चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ ऑक्टोबर २०२०

Date : 29 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती :
  • बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची  सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली  आहे.

  • माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • वैवेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

  • शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं :
  • भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल. २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे १० कोटी डोस बनून तयार होतील. पुणेस्थित सिरम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.

  • “‘कोविशिल्ड’ लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. “यूकेने त्यांचा डाटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे” असे अदर पूनावाला म्हणाले.

  • सिरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर सिरम इन्स्टिट्यूट करोना व्हायरसवर अन्य लशींच्या उत्पादनावरही काम करत आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त लशींचे उत्पादन सुरु आहे. त्यात ३८ लशी मानवी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत.

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला महत्वाचा निर्णय :
  • दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार जास्तीच्या एसटी बसची वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

  • या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. असे देखील आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

  • एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन, दरवर्षी नियमीत बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. त्यानुसार यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन केले गेले आहे. अर्थात, राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्यासर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करत, सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले गेले आहेत.

शिक्षा पूर्ण केलेल्या भारतीय कैद्यांना परत पाठवा - इस्लामाबाद न्यायालय :
  • दहशतवाद व हेरगिरीच्या प्रकरणांत शिक्षा पूर्ण केल्यानंतरही काही भारतीयांना कैदेत ठेवल्याबद्दल इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी पाकिस्तान सरकारची कानउघाडणी केली आणि त्यांना परत पाठवण्याचा आदेश दिला, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

  • आठ भारतीय नागरिकांनी सुटकेसाठी केलेल्या याचिकांची सुनावणी करताना अंतर्गत मंत्रालयाच्या प्रतिनिधीने इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला यांना अहवाल सादर केल्याचे वृत्त ‘जिओ न्यूज’ने दिले.

  • पाच भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तान सरकारने २६ ऑक्टोबरला त्यांची सुटका केली व त्यांना मायदेशी परत पाठवले, अशी माहिती पाकिस्तानचे एक उप- अ‍ॅटर्नी जनरल सैयद मोहम्मद तय्यब शाह यांनी न्यायालयाला दिली.

कोणी तयार केलं आरोग्य सेतू अ‍ॅप?; अखेर सरकार म्हणालं :
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’चा वापर करावा, असा आग्रह धरणारे केंद्र सरकार या अ‍ॅपच्या निर्मात्याबाबत अनभिज्ञ असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ (एनआयसी) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, यावरून झालेल्या टीकेनंतर मात्र हे अ‍ॅप कोणी तयार केलं याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी-सरकारी भागीदारीद्वारे विक्रमी वेळेत (२१ दिवस) आरोग्य सेतू अ‍ॅप ‘एनआयसी’द्वारे विकसित करण्यात आले. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून, अतिशय पारदर्शक पद्धतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले, असे स्पष्टीकरण इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिले. हे अ‍ॅप सुमारे १६.२३ कोटी जणांनी वापरले असून, करोनाविरोधी लढयास मदत झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  • ‘‘एनआयसी, इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय यांनी आरोग्य सेतू अ‍ॅपची रचना करण्याबरोबरच ते विकसित केल्याचा उल्लेख अ‍ॅपच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. मग, या अ‍ॅपच्या निर्मितीबाबतची माहिती कशी नाही?’’, असा सवाल माहिती आयोगाने केला आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यानुसार माहिती देण्यात आडकाठी आणणे आणि उडवाउडवीची उत्तरे देणे यासाठी दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारण माहिती आयुक्त वनजा सरणा यांनी नोटिशीद्वारे केली आहे.

२९ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.