.५-१.५ असे हरवले. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैशाली यांनी आपापल्या लढतीत बरोबरीत सोडवल्या. भारत-ब संघाने जॉर्जियाकडून ०-३ अशा फरकाने पराभव पत्करला, तर भारत-क संघाने ब्राझिलशी २-२ अशी बरोबरी साधली.