चालू घडामोडी आणि दिनविशेष - 29 जून 2023

Date : 29 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नैसर्गिक खतांना प्रोत्साहन, ‘पीएम-प्रणाम’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी युरियावरील अनुदानास तीन वर्षांची मुदतवाढ
  • रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा उपयोग वाढविण्यासाठी ‘पीएम-प्रणाम’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या योजनेंतर्गत मातीचा कस कायम राखणे आणि पर्यायी खतांच्या वापर वाढविणाऱ्या राज्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. याबरोबरच युरियाच्या वापरासाठी असलेल्या अनुदान योजनेला मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी ३.६८ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘पीएम-प्रणाम’ (पीएम प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन, जनरेशन, नरिशमेंट अँड अमेलिओरेशन ऑफ मदर अर्थ) या योजनेची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने या योजनेला मंजुरी दिल्याचे केंद्रीय रसायन व खतमंत्री मनसुख मंडाविया यांनी बैठकीनंतर सांगितले. पर्यायी खतांचा वापर सुरू करणाऱ्या राज्यांना त्या प्रमाणात प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. दुसरीकडे युरिया खताच्या वापरासाठी असलेली अनुदान योजना आणखी तीन वर्षे सुरू राहणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना २४२ ते २४५ रुपये प्रतिपिशवी दराने (कर आणि कडुलिंब लेपन खर्च वगळता) युरियाची खरेदी करता येईल. या योजनेकरिता २०२२-२३ आणि २०२४-२५ या वर्षांसाठी ३,६८,६७६.७ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी अलिकडेच जाहीर झालेल्या ३८ हजार कोटींच्या अनुदान योजनेचा समावेश नाही.

उसाच्या ‘एफआरपी’मध्ये १० रुपयांची वाढ

  • २०२३-२४च्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांद्वारे देय रास्त आणि किफायतशीर दरामध्ये (एफआरपी) प्रतिक्विंटल १० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यंदा प्रतिक्विंटल ३१५ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक, साखर कारखाने आणि ५ लाख कामगारांना होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. केंद्र सरकार शासन उसाच्या एफआरपीमध्ये सातत्याने वाढ करीत असल्याचेही ते म्हणाले.

अनुदान कसे मोजणार?

