चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ ऑक्टोबर २०२२

Date : 29 October, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून, सरकारची मोठी घोषणा :
  • मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणं, ही मध्यप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणारं देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे.

  • यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. एमबीबीएस किंवा मेडिकल यासारख्या शाखांचं शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिलं जाणार आहे, मात्र, विद्यार्थांना विषय समजून घेता यावा, यासाठी संबंधित विषयांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद केला जाणार आहे.

  • संबंधित योजनेची माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले, एमबीबीएस, मेडिकलनंतर नर्सिंग, डेंटल अशा अभ्यासक्रमाचं टप्प्याटप्प्याने अनुवाद करण्यात येणार आहे. यावर्षी एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीतून अनुवाद केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही अभ्यासक्रम मराठीत अनुवाद केले जातील. पुढील वर्षापासून विद्यार्थांना संबंधित पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण हे इंग्रजीतच असणार आहे. पण ते विद्यार्थांना समजण्यासाठी सोपं जावं म्हणून त्याचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

पोलिसांसाठी ‘एक देश, एक गणवेश’; सर्व राज्य सरकारांना पंतप्रधानांचा सल्ला, पण सक्ती नाही :
  • देशभरातील पोलिसांचा एकाच प्रकारचा गणवेश असावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. हा केवळ चिंतनासाठी ठेवलेला प्रस्ताव असून राज्यांवर लादण्याचा प्रयत्न नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘चिंतन शिबिरा’त पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले.

  • तरुणांची मने अतिरेकी आणि विघातक गोष्टींकडे वळवणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना केले. देशभरातील पोलिसांना एकाच प्रकारचा गणेवश असेल, तर त्याची मागणी वाढेल आणि अधिक चांगल्या दर्जाचे गणवेश तयार होऊ शकतील. शिवाय देशभरात कुठेही लोक पोलिसांना गणवेशावरून ओळखू शकतील. राज्ये त्यावर आपापल्या दलांची चिन्हे लावू शकतील, असे ते म्हणाले.

  • ‘‘तरुणांना भरकटवणाऱ्या, बंदुका किंवा लेखणीच्या माध्यमातून पसरणाऱ्या नक्षलवादाचा बिमोड केला पाहिजे. या शक्तींना मोठय़ा प्रमाणात आंतरराष्ट्रीय मदतही मिळते,’’ असा दावा त्यांनी केला. राज्यांनी आपले जुने कायदे काळानुसार बदलावेत आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कायदा आणि सुव्यवस्थेला असलेल्या वाढत्या आव्हानांचा मुकाबला करावा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. राज्यांनी इतरांच्या अनुभवातून शिकावे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारताच्या भल्यासाठी मोदींचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण -पुतिन :
  • रशियाचे भारतासोबत असलेले संबंध हे खास असल्याचे सांगत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘आपल्या देशाच्या भल्यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवत आहेत,’ असे पुतिन म्हणाले. येथील वैचारिक संघटना ‘वाल्डिया इंटरनॅशनल डिस्कशन क्लब’च्या बैठकीत ते बोलत होते.

  • लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासोबत सहकार्य सुरूच असल्याचे सांगून पुतिन म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये अनेक दशकांपासून  विशेष संबंध आहेत. भारतासोबत आमचा कोणत्याही मुद्दय़ावर कधीच वाद नव्हता. आम्ही नेहमीच एकमेकांना साथ देत आलो आहोत आणि भविष्यातही हे असेच राहील याबाबत मी आशावादी आहे.’ भारतासारख्या देशांना  उज्ज्वल भवितव्यच आहे असे नव्हे, तर त्यांचे जागतिक महत्त्व वाढत जाणार आहे, अशी पुष्टीही पुतिन यांनी जोडली.

  • जगभरात भारताकडे सन्मानाने बघितले जाते. ही  खऱ्या अर्थाने सर्वात मोठी लोकशाही आहे. चांगल्या विकासदराचा त्या देशाला अभिमान असायला हवा.

खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा : महाराष्ट्राच्या आकांक्षा व्यवहारेचे तीन राष्ट्रीय विक्रम :
  • खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शुक्रवारी मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेने ४० किलो वजन गटात दहा महिन्यांपूर्वीच नोंदवलेला आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. केंद्र सरकारच्या ‘टॉप्स’ योजनेची सदस्य असलेल्या आकांक्षाने स्नॅचमध्ये ६० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ७१ किलो असे एकूण १३१ किलो वजन उचलले. स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही विभागांमध्ये आकांक्षाने राष्ट्रीय विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे आकांक्षाने जानेवारी २०२२ मध्ये (५८ + ६९ = १२७ किलो) नोंदवलेला आपलाच विक्रम मोडला.

  • ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूला आदर्श मानणाऱ्या आकांक्षाने यापूर्वी जागतिक युवा स्पर्धेत रौप्य आणि आशियाई युवा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. वयाच्या १३व्या वर्षांपासून वेटलिफ्टिंगकडे वळलेल्या आकांक्षाने काका प्रवीण व्यवहारे यांच्याकडे वेटलिफ्टिंगचे धडे घेतले. करोनाच्या काळानंतर पतियाळा येथे २०२१मध्ये झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले.

  • त्यानंतर भुवनेश्वर येथे या वर्षी जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाने सर्वप्रथम विक्रमाची नोंद केली होती. महाराष्ट्राच्याच सारिका शिनगारेने वरिष्ठ गटातील ४५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. तिने स्नॅचमध्ये ६४ आणि क्लीन अँड जर्कमध्ये ८७ किलो असे एकूण १५१ किलो वजन उचलले.

२९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.