सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी, ६० धावा करताच त्याच्या नावावर होणार ‘या’ विक्रमाची नोंद
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे. या मालिकेतील उर्वरित तीन सामने कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खूप खास असणार आहेत. जर त्याने या मालिकेत ६० धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २००० हजार धावा करणारा भारताचा सर्वात वेगवान फलंदाज ठरेल.
सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी आहे
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ५५ सामन्यांच्या ५२ डावांमध्ये शानदार फलंदाजी करताना १९४० धावा केल्या आहेत. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील उरलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने आणखी ६० धावा केल्या तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जलद २००० धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. सध्या हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने टी-२०च्या ५६ डावात २००० धावा केल्या होत्या. दुसरीकडे, के.एल. राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. के.एल. राहुलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ५८ डाव घेतले होते.
भारताकडून सर्वात जलद टी-२० आंतरराष्ट्रीय २००० धावा करणारे खेळाडू
विराट कोहली, ५६ डाव
के.एल. राहुल, ५८ डाव
एमपीएससी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी… मुलाखतीच्या टप्प्यावर वैद्यकीय चाचणीच्या निर्णयात बदल
राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते.
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करून वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जूनमध्ये घेतला होता.
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी विभागीय मंडळांची स्थापना करणे, उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काही कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखतीच्या टप्प्यावर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी २०२३ पासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अरब राष्ट्रांशी संगनमत करून चीनची नवी खेळी!
Israel-Palestine conflict 2023 अलीकडेच २० नोव्हेंबर रोजी जगाचे लक्ष वेधणारी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनने आपल्या राजधानीत चार अरब राष्ट्रे आणि इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले. तसेच अरब आणि इस्लामिक ब्रदरहूडसाठी चीन लवकरात लवकर युद्धविराम होण्यासाठी प्रयत्न करेल असेही आश्वासन दिले. त्याच निमित्ताने चीनचा वाढता भू-राजकीय प्रभाव आणि पॅलेस्टिनींना असलेला दीर्घकाळ पाठिंबा यामागील कारणमीमांसा समजून घेणे हे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.
चीन आणि इस्लामिक प्रतिनिधींची भेट
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे पॅलेस्टाईन आणि चार मुस्लीम बहुसंख्य देशांचे परराष्ट्र धोरण अधिकारी २० आणि २१ नोव्हेंबर रोजी चीनला भेट देतील असे बीजिंगने आधीच घोषित केले होते. भेट देणाऱ्या शिष्टमंडळात वेस्ट बँक, सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त आणि इंडोनेशियामधील पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे परराष्ट्र मंत्री तसेच इस्लामिक सहकार्य संघटनेचे महासचिव यांचा समावेश होता. “भेटीदरम्यान, सध्याच्या पॅलेस्टाईन- इस्त्रायल संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी, तसेच नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि पॅलेस्टाईन समस्येचे न्याय्यपणे निराकरण करण्यासाठी अरब आणि इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाशी चीन सखोल संवाद आणि समन्वय साधेल हा या भेटीचा उद्देश होता, याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी त्याचवेळेस एका निवेदनात दिली होती.
७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यांनंतर इस्रायलने गाझामधील हमासला नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात १,२०० नागरिक मारले गेले आणि २४० जणांना ओलिस ठेवण्यात आले. तर गाझामध्ये, हमासच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या अथक हवाई बॉम्बहल्ला आणि जमिनीवरील कारवाईत तब्बल १२ हजाराहून अधिक नागरिक मारले गेले. दोन्ही बाजूंच्या मृतांमध्ये बहुतांश नागरिकच आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गाझा पट्टीवर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये आतापर्यंत साडेअकराहून अधिक नागरिक मारले गेले. तर २,७०० बेपत्ता झाल्याची नोंद आहे, अनेक जण ढिगाऱ्याखाल गाडले गेले आहेत. पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध हे इस्रायलचे पहिलेच युद्ध नाही, असे पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे परराष्ट्र मंत्री रियाद अल-मलिकी म्हणाले. “इस्रायलला हे त्यांचे युद्ध शेवटचे ठरावे, असे मनात आहे. म्हणजेच त्यांना पॅलेस्टाईनच्या ऐतिहासिक भूमीवर संपूर्ण नियंत्रण हवे आहे.”
