चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जुलै २०२१

Updated On : Jul 29, 2021 | Category : Current Affairs


राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त :
 • गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

 • अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

 • ‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले.

 • सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.

‘एमपीएससी’ भरती प्रक्रियेला गती :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागांना बुधवारी दिले.

 • ‘एमपीएससी’कडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, ‘एमपीएससी’च्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते.

 • करोना संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. ४ मे २०२१ आणि २४ जून २०२१च्या निर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते.

 • ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून या दोन निर्णयांतून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी :
 • कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 • कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे.

 • कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.

चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह :
 • चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 • लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे.

 • चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते.

 • अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.

मेडल जिंका आणि आयुष्यभर विनामूल्य तिकिटे मिळवा; ऑलिम्पिक खेळाडूंसाठी Inox ची घोषणा :
 • भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी, देशातील प्रत्येकजण खेळाडूंनी पदक जिंकावं म्हणून प्रार्थना करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

 • अलीकडेच मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर पिझ्झा कंपनी डोमिनोसने आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देण्याची घोषणा केली. आता याच भागात, देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयनॉक्सनेही एक मोठे पाऊल उचलले आहे.

 • मंगळवारी आयनॉक्सने घोषित केले की, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू आयुष्यभर फ्री चित्रपट पाहू शकतील. त्याचबरोबर, संघातील सर्व सदस्यांना १ वर्षासाठी चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाईल. म्हणजेच, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या कोणत्याही खेळाडूला आयुष्यासाठी आयनॉक्सकडून विनामूल्य चित्रपटाचे तिकीट मिळेल. याव्यतिरिक्त, टोक्योला गेलेल्या क्रीडापटूच्या संपूर्ण संघाला आयनॉक्सकडून एक वर्षासाठी विनामूल्य चित्रपटाची तिकिटे दिली जातील.

स्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात :
 • राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 • ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे.

 • यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

 • या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

२९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)