  • ’एखाद्या राज्यात १० लाख टन पारंपरिक खतांचा वापर केला जातो.
  • ’त्या राज्याने ३ लाख टनांनी वापर घटविण्याचे ठरविल्यास ३ हजार कोटी रुपयांची अनुदान बचत होईल
  • ’याच्या ५० टक्के, म्हणजे
  • १,५०० कोटी रुपये पर्यायी खतांच्या अनुदानासह अन्य विकासकामांसाठी केंद्राकडून त्या राज्याला दिले जातील
“पुण्यापेक्षा जास्त सुविधा नागपुरात, तरीसुद्धा…”, WC 2023 मधील सामन्यांच्या आयोजनावर माजी मंत्र्याची नाराजी; म्हणाले…
  • एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार विश्वचषक स्पर्धेचे सामने भारतात एकूण १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. परतु विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना नागपुरात खेळवला जाणार नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख म्हणाले, नागपुरात विश्वचषक स्पर्धेचा एकही सामना खेळवला जाणार नाही ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे.
  • अनिल देशमुख म्हणाले, विश्वचषक स्पर्धेचे मुंबईत, पुण्यात, अहमदाबादसह संपूर्ण भारतात सामने खेळवले जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील केवळ दोन शहरांचा म्हणजेच मुंबई आणि पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यात एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. परंतु नागपुरात एकाही सामन्याचं आयोजन केलेले नाही. नागपूर हे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी अद्ययावत सुविधा आहेत. नागपूरचं स्टेडियमही खूप सुंदर आहे. नागपुरात सामना असेल तर विदर्भाव्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातले लोक सामने पाहायला येतात.
  • अनिल देशमुख म्हणाले सर्व सोयी सुविधा असताना, उत्तम स्टेडियम असताना नागपूरला डावलण्यात आलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे आमची सर्व विदर्भवासियांची विनंती आहे की, त्यांनी याबद्दल फेरविचार करावा. जे सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत त्यातले काही सामने कमी करून ते नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात यावेत. असं केल्यास इथल्या जनतेला आनंद होईल.
  • अनिल देशमुख म्हणाले, पुण्यातल्या स्टेडियमवर जितक्या सुविधा आहेत तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त सुविधा नागपुरात आहेत. तसेच इथल्या स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता जास्त आहे. हे नवीन स्टेडियम आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि काही सामने नागपूरला खेळवण्यात यावेत. यासाठी मी बीसीसीआयला पत्र लिहून विनंती करणार आहे. देशमुख टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“समृद्धी महामार्ग बांधला राज्याने, लोक अपघातांबाबत प्रश्न विचारतात मला”; वाचा, गडकरी नेमके काय म्हणाले
  • नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. या अपघातांची कारणे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मते विचारली जात आहेत. काहींच्या मते, रस्ता बांधकामात दोष आहे तर काहींनी वेग मर्यादा यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
  • यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न विचारतात. हा महामार्ग बांधणारी ‘एमएसआरडीसी’ या संस्थेचा संस्थापक मीच आहे. या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे.
  • हा राज्याचा प्रकल्प आहे. येथे केंद्राचा संबंध नसला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे”, असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.
पंढरपूर : वारकऱ्यांच्या भक्तीने पंढरी सजली, आषाढीसाठी ८ ते ९ लाख भाविक
  • एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा सुरवातीला उन्हाचा तडाका त्याच वेळी लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून आली. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी विठ्ठलाची दर्शन रांग पत्रा शेड १० च्या पुढे गेली होती. शेवटच्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १४ ते १५ तास लागत असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
  • पावलो पंढरी पार नाही सुखा … भेटला हा सखा मायबाप …. या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण झाली. यंदा पावसाने ओढ काढल्याने यात्रेवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुरू झाली आहे. परिणामी प्रशासनाने जो अंदाज व्यक्त केला. त्यापेक्षा कमी भाविक दाखल झालेत. असे असले तरी येथील मठ, धर्मशाळ, लॉज, मोकळे पटांगण जिथे जागा मिळेल तिथे भाविकांच्या राहुट्या, तंबू, पहावयास मिळत आहे. तसेच शहरातील मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यावर भाविकांची वरदळ आहे. सर्वत्र भजन, कीर्तन, हरिनामाच्या गजराने नगरी दुमदुमून निघाली आहे.
  • मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेड उभे केले आहेत. या शिवाय आरोग्य, पिण्याचे पाणी, नाष्टा दिला जात असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘माउली पथक’ पोलीस प्रशासनाने तैनात केले आहे. यंदा जादा एस.टी बसेस सोडण्यात आल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त दिसून आली. आरोग्य विभागाच्या महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे ५ वाजता रांगेत उभा होतो सायंकाळी साडेपाच वाजता दर्शन झाले, असे पालघर येथील एका भाविकाने सांगितले.
राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची लवकरच स्थापना, संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाची संशोधन क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान या नव्या निधीपुरवठा संस्थेची स्थापना करण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान विधेयक-२०२३ हे संसदेच्या आगामी अधिवेधनात आणले जाईल. विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा-२००८ची जागा हे नवे विधेयक घेईल, असे ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयक सादर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सरकारने २०२७-२८ पर्यंत संशोधनासाठी ५० हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. या रकमेपैकी सरकार पुढील पाच वर्षांत १४ हजार कोटी रुपये थेट उपलब्ध करून देईल, तर उर्वरित ३६ हजार कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, उद्योग, प्रतिष्ठान आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जमा केले जातील, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

प्रतिष्ठान कसे असेल?

  • राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान या संस्थेत १५ ते २५ प्रख्यात संशोधन आणि व्यावसायिकांचा समावेश असलेले प्रशासकीय मंडळ असेल. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतील.
  • प्रस्तावित प्रतिष्ठानमध्ये प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या अधिपत्याखाली एक कार्यकारी परिषद असेल.
  • संशोधन आणि विकासाची वृद्धी होण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि संशोधन व विकास प्रयोगशाळांमध्ये नवसंशोधनाची संस्कृती वाढविण्यावर भर दिला जाईल.
  • या प्रतिष्ठान तर्फे नवीन गरजांवर आधारित संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाईल. आंतर-विषय संशोधनाला चालना दिली जाईल.
  • नैसर्गिक विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, पर्यावरण व पृथ्वी विज्ञान आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रांतील संशोधनास मदत केली जाईल.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार देशातील वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान ही सर्वोच्च संस्था असेल.

 

भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीचे मोदींचे आवाहन :
  • भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते. भारतासारखा मोठा देश जेव्हा अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो, तेव्हा इतर विकसनशील देशांनाही प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ उदयास येत असून जी -७ देशांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

  • जर्मनीत आयोजित केलेल्या ‘जी-७ परिषदे’च्या निमित्ताने मोदी यांनी हवामान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत भारत करीत असलेल्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कॉल्झ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रॅम्फोसा यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.

  • जी -७ परिषदेतील ‘उत्तम भविष्यातील गुंतवणूक: हवामान, ऊर्जा, आरोग्य’ या विषयावरील सत्रात मोदींनी भारताच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. भारताने अ-जीवाश्म स्त्रोतांमार्फत ४० टक्के ऊर्जा-क्षमतेचे लक्ष्य नऊ वर्षे आधीच गाठल्याचे मोदी यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य भारताने पाचमहिने आधीच गाठले. पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जगातील पहिला विमानतळ भारतात आहे, असेही मोदी यांनी म्हणाले.

  • भारतासारखा देश अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो तेव्हा त्याच्याकडून विकसनशील देशांना प्रेरणा मिळते. म्हणून जी -७ मधील श्रीमंत देश भारताला याबाबतीत पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.

देशात अंतराळ प्रक्षेपण क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले :
  • राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (इन-स्पेस) अंतरिक्ष क्षेत्रात प्रक्षेपणासाठी खासगी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला हे दालन खुले झाले आहे. भारतातील खासगी उद्योगांना अंतराळ क्षेत्रात प्रोत्साहन, त्यांना अधिकृत मान्यता आणि त्यांच्यावर नियंत्रण व देखरेखीसाठी ‘इन-स्पेस’ ही स्वायत्त संस्था स्थापण्यात आहे.

  • ‘इन-स्पेस’ने सोमवारी एका निवेदनाद्वारे सांगितले, की हैदराबादच्या ‘ध्रुव स्पेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि बंगळुरूच्या ‘दिगंतर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांना अंतराळ प्रक्षेपणास मंजुरी दिली. ‘ध्रुव स्पेस’च्या ‘ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर’ व ‘दिगंतर रिसर्च’च्या ‘रोबस्ट इंटिग्रेटिंग प्रोटॉन फ्लुएन्स मीटर’ (रोबी) या दोन उपकरणांना (‘पेलोड’) प्रक्षेपणास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांना ‘पीएसएलवी-सी५३’ च्या ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मोडय़ूल’द्वारे (पीओईएम) ३० जूनला प्रक्षेपित केले जाणार आहे.

  • ‘इन-स्पेस’चे अध्यक्ष पवनकुमार गोयंका म्हणाले, ‘‘इन-स्पेसद्वारे पहिल्या दोन प्रक्षेपणांना मान्यता मिळणे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  भारतातील खासगी क्षेत्राद्वारे अंतराळ प्रक्षेपणाचे नवे युग सुरू होणार आहे.  ‘ध्रुव स्पेस’ व ‘दिगंतर रिसर्च’ हे अंतराळ तंत्रज्ञान नवउद्योग (स्टार्टअप) आहे.  ‘पीएसएलव्ही-सी५३’ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) ५५ वी मोहीम आहे. ३० जूनला हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी सहाला प्रक्षेपित केले जाणार आहे.’’

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा :
  • रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • रिलायन्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. २७ जूनला मुकेश अंबानी यांनी तात्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.

  • रिलायन्स संचालक मंडळाने आकाश अंबानी यांच्याशिवाय इतरही काही नियुक्तीचे निर्णय घेतले आहेत. यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी आहे. रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा :
  • सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी लवकरच दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली. येथे ते गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (कृषी बँक) ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते.

  • शहा यांनी सांगितले, की आता सहकार क्षेत्र या सरकारी योजनांशी जोडले जाईल. त्यामुळे सरकारचा सर्वसामान्य व्यक्तींशी सर्वदूर व थेट संपर्क वाढेल. आतापर्यंत सरकारच्या आधार कार्ड-एटीएम-मोबाईलद्वारे थेट लाभ हस्तांतरण योजना (जेएएम-डीबीटी) राबवण्यात सहकार क्षेत्राचा संबंध नव्हता. परंतु आता सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  • शहा म्हणाले, की ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (डीबीटी) योजनेतून निधी सरकारकडून जन धन खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या (जेएएम) समन्वयातून लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. सरकारी अनुदानाशी संबंधित अनियमितता दूर करण्यासाठी सरकार जन धन खाते, आधार आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी जोडू इच्छित आहे. सध्या ५२ मंत्रालये ‘जेएएम’द्वारे लाभार्थीना मदत करण्यासाठी ‘डीबीटी’ अमलात आणत आहेत. अशा प्रकारे सुमारे ३०० सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जाते. या वेळी त्यांनी थकबाकीदारांकडून १९० कोटी रुपये वसूल केल्याबद्दल गुजरातच्या या सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाचे कौतुकही केले.

  • आता सहकार क्षेत्र सरकारी योजनांशी - जोडले जाईल. त्यामुळे सरकारचा सर्वसामान्य व्यक्तींशी सर्वदूर व थेट संपर्क वाढेल. सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजना राबविल्या जातील.

तेलंगणात शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना :
  • तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५८६ कोटी ६५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

  • शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना राबविणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य ठरले असून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही कधी अशी योजना राबविलेली नाही, असे रेड्डी म्हणाले. शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांच्या खरेदीसाठी राज्य सरकार प्रतिएकर प्रतिहंगाम पाच हजार रुपये देते.

ईऑन मॉर्गन निवृत्त :
  • ईऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सात वर्षांहून अधिक काळानंतर सोडले.

  • २०१५च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९ मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. त्याच्या नेतृत्व कारकीर्दीतच इंग्लंड संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात अग्रस्थान पटकावले.

  • मॉर्गनच्या संघाने गेल्या आठवडय़ात नेदरलँड्सविरुद्ध ४ बाद ४९८ अशी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या तीन सर्वोच्च धावसंख्या या मॉर्गनच्याच इंग्लंड संघाच्या नावावर आहेत. गेल्या दीड वर्षांत पस्तिशीच्या मॉर्गनची तंदुरुस्ती आणि लय ढासळल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

  • ‘‘हा निर्णय सोपा नव्हता. परंतु हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते,’’ असे मॉर्गनने सांगितले. २०१०मध्ये इंग्लंडने ट्वेन्टी-२० क्रिकेटचे विश्वचषक जिंकले. या संघातही मॉर्गनचा समावेश होता. मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय (२२५) आणि ट्वेन्टी-२० (११५) सामने खेळला आहे. याचप्रमाणे याच प्रकारातील सर्वाधिक धावासुद्धा त्याच्या खात्यावर आहेत.

29 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.