केरळच्या राज्यपालांकडून प्रलंबित आठ विधेयके मंजूर
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या आठ विधेयकांवर मंगळवारी संमतीपर स्वाक्षरी केली. त्याचवेळी त्यांनी सात विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवली. मंजूर विधेयकांमध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य विधेयकाचा समावेश आहे. तर राखून ठेवलेल्या विधेयकांमध्ये वादग्रस्त विद्यापीठ सुधारणा विधेयकाचा समावेश आहे. राजभवनाने मंगळवारी याविषयी माहिती दिली.
राज्यपालांनी विधेयके मंजूर न करता प्रलंबित ठेवल्याची तक्रार करत केरळ सरकारने राज्यपालांच्या कार्यालयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर २४ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्यपालांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच पंजाब सरकारच्या अशाच याचिकेवर न्यायालयाने दिलेले निर्देश पाहण्यास सांगितले होते.
त्यामध्ये राज्यपालांना विधेयकाला संमती न देण्याचा अधिकार आहे, अनिश्चित काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचा नाही असे खंडपीठाने बजावले होते.राज्यपालांनी दोन विद्यापीठ सुधारणा विधेयकांबरोबरच लोकआयुक्त विधेयक, विद्यापीठ विधेयक २०२२ (राज्यपालांकडून कुलसचिवपद काढून घेण्याची तरतूद असलेले विधेयक) यांचा समावेश असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले.
होती निवृत्तीची तयारी, पण तीन दिवसांसाठी झाली बदली; अधिकारी दिल्लीत रुजू, वरिष्ठांना लिहिलं खरमरीत पत्र!
आपल्या कामाच्या पद्धतीमुळे अल्पावधीत अनेकदा बदली झालेल्या अधिकाऱ्यांची अनेक उदाहरणं आसपास आहेत. कधी वरिष्ठांना किंवा कधी आसपासच्या इतर लोकांना नकोशा झालेल्या व्यक्तीचीही बऱ्याचदा बदली झाल्याचं आपण बघतो. पण हा अल्पावधी म्हणजे किती असावा? तर आयुष्यभर रेल्वे विभागासाठी सेवा दिलेल्या एका ज्येष्ठ रेल्वे अभियंत्याची चक्क निवृत्तीआधी फक्त तीन दिवसांसाठी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे छत्तीसगडच्या बिलासपूर विभागातून निवृत्तीच्या तयारीत असणारा हा अधिकारी अवघ्या तीन दिवसांसाठी दिल्लीत रुजू झाला आहे. पण हा सगळा संताप या अधिकाऱ्यानं वरीष्ठांना एक खरमरीत पत्र लिहून त्यातून व्यक्त केला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
हा सगळा प्रकार छत्तीसगडच्या बिलासपूर रेल्वे विभागात घडला. के. पी. आर्या हे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे ज्येष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ते पदावरून निवृत्त होत आहेत. पण आख्खं आयुष्य सेवा दिलेल्या विभागातून निवृत्तीच्या तयारीत असणाऱ्या के. पी. आर्या यांना विभागानं कारकिर्दीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी छत्तीसगडहून थेट दिल्लीत बदली दिली आहे. त्यामुळे मंगळवारी आर्या शेवटच्या तीन दिवसांची सेवा देण्यासाठी दिल्ली कार्यालयात रुजू झाले!
बदली नव्हे, बढती!
दरम्यान, ही फक्त बदली नसून आर्या यांच्यासाठी बढती असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. वरच्या श्रेणीत त्यांची बदली करण्यात येणार असून बदली शुल्क म्हणून त्यांना अतिरिक्त तीन लाख रुपयेही देण्यात येणार आहेत. मात्र, त्यावर के. पी. आर्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी वरीष्ठांना एक खरमरीत पत्रच लिहिलं आहे.
