एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला -
रियान परागने ११ षटकार आणि ५ चौकारांचा पाडला पाऊस -
फिरता निधी दुप्पट
मानधनात दुपटीने वाढ
रशियाच्या युक्रेनविरोधातील लष्करी कारवाईमुळे जागतिक अन्नधान्य दरांत वाढ झाल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळला आणि या समस्येचे मूळ पाश्चिमात्य देशांच्या ‘आर्थिक चुकां’मध्ये हे असल्याचा प्रत्यारोप केला.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय चमूचं नेतृत्व केलं.
२८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे. १९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.
यावेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.
भारत १८ व्यांदा या खेळांचा भाग बनत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगारांची सुरु असलेली धडपड गेल्या आठ वर्षांमध्येही बघायला मिळाली असली तरी अवघ्या एक टक्क्यांपेक्षा कमी अर्जदारांची स्वप्नपूर्ती झाल्याचं समोर आले आहे. २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत २२.०५ कोटी अर्ज सरकारी नोकरीसाठी प्राप्त झाले, परंतु त्यातल्या अवघ्या ७.२२ लाख किंवा ०.३३ टक्के अर्जदारांना केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.
पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली. नोकरीसाठी २०१९-२० या वर्षी सर्वात जास्त म्हणजे १.४७ लाख अर्जदारांची सरकारी नोकरीसाठी शिफारस करण्यात आली. करोनाचा उद्रेक व्हायच्या आधीचे हे वर्ष होते. आठ वर्षांमधील एकूण भरतीपैकी म्हणजे ७.२२ लाख पैकी सुमारे २० टक्के भरती याच वर्षी झाली, योगायोग म्हणजे त्याच वर्षी निवडणुकाही होत्या.
सर्वसाधारण कल असा दिसतो की, २०१९-२० चा अपवाद वगळता २०१४-१५ पासून सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीचे प्रमाण घटत आहे. २०१५-१६ मध्ये १.११ लाख, २०१६-१७ मध्ये १.०१ लाख, २०१७-१८ मध्ये ७६,१४७, २०१८-१९ मध्ये ३८,१०० व २०२१-२२ मध्ये ३८,८५० जणांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांमध्ये अवघ्या ७.२२ लाख भारतीयांना सरकारी नोकरीत भरती केलेले असताना १४ जूनला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १८ महिन्यांमध्ये १० लाखांना ‘मिशन मोड’ मध्ये रोजगार दिला जाईल अशी घोषणा केली. सर्व खात्यांमधील व मंत्रालयातील मानवी बळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
जितेंद्र सिंह यांनी संसदेत सादर केलेली माहिती दर्शवते की २०१४ पासून तब्बल २२.०५ कोटी लोकांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता, यातील सर्वात जास्त म्हणजे ५.०९ कोटी अर्ज २०१८-१९ या वर्षी करण्यात आले. तर सगळ्यात कमी म्हणजे १.८० कोटी अर्ज २०२०-२१ या वर्षी प्राप्त झाले.
भारतातील बुद्धिबळ महोत्सवाला प्रारंभ झाला असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या मान्यवरांच्या उपस्थित बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
‘‘बुद्धिबळ या खेळाला ज्या भूमीत सुरुवात झाली, तिथे प्रथमच ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून त्याच वर्षी ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवणे, हे भारतासाठी खास यश आहे,’’ असे पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळय़ातील भाषणात म्हणाले.
उद्घाटन सोहळय़ात भारत आणि तमिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. तसेच भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ऑलिम्पियाड क्रीडाज्योत स्टॅलिन आणि मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश युवा ग्रँडमास्टरांसह भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर एस. विजयालक्ष्मी यांनी ही क्रीडाज्योत हाती घेतली.
‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वार्कोव्हिच उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवल्याबद्दल त्यांनी तमिळनाडू सरकारचे आभार मानले. ‘‘ऑलिम्पियाड ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून एक उत्सव आहे. या स्पर्धेमुळे सर्वत्र सकारात्मक वातावरण होते,’’ असेही द्वार्कोव्हिच म्हणाले. या सोहळय़ाला प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हेसुद्धा उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांचेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
निवडणुकांमध्ये तरुणांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने निवणूक आयोग प्रयत्न करत आहे. त्यानुसार आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून १७ वर्षे पूर्ण झालेले तरुण मतदार यादीत आगाऊ नोंदणी करू शकतात. मात्र मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाच मिळणार आहे.
पूर्वी एक जानेवारी किंवा त्याअगोदर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास पात्र ठरत होते, तर एक जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी एक वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती. निवडणूक कायद्यातील बदलानंतर एक जानेवारी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबरला १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करता येते.
निवडणूक आयोगाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने तरुणांना मतदार आगाऊ अर्ज करण्यासाठी राज्यांमध्ये निवडणूक यंत्रणा तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करण्याची सूचना केली आहे.
‘‘यापुढे मतदार यादी दर तीन महिन्यांमध्ये अद्ययावत करण्यात येणार असून पात्र तरुणांची त्या वर्षीच्या पुढील तीन महिन्यांत मतदार म्हणून नोंदणी होणार आहे’’, असे निवडणूक आयोगाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गैया गृहितकाची मांडणी करणारे आणि पर्यावरण वैज्ञानिक जेम्स लव्हलॉक यांचं १०३ व्या वाढदिवसाला निधन झालं. मंगळवारी घरीच त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. लव्हलॉक हे यूकेच्या सर्वात प्रतिष्ठित स्वतंत्र शास्त्रज्ञांपैकी एक होते. १९६० च्या दशकाच्या मध्यापासून ते एकटेच त्यांच्या प्रयोगशाळेत विविध प्रयोग करायचे आणि हवामानाचे अंदाज बांधत होते. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली होती. द गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार, वयाची शंभरी ओलांडल्यावरही ते काम करत होते आणि सहा महिनेआधीपर्यंत त्यांची तब्येत उत्तम होती.
लव्हलॉक यांच्या कुटुंबाने सांगितले: “आमच्या प्रिय जेम्स लव्हलॉक यांचे काल त्यांच्या 103 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंबीय जमलेले असतानाच निधन झाले. ते जगात पर्यावरण वैज्ञानिक, हवामानाचा संदेश देणारे आणि गैया गृहितकाचे निर्माते म्हणून ओळखले जात होते. पण आमच्यासाठी ते एक प्रेमळ पती आणि कुतूहलाची अमर्याद भावना, विनोदी सेन्स ऑफ ह्युमर असलेली व्यक्ती आणि निसर्गाची आवड असलेले एक वडील होते.”
“सहा महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांची तब्येत चांगली होती. ते डोरसेटमधील त्यांच्या घराजवळील किनारपट्टीवर फिरू शकत होते, मुलाखतींमध्ये भागही घेऊ शकत होते, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची तब्येत खराब झाली होती. काही शारीरिक गुंतागुंतीमुळे मंगळवारी रात्री 9.55 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खासगीत केले जातील, नंतर सार्वजनिक स्मारक बांधलं जाईल. अशा या दुःखाच्या वेळी कुटुंबीयांचं खासगीपण जपण्यात यावं,” अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.