“ही बदली म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आपलं आयुष्य रेल्वेसाठी दिलेल्या एका कर्मचाऱ्याची बदली करणं हा मूर्खपणा आहे. यामुळे माझे निवृत्तीनंतरचे कार्यालयीन सोपस्कार अवघड होऊन बसतील आणि त्याचा मला मनस्ताप होईल”, असं आर्या यांनी या पत्रात नमूद केलं आहे. पीटीआयनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
घानाची कोरियावर संघर्षपूर्ण मात :
जिगरबाज कोरियाचा कडवा प्रतिकार ३-२ असा मोडून काढत घानाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. येथील एज्युकेशन नॅशनल स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात कोरियन संघाचा प्रतिकार मोडून काढताना घानाच्या खेळाडूंची कसोटी लागली.
कमालीचा आक्रमक खेळ करणाऱ्या घाना संघाकडून मोहम्मद सालिसु (२४वे मिनिट) आणि मोहम्मद कुडुस (३४, ६८वे मिनिट), कोरियाकडून चो गुए सुंगने (५८, ६१वे मिनिट) दोन गोल केले.
घाना संघाने विजय मिळविला असला, तरी कोरियाच्या खेळाडूंनी त्यांना अखेरच्या मिनिटापर्यंत झुंजवले. सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटांच्या भरपाई वेळेतील कोरियाची आक्रमणे घानाच्या बचाव फळीवर नुसतीच दडपण आणणारी नाही, तर त्यांची धडधड वाढवणारी होती. मात्र, कोरियाला बरोबरी साधण्यात अपयश आले.
सामन्याच्या पूर्वार्धात जॉर्डन आयुच्या खेळाने घानाचे वर्चस्व राहिले. गोल करण्याच्या संधी निर्माण करणाऱ्या आयुच्या पासवर २४व्या मिनिटाला सालिसु, तर ३४व्या मिनिटाला कुडुसने गोल नोंदवून घानाला मध्यंतरापर्यंत २-० असे आघाडीवर कायम राखले होते.
प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड उभारण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश; वैद्यकीय मदतीसाठी होणार उपयोग :
राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करत असताना प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड तयार करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. भविष्यात या हेलीपॅडचा उपयोग वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू कराण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात पार पाडली. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि मान्यवरांसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे. तर शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती कपूर यांनी दिली.
विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचेही विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्यात यावं. त्यासाठी जागा निश्चित करावी. गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता आणि इतर वैद्यकीय मदतीसाठीदेखील या हेलीपॅडचा उपयोग होऊ शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात ‘सी- प्लेन’ सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
घटत्या लोकसंख्येमुळे जपान सरकार चिंताग्रस्त :
जपानमध्ये यावर्षी जन्मलेल्या बालकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा विक्रमी नीचांकी असल्याने सरकारी प्रवक्त्याने याचे वर्णन ‘गंभीर परिस्थती’ असे केले आहे. घटत्या जन्मदरामुळे जपानमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असून अधिक विवाह आणि मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचा निर्णय जपानच्या सरकारने घेतला आहे.
जपानमध्ये यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकूण ५,९९,६३६ बालकांचा जन्म झाला. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ४.९ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी ८,११,००० बालकांचा जन्म झाला होता. जपानमध्ये लोकसंख्येचा दर घसरत असल्याने जपानी सरकारने चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या वाढीसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आश्वासन जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी दिले.
जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र राहणीमानाचा खर्च जास्त आणि मंदावलेली वेतनवाढ अशी परिस्थती देशात आहे. बालके, महिला आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी सर्वसमावेशक समाज बनवण्यात जपानमधील पुराणमतवादी सरकार मागे पडले आहे. या सर्वाचा परिणाम लोकसंख्येवर झाला आहे. सरकारने गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपनासाठी सबसिडीची देयके आणि इतर योजना करूनही त्याचा मर्यादित परिणाम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड :
ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ गडी गमावून ३३० धावा केल्या आहेत.
या स्पर्धेतील शेवटच्या ८ डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. २५ वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे १३वे शतक आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील ४९ वे षटक टाकत होता. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे, त्याने एकाच षटकात ७ षटकार लगावत एकूण ४३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ४१ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. राहुल त्रिपाठी ९ आणि सत्यजीत ११ धावा करून बाद झाले. मात्र कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड एक बाजू सांभाळून खेळत राहिला. त्याने अंकित बावणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अंकित ५४ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला.